12/20/10

मनातलं गाव

प्रत्येकाच्या मनातलं एक गाव असतं.
एक छोटंसं घर, त्यातली बाल्कनी आणि खिडकीतुन दिसणारं आकाश, आणि त्यापुढच्या वळणावर पत्र्याची पोस्टाची पेटी- लहानपणी बहुतेक मनातलं गाव बस्स एवढंसंच असतं.
थोड्या वर्षांनी त्यात भर पडत जाते - कॉलेजकट्टा, चार-दोन सिनेमा थिएटर्स, उसाच्या रसाची टपरी, नाहितर ठरलेला उडपी/समोसेवाला...
मग खूप दिवस एक नशा चढते- त्याच त्या वळणांना फाटे देऊन नवीन नवीन जागा हुड्कायच्या, नवे अनुभव अनुभवायची नशा...
आपण पंख पसरले, की सगळं जगच आपल्या अवाक्यात येऊ शकेल की काय, हे आजमावून बघायची नशा...

अजून काही वर्षांची पानगळ होऊन जाते, तेव्हा आपण इटालियन, मेक्सिकन, टर्किश काय वाट्टेल ते खाऊ लागलेलो असतो. शब्दकोषात "ब्लॅक फ्रायडे", "स्प्रिंग क्लीनिंग" अशी भर पडलेली असते. आता जग बघण्यातही काही थ्रिल राहिलेलं नसतं, कारण दोन पैसे गाठीशी बांधले, तर कोणीही ते करू शकतं की!!!

तरीपण ते मनातलं छोटं गाव काही पुसट होत नाही. उलट अजून रंगीत, अजूनच स्पष्ट होत जातं. तीच बाल्कनी, खिडकीतून दिसणारं आकाश, आणि वळणावरची पोस्टाची पेटी - येवढंच काय ते खऱ्या अर्थाने आपलं होतं- बाकीचं सगळं ते फांद्यामधून पसरणं, आकाशाकडे झेपावणं, जगाला मिठी घालणं - ते फक्त धूसर स्वप्न होतं असं वाटायला लागतं. स्वप्नात कदाचित आपण वाटच चुकलो होतो... आता जाग येतेय, ही जाणीव.

आपल्या मनातल्या गावात- लोकांकडे रंगीत टीव्ही असतांना, आपला मात्र १०x१० चा श्वेत-श्याम होता. मोठ्या शहरातल्या मुली फाडफाड इंग्रजी बोलत, उंच टाचांचे सॅण्डल आणि जीन्स सर्रास घालत होत्या, तेव्हा आपण बावळटासारखे "मृत्यूंजय" वाचत, कुंकू पंजाबी ड्रेसमधे हौस करत होतो. कॅन्टीनचे समोसे खातांना २-२ रूपयांचाही हिशोब चोख ठेवत होतो. तो पीळ काही केल्या सुटत नाही.

न्यू यॉर्कातल्या बड्या ब्रॅण्डच्या दुकानांमधे "आपल्याला घालण्यासारखं काही नसतं" असं वरवर म्हणतांना, खरं तर तिथले सेल्समनही आपल्यापेक्षा जास्त सोफिस्टिकेटेड असल्याची लाज वाटत असते. मारे इटालियन खातांना, अजूनही गोऱ्यांपुढे आपले काटे-चमचे धड चालताहेत की नाही हे सारखं चाचपून बघण्यात जेवणाची मजाच निघून जाते... देसींची नवीन पिढी कशी, अर्ध्या बर्गरने अमेरिकन होऊन सहज ४-५ हजार डॉलरची खरेदी, दर उन्हाळ्यात व्हेकेशन करत असते...तसे बेफिकीर आपण कधीच होऊ शकत नाही, ह्याचं मनातून एकीकडे फार वाईटही वाटत असतं.

आताशा तर जगात कुठेही गेलं, तरी मनातल्या त्याच गावाचा नकाशा सगळ्या रस्त्यांवरून अंथरल्याचा भास... नवीन काही नकोच वाटतं आताशा!

ज्या स्मृतींनी झाडाच्या मुळांसारखी "बांधिलकी" द्यायची, त्यांनीच आपण "बांधून" घ्यायचं? मनातल्या त्या सुरक्षित कोपऱ्यातून धडपडल्यावर पुन्हा उठायची शक्ती घ्यायची, की पडायची भीती?
तुम्हीच ठरवा!

12/2/10

भिंतीच्या पलिकडे

माणसा-माणसांत भिंती का असतात? कधी दृष्य, कधी अदृष्य, पण पावलोपावली आपण सतत त्यांच्यावर आपटून ठेचकाळतच असतो, इतक्या कठीण!
किती दिवस/वर्ष लागतात माणसांना एकमेकांशी मोकळं व्हायला? कधी एक भेट पुरते, आणि कधी जन्मही पुरत नाही- अशा भिंती भेदायला... परक्यांचे सोडा- अगदी जुनी मैत्री म्हणावी तर ती पण कधीकधी फक्त सोयीची, तात्पुरती आणि वरवरची वाटायला लागते तेव्हा? तेव्हा मनातले कुठल्या अदीम उर्मी जिवंत होतात ती भिंत तोडायला?
Something there is that doesn't love a wall,
That sends the frozen-ground-swell under it,
And spills the upper boulders in the sun;
And makes gaps even two can pass abreast.

Robert Frost च्या Mending Wall चे पहिले शब्द.

काहीतरी आहे असे, ज्याला भिंती आवडत नाहीत. बर्फाच्या कडक थरातून उरी फुटून निघत ते कोवळे कोंब,वरचे दगड खिळखिळे करून टाकतात. त्या खिंडारातून दोन माणसेही जातील इतकी फट पडते नकळत...

मुद्दाम उकरून भेदरलेल्या सशाला बाहेर काढण्याचे रूपक सार्थपणे वापरत फ्रॉस्ट स्पष्ट सुचवतोय- एकमेकांच्या अंतरंगात शिरून, दुखावलेल्या कोपऱ्यावर फुंकर मारणारी मैत्री वेगळी, आणि उलट दुसऱ्याच्या मनातले काढून घेत त्यावर दुसरीकडे तिखटमीठ लावून चर्चा करणारी "मैत्री" वेगळी.
पण भिंतीतूनही सहज दोन मनांमधे निर्माण झालेली वाट - तिचं कौतुक करण्याची परिस्थिती नसते. शेजारधर्म म्हणून का होईना, खिंडार बुजवण्याची जबाबदारी दोन्ही घरधन्यांवर येऊन पडते.

Good fences make good neighbors!

हे सौजन्यपूर्ण अंतर राखायचं बाळकडू शेजाऱ्याला त्याच्या वडिलांकडून मिळालेलं, आणि त्याने विचारांती मान्य केलेलं. अल्याडचे दगड ह्याने बसवायचे, पल्याडचे त्याने, अशी नेमकी वाटणीही आपसूकच झाली. मग स्वत:ची पाठ थोपटत दोघे कामाला लागले. मागच्या बागांचा एवढा प्रश्न नाही, कारण त्याचे pines काही माझ्या apples मधे मिसळून गोंधळ होणार नाहिये. आणि एकमेकांच्या परसात शिरून नासधूस करायला आम्हा दोघांकडे गाईगुरंही नाहियेत.
झालंच तर मग. ओळख, मैत्री, घरोबापण- अशा सर्वमान्य नियमांतूनच वाढत नसतो का? काल मी नेलेली वाटीभर साखर उद्या परत करणारच, किंवा तुमच्या घरची भांडी आमच्या घरी संक्रमण करायला लागली, तर तुम्ही सहज बोलताबोलता त्याची आठवण करून देणे!

पण ह्या सोप्या कुंपणाचीही वाढत वाढत भिंत कधी होते तेच कळत नाही. आणि मग मनात एक टिटवी किलबिलतेच.

Before I built a wall I'd ask to know
What I was walling in or walling out,
And to whom I was like to give offense.
Something there is that doesn't love a wall...

आपण घराभोवती भिंत घालता घालता, स्वत:लाच कोंडून घातलंय का आत?

पार्टी, हाय-हॅलो, पिक्चर, राजकारण, बाष्कळ विनोद, पुस्तकांच्या चर्चा. बास. इतकीच असते का मैत्री?
इतकीच सौजन्यपूर्ण, अंतर राखून, जबाबदाऱ्या समंजसपणे वाटून, आपले दोन शब्द बोलून झाले, की त्यांच्या दोन शब्दाची वाट बघणारी मैत्री? विषयांच्याही मर्यादा घालून घ्यायच्या असतात कुठल्या कुठल्या "मित्रांच्या" कंपूत बोलतांना?

ते ही एक कुंपण भेदून खरंच आपल्या रोजच्या सुखदु:खांबद्द्ल आपण कधी बोलू शकणार आहोत? काठावर पोहून कधी संपणारे, आणि कधी येईल त्या मैत्रीत एवढी शक्ती, की आपण खरोखरीच एकमेकांच्या अंतरंगात खोल डोकावून पाहू शकू, आणि नुसते बोलून नव्हे, तर कृतीने ते दाखवू शकू?
कधी बोलू शकणार आहोत आपण हक्काने फक्त हे चार शब्द- काय गं? कशी आहेस?