7/23/08

गुंता

काही लोक आपल्यावर इतकं प्रेम करतात की त्याची भीती वाटावी! उदाहरणार्थ माझी आजी- मी पुण्याला शिकायला गेल्यावर जवळजवळ ४ महिने माझा आवाज फोनवर ऐकला की रडायची. तिच्या मैत्रिणींनी तर मला आल्यावर सांगितलं, की तू गेलीस म्हणून आजी आजारी पडली. नको वाटायचं ते प्रेम त्या वयात. नवीन आयुष्य, नवीन मैत्रिणींच्या सहवासात रमलेली मी, मला वाटायचं आजी आपल्यावर इतकी कशी emotionally dependent??? मी आजीला सरळ सांगितलं, “मी येते ना दर दोन महिन्यांनी घरी, मग तू कशाला वाईट वाटून घेतेस?” मग तिला हळूहळू सवय झाली. मी हुश्श केलं. आता थोडे दिवसांपूर्वी नोकरीसाठी माझा लहान भाऊ घराबाहेर पडला, तर झाली पुन्हा हिची रडारड सुरू...!

लग्न झालं, तेव्हा निदान माहेरच्यांनी तरी स्वीकारलं, की मुलगी आता सासरी जाणार. तर सासरी गेल्यावर तिथेही same story!!! माझा नवरा गेला प्रथम अमेरिकेला, तेव्हा माझ्या सासूबाईंनी येवढं लावून घेतलं होतं, की त्यांना म्हणे डायबेटिसचा त्रास सुरू झाला... मग आमचं लग्न झाल्यावर दोघं एकदा अमेरिकेत येऊन छान ६ महिने राहून गेले, तरी आता फोनवर, “तुम्ही कधी येताय? तुम्ही कधी येताय?”.

कधीकधी वाटतं, घरच्या लोकांच्या प्रेमाखाली गुदमरून आपल्या स्वत:च्याच भावना बोथट होतायत का काय? त्यांनी शंभरवेळा आठवण काढली, तर आपण एकदा हळुच म्हणायचं, “हो ना, आम्हाला पण आता इंडिया ट्रीपचे वेध लागलेत.” खरं तर गेल्या गेल्या नातेवाईकांचे फोन, ५० माणसांचा गराडा, ह्या सगळ्याची कल्पना आत्तापासूनच नकोशी वाटतेय. नवरा तर हल्ली माणूसघाणाच झालाय- त्याला फोनवर कोणाशी बोलायलाच नको असतं. म्हणजे reporting ची जबाबदारी आली का नाही आपसूक माझ्यावर X( X(

सद्सद्विवेकबुद्धीमुळे कितीही लपवलं, तरी खरं म्हणजे घरच्यांची, त्यांच्या भाबड्या प्रेमाची, त्यांच्या चुकीच्या इंग्रजी व्याकरणाची, लाजच वाटत असते बरेचदा मनात. आमचे बाबा एकदा बोलायला लागले, की थांबतच नाहीत! अमेरिकेत आल्यावर सासूबाईंचं सारखं इथल्या अमेरिकन जेवणाला नावं ठेवणं चाललेलं असतं. आईने कॉईलवर ठेवून माझा प्लॅस्टिक स्पॅट्यूला जाळला! एक ना अनेक. घरच्यांपासूनच पळून जावसं वाटण्याइतके बेरड झालेलो असतो आपण....

आणि मग मध्यरात्री एक स्वप्न पडतं- रात्री वाचायला मी टेबललॅम्प लावला, तरी, “मी डोळ्यावर पदर ठेवला, की मला नाही त्रास होत,” म्हणणारी आजी. मी शाळेतून येईपर्यंत दुपारी जेवायला थांबलेली, माझ्यासाठी पहाटे उठून माझ्या बरोबर मागच्या दाराच्या पायरीवर बसून कॉफी पिणारी. बाबा, “तू वेबकॅमवर दिसलीस की बरंSSS वाटतं,” म्हणणारे. आजोबा, गुपचुप चॉकलेट आणून देणारे. सासूसासरे, “तो काही नीट फोनवर बोलत नाही. तुझ्याशी बोलल्याशिवाय समाधान होत नाही.” म्हणणारे.

माझ्याच खोल अंतरंगात जो जिव्हाळा मी दडपून ठेवला होता, तो freudian slip सारखा उफाळून आल्याची जाणीव. Practical होऊन किती easily जगत असतांनाच हा impractical भावनांचा नाकारलेला गुंता! दोघांच्या संसारातच ४ दिवस सलग स्वयंपाक केला की ५व्या दिवशी कंटाळा येणारी मी. ते लोक इथे आले, तर माझीच कामं वाढणार, आणि शिवाय, “तुम्ही मुली कित्ती पसारे घालता! सकाळी लवकर उठायला नको, आवरायला नको!” असली मुक्ताफळं ऐकावी लागणार, ह्याचं एकीकडे कायम टेन्शन.

आणि दुसरीकडे, छोट्या छोट्या गोष्टीत हळवं होणारं मन. काल काय, एका मित्राच्या धाकट्या भावाने मला, “ताई, पाणी देतेस का?” म्हटलं. परवा काय, माझ्या मैत्रिणीच्या गोडुल्या बेबीला मी दिलेला फ्रॉक घालतांना ती म्हणाली, “ये देखो, तुम्हारी मौसीने दिया है!” ही मी, आणि ती पण मीच? मग खरी मी कोणची? जबाबदाऱ्या टाळणारी, की त्यांच्यामागचं प्रेम दिसलं की विरघळणारी?

“प्रेमाचा झरा,” अशासाठी म्हणत असावेत, की ते पाणी जिथून वाहत येतं, तिथेच परत जाऊ शकत नाही. आपल्या घरच्यांनी जे प्रेम आपल्याला दिलं, त्याची परतफेड करायचा प्रयत्नही करू नये असं वाटायला लागलंय. त्यापेक्षा जे त्यांच्याकडून सहज मिळालं, ते दुसऱ्यांना सहज देता आलं, तरी त्यांचेच पांग फेडल्यासारखं होईल, हो ना?