6/23/15

"जीवनात" नव्हे, "जीवनाकडून" काय हवंय?

जीवनात आपल्याला काय हवंय, ह्याचा विचार सगळेच करतात, पण जीवनाकडून आपल्याला काय हवंय??? हा प्रश्न अगदी जीवनाच्या अंतापर्यंतही अनुत्तरीतच ठेवणारेच जास्त! एक चांगलं पुस्तक चाळायला मिळालं, "A Guide to The Good Life", त्याच्या लेखकाने हा प्रश्न विचारला आणि माझी विचारचक्रं फिरू लागली.

जीवनाच्या त्या त्या टप्प्यानुसार आपल्याला अनेक गोष्टी हव्या असतात: अधिक मोठं घर, मोठी कार, मुलांच्या भविष्यासाठी तरतूद वगैरे. पण जीवनाकडून तुम्हाला काय हवंय? ह्याचा विचार करायला कधी वेळ काढलाय का? किंवा, तसा विचारही करायचा असतो, हे तरी आपल्याला माहिती असतं का? मग ह्या प्रश्नाचं उत्तर शोधणं तर बाजूलाच राहिलं!
एखाद्याचे नशीब बघा, वॉल-स्ट्रीटवर नोकरी, चार बेडरूमचं भरलेलं घर, भरपूर मित्रप्ररिवार, उत्तम जेवण बनवणारी बायको, असं सगळं सगळं असलं तरी, त्याचं मन तिथे रमत नाही. त्याला डोंगरदऱ्यांची ओढ असते. सारखं भटकावंसं वाटतं. माणसं नकोशी वाटतात. ते का?
जेव्हा आपणच आपल्यापासून दुरावल्यासारखे होतो, सगळी सुखं असूनही त्यातून सुख घेण्याची क्षमता हरवून बसतो, समाधानाला पारखे होतो, तेव्हा तरी, प्रत्येकाने हा प्रश्न विचारायलाच हवा, आणि त्याचं उत्तर मिळतं ते तुमच्या "जीवनमूल्यांमधून". (ह्याला Core values, किंवा personal values असे म्हणू शकतो!)

मला आठवतंय तेव्हा पासून, मला शिक्षिकाच व्हायचं होतं, कारण "ज्ञानोपासना" हे माझं एक महत्त्वाचं जीवनमूल्य होतं. पण, शिक्षकीपासून दूर जावं लागलं, तरी ते मी कसं स्वीकारलं? कारण माझं एक अजून मोठ्ठं जीवनमूल्य "Adaptation" हे ही असावं. प्राणी-पक्षी, निसर्गातले सगळे घटक जसे परिस्थितीशी जुळवून घेतात, कारण तग धरण्याकरता ते आवश्यक आहे. हा जसा त्यांचा अंगभूत गुण आहे, तसा मला हवा होता, हवा आहे. 

ह्या उलट, परिस्थितीशी जुळवून न घेता, तिच्यात बदल घडवून आणण्याच्या काहींचा पिंड असतो. (आणि मग माझं त्यांच्याशी पटत नसलं, तरी मला त्यांचं कौतुक नक्कीच वाटतं!)
धैर्य: मनातले बोलण्याचे, लिहण्याचे, वागण्याचे, समाजाच्या आणि इतरांच्या अपेक्षांची ओझी न वाहता जगण्याचे धैर्य, हे ही एक मोठं जीवनमूल्य होतं, आणि ते वापरण्याचा पुरेपूर प्रयत्नही मी केला, त्याचे भले-बुरे परिणामही झाले, ते स्वीकारतांना जड गेलं नाही. 

रोज अनेकांना भेटतांना, त्यांच्याबरोबर जुळवून घेतांना अनेकदा त्यांच्या सवयी, त्यांच्या स्वभावांचा किती त्रास करून घेतो, तेव्हा त्यांच्या जीवनमूल्यांचा विचार केला, ती कशामुळे तशी "घडली", हे तपासून पाहिलं, तर दुसऱ्यांना समजून घेणं नक्कीच सोपं होतं. फक्त, आपल्या समाजात अजूनही काही जीवनमूल्य चक्क चुकीची, किंवा पूर्णपणे कालबाह्य आहेत, ती नक्कीच बदलायला हवीयेत. उदा:

  • स्त्रीसौंदर्याच्या कल्पना, आणि सतत, निरंतर त्याला दिले जाणारे महत्त्व. कॉलेजमधे जाणाऱ्या भाचीवर सतत, "किती सुंदर दिसते!" ही एकच प्रतिक्रीया नोंदवणे. 
  • पैसा: पैसा असणं ठीक, पण त्याचा माज करणे, दाखवणे, त्या एकाच तराजूत प्रत्येक व्यक्तीला तोलणे, आणि नसेल, तर मग संपलंच! 
अशी एक यादी केली, तर मग मला एकदमच खूप खूप साक्षात्कार झाले, खूप माणसं तर कळलीच, पण थोडीफार मी स्वत:सुद्धा कळले!
तर मग तुमची यादी काय आहे?