PR-वास........

12/4/17

शिक्षकी पेशाने मला काय दिलं?

लहानपणापासून मला शिकवायची खूपच हौस होती :) एक प्लास्टिकचं  गुंडाळलेलं काळं फळकूट आणि खडूच्या डब्यात उरलेला किंवा क्वचित शाळेतून खिशात टाकून आणलेला खडूचा तुकडा, ह्यावर मी आणि एक मैत्रीण तासंतास शाळा-शाळा खेळायचो! हजेरीतली सगळी नावं रोज ऐकून पाठच होती, त्यामुळे अगदी हजेरीपासून, बाहुल्यांना पुढे बसवून पट्टीने (हळूहळूच) रट्टे देण्यापर्यंत सगळे सोपस्कार करून मग शेवटी शिकवायची पाळी आली, की एकदम डबा खायची सुट्टीच व्हायची :)

ती मैत्रीण शाळा शिकून हुशार झाली, आणि सॉफ्टवेअर इंजिनियर वगैरे झाली. आणि मी मात्र मोठी झाले, तरी मला शिक्षिकाच व्हायचं होतं. घरच्या दारच्यांनी समजावलं- शिक्षण क्षेत्रात बाजार आहे, खूप कष्ट आहेत पण त्याचं चीज होत नाही... तू हुशार आहेस, तुला सहज दुसरीकडे प्रवेश मिळेल. पण तेव्हाही एक (वेडा म्हणा) आदर्शवाद डोक्यात होता, आणि तो आजही आहे.

कारण- मी बरेचदा विचार करते- शिक्षकी पेशाने मला काय दिलं? तेव्हा मला कळतं की मी ह्या क्षेत्रात खरं काय कमावलं आहे.
आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्राचे आपल्या मनावर नकळत जे संस्कार होतात, ते बरेचदा लक्षात येत नाहीत, जोवर इतर क्षेत्रात काम करणाऱ्यांशी चर्चा किंवा त्यांच्या बरोबर काम करायची संधी येत नाही. पण विचार केला, तर जाणवतं, की वर्षानुवर्षे आपण जे काम करतो, त्यानेच आपलं "व्यक्तिमत्व" तयार होत असतं, विचार करण्याची पद्धत पडून जाते.


  • PLAN B: एकदा कोणी पाहुणे आमच्याकडे आले, तेंव्हा त्यांना नवल वाटलं- मी दोन भाज्या, शिवाय फ्रीजमध्ये पराठ्याचं सारण, दुसरीकडे चीज सॅन्डविच साठी ब्रेड,अशी निदान ४ पदार्थांची तयारी ठेवली होती. लहान मुलांना काय आवडेल सांगता येत नाही. दिवसभर बाहेर फिरून आल्यावर पाहुण्यांना गरम सूप आवडेल, का पिठलं? दुसऱ्या दिवशी लवकर बाहेर पडण्या साठी पटकन सँडविच घेऊन निघतील, का पराठे? 
  • "भूक नसावी पण शिदोरी असावी" हे आजी म्हणाली तसं, नाही लागलं, तरी प्रत्येक तासाचं 'overplanning' केलेलं असतं, ते कामी येतं. 

  • हे अवधान मला शिक्षिका झाल्यावर आलं कारण, कधी एखादे वेळी वर्गात प्रोजेक्टर वापरायचा असतो, पण चालू होत नाही. मुलांनी गृहपाठात जे वाचलं असेल, त्याची चर्चा करायचं आपण ठरवतो, तर नेमकं त्या दिवशी बऱ्याच पोरांनी तो धडा वाचलेलाच नसतो! सतत कुठल्याही प्रश्नालाच नव्हे, तर झोपाळलेल्या मख्ख-शांत वर्गालाही सामोरं जावं लागतं - मग लगेच दिशा बदलून पोतडीतून काहीतरी मौजमजेचा धडा, थोडं सोपं वाचन काढायला लागतं!
    सतत, रोज, हरघडी 'तयारीत' राहण्याची इतकी सवय शिक्षकांसारखी खेळाडूंना असते. प्रश्नांवर 'बॅटिंग' करायची सवय होते. आणि कधी बाउन्सर आला च, तरी हसून 'वेल लेफ्ट' पण खेळता येतो की!

    त्यातही, मोठ्या सहकाऱ्यांपुढे एकवेळ वेळ मारून नेता येईल, पण विद्यार्थ्यां कडून १० मिनिटातच पावती मिळते... तिथे आपल्या "खरेपणाखेरीज" कुठलाही आवेश टिकू शकत नाही. कधी कधी चक्क "आज सगळ्यांनी स्वाध्याय करा" असे म्हणून हातही टेकावे लागतात. तरी पण, 
    सकारात्मकता: नवऱ्याच्या चुका काढायची सवय सहज आपल्या 'प्रोफेशनल मॅलडी' मध्ये टाकता येते :) हे खरं, तरी एकूण शिक्षकांचा सतत सकारात्मक दृष्टिकोन असतो- कारण सुधारणा घडवून आणण्याचा तो पाया आहे. बरेचदा धर्म,लोकशाही, ह्या बाबतीत आपण निराशावादी असतो. पण प्रत्येक शिक्षकाला बघा, "आजचा दिवस माझा" म्हणत रोज नव्याने आव्हानांना सामोरे जात असतात. काल जो मुलगा तासभर वर्गात उद्धट वागत होता, त्याला आज पुन्हा संधी देता येण्याइतकी "कोरी पाटी" घेऊन च वर्गात प्रवेश करतात.

  • प्रयोगशीलता: त्याच्याही पुढे जाऊन, आपला खोटा 'ईगो' मध्ये न आणता, त्या उद्धट विद्यार्थ्यासाठी तोच धडा पुन्हा वेगळ्या पद्धतीने मांडता येईल का, ह्याचा विचार सुरु होतो. 

  • कमी साधनांमधून जास्तीत जास्त परिणाम कसा साधता येईल, म्हणजेच OPTIMIZATION हे शिक्षकांच्या रक्तातच असतं, कारण साधनं कमी, विद्यार्थी जास्ती, हे कायमचं व्यस्त प्रमाण! :) हाताशी कीबोर्ड, तोंडाशी स्क्रीन असणाऱ्या कुठल्याही कॉर्पोरेट जगातल्या व्यक्तीला ऑप्टीमायझेशन ह्याहून जास्त करता येत नसेल. 

  • निरपेक्षता: फक्त थोर आणि नशीबवान शिक्षकांच्याच नशिबी 'जुने विद्यार्थी' भेटण्याचा योग असतो. बहुदा माझ्या जाचाला कंटाळलेले बिचारे पोरं पोरी, नंतर मॉल मध्ये वगैरे दिसले तरी नजरच चुकवतात, आणि मी पण खरं म्हणजे त्यांना भेटायला उत्सुक नसतेच, कारण आपल्या शिकवण्यावर काही 'बरी' टिप्पणी त्यांच्याकडून ऐकायला मिळेल, याची अजिबात खात्री नसते! :) त्यामुळे निष्काम कर्मयोग आपल्या रक्तातच भिनवून घ्यावा लागतो, शिक्षक झाल्यावर, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. मी शिक्षिका म्हणून फारशी यशस्वी नाहीच, आणि तरीही 'हे एक मला करता येतं, तर मी ते आपल्या परीने करत राहीन' इतका 'कमलपत्रेSव' अलिप्तपणा आजकाल व्यावसायिक जगात कुठे बघायला मिळतो? 


  • अर्थात, सुदैवाने पोटापाण्याची चिंता देवाने करायला लावली नाही, आणि हा शिक्षकी पेशा 'हौशी'खातर सुद्धा मी करत असेन तरी काळजी नाही, तर म्हटलं, 'शिकवतांना हे जे काय शिकायला मिळतंय त्याचा तरी लाभ घ्यावा!'
    • शिक्षकांना सदैव विद्यार्थीपण होऊन राहता येतं, ते त्यांनी राहावं सुद्धा, कारण त्यात फार गम्मत आहे! " मोबाईल नेमका बिघडलाय!" हे वाक्य पूर्ण व्हायच्या आत, विद्यार्थ्यांकडूनच लगेच सर्वात नवीन मॉडेल्सची फुकट आणि अतिशय रास्त माहिती धो धो वाहत येते! इतकं 'INSTANT CROWD-SOURCING' शिक्षक सोडून कोणाला जमलंय का सांगा? आणि केवळ तंत्रज्ञानच नव्हे, तर इतर अनेक बाबतीतही नवीन पिढी हुशारच आहे! तेंव्हा त्यांना शिकवताना त्यांच्या एक पाऊल पुढे चालता यावे, यासाठी सतत नवीन शिकत राहते, त्यामुळे स्वतःबद्दल अवास्तव अपेक्षा पण नसतात. प्रत्येक गोष्ट जमायला अवधी लागतो, हा संयम स्वतःबद्दल सुद्धा पाळता येतो. 
    • PEOPLE SKILLS: अर्धवट वयाची ही ६०-७० पोरं रोज भेटणार, त्यांचे राग लोभ सांभाळून घेतांना एकीकडे मी मनाने तरुण तर राहतेच, तरी दुसरीकडे स्वतःला त्यांच्या पासून वेगळं काढून त्यांच्या क्षणिक आवेशाने विचलित न होता, कामाकडे स्वतःचं , आणि त्यांचंही लक्ष केंद्रित करून घेऊ शकते. मुलं/त्यांचे पालक ह्या दोन्ही बाजूंशी संवाद साधून असते. ह्यालाच एम.बी.ए करणारे "पीपल स्किल्स" म्हणत असावेत. 
    • LIMELIGHT: शाहरुख खानला सुद्धा जोवर खऱ्या स्टेजवर उभे राहून 'हशा आणि टाळ्या' घेता येत नाहीत, तोवर मी स्वतःला त्याच्यापेक्षा मोठी 'शो-वूमन' समजते, कारण मी रोज नवीन 'प्रयोग' वर्गात सादर करते, आणि रोज १०० डोळ्यांमधले (क्षणिक का होईना,) आदर/कौतुक अनुभवते. "तमसोSमा ज्योतिर्गमय" प्रमाणे अंधाराला भेदून ज्ञानाचा एक क्षण जिथे जन्मतो, त्या अद्भुत क्षणाची साक्षी होण्यासाठी रोज धडपडते. 
    एकूण काय, शिक्षकीला 'पेशा' म्हणू नये, कारण ती रोजची साधना आहे. तुमच्याकडून इतकं मागणारी, पण तुमच्या झोळीत तितकंच भरभरून 'देणारी' एक शिक्षकी, आणि दुसरी 'वैद्यकी'. "तमसोSमा ज्योतिर्गमय" _/\_

