PR-वास........

5/22/11

बिम्मची आई



छोट्या बिम्मच्या छोट्याशा विश्वात तो सोडून २-३ च इतर माणसं असतात: त्याची आई, त्याला सतत छळणारी आणि स्वत:ला अतिशय शहाणी समजणारी त्याची मोठी बहीण बब्बी, आणि नेहमी घराजवळच्या मोकळ्या आवारात भेटणारे आजोबा.
पण बिम्मला त्याशिवाय भरपूर मित्र आहेत, हे ही विसरून चालणार नाही- पिवळाधमक नीनम पक्षी, भलाथोरला राहुल हत्ती, पिट्टू नावाचे कुत्र्याचे पिल्लू, कुरकुरीत ऊन खाऊन रंगीत होणारी गाय, आणि असेच कोणी कोणी.

बिम्म कसा, थोडासा खादाड, थोडासा वांड, पण बराचसा गोंडस मुलगा आहे. तो जी.ए. कुलकर्णींच्या बखरीतच भेटतो, असं जर कोणी म्हणत असेल, तर त्याने जन्मात कधी लहान मुलांशी दोस्ती केली नाहिये, किंवा स्वत:चं मूलपणच त्याला आठवत नाहिये, असं आपण ठामपणे समजू शकतो.

बिम्मची आई मात्र तशी नाहिये. आता बिम्म आणि बब्बीसारख्या दोन पोरांना एकटीने सांभाळणं काय सोपं काम आहे का महाराजा? निरनिराळ्या रंगांचे काचेचे तुकडे, चॉकलेटच्या पाकिटातली रिकामी चांदी, एखादा पेरू, बब्बीवर चुकून प्रेम उतू जात असल्यास तिच्या वेणीत घालायला दोन चुरगळलेली चाफ्याची फुलं, दोरे, दगडापासून चिकट बेलफळापर्यंत काही म्हणजे काही ही बिम्मच्या खिशातून बाहेर पडू शकतं, पण त्याच्या सुपीक डोक्यातून काय काय बाहेर पडेल, त्याची तर कोणी कल्पनाच करू शकणार नाही!

ती काही बोलत नाही, पण मनातून तिला खरं म्हणजे बिम्मच्या वेड्या खेळांत मधून भाग घ्यायला आवडतं.
तिने माजघराची नुकती पुसलेली फरशी बिम्मने आपल्या "चित्रांनी" भरून टाकली, तरी ती फारशी रागावत नाहीच, उलट त्यात बिम्मच्या समोर लाडवांचा डोंगर काढलाय, ते बघून चक्क त्याला एका ऐवजी आज दोन लाडू देते! चुकूनसुद्धा ती मुलांना कधी, "बंद करा रे तुमची ती पोरकट प्रश्न!"- असं म्हणत नाही. उलट, "बिम्म, तू आहेस कामाचा माणूस. तेव्हा तू इथेच थांब. तोवर मी ब्रह्मदेवालाच विचारून येते..." अशी दरवेळी खुसखुशीत उत्तरं देत ती दोन्ही मुलांचं मूलपणच नव्हे, तर त्यांचं उपजत शहाणपणही सांभाळत असते.

त्याचा पतंग "उडणारा" नाही, "उडवणारा" आहे, हे ती समजून घेते. बब्बी नसत्या वेळी "खरं बोलण्याचं" अर्धवट शहाणपण मिरवते, तेव्हा तिला जमीनीवर आणायला आई लगेच, "तू ही काही कमी नाहीस...." अशी बब्बीने घातलेल्या घोटाळ्यांची यादी वाचून दाखवतेच की.

पण बिम्मही तिला कधीकधी त्रास देऊन जीव नकोसा करतो. मग ती,
"तू एक नाही, दहा रूळ इंजिनं असलास, तरी मोठ्या रस्त्यावर शिटी फुंकत गेलास, तर हाडे सैल करून देईन!" अशी त्याला खरपूस धमकी देऊन ठेवते. बरं, रूळ इंजीन नाही, तर छत्री, नाहीतर झाड, असं सारखं वेगवेगळं कायकाय होतांना बिम्म त्यातून वेगवेगळ्या उचापत्या करणार, त्याच्या सतत एक पाऊल पुढे राहणं तिला भागच पडतं. "छत्री आहेस म्हणून पावसात भिजायचं नाही", आणि "झाड असशील तर स्वस्थ एका कोपऱ्यात उभं राहायला" बिम्मला बजावते. पावसात भिजायचं नाही, तर छत्री होण्यात काय मज्जा? शिवाय झाडाला लाडू वगैरे खाता येत नाहीत, आणि एका जागी उभं रहावं लागतं... हे तर त्याला मानवणारं नसतंच. मग शेवटी तो आईला, "मी आता खराखुरा बिम्मच आहे" हे सांगून टाकतो!

पण बिम्मचे बाबा असतात मुंबईला. त्यांना सारखं घरी यायला कुठे जमतंय? त्यामुळे पोरांच्या बालपणाची मजा एकटीने लुटतांना, आणि सोसतांना, ती कधीकधी फार हळवी होऊन जाते. ्परवा बिम्मने बाबांना आपल्या रेघोट्यांच्या लिपीत लिहलेलं पत्र घेऊन तर ती कितीवेळ उदास बसून राहिली. एकेदिवशी मुलं मोठी होऊन घरट्याबाहेर पडतील, आणि त्यांना त्यांच्या वस्तू, खेळ, भांडणं, खऱ्या-खोट्या गोष्टी- कश्शा कश्शाची आठवण राहणार नाही.

पण आपल्यापाशी दररोज जमतोय हा ठेवा, तो हदयात साठवून ठेवतांना तिचं मन भरून येतं, आणि ती पोरांचे खूप खूप पापे घेते. तेव्हा बिम्म आणि बब्बीला कळत नाही, आई आज अशी का वागतेय?