11/30/08

असंच काहीसं...

थॅंक्सगिव्हिंग वीकेंड होता, म्हणून डेलावेअरच्या एका मित्राकडे अड्डा टाकायला गेलो होतो. मित्र तसा माझ्या नवऱ्याच्या, पण नवऱ्याने अलिकडे "माणूसघाणे" हे आडनाव धारण केल्यामुळे, असंख्य मेला-मेली, फोनांमधे त्याने जाणूनबुजून अलिप्तपणा केला. मग शेवटी काहीच ठरेना, तेंव्हा नेमक्या शिव्यांनी नटलेली एकच सुबक इमेल अशी केली, की सगळे झोपेतून उठून "हो येतोय", "आम्ही तर आधीच तयार होतो!" वगैरे कुजबुज करते झाले!
तिथे गेल्यावर मात्र जरा प्रश्नच पडला, की आता काय बोलावं. लेकुरवाळ्यांना त्यांच्या बाळांपासून फुरसत नव्ह्ती, आणि त्यांचे चेहरे सुमारे २ वर्ष एकही दिवसाची शांत झोप न मिळाल्यामुळे "झॉम्बींसारखे" झालेले पाहून आपण त्यांच्याकडून अपेक्षा तरी काय करणार?
तरीही, एकत्र सण साजरा करून परत निघालो तेंव्हा नवरा एकच वाक्य बोलला, "तुला ह्या कंपनीत एकाच्याही चेहऱयावर मित्र भेटल्याचा खरा आनंद दिसला?"
नशीब तिथून आम्ही लवकरच पळ काढला- कारण घरी माझी मैत्रिण तिच्या नवऱ्याला घेऊन येणार होती नं! मला इतका उत्साह आला होता- काय करू नि काय नाही असं होऊन गेलं. कॉलेज मधे अगदी जिवलग होतो, पण नंतर मधे संपर्क तुटल्यासारखा झाला, तो सरळ इथे येऊन जुळला. ती आली, आपुलकीने राहिली, आम्ही पिक्चर, गप्पा, पत्ते, खाणे, पीणे अशा सगळ्या करण्याच्या गोष्टी केल्या, पण मला का कोणजाणे, माझी जुनी मैत्रिण कुठे हरवलीये, असा विचार डाचत होता.
ती गेल्यावर नवरा पुन्हा त्याच्या नेमक्या शब्दात म्हणाला, "ही खरंच तुझी इतकी चांगली मैत्रिण होती?"
"हो, का रे?"
"अगं मला तरी तिच्यात तसं काही दिसलं नाही. तिने ना तुझी चौकशी केली, ना तुझ्या कुठल्या गोष्टीचं कौतुक. तिला तू आधीचीच "कळली" होतीस, त्यामुळे तुझ्यात आता तिला interestच नाहिये असं वाटलं मला! किती खोटं वाटलं तिचं सगळंच वागणं..."

मला त्याचं बोलण कळलं पण वळलं नाही असंच काहिसं झालं. नाती इतकी बदलतात, की ज्या मित्रांनी आपलीच ओळख एकेकाळी आपल्याला सांगितली होती, त्याच मित्रांचे चेहरेच आता ओळखू येऊ नयेत? कोण बदललं असेल? ती, का मी? आम्ही दोघीही, की माझा नवरा?
की आम्हा दोघींमधली ती ओळखच पुसलीये, आणि ती पुन्हा लिहावी लागणारे नव्याने?