    10/27/17

    भाग १: Pancakes, Pancakes!


    एरीक कार्लच्या ह्या पुस्तकातला जॅक बाळा, सकाळी सकाळी आपल्या आईला लाडीगोडी लावून म्हणतो, "आई, आज मला पॅनकेक हवे! आज मला पॅनकेक हवे!!" त्यानंतर मला वाटलं, की फार तर फार आई त्याला सांगेल,"मी पॅनकेक करते, तोवर तू ताटं मांड." मग घरची मंडळी मिळून कसा छान ब्रेकफास्ट करतात, जॅक अगदी अमेरिकेतल्या टिपिकल शाण्या-बाळा प्रमाणे आपले आपले पॅनकेक गट्टम करतो, वगैरे वर्णन असेल...

    पण झालं उलटंच! बिचाऱ्या जॅकची आई आपल्या भारतीय सासवांपेक्षाही खडूस निघाली बरं का!!!साळसूदपणे पणे त्याला म्हणाली, "अरे जॅक, पॅनकेकसाठी मला बरंच साहित्य लागेल, ते देशील का आणून?" मग तिने जॅकला सरळ शेतात पाठवलं. गहू तोडणी, मळणीपासून गिरणीतून पीठ दळेपर्यंतचा प्रवास फास्ट फॉरवर्ड मध्ये झाल्यावर म्हटलं आता तरी बिचाऱ्या जॅकच्या पोटात पॅनकेक पडतील........तर नाSSSSSही.

    "कारल्याचा वेल लाव गं सुनबाई, मग जा आपल्या माहेरा!"
    स्ट्रॉबेरीचा जॅम च फक्त वगळता, आईने जॅकला भरपूर दमवलं, पळवलं, पण का?

    "वेलाला फुलं येऊदे सुनबाई, मग जा आपल्या माहेरा माहेरा."
    कोंबडीचं अंड आण रे बाळा, मगच करूया पॅनकेक तुला, पॅनकेक तुला.
    गायीचं दूध आण रे बाळा मगच करूया पॅनकेक तुला, पॅनकेक तुला.

    "जॅक, माझा मुलगा शहरी-दीडशाणा व्हावा, लोकांनी त्याला नावं ठेवावी, असं का मला वाटेल? आपलं अन्न कुठून येतं, ते उगवायला, त्यावर प्रक्रिया करून ते खाण्यायोग्य बनवायला किती परिश्रम घ्यावे लागतात, ते माझ्या मुलाला माहिती असू नये..., असं का मला वाटेल? जॅक, मी तुला पीठ, मीठ आणायला पाठवलं, ते तुझा छळ करायला नव्हे रे बाळा, तुला वळण लावायला!"

    असं हे मस्त पुस्तक आमचा चिटुक फक्त दोन-अडीच वर्षांचा असतांना, लायब्ररीत हाती लागलं, आणि एकदम मेंदूत नवीन पेशी तयार झाल्यासारख्या झिणझिण्या आल्या की!

    भारतात, आमच्या खानदानात तीन पिढ्यांपासून कोणाचीच शेतीवाडी नव्हती. बागेत आजी गुलाब, क्रोटन लावायची, तितकाच आमचा मुळं-मातीशी संबंध. तरीसुद्धा, अधूनमधून शाळेची सहल म्हणून, किंवा बाबांच्या मित्राच्या शेतावर चिकन-पार्टी असेल तर, जायचा योग यायचा, आणि खूप आवडायचा देखील. तिथे गोठ्यातल्या गाई, तेव्हा तरी मला खूषच दिसायच्या. शेणाचा वास नाकपुड्यात भरला, तरी तो सुद्धा त्या अनुभवाचा भाग म्हणून त्याचं अप्रूपच वाटायचं. दिवसभर तिथला भन्नाट वारा प्यायचा, आणि संध्याकाळी हुरडा पार्टी- म्हणजे आहाहा!!!

