PR-वास........

10/27/17

भाग १: Pancakes, Pancakes!


एरीक कार्लच्या ह्या पुस्तकातला जॅक बाळा, सकाळी सकाळी आपल्या आईला लाडीगोडी लावून म्हणतो, "आई, आज मला पॅनकेक हवे! आज मला पॅनकेक हवे!!" त्यानंतर मला वाटलं, की फार तर फार आई त्याला सांगेल,"मी पॅनकेक करते, तोवर तू ताटं मांड." मग घरची मंडळी मिळून कसा छान ब्रेकफास्ट करतात, जॅक अगदी अमेरिकेतल्या टिपिकल शाण्या-बाळा प्रमाणे आपले आपले पॅनकेक गट्टम करतो, वगैरे वर्णन असेल...

पण झालं उलटंच! बिचाऱ्या जॅकची आई आपल्या भारतीय सासवांपेक्षाही खडूस निघाली बरं का!!!साळसूदपणे पणे त्याला म्हणाली, "अरे जॅक, पॅनकेकसाठी मला बरंच साहित्य लागेल, ते देशील का आणून?" मग तिने जॅकला सरळ शेतात पाठवलं. गहू तोडणी, मळणीपासून गिरणीतून पीठ दळेपर्यंतचा प्रवास फास्ट फॉरवर्ड मध्ये झाल्यावर म्हटलं आता तरी बिचाऱ्या जॅकच्या पोटात पॅनकेक पडतील........तर नाSSSSSही.

"कारल्याचा वेल लाव गं सुनबाई, मग जा आपल्या माहेरा!"
स्ट्रॉबेरीचा जॅम च फक्त वगळता, आईने जॅकला भरपूर दमवलं, पळवलं, पण का?

"वेलाला फुलं येऊदे सुनबाई, मग जा आपल्या माहेरा माहेरा."
कोंबडीचं अंड आण रे बाळा, मगच करूया पॅनकेक तुला, पॅनकेक तुला.
गायीचं दूध आण रे बाळा मगच करूया पॅनकेक तुला, पॅनकेक तुला.

"जॅक, माझा मुलगा शहरी-दीडशाणा व्हावा, लोकांनी त्याला नावं ठेवावी, असं का मला वाटेल? आपलं अन्न कुठून येतं, ते उगवायला, त्यावर प्रक्रिया करून ते खाण्यायोग्य बनवायला किती परिश्रम घ्यावे लागतात, ते माझ्या मुलाला माहिती असू नये..., असं का मला वाटेल? जॅक, मी तुला पीठ, मीठ आणायला पाठवलं, ते तुझा छळ करायला नव्हे रे बाळा, तुला वळण लावायला!"

असं हे मस्त पुस्तक आमचा चिटुक फक्त दोन-अडीच वर्षांचा असतांना, लायब्ररीत हाती लागलं, आणि एकदम मेंदूत नवीन पेशी तयार झाल्यासारख्या झिणझिण्या आल्या की!

भारतात, आमच्या खानदानात तीन पिढ्यांपासून कोणाचीच शेतीवाडी नव्हती. बागेत आजी गुलाब, क्रोटन लावायची, तितकाच आमचा मुळं-मातीशी संबंध. तरीसुद्धा, अधूनमधून शाळेची सहल म्हणून, किंवा बाबांच्या मित्राच्या शेतावर चिकन-पार्टी असेल तर, जायचा योग यायचा, आणि खूप आवडायचा देखील. तिथे गोठ्यातल्या गाई, तेव्हा तरी मला खूषच दिसायच्या. शेणाचा वास नाकपुड्यात भरला, तरी तो सुद्धा त्या अनुभवाचा भाग म्हणून त्याचं अप्रूपच वाटायचं. दिवसभर तिथला भन्नाट वारा प्यायचा, आणि संध्याकाळी हुरडा पार्टी- म्हणजे आहाहा!!!

शेतात काय करतात, पिकं कशी उगवतात, किती कष्टाचं काम, वगैरे सामान्य ज्ञान फारसं न शिकवताच समजलं होतं. पण ह्या स्वच्छ सुंदर अमेरिकेत माझ्या पोराला हे सगळं कसं कळायचं? नुसती जॅक न पॅनकेकच्या पुस्तकांना खऱ्या अनुभवाची सर कधी येईल का? आणि ही विचारांची आगगाडी शेवटी, "अमेरिकेत येऊन काय कमावलं, काय गमावलं!" ह्या नेहेमीच्या प्रश्नावर येऊन थांबणार. 

मुलांच्या बाबतीत कितीही केलं तरी प्रत्येक आईबापाला कुठलीतरी खंत राहूनच जाते, त्यात आम्ही इथे येऊन त्याचे आजीआजोबा, चुलत-मामे भावंडं, त्याच्यापासून हिरावूनच घेतली वगैरे आधीच्या हजार चिंतांमध्ये आता ह्या एक हजार एक व्या चिंतेची भर पडली.

म्हणावं तर अमेरिकन सुपरमार्केट मध्ये भाज्या फळं दृष्ट लागण्यासारखी दिसतात! इतकी, की जगातल्या सात आश्चर्यांमध्ये आठवं म्हणून, हे अजस्त्र, पण एकसारखे दिसणारे शुभ्रवर्णी, एकही डाग नसलेले फ्लॉवरचे गड्डे, किंवा तजेलदार कांतीचा भोपळी मिरच्या पण ठेवाव्या! पण खाऊन बघावं तर- "दुरून भाज्या साजऱ्या".

चिकन किंवा दूध कसं बनवतात, त्या प्रक्रियेबद्दल (मुद्दाम) अतिशय गोपनीयता पाळली जाते, कारण यांत्रिक पद्धतीने प्राण्यांचे 'अन्न' बनवणे - हा कारभार बघणाऱ्याला अतिशय निर्दय, निर्घृणच वाटतो, आणि त्यावरून प्राणीहिंसा विरोधकांना वगैरे पुष्कळ 'खाद्य' मिळतं.

ह्या पार्श्वभूमीवर जेव्हा शेजारणीने विचारलं, "तुम्हाला भाड्याने शेत घ्यायचं आहे का?" तेव्हा माझे डोळे च विस्फारले :) आमच्या जॅकला "पॅनकेक काय झाडावर उगवतात का?" ते कळू शकेल तर! माझं हे म्हटलं तर छोटं, म्हंटल तर मोठं अमेरिकन ड्रीम पूर्ण होईल का?

वाचा पुढील भागात.