PR-वास........

5/8/14

तिसरा डोळा!

 दोन डोळ्यांनी बघण्याची एकच दृष्टी आपल्याला मिळालेली असते, पण त्या दृष्टीचा केवळ "बघणे" ह्या एकाच क्रियेसाठी उपयोग करेल तर तो मानव कसला? दृष्टीतून आधी अनुभूती, मग पुढे, "मा निषाद!" प्रमाणे अनुभूतीची अभिव्यक्ती, आणि अभिव्यक्तीचे वाचन करणाऱ्याला त्यातून स्थलकाल-अबाधित  एक व्यक्तिगत अनुभव मिळणे, हे सर्व एका दृष्टीनेच निर्माण झालेली साखळी आहे. 

वाचनाचा हा अनुभव प्रत्येकाला असतो, पण आजच्या माहितीयुगात त्या पलिकडे जाऊन वाचनाकडे कुणी बघत नाही. विशेषत:, एका पुस्तकाने मिळालेल्या "दृष्टीतून" दुसरे पुस्तक, वा निव्वळ आपले रोजचे जीवन तपासून बघण्यातला "थरार" अक्षरश: अनुपम असतो. माहिती, किंवा मनोरंजन, ह्या दोन प्राथमिक उद्देशांच्या पलिकडे घेऊन जाणारे वाचन म्हणजे काय असतं? ते ह्या "तिसऱ्या नेत्राच्या" दृष्टीतून बघितल्यावर कळतं!

काही दिवसांपूर्वी मी योगायोगाने सलग ३ पुस्तकं वाचली: 
Wave 

त्यातिल "A Game of Thrones" सध्या फारच लोकप्रिय झालंय. महाभारतापेक्षाही मोठा पट मांडून लेखकाने वाचकांनाच नव्हे, तर कदाचित समीक्षकांनाही गोंधळात टाकून चांगले अभिप्राय मिळवले असावेत. कुणाला "महाभारत" तर कुणाला "कहानी घर घर की" वा तत्सम "अनंत" मालिकांप्रमाणे वाटू शकेलशा ह्या पुस्तकाचे आजवर ६ भाग (प्रत्येकी साधारण ७०० पानी) आलेत, नि लेखक महर्षी व्यासांइतका वयोवृद्ध असल्यामुळे, शेवटचा भाग न लिहिताच "प्रयाण" न करो, अशी त्याचे कट्टर वाचक प्रार्थना करताहेत. एकाच शब्दात वर्णन करायचं झालं, तर शुद्ध "मसाला"! "शोले" ला लाजवतील अशी रसभरीत पात्रं, नि वर्णनं! "२४" ला लाजवतील असे थरारक प्रसंग, आणि Lord of the Rings समजत नसेल तर आमच्या वाटेला जाऊच नका, अशी देशोदेशीची मिसळ. Francis Bacon ने म्हटल्याप्रमाणे, काही पुस्तकं चमचमीत लागतात, ती अशी. 

आजकाल अशीच पुस्तकं, मालिका, सिनेमे खपतात. प्रत्येक "प्रकरणाच्या" शेवटी एक रहस्य. रोजचा एपिसोड संपतांना पुढची झलक, पात्रं वाईटाची अचानक चांगली होणे, किंवा अपेक्षितपणे अनपेक्षित धक्के! मी पण बघते, "डोकं बाजूला ठेवून" बघते असं मात्र म्हणता येत नाही, कारण कधीकधी ह्या "मनोरंजनाच्या" बाजारात आपणही अजून मिरची, अजून थोडी आंबट चटणी, अजून थोडं आलं लसूण शोधायला आपसूकच निघतो. चर्चा करतो, खूप लोकांना तेच चटपटीत आवडलेलं असतं, म्हणून त्यांच्यात मिसळतोही. 

पण तसल्या वाचनाने ना "दृष्टी" येते, ना आपल्या आयुष्यात कुठलाही फरक पडतो. फरक पडतो, तो "Wave" सारख्या पुस्तकाने. सोनिया देरानियागालाची कथा "त्सुनामी" मधे, भूकंपात, बॉम्बस्फोटात सर्वस्व हरवलेल्या कुणाचीही असू शकेल, पण तिने ज्या धैर्याने असीम दु:खाचे पदर उलगडून दाखवले आहेत, त्याला तोड नाही. त्सुनामीने तिच्या पूर्ण कुटुंबाचा एका क्षणात घास घेतला. दोन चिमुरडी मुलं, नवराच नव्हे, तर आई-बाप आणि मैत्रही. हीच एकटी "वाचली", का, कशी, कशाला? ह्या प्रश्नांची उत्तरं कधीच मिळणार नाहीत. जन्मभराची वेदना घेऊन जगायची सवय होऊ शकते, पण त्या कधीही थांबत मात्र नाहीत, हेच सत्य सोनियाने कुठलाही मुलामा न लावता सांगितले आहे. तिच्या पुस्तकाने हेलावून जाणार नाही, असं कोण असेल? 

