8/22/16

Syriaतले घर थकलेले संन्यासी

"घर थकलेले... संन्यासी" ह्या कवितेच्या पहिल्या ३ शब्दातच ग्रेस यांनी सगळं सांगून टाकलं असावं! इतकी अर्थघन शब्दयोजना. पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या स्वररचनेतला दोन शब्दांमधला तो जीवघेणा अंतराळ.... त्यात निर्वासितांचं अस्तित्वच नव्हे, तर "टांगणीला" लागलेल्या जीवाचा दाटलेला हुंदका आहे!

Syria देशातून गेली अनेक वर्ष ते चालताहेत. त्यांच्या मागे बॉम्बने विदीर्ण झालेल्या त्यांच्या गावांचा आक्रोश कानापर्यंत येऊ नये म्हणून कान आवळून बंद करून. त्यांची घरं जणू "थकलेली". कुणाची "थकबाकी" असते, कर्ज थकलेलं असतं तसं, घरासाठी वाट पाहणं त्यांच्या नशीबी आलेलं. आणि जीवाच्या भीतीने पायपीट करून करून ते ही थकलेले.  त्यांना "गृहस्थ" कसं म्हणावं? जे घरदाराच्या पाशांमधून निकराने स्वतःला सोडवून निघालेले- ते संन्यासीच म्हंटले पाहिजेत.

आडोशाची "भिंतही खचते" तेव्हा आईच्या डोळ्यातलं नक्षत्र त्यांना आठवतं आहे.
५ वर्षांच्या ओमरान च्या शून्य नजरेमध्ये असेल का तेच नक्षत्र?
आई, जिच्या उबदार पंखांमागे निर्धास्त डोळे मिटून लपून जावं, आणि सगळी चिंता आपोआप विरून जावी, त्या आईचं घरटं, हे प्रत्येकाच्या मनात खोल रुतून बसलेलं एक सुरक्षित स्थान असतं. पाय कितीही भरकटले, तरी तिच्या डोळ्यातल्या नक्षत्राने वाट दाखवावी, आणि फिरून आपण आयुष्याच्या शेवटी का होईना, तिच्या कुशीत निजावं, अशी उर्मी दाटून येते.
पिलं चालू लागतात, पण त्यांची आईसुद्धा देशोधडीलाच लागलेली असते! सिरियन निर्वासितांबरोबर प्रवास करणार्‍या पत्रकरांनी त्याबद्द्ल कितीहि भरभरुन लिहिलं, तरी कमीच...

जवळजवळ २५०,००० नागरिकांचं घर हिरावून घेणारं हे कसलं जीवघेणं युद्ध? गेली ५ वर्ष सतत जाळणारं हे कुठलं "रखरखते ऊन"!
"पक्ष्यांची घरटी होती ते झाड तोडले कोणी
एकेक ओंजळीमागे असतेच झऱ्याचे पाणी"
आयुष्य पाण्यासारखं पुढेपुढे वाहत जाताना, आपण ओंजळीत त्यातले दोन क्षणही सुखाने धरून ठेवू शकत नाही. प्रेमाची माणसं कालाधीन, तर कधी दुरावलेली... हातातून निसटून जातात. प्रत्येकवेळी ओंजळ भरून घेतांना त्यांना त्यातून निसटलेला झराच आठवत असेल का?
उलट प्रवाहाविरुद्ध पोहणारे जिगीषू निर्वासित, त्यांच्यातले किती पल्याड पोचू शकतात? एका बापाला मृत पोरासाठी अश्रू ढाळत न बसता, तसंच पुढेपुढे प्रवाहपतीत होऊन जावं लागतं. एक पिलू वाहून गेलेलं, त्याला आठवलीच असेल ना आपली आई, त्या अंतिम क्षणांमध्ये?

"मी भिऊन अंधाराला अडगळीत लपुनी जाई" जर कधीकाळी ह्या वाटसरूंना आश्रय मिळाला, तरी त्यांच्या डोळ्यांनी पाहिलेला "अंधार", ते अत्याचार, रक्तपात, बलात्कार, चिंधड्या - त्यांना विसरता येतील का कधी? घरासाठी रानोमाळ फिरणाऱ्या भटक्यांना जर घर कधीकाळी मिळालंच, तर ते हि पुन्हा नव्याने तिथे रुजतील. घरातल्या "अडगळीत" त्यांना सुरक्षित वाटूही लागेल. तो सवयीचा पसारा, "माझ्या" असणाऱ्या वस्तू, हौशीने जमवलेली भांडीकुंडी....... रोज रोज डोळ्यांना दिसल्या, कि जीवनाच्या सुरळितपणाचा क्षणिक दिलासाही मिळेल.

पण एकदा ज्यांनी आपलं घर उद्ध्वस्त होणं अनुभवलं आहे, त्यांना कायमच त्या "दरीतल्या वनराईचा" धसका लागून राहणार. ती भयाण वनराई, ते भटकेपण, कधी येऊन पुन्हा घर गिळंकृत करील? करील का? सगळीकडून ती आपल्या घरावर "हलके हलके" पुन्हा अतिक्रमणकरू लागलं आहे हा भास.... त्यातून त्यांची सुटका नाही.