    शेतात काय करतात, पिकं कशी उगवतात, किती कष्टाचं काम, वगैरे सामान्य ज्ञान फारसं न शिकवताच समजलं होतं. पण ह्या स्वच्छ सुंदर अमेरिकेत माझ्या पोराला हे सगळं कसं कळायचं? नुसती जॅक न पॅनकेकच्या पुस्तकांना खऱ्या अनुभवाची सर कधी येईल का? आणि ही विचारांची आगगाडी शेवटी, "अमेरिकेत येऊन काय कमावलं, काय गमावलं!" ह्या नेहेमीच्या प्रश्नावर येऊन थांबणार. 

    मुलांच्या बाबतीत कितीही केलं तरी प्रत्येक आईबापाला कुठलीतरी खंत राहूनच जाते, त्यात आम्ही इथे येऊन त्याचे आजीआजोबा, चुलत-मामे भावंडं, त्याच्यापासून हिरावूनच घेतली वगैरे आधीच्या हजार चिंतांमध्ये आता ह्या एक हजार एक व्या चिंतेची भर पडली.

    म्हणावं तर अमेरिकन सुपरमार्केट मध्ये भाज्या फळं दृष्ट लागण्यासारखी दिसतात! इतकी, की जगातल्या सात आश्चर्यांमध्ये आठवं म्हणून, हे अजस्त्र, पण एकसारखे दिसणारे शुभ्रवर्णी, एकही डाग नसलेले फ्लॉवरचे गड्डे, किंवा तजेलदार कांतीचा भोपळी मिरच्या पण ठेवाव्या! पण खाऊन बघावं तर- "दुरून भाज्या साजऱ्या".

    चिकन किंवा दूध कसं बनवतात, त्या प्रक्रियेबद्दल (मुद्दाम) अतिशय गोपनीयता पाळली जाते, कारण यांत्रिक पद्धतीने प्राण्यांचे 'अन्न' बनवणे - हा कारभार बघणाऱ्याला अतिशय निर्दय, निर्घृणच वाटतो, आणि त्यावरून प्राणीहिंसा विरोधकांना वगैरे पुष्कळ 'खाद्य' मिळतं.

    ह्या पार्श्वभूमीवर जेव्हा शेजारणीने विचारलं, "तुम्हाला भाड्याने शेत घ्यायचं आहे का?" तेव्हा माझे डोळे च विस्फारले :) आमच्या जॅकला "पॅनकेक काय झाडावर उगवतात का?" ते कळू शकेल तर! माझं हे म्हटलं तर छोटं, म्हंटल तर मोठं अमेरिकन ड्रीम पूर्ण होईल का?

    वाचा पुढील भागात.

    5/10/17

    मी अमेरिकन झाले आहे का?

    मी अमेरिकन झाले आहे का?

    आधी कधी हा प्रश्न स्वतःला विचारला नव्हता. तो विचारावा लागला कारण- खूप जुनी एक मैत्रीण भेटली. आम्ही लहान असतांना आमचं घर ७ खोल्यांचं आणि तिचं ४ खोल्यांचं हे तिलाच आठवलं, पण आत्ता ही तिचं घर ३ खोल्यांचं आणि माझं ५, हे पण तिला जाणवलं. तिने कौतुक केलं, माझं, माझ्या घराचं, माझ्या नवऱ्याचं, माझ्या दिसण्याचं, वागण्याचं आणि स्वयंपाकाचंही!

    पण कौतुकात किती आनंद होता, आणि किती खंत? कितीशी जेलसी/असूया? जरा शंका आली, तरी मला भीती वाटली.

    इतक्या वर्षांची मैत्री समतोल नव्हतीच म्हणजे! कुठेतरी वर-खाली पारडी तोलण्यात सदैव माझंच पारडं खाली राहिलं. नशिबाने मिळालेल्या घराने, रूपाने, पैशानेच का माझे गुण ही मला मिळाले होते? माझे गुण मी कितीही 'कमावले' असतील, तरी तिच्या मते ते माझ्या 'पदरात' च पडले असतील तर आमची घनिष्ठ मैत्री 'निखळ' मात्र कधीच नव्हती हे मला मान्य करावंच लागेल, त्याची मला खूप खूप भीती वाटली! ते विचार मी गेली अनेक वर्ष मनाच्या तळाशी दडपून टाकले.

