3/16/15

सोप्पं गणित

लहान असतो आपण तेंव्हा जग अवाढव्य पसरलेलं दिसतं...
आपण लिलिपूट, राक्षसांच्या जगात.
शाळेच्या भिंती इतक्या उंच की उडी मारून जाता येऊ नये
रस्ते लांब इतके, की पाय दुखतात दोन चौक चालून
तरी दिसत नाही, आईसक्रीमचा गुलाबी कोन काढलेली पाटी
सगळ्या गोष्टीची घाई असते, पण वेळ सरकत नाही भरभर पुढे
“आई, बोअर होतंय, आता काय करू???”

खरं म्हणजे ५० वर्ष तेंव्हा वाटत असतात युगांसारखी-
येवढ्या मोठ्या आयुष्याचं काय करतात माणसं?
खरं तर, काही करत का नाहीत? असे बाळबोध प्रश्न!

आणि आता - दिवस घालवायला फारसं काही करावं लागतच नाही
तासचे तास कसे नकळत भरून जातात ते कळतंय
चादरी धुवायच्यात लॉन्ड्रीत, बाथरूम घासायला हवी,
भांडी, तेवढ्यात टी.व्ही बघत बघत स्वयंपाक,
मुलांचे अभ्यास, कपड्यांच्या घड्या,
धूळ झटकायची, न संपणारी आवराआवरी
रात्री डोळे मिटतात तरी वाचायचं असतं
करायचे असलेले फोन, भरायची असलेली बिलं,
जेवायला यावे लागणारे-पाहुणे, जेवायला जावे लागणारे नातेवाईक,
जमलंच तर निसर्ग सौंदर्य, हवाबदल, सुट्ट्या आणि नोकरीचं चक्र...
तेच, तसंच, असंच, थोडसं, कहिसं, काहीतरी...

भरून टाकायचे क्षण, वेगवेगळ्या निरर्थांनी
रंगीबेरंगी खोक्यात लपवून पोकळ्या
मग वाहत जातो, दिवस, अज्ञात प्रवाहाने ढकललेला
वर्ष, गरगरणाऱ्या पृथ्वीसोबत,
शतकं- इतिहासाच्या पुस्तकात......

सोप्पं असतं आयुष्याचं गाणित, लहानपणी न सुटलेलं,
खरं म्हणजे तोवर वाचावंच न लागलेलं...


Writing, Voice and Anonymity

नुकतंच एक अतिशय मनोरंजक पुस्तक प्रसिद्ध झालंय- ह्या समस्त इंटरनेट वरील ब्लॉग, माहिती तंत्रज्ञान आणि चर्चेविषयी. Andrew Keen चं "The Cult of the Amateurs" नावाचं. त्यात त्याने असा दावा केलाय, की इंटरनेटमुळे आपली (म्हणजे अमेरिकन) संस्कृती बुडते आहे. ब्लॉग किंवा विकिपीडिया मुळे खरी आणि खोटी माहिती, निरपेक्ष आणि पक्षवादी लेखनामधे फरक करता येईनासा झालाय. चुकीची मतं, मतप्रवाह सुदृढ होऊ लागले आहेत, आणि खरंच उच्च दर्जाच्या लेखनाला किंवा इतर कोणत्याही उच्च दर्जाच्या प्रॉडक्ट ला अक्षरश: "भाव" (किंमत) " मिळेनासा झालाय. म्हणजे असं, की आजकाल आवडत्या गाण्यांची सीडी बाजारात जाऊन विकत घेण्यापेक्षा फुकट गाणी डाऊनलोड करता येतात. येवढंच नव्हे, तर अख्खी पुस्तकंच्या पुस्तकं इथे उद्धृत केलेली सापडू शकतात. चित्रपट, मालिकांचं तर विचारूच नका- इंटरनेटच्या youtube.com ह्या वेबसाईटवर कोणीही कसलेही व्हीडियो लावा, आणि त्याला प्रेक्षकवर्ग असणारच, ह्याबद्द्ल निश्चिंत असा.

कीन महाशयांचा सर्वात मोठा आरोप असा, की इंटरनेटवर आपल्याला आपलं खरं रूप दाखवावं लागत नसल्यामुळे वापरणाऱ्यांवर कोणतीही सामाजिक, राजकीय, व्यक्तिगत जबाबदारी नसते, आणि त्याचा गैरफायदा प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या पातळीवर उचलत असतो.

