12/10/08

झाड

ते एकटं, चैतन्याने सळसळणारं, स्थितप्रज्ञ.
मी गराड्यात, उरापोटी धावणारी, थकलेली.

त्याची अपार माया, पानापानांतून वाहणारी.
माझं मीपण कोंडून ठेवल्यागत, आसक्त.

त्याचा डौल- ते सृजन! ती नव्हाळी!
माझं पिकलेलं मन, अंतर्नादविहीन- तरी ही जिव्हाळी?

त्याचं जमीनीशी अतूट नातं, मुळांतून नसानसांत भिनलेलं.
माझी आधांतरीची फडफड, वठू पाहणाऱ्या जीवनाची.

त्या झाडाच्या सावलीत वाटतं
पुढच्या जन्मी तरी झाड व्हावं.

कारणांची गरज नसलेलं जगणं कळावं-
वाऱ्यात भरून मनांमधे सळसळावं!

12/8/08

गॅट्स्बी द ग्रेट!

त्या दिवशी मी सहज बोलून गेले, "आपल्या मणीकाकाने कित्ती पैसे उधळले, नाही?" बाबांनी गूगलचॅटवर त्याची खबरबात दिली, तो सध्या तिथे आलाय वगैरे सांगितलं, तशी माझ्या मनात वृथा काळजीपोटी त्रास दाटून आला, आणि आता बचत करण्याबद्द्ल काय मी त्याला लहान तोंडी मोठा घास घेऊन सांगू? असा प्रश्नही. आणि मणीकाकाची नेमकी तीच तर हळवी-दुखरी जागा होती! त्याला कित्ती लोकांनी सांगितलं- समाजसेवा पुरे! पण ऐकेल तर तो मणीकाका कसला?

तो खरं म्हणजे माझ्या वडिलांचा मोठा भाऊ. घरच्या गरिबीत धड ११वी पर्यंतही शिक्षण झालेलं नसतांना, केवळ हुशारी आणि मेहनतीच्या जोरावर मोठा झालेला. जाहिराती रंगवण्यापासून सुरूवात झाली, पण पेंटिंगपासून हार्मोनिका वाजवण्यापर्यंत, आणि स्वयंपाकापासून स्पोर्टसपर्यंत सगळंच त्याला यायचं, त्यामुळे एकूणच व्यक्तिमत्त्व एकदम छाप पडेलसं. काही वर्ष भारतात धडपड करून त्याने जो आफ्रिकेचा रस्ता धरला, तो सरळ रिटायर झाल्यावरच परतला. तेंव्हा तो कसा अलिप्त असायचा- फक्त एक नाव, बाबांनी सांगितलेलं, कधीमधी बोलण्यात येणारं.

मी लहान होते, तो पहिल्यांदा आला तेंव्हा. त्याचा वाढदिवस नेमका २९ फेब्रुवारी- मी १३ वर्षाची होते, तेंव्हा तो तर फक्त १० चा- अशी गंमत म्हणून की काय, पण त्याला "अहो काका" कधी म्हणवलं नाही... त्याच्याकडून मिळालेल्या चित्रविचित्र वस्तूंचं तेंव्हा खूपच अप्रूप वाटायचं. त्याने आणलेल्या फ्रॉकचं वेगळंच रंगीबेरंगी प्रिंट, खेळण्यांचे आकार आणि रंग तर कधीच न पाहिलेले! मग मोठी झाले, आणि तो भारतात परतला, तशी त्याच्याशी मैत्रीच झाली. "फोरेन रीटर्न्ड" चा शिक्का कधीही त्याच्या चेहरयावर दिसला नाही. दोन पांढरे शर्ट शिवून तेच वर्षभर वापरायचे, इतका साधेपणा! धो धो पैसा वाहवला त्याने, तो सगळा इतरांवर!

