8/29/12

नामानिराळे!


दु:खाच्या आरशाने मला दाखवलं-
माझं जग
माझं स्थान
माझं उसनं अवसान.

प्रेमाच्या आरशाने मला दाखविले-
रंग पुसट-दाट
चढणीचा, पण हिरवा घाट
सदैव नव्यानेच वळणारी वाट.

काळाच्या आरशाने मला दाखविले-
कुणाकुणाचे जपलेले क्षण
अजूनही घुमणारा एकच घण
कडू-गोड आठवांचे माजलेले रण.

शब्दांच्या आरशात बघते मात्र-
फक्त पांढरे, वा काळे-
नि:संदिग्धसे चौकोनी जाळे
स्वत:पासून होणे असे - नामानिराळे.