मला हे सगळं पटतं आहे, तरीही कुठेतरी दुसऱ्या दिशेनेही विचार डोक्यात येताहेत। नुकतंच मी ह्याच ब्लॉगवर "नातिचरामी" नावाचं एक छोटं रसग्रहण लिहिलं, मेघना पेठेंच्या पुस्तकावर. मी हा ब्लॉग लिहिते, हे आमच्या बऱ्याच नातेवाईकांना/मित्रांना माहिती आहे. आईवडिलही मोठ्या कौतुकाने वाचत असतात मी काही नवीन लिहिलेलं. हे सगळं असतांना अर्थातच काय लिहायचं ह्याला मर्यादा येतात.
"नातिचरामि" सारख्या पुस्तकाला अनुकूल प्रतिसाद असणारं पोस्ट लिहिलं, हेच खरं म्हणजे माझ्या आयुष्यातलं एक political statement झालंय, हे खरं...

मनातल्या मनात आपल्याला अनेक गोष्टी पटत नसतात, पटत असतात, पण त्यांचा जाहिर स्वीकार करणे, ह्याला जे धैर्य लागतं, ते कधीकधी anonymity मधूनच येतं. सामान्य माणसांना तर ही anonymity लागतेच लागते, पण मोठेमोठे लेखकही अपवाद नाहीत. विशेषत: स्त्री लेखिकांनी कायम pseudonyms किंवा खोट्या नावाखाली लेखन केलं आहे. George Elliot म्हणजेच Mary Ann Evans हे उदाहरण प्रसिद्ध आहे. अशी स्वत:ची identity लपवण्यातही एक समझौता आला, जो खरं म्हणजे कोणालाही करायला लागता कामा नये। पण त्या पडद्यामागे राहून का होईना, आपले विचार स्टेजवर पोचले, ह्यातच त्या लेखिकांनी धन्यता मानली. त्या विचारांना वाचक/प्रेक्षकांनी उचलून धरलं, त्यातच लेखनाचं सार्थक झालं असं त्यांना वाटलं असावं.


मला मात्र असं वाटत नाही। माझ्याही आयुष्यात असा एक काळ आला, की मला लिहायला नकोसं वाटू लागलं. कारण मी जे लिहीन ते फार कडू जहर असेल अशी मला भीती वाटली. माझ्या लेखनातून मी माझ्या जवळच्या व्यक्तिंना दुखावणारं काही येऊ नये ह्यासाठी आटोकाट प्रयत्न करत राहिले, तर ते लेखनच फसवं, उथळ वाटायला लागलं.
लेखक-मी, आणि व्यक्ति-मी ह्यांत एक भींत मी निर्माण केली, तरी ती मर्यादा माझ्या जवळच्या लोकांना कळेल का? आणि अशी लक्षमणरेषा निर्माण करणं खरंच कितपत शक्य आहे, हा ही मोठा प्रश्नंच। मी म्हणजे केवळ माझं लेखन, असं समीकरण मांडणं, हा मोठा अन्याय आहे, पण माझ्या लेखनात जोवर मी नाही, तोवर त्या लेखनाला काय अर्थ? साध्या साध्या गोष्टी मोकळेपणाने मांडण्याचं स्वातंत्र्य मला नाही, जोवर मी मुलगी, सून, बायको, शिक्षिका ह्या भूमिकांमधे अडकलेली आहे.

मलाही वाटतं- एक Anonymous blog लिहावा. पण जे विचार माझ्या घरच्यांजवळ व्यक्त करण्याचं धैर्य़ माझ्यापाशी नाही, ते विचार इतरत्र लिहण्याची पळवाट मला नको आहे। माझ्या जवळच्यांनी मला माझ्या लेखनासकट स्वीकारावं, आणि लेखनातल्या माझ्या विचारांचं सावट माझ्या वैयक्तिक आयुष्यावर येऊ नये, तर त्या लेखनाला “आनंददायी म्हणता येईल.

टायटॅनिक सिनेमातल्या म्हातारीकडे, तरूण असतांना मनाविरूद्ध लग्नाला प्रतिकार करण्याची शक्ति नसते. ती जीव द्यायला बोटीच्या कठड्यावर चढून उभी राहते, पण आत्महत्या करण्याचंही धैर्य तिच्यात नसतं. तीच मुलगी, मग म्हातारी झाल्यावर आपण जॅकबरोबर कसा लपून प्रणय केला, हे अनोळखी वैज्ञानिकांना, आणि आपल्या नातीला बिनधास्त सांगत बसते.