तोवर घरात राहूनसुद्धा "घरपण" मात्र थकलेलं च राहील!

8/8/16

कवितेचा लोचा

आमच्या जीउनात कवितेनेच सगळा लोचा केलाय. हे पक्कंच कळलंय. आदिमानवांच्या काळात भाषा अशी असावी :
आ.ई (म्हणजे आदि.आई). : झाड (झाडाकडे बोट दाखवून)
आ.बा. (आदि.बाळ): दाल
आ.ई.: झा................ड....
आ.बा.: झा.....लं, जालं, जाड, झा.......................ड!

भाषेचा विकास, हा इथेच थांबायला हवा होता. "त" वरून "ताकभात" ओळखता येण्याइतकी बुद्धी (सुदैवाने/दुर्दैवाने) माणसाला मिळालेली आहेच की. पण नाही. थांबायचं कुठे, हे ज्याला कळत नाही, तो प्राणी म्हणजे माणूस. आपली भाषा, आणि त्यायोगे आपलं जीवन, अधिकाधिक कॉम्प्लिकेटेड करायला ज्याला आवडतं, आणि मग त्या गुंतागुंती बद्द्ल रडतांनाही नवनवीन सुरात कसं रडून दाखवता येईल, ह्याचा विचार जो करतो, तो प्राणी म्हणजे माणूस. आणि म्हणूनच, माणूस = कवी. आणि म्हणूनच, काव्य-भावनेनेच सगळा लोचा केलाय, हे पक्कं.

नुसतं "झाड" म्हणून थांबायच्या ऐवजी, मग झाड हिरवं असतं, हिरव्या झाडाला खूप पानं असतात, झाडाची पानं वाऱ्यावर डुलतात, झाड सुंदर असतं, ही असली निरूपयोगी निरीक्षणे करणं, हे कवीचं काम असतं. इथे कवी= शिकार, झाडे तोडणे, एकमेकांवर स्फटिके आपटून आग लागते का बघणे, ती स्फटिके विकून चार कोंबड्या विकत घेता येतील का ते पाहणे, असले कुठलेही "अर्थपूर्ण" उद्योग करायचे सोडून, झाडाची हिरवी पानं बघत बसलेलं खुळं, हा एकच अर्थ अभिप्रेत आहे.

हे खूळ म्हणजे एक खूळच असल्यामुळे, कवीमंडळींना आत्मविश्वासाचा जबरदस्त विंचू चावलेला असावा (अगदी आदिकाळापासून), कारण, तुम्ही हे जे (इतरांना) उपयुक्त पण स्वत:ला निरूपयोगी जीवन जगताय, ते काही खरं नाही, असं सांगून त्यांनी आम जनतेलाच वेड्यात काढलं. उलट कवींना सरळ बुद्धी दे रे बाबा, म्हणून "आदि"माते ला विनवण्यापेक्षा, कवींची निरीक्षणं स्मरणात ठेवून चघळणे, एकमेकांना ऐकवणे, असल्या प्रशस्तीमुळे कवी मंडळी लई डोक्यावर चढत गेली ती गेलीच.

शिवाय, रोज रोज खाल्यावर जसे स्वयंपाकातले बारकावे कळू लागून "रसिक" जन्माला येतात, स्वत:ला गाण्यात गती नसूनही जसे "कानसेन" तयार होतात, तसेच रोज रोज हा खुळ्या शब्दखेळाचा रतीब ऐकून-वाचून वाचकही प्रगल्भ (किंवा बोअर) झाले, की त्यांनाही वर्णनात्मक कवितांनी किक बसेनाशी झाली, आणि कवींना उपमा-उत्प्रेक्षांच्या फोडण्या घालून घालून शब्द खपवायची वेळ आली.  हे मीच नव्हे, लेव्ही स्ट्राऊसनेही म्हटलंय बरंका. आणि काय म्हटलं, यापेक्षा कुणी म्हटलं, ह्याला जास्त महत्त्व आहे, असं पुलंनीही म्हटलंय, जे स्वत: पु.ल. असल्यामुळे, त्यांच्या म्हणण्याला तरी मान असणारच किनई!  इथवर ठीक होतं. खरा लोचा झाला, तो पुढेच आहे.

आता तुम्ही म्हणाल कि कवितेत मला काय प्रॉब्लेम! मी काय कवी/कवयित्री नाही. असते तर लेख लिहिण्या ऐवजी कविताच केली असती ना हो. कविता करण्या/ वाचण्याचा छंद तसा निरूपद्रवी आहे. वर सांगितल्याप्रमाणे, कवी मंडळींंचा प्रक्षोभ सक्रीयतेकडे क्वचितच पोचत असल्याने, तसाही काही धोका नाही. "आदि"कवी वाल्मिकींनाच बघा, हरणाला बाण मारणारा शिकारी बघून एखाद्याने त्याचा हात धरला असता, किंवा किमानपक्षी नंतर त्या विद्ध हरणाला मलमपट्टी केली असती, पण हे फक्त "मा निषाद!" म्हणून काव्यच करत बसले, आणि संस्कृतात वगैरे लिहिल्यामुळे त्यांचा आदिकवी म्हणून गौरव झाला, तो वेगळाच. काय नशीब असतं एकेकाचं. आम्ही जन्मल्यापासून पांढऱ्यावर काळं खरडतोय, खरडतोय, तरी ब्लॉगवर कॉमेंटाही येणं दुरापास्त. आणि इथे, दोन शब्द म्हटले, की झाले कवी!