म्हणून तर राग येतो. कुठे गेले आता हे लोक ज्यांना अडल्यानडल्याला तो उभा राहिला? आणि ह्याला तरी एवढासुद्धा व्यवहार कळू नये? कितीक धंदे केले- पैठण्या नेऊन आफ्रिकेला विकायच्या म्हणून १० खोकीभर पैठण्या विकत घेतल्या, आणि शेवटी कित्येकांना फुकटच वाटल्या- इतकी बेफिकीर मुशाहिरी. त्याच्या ह्या वृत्तीला दानशूरपणा म्हणावा, की अक्षरश: अव्यवहारीपणा? हेच कळत नव्हतं, तेव्हाच नेमका "द ग्रेट गॅट्स्बी" भेटला.

गॅट्स्बीची एक श्टाईल होती म्हणा ना! लॉंग आयलंड (न्यू यॉर्कच्या) अतिशय उच्चभ्रू वस्तीत ह्या Jay Gatsby चा महाल होता. तिथे अविरत ओल्या पार्ट्या चालत. किती लोक आले, कोण बोलावलेले, कोण आगंतुक- ह्याचा काहीही हिशोब करायची गरज नव्हती. कारण गॅटस्बीच्या पिंपातून धो धो वाहणारी दारू होती, आणि घरातून धो धो वाहणारा पैसा. गॅट्स्बीची कार तर केवळ लोकांना न्यू यॉर्क मधून ने-आण करण्यासाठी धावत होती.

आणि येवढं करून गॅट्स्बीच्या नावाभोवती कायम एक धुक्याचं वलय. कोणी म्हणे त्याने कोणाचा खून करून पैसा जमवला. कोणी म्हणे त्याच्या काकाची इस्टेट मिळाली. तर कोणी म्हणे हा पहिल्या महायुद्धात जर्मन गुप्तहेर होता. खरं काय खोटं काय देवाला ठाऊक, पण गॅट्स्बीच्या चेहऱ्यावर मात्र कायम एक निरागस, आशावादी हसू. सगळं जग एकीकडे, आणि तुम्ही एकीकडे, असा बटवारा असता, तर गॅट्स्बी सगळ्या जगाकडे पाठ फिरवून तुमच्या पाठीशी उभा राहणार, असा दिलासा देणारं ते निखळ हसू...
गॅट्स्बीने जीवनावर प्रेम केलं, ते खरं Daisyवरच्या प्रेमामुळे. कफल्लक असतांना डेझी मिळाली नाही, म्हणून खुन्न्स घेऊन येवढा पैसा कमावला, की लोकांचे डोळे फाटले. पण २० वर्ष ज्या डेझीचा ध्यास त्याने घेतला, ती डेझी मात्र शेवटी आपल्या निर्ढावलेल्या नवऱ्याचीच राहिली. त्याची प्रतारणाही गॅट्स्बीच्या स्वच्छ प्रेमापेक्षा मोलाची झाली!

गॅट्स्बी वाचेपर्यंत आमचा मणीकाका मला समजलाच नव्हता. दारोदारी भीक मागण्याच्या दिवसांतून जिद्दीने, कष्टाने, आणि प्रामाणिकपणाने वर येऊनही, आमचा मणीकाका शेवटी एकटा तो एकटाच राहिला. त्यालाही भेटली होती जी डेझी, तिने शेवटच्या क्षणी त्याला डावललं- आणि तो खरंच खचला. लोकांनी मूर्खात काढलं, ते फक्त ह्याने पैसे उडवले म्हणून.

पण पैशाने कुठे सगळ्या गोष्टी विकत घेता येतात? निरपेक्ष आणि खरं प्रेम? हरवलेलं तारूण्य? बालपणी सोसलेल्या हाल-अपेष्टांवर मलम? ह्यातलं काय मिळवता आलं असतं मणीकाकाला पुन्हा? मणीकाकानेही मला सांगायचा प्रयत्न केला होता, "अगं आपल्या माणसांचा आनंद ज्याने मिळेल, त्या कुठल्याही गोष्टीची पैशात किंमत मी मोजत नाही..."

पण तो जे सांगू शकला नव्हता, ते गॅट्स्बीने मला दाखवलं- माणसांच्या प्रेमावरल्या विश्वासातून साकार झालेलं स्वप्न. आणि गॅट्स्बीमुळे मला समजला, प्रेम करणाऱ्या, स्वप्नांसाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बहाल होणारा "द ग्रेट" चा किताब!