    म्हटलं तर माझ्या पेक्षा अनेक पटींनी तिचंच करियर नेत्रदीपक! पुढे शिकायला डिग्री उरली नाही इतकी ती शिकली, आणि दरवेळी सुवर्णपदकं मिळवत शिकली! जिथे गेली तिथे सर्वांची लाडकी झाली. आणि तरीही तिला माझी असूया? मी फक्त साधी शिक्षिका आहे, मला ना तिच्या इतके पैसे मिळतात, ना भोवती तिच्या इतके मैत्र! माझ्यापाशी कोणी आपले मन मोकळे करत नाही, आणि मी ही फार कोणावर विसंबत नाही. तिचे आईवडील आपला संसार सोडून तिच्या मुलीचा सांभाळ करायला सदैव पाठीशी उभे राहिले, पण माझ्याकडे अनेक कारणांनी तशी परिस्थिती कधीच येणार नाही.

    मग असा फरक का? कदाचित गेली अनेक वर्ष अमेरिकेत स्थायिक होण्याने माझा सर्वात मोठा फायदा हा झाला की मला कुठेच कुणाशी तुलना करायची वेळ आली नाही, की सवय झाली नाही! त्यांच्याकडे मोठी गाडी, आपली लहान..... त्यांच्या दोन्ही रग्गड पगारी नोकऱ्या- माझी जेमतेम मुलाचा खर्च भागवणारी! असले विचार मी केलेच नाहीत कारण ह्या देशात माझ्या 'शिक्षकी' पेशात असलेलं दुसरं कोणी मला भेटलंच नाही, आणि जे थोडे भेटले, ते सगळे माझ्याच सारख्या परिस्थितीतून जातायत असं जाणवलं.

    इथे येणारे सगळेच भारतीय (अनिवासी/इमिग्रंट) थोड्याफार फरकाने सारख्या टप्प्यातून जातात. आधी भाड्याचं घर, एखादी कार, व्हिसाची टांगती तलवार! त्यामुळे नवीन येणाऱ्यांबद्दल सहसा सहानुभूतीच जास्त!

    अमेरिकन माणसाचा स्वभाव अघळपघळ, पण नसत्या चौकशा न करणारा. तासाचे ८ डॉलर मिळवणाऱ्या कॉफीशॉप मधल्या भारतीय/आशियाई दीदी पासून ते वॉलस्ट्रीट वर लाखो कमावणाऱ्या सुटा बुटातल्या दादा पर्यंत कुणाला एकमेकांच्या घरी किती सुबत्ता आहे, हे जाणून घेण्याची खाज नाही.

    उलट भारतात शेजार्यांकडे नवीन सोफा, टीव्ही, कार आली कि लगेच कौतुक, नि लगेच असूया. अमेरिकेत 'भौतिक' सुखं आहेत असं म्हणतात, पण माझ्या साठी हे 'मानसिक' सुखच जास्त मोलाचं आहे!


    सोबत

    दुपारी ४. ३० -५ ची वेळ
    टेकडीवर ढग जमू लागलेले असतील.
    गाड्यांचे लाल दिवे, तूर्तास मंद
    रस्त्यावर फुलू लागलेले असतील

    मी पण आत्ताच ७८ ला लागले पण
    पुढे अजस्त्र हत्तींचा तांडा असावा
    तसा १८ चाकी ट्रकांचा ताफा
    ताशी २० मैलाच्या गतीने झुलतो आहे

    हायवेच्या दोन्हीकडे हिरवळ बघून
    का कोण जाणे- टेकडीवरची सुकट झाडंच आठवली!
    ढगांच्या गडद रेषा मी डोळ्यात साठवते
    आशाच्या आर्त सुरांना, दुरूनच परत पाठवते

    दुपारी साडेचार पाच ची वेळ
    अनेक शक्यतांची  हुरहूर -
    टेकडीवर ढग जमू लागलेले असतांना
    धो धो पाऊस येईल?
    का हे दुखावलेले लाल-केशरी ढग
    मिटून जातील रात्रीच्या गडद दुलईत?

    पण आत्ता शक्यतांचा विचारच नाही!
    गाडी आपोआप पुढे सरकते आहे
    उद्याची काळजी आणि कालचे हिशोब
    आत्ता डोक्यात काहीही नाही
    म्हणूनच फक्त तू - मनातलं बोलायला -
    आत्ता इथे हवा आहेस

    हा सगळा मोकळा वेळ
    हा अनंत वाहणारा संथ रस्ता
    डाव्या बाजूने सर्र्कन कापून
    मला पुढे जायचं नाहीये

    तुझ्या मागे
    किंवा कधी तुझ्या शेजारी बसले होते त्या
    सुंदर क्षणांची
    परतफेड?
    नव्हे
    केवळ सोबत
    मला करायची आहे 

