PR-वास........

2/26/14

ती मुलगी...

प्रिय, 

कुणालातरी कडकडून पत्र लिहावंसं वाटत होतं, म्हणून तुला लिहिते. तू टोटली नालायक आहेस, आणि मला गेल्या १० वर्षात एकदाही पत्र तर सोड, इमेलसुद्धा केलेली नाहीस, तरी लिहितेय, कारण... देवाणी-घेवाणीची मला आता पर्वा उरली नाही म्हण, किंवा, तुला पत्र लिहितांना मलाच काहीतरी मिळतंय असं म्हण! तसंही, पडके २-३ दात, किडक्या हातां-खांद्यांवर टांगलेला फ्रॉक आणि नाकात लोंबलेला शेंबूड ह्या वयात झालेल्या मैत्रित देवाण-घेवाणी करण्यासाठी आपल्याकडे होतंच असं काय?

तुझी चित्रकला: १. जास्वंदीचं फूल २. गुलाबाचं फूल (शेडिंग वगैरे उत्तम असलं तरी हे दोनच नमूने), आणि माझी हस्तकला: १. पेन्सिलींना टोक करतांना, टोक तुटो, साल राहो अशा आकांताने जमवलेल्या सालांची चिकटवलेली फुलं २.ओरिगामी कठीण म्हणून कातरकाम चिकटवलेली ग्रीटिंगं.

मग आपण स्वत:लाच पुढे केलं मैत्रीकरिता, आणि केलं असलं तरी घेतलं नाहीच काही एकमेकींचं. घेणार तरी कसं? स्वप्ना- म्हणजे- शिष्ठ, मनीषा- एकलकोंडी, कविता- भोळीभाबडी, प्रणीता- नीटनेटकी, तू- आळशी, नि मी.....मी सगळंच थोडं धर-थोडं सोड करणारी - अशा ठळक/ढोबळ रेषांनी आपण रंगवत राहिलो एकमेकिंच्या मनाचे आकार.

अजूनही मनीषा कसं म्हणायची, "हं, पुरे आता." किंवा तू कसं म्हणायचीस, "क...शाSSSला काय करायचंय?" ते आठवून आपण किती हसतो, भेटलो की. आणि नाही भेटलो की, अगदी २ महिने उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्याला गेलो, तरी एकमेकिंना पत्रं पाठवायचो. 

पण नाही भेटलो गेल्या १० वर्षात. सगळ्या बायकांचं होतं तेच आपलंही झालं. तेंव्हा, जागरण कर-करून तात्विक चर्चांचा कोळ करून प्यालो,  पण आता संसारात, नि व्यवहारात, अडकलोच. 

पण परवा तू फेसबूकवर काय एक कॉमेंट केलीस माझ्या फोटोवर, आणि मला आपले फुलपंखी दिवस लख्ख आठवले गं पुन्हा! पुन्हा लहान झाल्यासारखं नाही वाटलं, पण "लहान असतांना आपण असे होतो का?" असं वाटलं. मला १०वीला कोणत्या विषयात किती मार्कं होते, ते तुझ्या बरोब्बर लक्षात! मी चाट. पेपर लिहून झाला, की कोणत्या प्रश्नाला काय उत्तर लिहिलं ते स्वत:चंच स्वत:ला न आठवणारी मी, आणि २० वर्षांपूर्वीच्या माझ्या मार्कांचा नकाशा डोळ्यापुढे आणून फेसबूकवर माझ्याशी बोलू पाहणारी तू. 

पुला खालून किती पाणी वाहून गेलं, पण थोडंसंतरी ओंजळीत उरलं, ते तुझ्यामुळे. आपण कोण होतो, शाळा-कॉलेजात समोर हजारो रस्ते, आणि हजारो शक्यता, पण मनावर अर्धवट उमललेल्या स्वप्नांचं ओझं! मी सांभाळलं (तू ही असशील, असं वाटतं), ते आपल्या मैत्रीमुळे. मी तुझ्यासारखी नव्हे, पण तू ही माझ्यासारखी नाहीसच, हे जाणून मला, स्वत:ला स्वीकारण्याचं बळ आलं असावं. 

आता नवरा, मुलं, सासू-सासरे, अगदी आई-बाबा-भावालाही जी मुलगी कधीच माहिती नव्हती, ती फक्त तुझ्याकडे थोडीशी उरली आहे. ती मुलगी, निदान थोडे क्षण तरी, मला भेटायला हवीये. तिच्याकडून मला पुन्हा थोडी स्वप्नं विणून घ्यायची आहेत. तिला तुझ्या पत्रातून पाठवतेस का? 
मी बदलले, ते काही वाईट नाही, तरीही, 
कुणीतरी लागतं असं- जमेल/न जमेल, झेपेल/न झेपेल असल्या फालतू विचारांना, निखळ प्रेमाने बगल देऊन, तुम्हाला पुढे ढकलणारं. 
कुणीतरी लागतंच असं- तुम्हाला तुमच्या फुलपंखी दिवसांतल्या नावाने ओळखणारं. 

इतकंSSS सेंटी पत्र लिहिलंय मी, तर मठ्ठ मुली, आतातरी पेन उचल. किंवा, नकोच उचलू. फ़ेसबूकवर कॉमेंटी कर फक्त- उचलला माऊस, केलं क्लिक. आळशे, "बूडही हलवायला" लागत नाही पत्र लिहायला. म्हणून लिही. 

तुझी...