8/25/08

केनीकुर्डू आणि कोल्स्लॉ

Prelude: मित्रमैत्रिणींनो, मी जन्मात कधी ब्लॉगोस्फियरमधे खो खो खेळले नव्हते, त्यामुळे माझा जरा गोंधळ झालाय खरा, पण मी यशोधरा आणि नंदन ला खो दिलाय...
===================================================================
परवा एका सत्यनारायणाच्या पूजेला गेलो होतो- यजमान फारच भाविक. अगदी केळीचे खांब लावून सजवलेला चौरंग, विष्णूसहस्त्रनामाचे प्रिंट-आऊट्स, टोपलीभरून फुलांच्या पाकळ्या, अशी जय्यत तयारी होती. सौ. नी पैठणी, श्रींनी धोतर, जानवं घालून अगदी साग्रसंगीत दाक्षिणात्य गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पूजा केली. त्या भारलेल्या वातावरणात, एरवी फारसे भाविक नसलेले लोकही खिळून बसतात नं, तसं माझं झालं होतं. लहान मुलांना बाकी काही कळत नसेल, तरी रंगीबेरंगी आरास आवडते, तसं ते visual च इतकं सुंदर होतं, की कोणीही आकर्षित व्हावं... मनातले गोंधळ तात्पुरते संपून केवळ गुरूजींचा भारदस्त स्वर कानात भरून रहावा, इतपत माझी समाधी लागली होती.

कधीतरी शिकलेल्या संस्कृतामुळे, आणि आजी पौरोहित्य करते, त्यामुळे गुरूजी खरंच त्या त्या वेळी समर्पक मंत्र म्हणतायेत, की तोंडातल्या तोंडात जे श्लोक आठवतील ते पुटपुटताहेत, ते ही कळत होतं, आणि त्यामुळे गुरूजींबद्दल थोडा आदर निर्माण झाला होता. काही गुरूजी, पुजा सांगता सांगता, कोण आलं, कोण गेलं, कोणती मुलगी दिसायला चांगली आहे, अशा अनेक गोष्टी इकडे तिकडे बघत, टिपत असतात! त्यातले हे नव्हते- असं प्रथमदर्शनीच जाणवलं. लोकांना ५ ची वेळ दिली, त्यानंतर लोक हळूहळू येत होते, थोडं बसून, पुन्हा दुसरीकडे जात होते. लहान बाळं असलेल्या बायका त्यांना घेऊन शक्यतोवर पूजेपासून दूर बसल्या होत्या- म्हणजे रडणं-पडण्याचा व्यत्यय नको- अशा विविधतेने नटलेल्या त्या जागी, गुरूजींचं सगळं लक्ष मात्र फक्त पूजेवर केंद्रित होतं.

पूजा झाल्यावर, “आता कथावाचन..” असं त्यांनी सांगितलं. त्याबरोबर यजमानांनी एक टिपिकल प्लॅस्टीक कव्हर लावलेलं जुनंपुराणं पुस्तक बाहेर काढून, “The Satyanarayana Katha: Chapter 1” अशी सुरूवात केली. “One day the holy sage Narada was roaming in the heavens, and while roaming, he came to Vaikuntha, the dwelling of almighty Shri Satyanarayana.” मी नवऱ्याकडे हळूच एक नजर टाकली. ती टाकायला नको होती, असं नंतर वाटलं, कारण तोही, माझ्याप्रमाणेच, हसू दाबण्याच्या कठोर प्रयत्नात!!! इकडे कथा सुरूच, “There was once a Merchant by the name of Sadhu, who had a wife called Leelavati. He was unhappy, because he did not have children.” आता पूजेत व्यत्यय नको, म्हणून आपणच तिथून उठून जावं का काय, इतपर्यंत माझी परिस्थिती झाली होती.

लहानपणी, “पुराणकथा,” नावाच्या १० पानी पुस्तकात कित्ती कहाण्या वाचल्या होत्या, त्यांचा ह्या Lord Satyanarayana शी काही संबध आहे असं वाटेना! मनातल्या मनात, “हे लोक केनीकुर्डूच्या भाजीचं इंग्रजीत काय भाषांतर करतील?” असा विचार येऊन जास्तच हसायला आलं. “एकदा एका कुष्ठरोग्याच्या रूपात श्री विष्णू कलावतीच्या घरी आले असता, तिने त्याला प्रेमाने घरात घेऊन, तेल-उटण्याने न्हाऊ माखू घातलं.” अशा आशयाची एक गोष्ट आठवली, आणि नागपंचमी, पोळा, श्रावण, सोळा-सोमवार अशा किती कहाण्या आपण विसरलो, ते ही आठवलं! एवढी पूजा साग्रसंगीत केलीये, तर ह्यांनी कहाणीपण मराठीत वाचायला काय होतंय? असंही एकदा वाटून गेलं.

पण मग पुन्हा शांताबाई शेळकेंचं, “चौघीजणी.” डोळ्यापुढे आलं. त्यातल्या एका गोष्टीत, हॅनाने थॅंक्सगिव्हिंगच्या सणाला बनवलेलं उत्कृष्ट जेवण, शांताबाईंच्या उत्कृष्ट अनुवादामुळे मला चाखायला मिळालं होतं. मेग (Meg) च्या फसलेल्या मुरांब्याचे प्रयोग जवळचे वाटले होते, आणि सर्वात अधिक लक्षात राहिलं, ते एक Christian Hymn,
“लीनपणे जो जगे तयाला
पतनाचे भय कधीच नाही.
कुणी न ज्याचे, देव तयाचा
सदैव सहचर होऊन राही.”
शांताबाईंनी ती भाषाच नव्हे, तर त्या संस्कृतीचा अनुवाद केल्यामुळे जे अनुबंध माझ्यात आणि Little Women मधे निर्माण झाले, तेच अनुबंध इथल्या मुलांसाठी इंग्रजी सत्यनारायणाच्या कथेने नाही का निर्माण केले? एकदा वाटतं, आपल्या संस्कृतीचं जतन व्हायला हवं. पुराण-कथेच्या पुस्तकांना अक्षरश: म्युझियममधे जागा करून द्यावी. आणि दुसरीकडे वाटतं- म्युझियममधे सडण्यापेक्षा, त्यांचा प्रसार व्हायला हवा. मग केनीकुर्डूच्या भाजीला कोल्स्लॉ का म्हणेनात!!!

===================================================================
तळटीप: आनंद सरोळकरांनी, “खो.” दिल्यामुळे माझापण हा, “शब्दखेळ.” पटकन पूर्ण झाला, त्याबद्द्ल त्यांना मन:पूर्वक धन्यवाद!