    4/20/17

    13 Reasons Why

    १३ कारणे न आवडल्याची १३ कारणे आहेत, पण त्या आधी शीर्षकावरून आठवलेली ही कविता सांगते: 
    "१३ प्रकारे कोकिळेकडे बघतांना" - वॅलेस स्टीव्हन्स यांची ही कविता म्हणजे "व्यक्त होणं" काय असतं त्याचा परिपूर्ण अभ्यास आहे! कवीची नजरच कवितेचा विषय 'वेगळा', काढत असते, त्यानुसार बघणाऱ्याची नजरेच्या चौकटीतूनच कुठलंही 'सत्य' व्यक्त होत असतं.... असं काहीसं स्टीव्हन्स यांच्या कवितेत प्रतीत होतं. कुठल्याही विषयाची चौकट बदलली की त्याच विषयाचे रंग आपल्याला बदलतांना दिसू लागतात. हे सगळं त्या शीर्षकातून सुचवण्याचा प्रयत्न असेल, तर निदान शीर्षक तरी आपल्याला आवडलेलं आहे :)

    तर 13 Reasons Why ही नेटफ्लिक्सवरची नवी मालिका उत्साहाने सुरु केली, कारण, अमेरिकन शाळेत काही वर्ष शिकवल्यामुळे तिथलं वातावरण परिचित आहे. सगळ्या पोरांनी अभिनयपण छान केलेला पहिला भाग आवडला होता... पण... 

    १. शालेय जीवनाबद्दल 'स्पीक' ही लॉरी हाल्स अँडरसन यांची कादंबरी, तसेच टॉम पेरोटा यांची 'इलेक्शन' कादंबरी प्रसिद्ध आहेत.त्या दोन्ही ह्यापेक्षा खूपच जास्त वास्तवदर्शी आहेत. (१३ कारणे ही मूळ कादंबरी मी वाचलेली नाही, पण मालिका पहिल्या नंतर वाचायची इच्छा नाही!)

    2. इथे पौगंडावस्थेतल्या मुलांना 'यंग ऍडल्ट' म्हणण्याची पद्धत आहे, पण ही मुलं आपण आधी 'यंग' आहोत आणि अजून 'ऍडल्ट' झालेलो नाहीये, हे सहज विसरतात. अमेरिकन पालक त्यांना 'फुलण्याची' खुली सूट देतात, मात्र दुष्परिणामांकडे बघायला त्यांना वेळ नसतो, असं वातावरण या मालिकेत दिसतं. भावनेच्या आहारी जाऊन तिरीमिरीत निर्णय घेणाऱ्या या मुलांना 'healthy dose of reality' द्यायला मात्र कुणीच पुढे येत नाही- आपलं सामाजिक वातावरण खरोखर इतकं एककल्ली आहे का?

    3. प्रमुख पात्र 'हॅना' ही अक्षरशः 'बेकर' असते (आडनाव), तर तिच्या हिरोचं नाव 'क्ले' (माती) असतं. म्हणजे ती त्याला घडवते - पण घडवते कसली 'बि'घडवते, आणि त्याचा दगड करायचाच बाकी ठेवते! 

    4. 'हॅना' ही अति-संवेदनशील, पण प्रचंड आत्ममग्न आहे. १०विच्या वर्गात, नवीन शहरात आल्या आल्या ह्या बयेला आधी मित्र मिळवण्याची, त्याला किस करायची  घाई झाल्यासारखी वाटते- पण अभ्यासाचं काय? हिला ना माणसं ओळखता येतात, ना स्वतःचं भलं कळतं. बरं नसेल कळत, तरी चांगल्या मित्रमैत्रिणींच्या संगतीत राहायचं सोडून ही खो-खो खेळल्यासारखे वेगवेगळ्या मुला-मुलींशी मैत्री जोडू पाहते, आणि प्रयत्न फसले, किंवा कुणी गैरफायदा घेतला, की ना तिला सहन करता येतं, ना आवाज उठवता येतो. पुन्हा पुन्हा त्याच चुका करणाऱ्यांना मूर्ख नाही तर काय म्हणायचं?

    5. बरं, ह्या १०००-२००० मुलं असलेल्या मोठ्या उच्चमहाविद्यालयात, एक क्ले सोडून एकही सुसंस्कारित मुलगा नसतो! सगळे आपले एका माळेचे मणी. कोणी मुलींच्या रंगरूपावरून त्यांची वर्गवारी करणारे, तर कुणी अश्लील फोटो काढून मोबाईलने शाळा-भर पसरवणारे. आणि ह्या गदारोळात, एकच 'देसी' मुलाचा उल्लेख येतो, तो काय करतो? व्हॅलेंटाईन डे साठी 'सॉफ्टवेअर' बनवतो :) :) :) इट इज नॉट कूल टू बी अ नर्ड! 

    6. चमचमीत गोष्ट लिहायची म्हणजे त्यात शाळेतली मुलं दारूपासून ड्रग्सपर्यंत काय काय करतात त्याचा रसभरीत आढावा यायलाच पाहिजे. ही मालीका बघून प्रौढांनाही हँगओव्हर यावा इतकी दारू ही पोरं पीत असतात, आणि विषय 'यंग ऍडल्ट' असला तरी मालिका 'ऍडल्ट' असावी इतका प्रणय करत असतात! 

