12/3/18

पायजम्यांची प्रतिष्ठा

माझं लग्न झालं, त्या काळी मी जीन्स क्वचितच घालत असे. त्याचं कारण, मी सोज्वळ होते, किंवा घरी कर्मठ वातावरण होतं असं नव्हे, तर त्या काळी माझ्या (किंवा आमच्या) भारतीय बांध्याला शोभतील तर दूरच, किमान नीट बसतील, अशा जीन्स सुद्धा बाजारात सहज मिळत नसत.
मग जीन्सपुढे, शिवून घेतलेला, सुरेख भरतकामाचा, आपल्या नेमक्या मापाचा सलवार-कुडता (ड्रेस) कुणाला आवडणार नाही?
शिवाय, सलवार कुडत्यात असंख्य वेगवेगळे प्रकार करता येतात, घेरावर विरुद्ध रंगाचा पॅच लाव, तर कुठे षट्कोनी गळ्यापासून निघालेली बॉर्डरची पट्टी लाव! सृजनशीलतेला भरपूर वाव, आणि 'माणसं तितक्या प्रकृती' प्रमाणे, 'मुली तितक्या फ़ॅशन'!

पण गेल्या ८-१० वर्षात वयात येणाऱ्या पिढीला हे आमच्या पिढीचे हे सलवार कुर्ते पक्के 'आंटी कॅटेगरी' वाटू लागले आहेत. कपड्यांच्या हळू हळू बदलणाऱ्या चवींमुळे व्यक्तींची शारीरिक ठेवणसुद्धा बदलू शकते काय, हा संशोधनाचा विषय आहे, तरी एका सरसकट पाहणीवरून, जीन्सच्या मापाला अनुसरून, ह्या मुलींच्या पार्श्वभागाची रुंदीपण आजकाल आमच्या पिढीपेक्षा आपसूकच कमी होते आहे कि काय, अशी मला दाट शंका आली!

पण सलवारला सहज आपलंसं करणाऱ्या माझ्या पिढीत 'पायजामा' मात्र उपेक्षितच राहिला! फक्त रात्री झोपतांनाच घालण्याचा नाईलाज, किंवा कदाचित 'पाळी' च्या वेळी जास्त सैलसर आणि मोकळा वाटतो म्हणून, पायजम्याला अगदीच 'गरीब' स्थान असतं. आणि 'हे काय पाहुण्यांसमोर पायजमा घालून आलीस!' अशी सरळसरळ हिणवणूक पण रोजच होते!

पण 'पायजमा किती दयाळू'! असं ट्विंकल खन्नाचं नवीन पुस्तक आलंय, त्यामुळे माझी उत्सुकता चांगलीच चाळवली गेली. पेपरातील तिच्या सदरावरून तिची ख्याती, सिनेसृष्टीतुन उगम पावलेला, तरीही एक 'समतोल साधणारा' आवाज, अशी आहे. ह्या मुलाखतीत सुद्धा स्त्रीवादा विषयी तिने काही नवीन मुद्दे मांडले, असं नाही, तरी वाचा फोडली, किंवा त्या मुद्द्यांकडे बघण्याचा एक हलकाफुलका दृष्टिकोन पुढे आणला हे हि नसे थोडके!

कथा अगदीच सर्वसाधारण, अपेक्षित रटाळ वळणांचीच असावी. जीन्समधली तरुण, सडपातळ सवत बघून पायजम्यातली मध्यमवयीन घटस्फोटित स्त्री, आधी खंतावते, साशंक होते, पण मग, "आता तरी आपल्यावर श्वास आत ओढून, पोटावरचे वळ झाकत टंच दिसण्याचं बंधन नाही", हे जाणवून शांत होत जाते. अशी कथा असावी...

तर त्यावरून मला पुन्हा एकदा वाटलं, की बायकांच्या उठण्या-बसण्यापासून, काय बोलले, काय घातले, काय केले, इथपर्यंत अगदी प्रत्येक गोष्टीत १०० निर्बंध अजूनही घातले जातात. कधीकधी वाटतं कि अस्तित्वाभोवती करकचून बांधलेल्या ह्या गाठींशिवाय जगणं कसं असू शकेल, ह्याची कल्पनाही करणं सोपं नाही! साडीत मोकळेपणा म्हणावा, तर ब्लाऊजमध्ये दंड, खांदे, कंबर ह्या आकारमानात तसूभराचाही फरक चालत नाही. थोडा लेगगिंग्स चा मोकळेपणा आला म्हणावे, तर उलट पलाझोच्या घेराला सावरायला उंच टाचांचे सॅंडल हवे, मग त्यात तोल सांभाळता यायला हवा.

मी रोज विचार करते, पुरुषांच्या कपड्यांमध्ये वर्षानुवर्षे तसा मुळातून काहीच बदल होत नाहीये, पण बायकांच्या सोयी-गैरसोयीपेक्षा महत्वाचं त्यांचं सौंदर्य, त्यांनी आकर्षक दिसणं, हे समीकरण तर कधीच बदलत नाहीये! तर मग समस्त पायजम्यांनी सामाजिक प्रतिष्ठेसाठी उठाव करायची वेळ आली आहे का?

No comments: