PR-वास........

8/29/11

चित्तरकथा!

जेमतेम एक-चतुर्थांश वर्षे वयाच्या माझ्या पोराला केवळ मी जन्मच दिलाय म्हणून- अन्यथा सासरची सोडाच, पण माहेरची मंडळीसुद्धा, "अगदी त्याचा बाSSबा दिसतोय" म्हणायला लागली, तेव्हा मी जरा हिरिरीने माझा बाळपणीचा फोटो अ‍ॅल्बम पुस्तकांच्या कपाटातून शोधून काढला. नाक तर निर्विवाद आपलं नाही, पण थोडीशी हनुवटी, किंवा गालांचा भास तरी? माझ्याच फोटोंमधे मी माझंच बाळ कुठे दिसतंय का बघत बसले!

वितभर उंचीच्या मला, फूटभर उंचीचा हलव्याचा मुकुट घातलेला फोटो.
मग मोठ्ठा काळा गॉगल घातलेला, कुरळ्या केसांची नारळाची शेंडी घातलेला फोटो.
मग फ्रिलच्या फ्रॉकवर सोनेरी चांदण्या लावून शाळेच्या गॅदरिंगला नाच करतांनाचा फोटो...

एका फोटोपाशी मन जरा जास्त रेंगाळलं. जवळजवळ माझ्या खांद्यापर्यंत येणाऱ्या मोठ्या बादलीत, माझ्या आबांनी मला आंघोळ घालायला उभं धरलंय! काळ्या-पांढऱ्या मण्यांच्या मनगट्या घातलेल्या इवल्याशा हातांनी मी बादलीची कड धरून ठेवलीये, आणि बोळकं दाखवत हसतेय. माझ्याही आईने केवळ मला जन्म दिला म्हणून. अन्यथा मी सदासर्वदा आजी-आबांना चिकटलेली असायचे, आणि आईजवळ झोपल्यावरही, अगदी मध्यरात्री तिला उठवून "आबांकडे जायचंSSSS" असं भोकाड पसरायचे- ही गोष्ट मला वेगवेगळ्या प्रसंगी आई-मावशी-आजी-बाबांनी सांगून सांगून अगदी पाठ झालीच होती.

शिवाय ह्या बादलीतला फोटोचीपण एक गंमत गोष्ट खुद्द आबांनीच सांगितली, "हा फोटो बघ- मी तुला लहानपणी आंघोळ घातलीये त्याचं प्रूफ, नाहीतर तुला वाटेल आपल्या आबांनी आपल्यासाठी काही केलं की नाही? " "अहो मला असं कसं वाटेल?" हे म्हणण्याइतकी मी मोठी होईपर्यंत, तो फोटोही त्यांनी खास त्यांच्या कपाटाच्या दारावर चिकटवून ठेवला होता. जाता येता मला विचारायचे- "सांग बरं लहानपणी तुला आंघोळ कोण घालत होतं???"

आज तो फोटो बघतांना त्यांची आठवण तर आलीच, पण माझ्या स्वत:च्या पोट्ट्यालाही त्याची आजीच (माझी आईच) अजून आंघोळ घालते, म्हणून जरा कानकोंडंही झालं. मग आईला म्हटलं, "अगं उद्यापासून माझं ट्रेनिंग. मी पायावर नाही तर टबात, पण पिटक्याला आंघोळ घालायची सवय केली पाहिजे. नाहीतर आंबांबरोबर माझा होता, तसा ह्याच्या बरोबर तुझाच- बादलीतला फोटो काढावा लागेल!"
आई एकदम तापलीच, "तुला काय वाटतं- आबा तुला आंघोळ घालत होते? अगं मीच रोज घालत होते... त्यांनी तर चुकुनसुद्धा, एकदाही तुला आंघोळ घातली नव्हती!"

तेव्हा हसायला आलं, पण नंतर उगीच हरवल्यासारखं वाटत राहिलं... गमतीत झालं म्हणून काय, त्यांनी आपल्याला खोटं का सांगितलं? अगदी प्रूफ-प्रूफ म्हणून फोटो दाखवून पाठ करून घेतलं, आणि आपणही त्या फोटोभोवतीच आठवणी विणत बसलो? आधी न दिसलेल्या गोष्टी मग एकएक करून दिसायला लागल्या- बादली कोरडी ठण्ण आहे. ती त्यांच्या खोलीत का ठेवलीये? आंघोळच घालायची तर ती बाथरूम मधे नको का? आणि मुळात बादलीत पाणी असायला हवं- बाळ नव्हे! भारतात असं टब सारखं कोणी पाण्यात बुडवून आंघोळ घालत नाहीत.......

पुन्हा अ‍ॅल्बम चाळला- माझं केवढंतरी आयुष्य केवळ त्या फोटोंमधे उरलंय आता... न आठवणारं बालपण तर सोडाच, पण आठवणारंही बरंच काही आता थोडं धूसर व्हायला लागलं- तर त्या फोटोंमधूनच पुन्हा ठसठशीत अधोरेखित करून घ्यायचं. कॅलिडोस्कोपच्या रंगीत तुकड्यांसारख्या आठवणी- दरवेळी नवीन आकार घेऊन येतात. ते आकार आठवणींचे असतात, की मनाचे? कधी उदास असतांना आठवणीतलं आभाळही भरून आलेलं असावं, नि आठवणीतल्या सख्ख्या मैत्रिणीशी प्रत्यक्षात भेटल्यावर मात्र काय बोलावं ते कळेनासं व्हावं...

जितके फोटो- तितक्या गोष्टी.

एका वाढदिवसाला आम्ही अंगणात "व्हॉट कलर" खेळतोय. नेमकं माझ्यावर राज्य आलेलं, आणि २-३ रंग सांगितले तरी ते जाईना. तेव्हा रश्मीताईने मला बोलावलं. ती माझी आतेबहीण. माझ्याहून ५-६ वर्षांनी मोठी होती, त्यामुळे आम्हा बच्चेकंपनी बरोबर खेळण्यात तिला रस नव्हता. ती कानात म्हणाली, "क्रीम कलर सांग". क्रीम कलर म्हणजे कुठला, हे सुद्धा मला माहिती नव्हतं! तर ती म्हणाली, "तुझ्या फ्रॉकवर जी फुलं आहेत नां, तोच क्रीम कलर आहे." आता माझी चंगळच झाली. क्रीम कलर ला हात लावायचा, म्हणजे सगळ्यांना माझाच फ्रॉक धरायला यावं लागलं असतं, त्यामुळे मी कोणालाही आऊट करावं!

आत्ता क्रीम रंगाची फुलं असलेल्या त्या निळ्या ड्रेसमधला फोटो दिसला, नि ही गोष्ट आठवली. अजून किती क्षणांचा बनलेला होता तो दिवस! आईने केक केला असणार-सकाळी ओवाळलं असणार-मैत्रिणींनी कायकाय भेटवस्तू दिल्या असणार. पण ते आता आठवत नाही. फक्त ही क्रीम कलरची गोष्ट तेवढी ह्या एका क्षणात बंदिस्त झालिये!आता नादच लागलाय- ह्या फोटोंच्या कोलाजमधून आयुष्याची कहाणी सलग लावता येतेय का ते बघण्याचा. लाखो करोडो घटना, पात्र आणि स्थलकालाच्या गर्दीतून हे क्षण तेवढे हाती उरले- आबा म्हणाले तसे- प्रूफ म्हणून!

अजून शेकडो दिवस जातील, माझं बाळ मोठं होईल तेव्हा त्याला, आताच्या पद्धतीप्रमाणे अक्षरश: करोडो फोटोंचं वाण आयतं मिळेल. केवळ त्याचीच नव्हे, तर माझ्या जीवनाची चित्तरकथाही मला शेवटी त्यांच्याकडूनच ऐकायची आहे हेच खरं.