    7.  इतकं करून दुखऱ्या मनाचं खापर फोडायला शिक्षक, आई-बाप, समाज, व्यवस्था सगळे आहेतच. आईबाप कष्ट करून पैसे जोडतात, ते ह्यांना प्रॉम डे ला नवीन गाडी घेऊन द्यायला! हेच आईवडील, आत्महत्या प्रकरणी 'आपल्या मुलाला/मुलीला पाठीशी घालून त्यांच्यावर शाळेत कोणी दादागिरी केली, त्यांच्यावर कसला मानसिक ताण होता, ह्या 'सत्याचा' शोध घेऊ पाहतात. 

    8. शिक्षक तिथे घसाफोड करतात तेव्हा पोरांना चिट्ठ्या फेकण्यात जास्त रस असतो, पण, इतकं करून जर यांचा तोल ढळला, आणि यांनी जीवाचं बरंवाईट करून घेतलं, तर खापर आधी शिक्षकांवर फोडायलाही 'क्ले'चं पात्र कमी करत नाही. "तुम्हाला माहिती होतं का, ही कविता कोणी लिहिली?" तो शिक्षिकेलाच विचारतो!
    झालंच तर शाळेतील मानसोपचार तज्ञालाही खलनायक बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न ही हॅना करते. कारण काय, तर ती स्पष्ट बोलायला तयार नसतांना, त्याने तिला थांबवून खोदून खोदून विचारायला हवे होते, पण त्याचा फोन खणखणत होता!

    9. "सायबर बुलीइंग" ह्या नवीन पिढीच्या राक्षसाशी दोन हात करायला अनेक शाळांमध्ये मुद्दाम वेगळा वेळ दिला जातो. सायबर बुलीइंग मुळे अनेक विध्यार्थानी आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत, पण, ह्या मालिकेत केवळ तेच एक कारण दाखवले नाहीये.

    10. ह्या मुलांच्या खऱ्या समस्यांचा वेध घेण्याचा एकही प्रयत्न ही मालीका करत नाही. एका मुलाची आई सतत वेगळे पुरुष घरात आणते, आणि मुलापुढे मित्राला कायम प्राधान्य देते. फाटके बूट घालूनही हा मुलगा शाळेच्या खेळ-संघाचा स्टार असतो -पण ही गोष्ट त्याच्या वर ही 'संधीसाधू' 'चारित्र्यहीन'तेचं लेबल लावून मोकळी होते. 

    11. शाळा म्हणजे समाजाचा आरसा असतो, त्यात आवडते-नावडते, समंजस, असमंजस अशी सगळ्या प्रकारची मुलं असतात पण, ह्या मालिकेत एकही 'सकारात्मक' आदर्श व्यक्तिरेखा दिसत नाही. क्ले ची एकमेव 'चांगली' व्यक्तिरेखा आहे, पण तो सुरुवातीला अतिशय शामळू दाखवला आहे. सामाजिक विकृतींवर इतका झोत टाकतांना अनावधानाने इथे त्यांचा पुरस्कारच एका दृष्टीने केला जातो!

    कथानकातील काही छुप्या गोष्टींची चर्चा वाचायची नसेल, त्यांनी इथे थांबावे.


    12. एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येची नैतिक जबाबदारी सगळ्या शाळेवर आहे, हे दाखवायचा प्रयत्न सपशेल फसलेला आहे, कारण चक्क हॅनावर प्रेम करणाऱ्या क्लेला सुद्धा तिच्या मृत्यूसाठी आपण जबाबदार असल्याचं वाटतं! तो सगळ्यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करतो, ते ही आधी सरळ त्यांना दोषी ठरवून. मात्र हॅना स्वतः कधीच क्ले जवळ मोकळी होत नाही, की त्याला आपल्या लढाईत सामील करून घेत नाही. 

    13. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आत्महत्या, असा सोयीस्कर अर्थ हॅना काढते! तिच्या बरोबर झालेल्या गोष्टी तिच्यासाठी असह्य होत्या, ह्यात वादच नाही, पण म्हणून काही दिवस त्या व्यक्तींपासून स्वतःला वेगळं काढून, आईवडिलांशी बोलून, मार्ग काढायचं सोडून हॅना सरळ 'passive agressive' पद्धतीने स्वतःचं 'म्हणणं' अक्षरशः खरं करते- सर्वांना स्वतःचं म्हणणं ऐकायला लावून, आणि त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी न देता. 
    तसेच जेसिकाचा मित्र तिच्यावर होणाऱ्या बलात्काराचं समर्थन करतो, त्याचा बदला घेण्याकरता ती ज्याने बलात्कार केला, त्याचा बरोबरच पुन्हा झोपते! हे पाहून हसावं की रडावं मला कळेना.

