PR-वास........

4/15/19

बोडण

माझ्या लहानपणी वेटाळातल्या बायका
सतत मानगुटीवर बसून
नियमांचे उपदेश घोकायच्या
डाव्याने वाढू नको- उजव्याने काढू नको
हिला कुंकू लाव- पण तिला लावू नको!

केसांची बट आवर !
गुडघ्यांवर झगा सावर !
हरतालिकेला पत्री आण!
संक्रांतीला देऊन ये वाण !

एरवी कांदेनवमीला झुणका-भजी,
चैत्रात डाळ पन्हं मटकावणाऱ्या खादाडणी
कधीतरी प्रायश्चित्तासाठी घालणार
एक अघोरी प्रकार-
बोडण!

पितळी परातीत अन्नाचं कालवण
पुरणपोळीवर दही, दह्यावर वरण!
माझ्या सूप्त बुलीमियाचं कारण!
काल्यात एकदा हात घातला,
की जाता जात नाही पंचपक्वांनांचंही जेवण.

बायकांचे देहाला जडलेले सोस
त्यांनाच मोडून काढायला लावायचे
भोगू द्यायची नाही
ओटीपोटातल्या विवराची भूक
दुधाच्या पातेल्यावरची साय चोरून ओरबाडतांना
शमलेला त्या भुकेचा आनंद!

गोड गोबरे नि खारट खुसखुशीत
चिरोटे
फराळाची आली 
पाळी
की ह्यांचं मचामचा चावत
बोलणं कानीकपाळी -
खाखा नको- त्रास होईल !
वजन उतरवा - बास होईल !

आईस्क्रीमचा टबात बुडवणे ह्रदयभंग
अलिप्त थंडगार शिस्तीत 
लाड असे सवंग! 
आमच्या वेळी येतच नव्हते हे प्रसंग!

आताच्या पोरींना रस्त्यावरच्या चाऊमेन चा 
भरून घेता येत असेल
नाकपुडीभर श्वास
कदाचित करतही असतील त्या आता 
फक्त स्वत:साठी
रोजे. लेंट. निर्जळी उपवास.



























4/14/19

मानसीचा चित्रकार तो

कला ती अजरामर, ती कलाकारच काय, कलेचा विषय झालेल्या सौंदर्याला हि पुरून उरते, म्हणून किती तिचं कौतुक! चित्रात बंदिस्त झालेला क्षण, पण तो आपल्या हातातून मात्र कायमचा निसटलेला असतो.
"मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो!" ह्या अजरामर ओळींमध्यें 'निरंतरता' किती महत्वाची आहे!

मानसी वसलेली रूपसी, वीस वर्षांनी जेव्हा भुऱ्या केसांनिशी किंवा दोन ऐवजी चार डोळे लावून समोर येते, तेव्हा? नश्वर सौंदर्याचं हे नवीन, भीषण रूप सुद्धा त्या मानसीच्या चित्रकारा ला तितकं च भावेल काय? अनेक पावसाळे पाहिलेल्या आजीच्या चेहेऱ्यावरच्या सुरकुत्या तिचे एक एक अनुभव सांगतात, पण त्यांचं जगात खरं काय मोल? भरभर पुढे धावणाऱ्या जगाचे मानवी मूल्यांचे निकष भूतकाळात अडकून थोडेच पडणार? सतत सुंदर, सतत नवीन चेहेऱ्यांच्या मागे ते धावणार. 

पण जर, एखाद्या चित्रांमधली निरंतरता व्यक्तीमध्ये संक्रमित झाली, आणि व्यक्तीतली बदलती नश्वरता चित्रात उमटू लागली तर? चिरतारुण्याचा वर मिळालेल्या त्या माणसाच्या बाह्यरूपात तर बदल होणार नाहीत, पण अंतरंगात कुठले बदल होतील? ह्या अनोख्या कल्पनेला ऑस्कर वाईल्डच्या लेखणीने जिवंत केलं. कला, ही कलाकाराचं अस्तित्व ओलांडून अजरामर होते, पुन्हा पुन्हा जन्म घेते त्याचा प्रत्यय 'द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे' मधून आपल्यापुढे ठेवतो.