कदाचित, कदाचित, ९०व्या वर्षी मी एक यशस्वी लेखिका होईन. कदाचित, कदाचित, त्यावेळी माझी भूमिका केवळ एक लेखिका येवढीच उरेल. कदाचित, कदाचित, Andrew Keen च्या प्रयत्नांनी माझ्या पुस्तकांच्या प्रतींच्या pirated copies इंटरनेटवरून फिरणार नाहीत. पण तोवर, हेच, असंच, थोडं इकडे, थोडं तिकडे, थोडं मनाचं, थोडं जनाचं....

भैरवी

आद्य स्वर म्हणुनी तुला, झाले तुझी संवादिनी
षडज- पंचम भारल्या तारांत मी "गंधारूनी"।


वेदनेच्या उमटता लहरी कधी तानेतल्या
तेजात क्षणभर नाचले उन्मुक्त नभी सौदामिनी।

आज नाकारू कसे ते दुःख तू मजला दिले
काव्य त्यतील घेतले स्वप्नांतही मी मागुनी।


भाव एकाकार होते, अंतरातिल गूज ही
हृदयी तुझ्या जे उमटले, अश्रूत ते ह्या लोचनी।


भेटते द्वैतास बेदरकार आता रोजही
गायली संपूर्ण मी ही भैरवी द्वैतातुनी.

चारोळी, ग्राफीटी

परक्या देशातले अनोळखी लोक
"आपल्यांपेक्षा" बरेच वाटतात
त्यांचे खोटे जिव्हाळे नि उमाळे
खोटेपणात तरी खरेच वाटतात!
===========================

ज्या प्रेमाने सगळे प्रश्न
सोप्पे झाले
ते प्रेम तुझं होतं की माझं?
की ...
हा विचार
न केल्यामुळेच
प्रश्न सोप्पे झाले ?

चरोळ्या

आकाशाच्या नि:शब्द पोकळीत
नाही संवेदना, वेदना ही नाही.
तरीही वाहतात ढगांसारखे शब्द
सांगायचे काही असो, वा नाही।
कोण मी? ह्या प्रश्नाचं उत्तर
त्या ढगांत शोधणारे
व्यर्थ भरलेल्या आभाळातून
थेँबांचे अश्रू ओघळणारे!
=========================
तुझ्या अबोल्यात दडलेले अर्थ
न शोधताही सापडताहेत सहज
अर्थांचे प्रश्न सार्थ व्हावे,
त्यासाठीच तर भावनांची गरज.

झाडं

प्रत्येक झाड वेगळं असलं तरी
प्रत्येक झाड सुंदर असतं
कधी कधी मी विचार करते-
माणसांचं असं का नसतं?

मी कुठेही फ़िरायला गेले तरी आधी मला जाणवतात ती झाडं! माझ्या माहेरी मागच्या दारी असलेलं मोठं लिंबाचं झाड असो, किंवा दारापुढे असलेलं जास्वंद- ह्या माझ्या लहानपणापासूनच्या सोबत्यांनी मला वेगवेगळ्या झाडांकडे बघायला शिकवलं.
आता आठवतंय- आम्ही एका पावसाळ्यात फ़िरायला चिखलदय्राला गेलो होतो. तिथला निवांतपणा, पावसाने तकतकीत झालेली हिरवळ मनाला ताजेपणा देत होती. पण तिथेही माझ्या उत्साही आईला शोधून शोधून काय सापडावं??? कढीलिंबाचं बन!!! रोज रोज स्वयंपाक केला की मनाच्या कप्प्यात कायमच भाजी-पाले दिसायला लागतात हे तेव्हा मला कळलेलं नव्हतं! पण तरीही, त्या कढीलिंबाच्या बनातला वास अजूनही एक प्रकारची झिंग आणतो आहे.

नंतर असंच पुण्यात शिकत असतांना युनिव्हर्सिटीतले ॠतु आठवतात- उन्हाळा आला की बाकी सगळीकडे पानगळ सुरु झाली, तरी आमच्या "शांतीनिकेतन" कॅन्टीनवर छत्रछाया धरणारी अजस्त्र चिंचेची आणि वडाची झाडं मात्र सदाहरित असायची... त्यांच्या पानांमधून शितल होऊन येणारी झुळुक उन्हाच्या, आणि परीक्षेच्याही तापातुन थोडा विसावा द्यायची.

गेले ते दिवस. अंगणातल्या सिताफ़ळाच्या पानांची पत्रावळ करुन बघायचे- उंचावरच्या चिंचा नाहीच मिळाल्या, तर चिंचेच्या पानांतला आंबटपणा चोखुन "कोल्ह्याला चिंच आंबट" म्हणायचे!!!

जर्मनीत माझ्या खोलीच्या खिडकीतून दिसणारे तसे "तरुण" झाड- बाकी अनेक झाडांनी थंडी संपल्यावर पसरलेल्या फ़ांद्यांवरची कोवळी पाने बघूनही, ते वेडे झाड आपल्या कोषातुन बाहेर यायला तयारच नव्हते! मग एकदाची त्याला पालवी फ़ुटली. आणि मग थोड्याच दिवसात त्यावर नाजुक राणी-हलक्या गुलाबी फ़ुलांनी गर्दी केली!!!! मग माझ्या खोलीची खिडकी उघडायची सोय उरली नाही- कारण त्या फ़ुलांकडे येणारे असंख्य भुंगे आणि इतर कीडे बरेचदा वाट चुकुन माझ्या खोलीत शिरु लागले.
हे माझे खास झाड होते- त्या अनोळखी प्रदेशात ते एकच मला ओळखीचे वाटू लागले होते. माझी खोली पहिल्या मजल्यावरची. त्यामुळे त्या झाडाच्या फ़ांद्या सरळ माझ्या नजरेसमोर येत. त्यामुळे कधीकधी खिडकीबाहेरच्या दृश्याकडे पाहता आले नाही, की त्याचा राग येई... पण ६ महिन्यांनी घरी परत जातांना इतर कुठलेच पाश नव्हते तरी त्या झाडाकडे बघून वाईट वाटले होते.

त्यानंतर भारतातल्या जुन्या झाडांची नव्याने ओळख करून घेतांना एक दोन पावसाळे कसे गेले कळलंच नाही. लग्नाच्या आधी आम्ही काही झांडांभोवती गाणी म्हटली नाहीत- पण मला आवडलं असतं! पंकजला एकदातरी पुण्याच्या वेताळटेकडीवर न्यायचं होतं. तिथली झाडं संध्याकाळी सुरेख, पण रात्र पडताच भयाण दिसायला लागतात. चंद्र उगवू लागलेला असेल तरी त्याचा प्रकाश रस्त्यावर झिरपत नाही तेव्हा त्यांची भीती वाटते. शहरातल्या दिव्यांना बाजुला सारून बैराग्यासारखी ही झाडं वेताळ-टेकडीवर जाऊन बसलेली!!!

आता मी अमेरिकेत आले. जर्मनीमुळे स्प्रिंग, ऑटम ही ॠतुंची नावं माहिती असल्यामुळे इथे त्या ॠतुंची नकळत मन वाट पाहत होतं. आल्या आल्या भयंकर थंडी आणि बर्फ़ात उभी राहिलेली निष्पर्ण झाडं पाहिली. एका झाडावर तर एक छोटी चिमणी पण दिसली. मी विचार केला- ही बिचारी चिमणी इथे आडोशाला आलिये नेहमीप्रमाणे, पण तिच्या ओळखीच्या झाडांवरची पानं कुठे हरवली?
बर्फ़ातली निष्पर्ण झाडं ना त्या चिमणीच्या ओळखीची होती, ना माझ्या. पण चैत्रात पालवी फुटायला लागल्यावर झाडांचे खरे रूप दिसायला लागले. आणि तरीही मनाला ओळख पटेना! भारतात घेरेदार वृक्ष, वेली, छोटी झुडपं असे वेगवेगळे प्रकार पाहिले होते, पण इथे अमेरिकेत त्यातले एकही दिसले नाही. फ़ार तर फ़ार आमच्या जुन्या घराजवळ "फ़र्न" किंवा "विद्या" ह्या प्रकारांशी मिळतीजुळती एक दोन झाडं होती.

संध्याकाळी फ़िरायला जातांना इकडे तिकडे बघता बघता मनात असे विचार यायचे- की हा देश कित्येक भारतीयांनी "आपला" म्हटला आहे. आपलासा केला आहे. आणि ह्या देशानेही त्यांना सामावून घेतले आहे. पण भारतात जशी मेंदी, मधुमालती, चाफा, नारळ, दुर्वा, बाभळी, चिक काढणारी घाणेरी, हे प्रकार आपल्या अंतर्मनात रूजलेले असतात, तसे इथले कधी रूजतील का? उद्या माझ्या अमेरिकन पोरांना मी ह्या झाडांची ओळख कशी सांगू??? की त्यांच्या पुस्तकातून मला स्वतःला आधी ती करून घ्यावी लागेल???

ऑटम येईपर्यंत ही झाडं नजरेला तरी सवईची वाटू लागली होती. (आपल्या घरी पेपर टाकणाय्रा पोराचं नाव आपल्याला कुठे माहिती असतं? पण आपण त्याला चेहय्राने ओळखतो ना, तसंच काहिसं). मग आमच्या नवीन मित्रांच्या कंपूने न्यू हॅम्पशायरला जायचे ठरवले- खास "ऑटम कलर्स" पाहण्याकरता! गाडीत अंताक्षरी खेळत होतो. भारतात हजारो वेगवेगळ्या सहलींना अंताक्षरी खेळले असले, तरी त्याला किती युगं लोटली होती कोणजाणे! "सुहाना सफर और ये मौसम हसीं" असं गात होतो, तेवढ्यात बाहेर लक्ष गेलं आणि गाणं म्हणायचं विसरूनच गेलो!!!

नेमका पाऊस पडल्यामुळे पर्वतावर विसावलेलं धुकं, आणि त्यातून अधिकच मोहक दिसणारी अक्षरशः शेकडो रंगांची उधळण करणारी झाडं! एरवी भारतात जितकं सृष्टीसौंदर्य आहे, तेवढं मी अजून तरी कुठेही पाहिलेलं नाही. पण हे रंग खरंच वेड लावणारे होते! कुठे बघावे, कुठे नाही? एकीकडे लालसर, गुलाबी, दुसरीकडे केशरी, पिवळी, आणि मधेमधे त्या रंगांच्या असंख्य छटांनी पर्वतरांगा नटल्या होत्या. maple, birch, hickory, red oak अशी सगळी झाडं रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लावली होतीच, पण खालची दरी आणि वरचा डोंगरही ते दागिने घालुन मिरवत होता.
जाताजाता उन्हाळ्याने दिलेली अप्रतीम भेट. थंडीची चाहूल लागावी, पण ती थोडी तरी सुखद व्हावी, म्हणून हा झगमगाट!

भारतातली झाडं कशी अस्ताव्यस्त पसरलेली असतात. इथली मात्र एकूणच व्यवस्थितपणाला शोभेशी! उंचच उंच, पण सरळसोट वाढणारी, एकमेकांच्या अध्यात ना मध्यात. खरं सांगायचं म्हणजे इथल्या माणसांसारखीच. सावली देतील, पण आपल्या मुळांनी वेढून टाकणार नाहीत. त्यांची पानं/फळं जेव्हा शिशिरात खाली पडतात, तेव्हा लगेच कोणीतरी ती झाडून टाकणार! आपली मुलं मोठी झाली, की त्याना बाहेरच्या जगात नि:शंकपणे धाडून देणारे इथले आईबाप- तशीच ती झाडं...

आता पुन्हा हिवाळा आलाय. उन्हाळ्यात गुलाबी निळे लाल सगळे रंग घालणारे हे "लोक" एकदम काळ्या, ग्रे, राखी रंगात थोडेसे उदास दिसताहेत. आता क्रिमसचे वेध लागले, पण दिवस लहान होत होत ४.३० लाच मावळायला लागलंय. त्यामुळे आता झाडांनाही आपला पसारा आवरता घ्यायला लागलाय.
नुसत्या राखाडी रंगाच्या काड्या काय त्या उरल्यात.
भारतातही उन्हाळ्यात झाडांची काडं होतातच, पण त्यातही उन्हाची ऊब जाणवते, तिचा इथे लवलेशही उरला नाहिये. नदीकाठावरून आमच्या कॉलेजची बस जाते, ते दृश्य सुंदर म्हणावं की भाकास? बाजूला पाणी असूनही पानांना पारखी झालेली झाडं पाहिल्या बर्फ़ानंतर मात्र पुन्हा डौलदार दिसू लागतील- Christmas Tree बरोबर रस्त्यावरच्या इतर झाडांनाही प्रकाशाची फुलं लाभतील... आणि मग वसंतोत्सवाची वाट बघत बघत हिवाळा कसा गेला कळणारही नाही...

माणसं झाडांसारखी असती,
तर रान झालं असतं,
प्रत्येक माझ्या आठवणीचं
एक पान झालं असतं!