    जाता जाता......... 'क्ले' चं पात्र साकारणारा मुलगा छोट्या कियानो रिव्हीज सारखा गोड गोड दिसतो, म्हणून च मी ही मालिका संपूर्ण पाहू शकले! :) 







    4/1/17

    अनाम सर्व दु:खांचे एकच हो नाव तू

    अनाम सर्व दु:खांचे एकच हो नाव तू
    नेमका कातरवेळी अस्त होऊन 'पाव' तू!

    बोचरे डोळ्यात पाणी, करावया वाहते
    वाळूकण शिंपल्यात कर तसा शिरकाव तू 

    जे असेल सत्य ऐसे मी मनात मानिले
    घ्यायला लावू नकोस मज त्याचा ठाव तू

    रुजला असेल खोल स्नेह विश्वासामधे
    विचारून घालू नको अर्थांचे घाव तू

    लहरींतून आठवेन गाणे अंधूकसे
    सूर स्पष्ट लावण्यास कर परी मज्जाव तू 

    दाही दिशा पसरल्यात एकट्या माझ्यापुढे
    निर्वात अस्तित्वाचे ओसाडसे गाव तू


    1/31/17

    शॅम्पू ने डोक्यात गळू होईल!

    शॅम्पू ने डोक्यात गळू होईल!
    आकलनाच्याही आधी एक निमिष होता
    मी तिथेच थांबायला हवे होते
    पण तोवर डोळ्यात घुसून
    संवेदना मेंदू पर्यंत पोचली होती.

    षट्कोनी भोकांमधून
    आळ्यांचे डोळे
    केसांच्या खाली, सपाट गोऱ्या मानेवरून
    माझ्याकडे बघत होते.

    मी गप्पकन डोळे मिटून घेतले
    तरी पटलावर कोरलेली ती भोकं
    त्यातून वळवळणारे लक्ष डोळे
    तोंडात अचानक दाटून आलेले दर्प
    हातापायांना सुटलेला कंप

    एक असहाय चीड उठून मग जुळवली बोटं
    एक एक चौकोनावर आघात करत,
    "शोधा" त लिहिलं: "शॅम्पूचं गळू खरं आहे काय?"
    कमळ- कंदाच्या षट्कोनी पोवळ्यातून
    गुलाबी पाकळ्या फुटतांना पहिल्या
    त्याच डोळ्यांनी.

    "खरं आहे काय?" काय खरं आहे?
    'माझ्या' शोधाच्या 'चौकटीतून' कापून
    त्याला शंबर ठिकाणी चिकटवलं
    सीमेवर परत पाठवलं
    आणि सांगितलं, "आता कर आक्रोश!"
    निवायला हवे आहेत मला माझे डोळे - स्वच्छ प्रकाशाने.

    डोळ्यांवर अत्याचार केला होता
    ती मैत्रीण आता मला फुलं पाठवते
    रोज सकाळी - गुड मॉर्निंग!
    कळवळा आहे तिला माझा
    आणि मी पण रोज डोळे मिटून 
    कमळ-कंदातुन उमलणाऱ्या पाकळ्या आठवते. 



    टीप: खोटी प्रतिमा इथे देऊ इच्छित नाही, त्यामुळे कुतूहल असल्यास Shampoo Hoax शोधावे. कमळाच्या बिया बाहेर पडत असतांनाचा फोटो मानेवर चिकटवून भयानक रोग भासवला गेला आहे.

    सध्या अमेरिकन निवडणुकी संदर्भात जालावर फिरणाऱ्या बातम्या (बहुतांशी खोट्या) असूनही जनमत बदलून गेल्या. निवडून आल्यावर राष्ट्राध्यक्षानी केलेली विधाने, दोन्ही बाजूंची वृत्तपत्रे, यांनी नि:पक्षपाती पत्रकारितेचा परिहास केला आहे! त्या पार्श्वभूमी वर माझा एक व्यक्तिगत अनुभव म्हणून वरील कविता लिहिली आहे.






    1/9/17

    प्रवासी कशाचा तुला भार आहे?

    कधी वाटते मी जगापार आहे
    मनाचे मना, मुक्त हे द्वार आहे
    परी अडखळे जीव माझेपणाशी
    विचारांचाच जरा आजार आहे!

    कधी वाटते कि स्थितप्रज्ञ झाले
    दुःखे-सुखे वा, कशाचे न काही
    तरी भळभळे रक्त हळवेपणाने
    जरी वल्गनेचा समाचार आहे

    कधी वाटते ती जिगीषाच खोटी
    न झिजले न घडले पुरेशी खरी
    सुखासीनता न मागताही मिळाली
    यशाचा कुठे मात्र बाजार आहे?

    कधी वाटते जीव लावू नये तो
    तुटताच धागे, तुटे जीवही
    परी प्रेमगाठी कशा सोडवाव्या?
    प्रेमात अवघाच संसार आहे!

    कधी वाटते का न कळले मला हे
    दिवास्वप्न आहे जग डोळ्यातले
    दिलेले तुला, पण तुझे काय होते?
    प्रवासी कशाचा तुला भार आहे?