कथा सुरु होते, तेव्हा डोरियनच्या निरागस सौंदर्यावर वर निरतिशय प्रेम करणारा एक चित्रकार, अक्षरशः जीव ओतून त्याचं एक चित्र काढतो. ते चित्र विकणंच काय, पण कोणाला दाखवणंही आपल्या प्रेमाशी प्रतारणा करणं होईल, ह्या भावनेचा हा चित्रकार, डोरियनला ते चित्र भेट देतो. स्वतःच्या सौंदर्याची आजवर जाणीव नसलेला डोरियन, चित्र बघून मात्र स्तिमित होतो! स्वतःच्या चित्रावर स्वतःच मोहित व्हावं, असं निकोप, निरागस सौंदर्य डोरियन ला मिळालेलं असतं. 

त्याचा मित्र हेन्री मात्र ग्यटेच्या सैतानाशी साधर्म्य सांगणारा आहे. प्रखर बुद्धिमत्तेच्या अहंकाराने सगळ्या गोष्टींचे फक्त विच्छेदन करणारा. कधी आपला खलनायक, तर कधी सूत्रधार. 

तो डोरियनच्या डोक्यात किडा सोडतो- सौंदर्याच्या नश्वरतेची जाणीव करून देतो. "काहे भुललासी वरलिया अंगा?" मुळात सामान्य रूपाच्या व्यक्तींनी हे म्हणणं सोपं आहे, पण डोरियनला पुढचं दुर्भाग्य दिसू लागताच तो आत्म्याचं धन गहाण टाकून चिरतारुण्याचा वर मिळवतो. डोरियन Goethe च्या Faust प्रमाणे भरभरून जीवन जगण्याच्या प्रयत्नात नव्हता, तर केवळ स्वतःच्या जीवनावर प्रेम करणारा होता. त्यामुळे त्याची अधोगती तर अधिकच झपाट्याने होत जाते... 

दुसरीकडे, चित्रातल्या डोरियनचा चेहरा मात्र त्याच्या दुष्कृत्यांच्या खुणांनी भेसूर होत जातो... शेवटी कोण जिंकतं? कलाकार, त्याची कलाकृती, कि कलाकृतीमागची प्रेरणा बनलेला अप्रतिम चेहरा? त्या अप्रतिम चेहऱ्याचा धनी?

ऑस्कर वाईल्डची ही एकमेव लघु-कादंबरी. ताकदीने, सहजतेने वैचारिक उहापोह करणाऱ्या त्याच्या ओघवत्या भाषेने आपण थक्क होतो. अनेक वाक्य अशी, कि खोटी खोटी ठरवायला जावं, तितकी अधिकच खरी वाटणारी! 
"You will always be fond of me. I represent to you all the sins you never had the courage to commit.” 
“There is only one thing in the world worse than being talked about, and that is not being talked about.” 
“Nowadays most people die of a sort of creeping common sense, and discover when it is too late that the only things one never regrets are one's mistakes.” 

“The only artists I have ever known who are personally delightful are bad artists. Good artists exist simply in what they make, and consequently are perfectly uninteresting in what they are. A great poet, a really great poet, is the most unpoetical of all creatures. But inferior poets are absolutely fascinating. The worse their rhymes are, the more picturesque they look. The mere fact of having published a book of second-rate sonnets makes a man quite irresistible. He lives the poetry that he cannot write. The others write the poetry that they dare not realize.” 

वास्तवात 'काळाचा' प्रभाव कुणालाही चुकवता येत नाही. पण ज्या व्यक्ती ध्येयनिष्ठता, कर्तव्यबुद्धी, प्रेम देण्याची वृत्ती, किंवा स्वभावातले मार्दव- ह्या सनातन मूल्यांचा ध्यास घेऊन जगतात, त्यांच्या चेहऱ्यावर वृध्दपणीसुद्धा तेज दिसतं, ह्याचा अनुभव मी घेतला आहे. आदर्शवादाचं प्रवचन नाही, पण शेवटी, स्वतःचा चेहरा स्वतःलाच आरश्यात रोज बघायचा आहे, हो ना?