शब्द सवयीचे

शब्द सवयीचे असे का आज घोटाळून बसले
थेंब पानांवर तसे ते आज सांभाळून बसले।

लाट आवेगात आली भेटण्या सागरतिरी
पाऊले भिजली परी ती लाट मी टाळून बसले।

कोसळावे कड्यांवरूनी सत्य निर्मळ जळ जसे
प्रवाही त्या भावनांना आज मी गाळून बसले।

ओळखीच्या प्रदेशाचे आंधळे जे काव्य होते
ठेच त्याला लागली अन स्वत्त्व कुरवाळून बसले।

ये पुन्हा तू पावसा, विखुरल्या मोत्यांपरी
सापडावे मग मला, ते रान तुज माळून बसले।

स्पंदनांना विसरूनी, सोसली मी मुग्धता
पेटवा ते मन आता जे त्यास ओशाळून बसले।

मनावेगळी लाट

कुठेतरी एकदा वाचलं होतं, की कविता म्हणजे फक्त शब्द. त्यातून अर्थ, आशय, प्रतीक आणि प्रतिमा उपसून काढण्याचा आपण वृथा प्रयत्न करत राहतो. पण कविता म्हणजे फक्त शब्द. शब्दांच्या प्रेमात पडायला लावते, ती कविता. शब्दांची कधी न पाहिलेली, न चिंतलेली रूपं दाखवते, ती कविता. ती कविता मला ओढून नेते एका नवख्या प्रदेशात...

तुला पहिले मी...
कवीचं प्राक्तन- बघणे. काही बघतात, काही जगतात, पण कवी ते दोन्ही ही करतो. त्याला करावंच लागतं- लेखनातून. लिहण्यासाठी जगणं, आणि जगण्यासाठी लिहणं, स्वत:च्याच अनुभवांकडे तटस्थपणे बघणं.

“तुला पाहिले मी, नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे
इथे दाट छायांतुनी रंग गळतात
ह्या वृक्षमाळेतले सावळे"
ती, मूर्त आणि अमूर्त स्वरूपांच्या सीमारेषेवर उभी. तिच्या मोकळ्या केसांची मोहिनी,की दाट छायांतून गळणाऱ्या रंगांची? की ते दोन्ही रंग एकमेकांत मिसळेत नकळत?

तुझी पावले गे धुक्याच्या महालात
ना वाजली ना कधी नादली
निळागर्द भासे नभाचा किनारा
न माझी मला अन् तुला सावली
इतक्या अलगदपणे, पावलांचा आवाज न करता ती आली,कवीची प्रेरणा झाली. पण त्या उदास अनामिकेला खरी स्त्री म्हणावे, की नित्य अनुभवलेली सुंदर संध्या?
नभाचा किनारा! दोन अनोळखी शब्द. (किनारा सागराचा असतो, नभाचा नव्हे!) पण मूर्त आणि अमूर्ताशी खेळता खेळता ते दोन अनोळखी शब्द एकमेकांसमोर आले, तर अर्थाचा निळागर्द रंग डोळ्यांसमोर मांडून गेले.

मनावेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे
पुढे का उभी तू तुझे दु:ख झरते
जसे संचिताचे ऋतू कोवळे
“मनावेगळी लाट"... कवीच्या मनाचं सतत दुभंग होणं. मनावेगळ्या लाटेने व्यापून जाणं. ते टाळता न येऊन खूप व्याकुळतेने विचारणं, “पुढे का उभी तू? तुझे दु:ख झरते!” पुढे उभ्या "तिच्या" दु:खाशी एकरूप होतांनाही, कुठेही सावली नाही,ना त्याला, ना तिला, ह्याची वेदना समजून घेणं.

अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिल्वरांचा चुरा
तिचं झरणारं दु:ख आपलंसं करतांना, कवीच्या उरात एक आकांत. आणि तरीही, त्या एकरूपतेच्या क्षणातच कवीच्या अस्तित्वाचं सार्थक असतं. त्या एकरूपतेला कोणी प्रियकर-प्रेमिकेचा एकपणा म्हणतं, कोणी सं-वेदना, कोणी कवीमनाचं स्पंदन. त्या क्षणातच दु:खाला लखलखीत ताऱ्यात परिवर्तीत करण्याची क्षमता असते.
“दिसे की तुझ्या बिल्वरांचा चुरा...” दिसणे, बघणे.
जगण्यातून, असण्यातून काहीशा नाईलाजाने, काहीशा अपरिहार्यतेने, कवी बाहेर पडतो. मी ही बाहेर पडते.

मागे वळून बघतांना शोधत राहते,
ही प्रेमिकांची भेट होती?
की एका संध्याकाळच्या आर्ततेचं वर्णन,
की कविता जन्म घेते,त्या एका क्षणाचं?