ग्रीक शोकांतिकांबद्द्ल ॲरिस्टॉटलने म्हटलेले आठवले, "शोकांतिकेचा, किंवा शोकनाट्याचा अनुभव घेतल्यावर माणसाला एकाच वेळी स्वत:च्या क्षुद्रत्वाची जाणिव होते, व त्याच वेळी मनोमन 'बरं झालं, हे दु:खी भागधेय माझ्या वाट्याला आलं नाही!' अशी सुटकेचीही भावना होऊन समाधान मिळतं." Wave वाचल्यावर माझ्याही क्षुद्र "भावनांचा निचरा" झाला असेल कदाचित, पण त्याही पुढे जाऊन, कुठेतरी वाचनाच्या "तिसऱ्या उद्देशाची" जाणीव झाली: मनाचे उन्नयन. 
जीवनाची क्षणभंगूरता, पण त्याच वेळी, सोनियाने आपल्या कुटुंबाच्या आठवणींना स्वीकारून, त्या आठवणींमधलं प्रेम, सौंदर्य, जपण्याचा त्या पुस्तकातून केलेला प्रयत्न, आणि तो वाचतांना मला मिळालेल्या अनुभवातून माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन, काही प्रमाणात नक्कीच बदलला. शेकडो पुस्तकं वाचली, तरी काही जन्मभर स्मरणात राहतात, ती ह्याच मुळे. त्या पुस्तकाचा अंतर्यामी अनुभव आपण कधीच विसरू शकत नाही. 

दोन अत्यंत टोकाची पुस्तकं वाचली खरी, पण Fahrenheit 451 च्या दृष्टीतून बघतांना मात्र नवीनच साक्षात्कार होत गेले. भविष्यकाळात (जो आताचा वर्तमान आहे), पुस्तकं जाळण्याचे सरकारी काम करणाऱ्या एका fireman ची ही कथा. शोकांतिका अशी, की कुण्या जुलमी राज्यकर्त्याने पुस्तकांची बंदी ह्या समाजावर लादलेली नाही, तर ती समाजानेच स्वत:वर ओढवून घेतलिये, कारण त्यांना हळूहळू पुस्तकांची गरजच वाटेनाशी झालिये. घराच्या चारही भिंतींवर टी.व्ही. प्रसारणातून तुम्हीच मालिकेत सहभागी होऊ शकता. मालिका रसभरीत. मनोरंजक. दिवसभर काम, आणि थोडं मनोरंजन, ह्या पलिकडे बघायला कुणालाच वेळ नाही.  

७०० पानांची कादंबरी मग १०० पानांची झाली, तिची मग १० पानी कथा झाली, (आणि होत होत १४० अक्षरांची tweet झाली).  इतकंच काय, गाड्या दिवसेंदिवस अधिकाधिक वेगाने धावू लागल्यावर, रस्त्यांवरचे फलक वाचणेपण कठीण पडायला लागले, त्यामुळे तेही मोठमोठ्या पण कमीतकमी अक्षरांत लिहण्याची प्रथा पडली. 
उगीच नको ते वाचून नको ते विचार, आणि विचारातून व्यक्तिस्वातंत्र्य, स्वातंत्र्याचा परिणाम जबाबदारी! जबाबदारी हवीच कुणाला? सरकार तर नागरिकांना सर्वोच्च सुखासीन जीवन देण्यास करबद्धच असतं, मग एकेकाळी आग विझवून पुस्तकं वाचवणारे firefighters, आता घरांवर छापे घालून पुस्तके जाळणारे झाले. 

ह्या भिंगातून मला Wave आणि Game of Thrones चे "खरे" रंग दिसायला लागले. खरंतर Wave असो वा GoT, दोन्ही जीवनाला आरसा दाखवतात, असेही कोणी म्हणेल. वाचनच काय, कुठल्याही उपक्रमात, "उद्देश" महत्त्वाचा तर असतोच, पण खरोखरी सकस वाचनाने कुठेतरी सहानुभूती जागृत होते. एक विचार जागा होतो, एक जाण येते. ही दृष्टी मला Fahrenheit 451 ने दिली. "Fahrenheit" च्या विश्वात सगळेच Game of Thrones वाचणारे, जगणारे. आणि ते विश्व भयानक आहे. 

ही त्सुनामी लाट हळूहळू येते आहे. त्यात माझे जिवलग: ॲरिस्टॉटल, फ्रान्सिस बेकन, शेक्सपियरच नव्हे, तर कुसुमाग्रज, शांताबाई शेळके, ग्रेस, दुर्गाबाई नि गौरी देशपांडेही वाहून जाणारेत, असा भास झाला, नि हादरले. अजून "दृष्टी" यायला हवीये.