PR-वास........

8/6/13

स्कार्लेट ओ’हारा सिनिकल का झाली नाही?

स्कार्लेट ओ’हारा चं झालं, तसंच आपलंही होईल असं कधी वाटलं नव्हतं. पण असं असूनही, आपण सिनिकल झालो. आपल्यात कडवटपणा आलाच. तिच्यात मात्र आला नाही. असं का?

स्कार्लेट बिचारी, तिला लहानपणापासून पढवून पढवून, तिच्या मनावर बिंबवलेलं होतं, की सोज्वळ मुलींनी कसं, चारचौघात चिमणीसारखं खावं, बाहुलीसारखं मढावं, नाचावं- गावं, पण शेवटी पुरूषांसाठी जगावं. ह्या नाटकाचा तिला थोडाफार वैताग येत असे, पण त्यात फारसं काही गैर मात्र वाटत नव्हतंच, कारण शेवटी हे खुळचट पोरगे तिच्याच पायांशी आपलं हृदय ठेवणार, आणि त्यांचा ती खुशाल चक्काचूर करीत, फक्त मानाचे मुजरे झेलीत, "तिच्या" ॲश्लीच्या हातात हात देणार.

पैसा? तो काय असतो? आजीबरोबर कीर्तन ऐकतांना तर "भक्ती", "त्याग", "निर्लोभीपणा" - असल्याच गुणांचा ध्यास घ्यायचा असतो हे कळलं होतं. "स्वत:ला ओळखा", म्हणजेच, स्वत:च्या कुवती/आवडीनुसार करीयर करा, केवळ पैशाच्या मागे लागून भलत्याच मार्गाला (चुकीच्या करीयरला) जाऊ नका, असं ही होतं.
पोटापुरता पैसा "असणं", एवढंच फक्त त्याचं महत्त्व होतं. कुणीतरी, कुठेतरी पडद्याआड, पैसे कमावतं, नि जमवतं (आई-बाबा). पैसे "खर्च" करू देण्याइतके लाड त्या काळात कोणत्याच घरात होत नसतील...

स्कार्लेटलाही हे येवढंच समोर दिसत होतं: कापूस पिकतोय, घर भरतंय, गडी राबताहेत, मेजवान्या झडताहेत. "सिव्हिल वॉर" सारख्या कंटाळवाण्या विषयावर चर्चा करायला तिला अजिबात आवडत नसे. तसंही, युद्धाने कधी कुणाचं भलं झालंय? आणि बायकांचा तो प्रांतच नसतो की! गणित वगैरे शिकून, पुस्तके वाचून, फार डोकं चालवलं, तर उगीच नाचक्की व्हायची!
आपण हुशार आहोत, असा थोडा जरी संशय आला, तर सगळे प्रेमवीर पापणी मिटायच्या आत गायब व्हायचे!

पण.......स्कार्लेटचं जग Civil War ने बदललं, आपल्याला तर तेवढीही सबब उरली नाही. आपलं जग बदलतच होतं, बदलंलच होतं, आपणच झापडं लावून चालत होतो... पण तसं म्हणावं, तर "गाणं म्हणतेस का? रांगोळी काढतेस का? कुंकू लावतेस का? स्वयंपाकाची आवड आहे का?" ह्याच गोष्टी लग्नाच्या बाजारात आपल्यालाही विचारल्या होत्या!

ह्या हिशोबात मग १५- २० वर्ष जोडा. आपण, नोकरीच्या शोधात, नि आपली किंमत आता अचानक पैशात कशी मोजली जाते- ह्या कोड्यात! अर्थात् , स्कार्लेट सारखी बिकट परिस्थिती देवदयेने आपल्यावर आलेली नाही, आणि खरं म्हणजे आजूबाजूची माणसंही इतकी काही वाईट नाहीत. पण आयुष्याचा आढावा घेतांना, बेरीज- वजाबाकी फक्त आकड्यांतच करायची असते का? तशी ती करावी लागते का? हे स्वत:लाच विचारतांना, आधी कधीही न घातलेल्या, न बसणाऱ्या चष्म्यातून जग धूसर दिसावं, तसं आपलं डोकं गांगरलेलं.

स्कार्लेट मात्र, पदर बांधून मनाशी पक्का निश्चय करीत, त्या जगप्रसिद्ध ओळी बोलून गेली , "इन्शाल्लाह, मै जी-जान लगा दूंगी, लेकिन भूखी-कंगाल नही रहूंगी!" आणि नीतीमूल्यांचा फारसा विचार न करता, ते बोल तिने खरेही करून दाखविले.

आपण मात्र, नेहमीप्रमाणेच, अजूनही "रोमँटिकली सिनिकल". इतरांच्या तराजून स्वत:ला तोलत फालतू प्रश्न विचारत बसलेलो, की "स्कार्लेट सिनिकल का झाली नाही?" कशी होईल? तिच्या काळी नाटकातला "नाटकीपणा" ही शाबुत होता, आणि खऱ्या प्रेमातला खरेपणाही!