पण ते ही मान्य. खरा लोचा झाला, तो पुढेच आहे.

सुरुवातीला कवींना राजाश्रय असे. म्हणजे खाऊन पिऊन (कदाचित जास्त पिऊन सुद्धा), कविमंडळी खूष असत. पण स्वतःला विकणं इतकं सोपं नसतं! त्यासाठी स्वतःचं व्यक्तिमत्व तसं घडवावं लागतं, मी, माझे विचार, माझ्या भावना, माझे अनुभव, सगळंच किती मनोरंजक आहे, हे दाखवावं लागतं. आणि दाखवता येण्यासाठी तसा तेवढा स्वतःवर विश्वासही असावा लागतो. किंबहुना, स्वतः सोडून दुसरा तिसरा कोणाचाही विचार करून चालतच नाही.
किंवा, दुसऱ्यांचं निरीक्षण केलंच, तरी ते "आपल्याच" रचनेतून मांडायचं, त्यासाठी त्यांच्या गोष्टी वापरायच्या.

हे असं आत्ममग्न जगणं कवींनी सुरु केलं, तिथेच देकार्त सारख्याला, "I think, therefore I am" चा साक्षात्कार झाला असावा. मी म्हणजेच माझं मन. माझं मन, माझे विचार म्हणजेच मी.
म्हणजे काय, की एकवेळ स्वत:ची मुलं नसली, तरी मी आई हे बिरूद लेऊ शकते, घर सांभाळत असले, तर "होममेकर" हे "पद" भूषवू शकते, पण मी विचारच करत नसले, तर मी अस्तित्वात आहे की नाही, हाच प्रश्न पडावा!

आणि लोचा असा, कि फक्त कवी लोक असले "विचार" करत असत, तोवर ठीक होतं. विचार करणं, हि त्यांची व्यावसायिक गरज म्हणा ना! पण इतर लोहार, कुंभार, भाजीवाले, सैनिक नि गिरणीवाले... सगळ्यांनाच हे एकदम हॉट म्हणजे एकदम हॉट प्रोफेशन वाटू लागलं ना! दुकान टाकायला एक पेन नि कागद, आणि कामाच्या नावावर नवनवीन प्रेमप्रकरणे, देशाटने, लोकसंग्रह....... शिवाय प्रसिद्धी, आब आणि किताब, कोणाला आवडणार नाही???

आणि सगळेच कवी, तिथे वाचक विरळा! लेखन, प्रकाशन आधीच इतकं सोपं होतं, ते ब्लॉगद्वारे किंवा जालावर आणखीनच सोपं झालं, आणि काही वेबसाईटतर, हजारो लोकांनी, वेगवेगळ्या मुद्द्यांवर, हरप्रकारे चर्चा करावी, ह्यासाठीच बनलेल्या आहेत. स्वत:च्या विचारांना, आणि मतांना, एवढं महत्व येऊ शकतं, हे फक्त आताच्याच पिढीने पाहिलंय.

त्यामुळे किनई, ऐकून घेण्याची कला मागेच पडलीये, आणि समंजसपणा किंवा सगळ्यांशी जुळवून घेणे हे काय असतं? आजकाल ह्या कलेला कुणी विचारतच नाही, तिची उपासना करणे तर दूरच. बघावे तिथे मी मी मी चा घोष! आत्मकेंद्रितेची फ़ॅशन.

हेच बघा ना, मी तरी दुसरं काय करतेय? घेतला लॅपटॉप कि लागले बडवायला :) म्हणूनच..... आता स्वतःलाच सल्ले द्यायची वेळ आलीये. प्रत्येकाने स्वतःला (आणि केवळ स्वतःलाच) सल्ले द्यावे, ही काळाची खरी गरज आहे. आणि अगदी कविता वगैरे लेखनाचं मनावर घेतलंच असेल, तर आधी सहृदयतेचं वाचनपुण्य गोळा करायला हवंय.

पोकीमॉन शोधतात, तसे मीरा,सूर, कबिरा शोधायला हवे आहेत. त्यांच्या मागे वेडं व्हायला हवंय. तसं वेड लागल्याशिवाय......कवीपण अंगी येत नसतं महाराजा.










8/6/16

तुझी आठवण

तुझी आठवण क्षणाक्षणाला 
बरसत गेली पानांवरती 
पागोळ्यांतून रेषेवरती 
शब्द सावळे अविरत झरती 

मेघाच्याही मनात तेव्हा 
दाटून आला एक हुंदका 
सागराच्या मनातल्या 
हिंदोळ्यांना आली भरती 

कुंद गारवा लेऊन बसले 
तरी विसावा नाही क्षणभर 
गर्द काजळी आभाळासम 
तुझी आठवण माथ्यावरती.