PR-वास........

6/20/19

ग्रँड कॅनियन



ती कापत गेली अष्मयुगातून खडक दांडगे
ही चीर भूवरी पहा आज सुंदर दिसते
उकलून फाटले जिथे कडे हे क्षणोक्षणी
ती घळ केशरी रंगाची मनभर भरते

लहरीलहरीने पदरावरती पदर पडे
तिने वाहिल्या सुपीक मऊ मातीचा
संततधारेने तिच्या कोरले जे इमले,
त्यातून वाहतो प्रवाह हा काळाचा

उगवली कपारित कडे फोडुनी झाडे
खाचेत खाण चमचमे गडद पाचूची
तळपते उन्हाने पेटुनिया, वैराण 
उभी पुढे रांग ही रांगड्याच शिखरांची

कधी झळके वैभव तीक्ष्ण लाल कड्यांचे
कधी काळोखे कोपरे, सावली दाटे
घनघोर शांतता कधी अथांग दरीत
घुमती गरुडांचे कधी चित्कार पहाटे

मानवी जीवापलिकडली
भव्यता भरे हृदयात
मद-लोभ-मोह विरघळले
कृतार्थ, नम्र नमनात!
कोसळून मनाचे असे पुन्हा उसळणे -
मारून सूर ही भरारी उत्तुंगात!










6/10/19

Clickbait

काही दिवसांपूर्वी माझी ही कविता 'अटक मटक' नावाच्या लहान मुलांसाठी असलेल्या संस्थळा वर प्रकाशित झाली.

सुंदर मांडणी आणि लहान मुलांना खूप आवडतील असे, वाचनीय लेख, कथा, ह्यांसाठी जरूर ह्या वेबसाईटला भेट द्या!

https://www.atakmatak.com/content/clikbait-poem

4/15/19

बोडण

माझ्या लहानपणी वेटाळातल्या बायका
सतत मानगुटीवर बसून
नियमांचे उपदेश घोकायच्या
डाव्याने वाढू नको- उजव्याने काढू नको
हिला कुंकू लाव- पण तिला लावू नको!

केसांची बट आवर !
गुडघ्यांवर झगा सावर !
हरतालिकेला पत्री आण!
संक्रांतीला देऊन ये वाण !

एरवी कांदेनवमीला झुणका-भजी,
चैत्रात डाळ पन्हं मटकावणाऱ्या खादाडणी
कधीतरी प्रायश्चित्तासाठी घालणार
एक अघोरी प्रकार-
बोडण!

पितळी परातीत अन्नाचं कालवण
पुरणपोळीवर दही, दह्यावर वरण!
माझ्या सूप्त बुलीमियाचं कारण!
काल्यात एकदा हात घातला,
की जाता जात नाही पंचपक्वांनांचंही जेवण.

बायकांचे देहाला जडलेले सोस
त्यांनाच मोडून काढायला लावायचे
भोगू द्यायची नाही
ओटीपोटातल्या विवराची भूक
दुधाच्या पातेल्यावरची साय चोरून ओरबाडतांना
शमलेला त्या भुकेचा आनंद!

गोड गोबरे नि खारट खुसखुशीत
चिरोटे
फराळाची आली 
पाळी
की ह्यांचं मचामचा चावत
बोलणं कानीकपाळी -
खाखा नको- त्रास होईल !
वजन उतरवा - बास होईल !

आईस्क्रीमचा टबात बुडवणे ह्रदयभंग
अलिप्त थंडगार शिस्तीत 
लाड असे सवंग! 
आमच्या वेळी येतच नव्हते हे प्रसंग!

आताच्या पोरींना रस्त्यावरच्या चाऊमेन चा 
भरून घेता येत असेल
नाकपुडीभर श्वास
कदाचित करतही असतील त्या आता 
फक्त स्वत:साठी
रोजे. लेंट. निर्जळी उपवास.



























4/14/19

मानसीचा चित्रकार तो

कला ती अजरामर, ती कलाकारच काय, कलेचा विषय झालेल्या सौंदर्याला हि पुरून उरते, म्हणून किती तिचं कौतुक! चित्रात बंदिस्त झालेला क्षण, पण तो आपल्या हातातून मात्र कायमचा निसटलेला असतो.
"मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो!" ह्या अजरामर ओळींमध्यें 'निरंतरता' किती महत्वाची आहे!

मानसी वसलेली रूपसी, वीस वर्षांनी जेव्हा भुऱ्या केसांनिशी किंवा दोन ऐवजी चार डोळे लावून समोर येते, तेव्हा? नश्वर सौंदर्याचं हे नवीन, भीषण रूप सुद्धा त्या मानसीच्या चित्रकारा ला तितकं च भावेल काय? अनेक पावसाळे पाहिलेल्या आजीच्या चेहेऱ्यावरच्या सुरकुत्या तिचे एक एक अनुभव सांगतात, पण त्यांचं जगात खरं काय मोल? भरभर पुढे धावणाऱ्या जगाचे मानवी मूल्यांचे निकष भूतकाळात अडकून थोडेच पडणार? सतत सुंदर, सतत नवीन चेहेऱ्यांच्या मागे ते धावणार. 

पण जर, एखाद्या चित्रांमधली निरंतरता व्यक्तीमध्ये संक्रमित झाली, आणि व्यक्तीतली बदलती नश्वरता चित्रात उमटू लागली तर? चिरतारुण्याचा वर मिळालेल्या त्या माणसाच्या बाह्यरूपात तर बदल होणार नाहीत, पण अंतरंगात कुठले बदल होतील? ह्या अनोख्या कल्पनेला ऑस्कर वाईल्डच्या लेखणीने जिवंत केलं. कला, ही कलाकाराचं अस्तित्व ओलांडून अजरामर होते, पुन्हा पुन्हा जन्म घेते त्याचा प्रत्यय 'द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे' मधून आपल्यापुढे ठेवतो.

कथा सुरु होते, तेव्हा डोरियनच्या निरागस सौंदर्यावर वर निरतिशय प्रेम करणारा एक चित्रकार, अक्षरशः जीव ओतून त्याचं एक चित्र काढतो. ते चित्र विकणंच काय, पण कोणाला दाखवणंही आपल्या प्रेमाशी प्रतारणा करणं होईल, ह्या भावनेचा हा चित्रकार, डोरियनला ते चित्र भेट देतो. स्वतःच्या सौंदर्याची आजवर जाणीव नसलेला डोरियन, चित्र बघून मात्र स्तिमित होतो! स्वतःच्या चित्रावर स्वतःच मोहित व्हावं, असं निकोप, निरागस सौंदर्य डोरियन ला मिळालेलं असतं. 

त्याचा मित्र हेन्री मात्र ग्यटेच्या सैतानाशी साधर्म्य सांगणारा आहे. प्रखर बुद्धिमत्तेच्या अहंकाराने सगळ्या गोष्टींचे फक्त विच्छेदन करणारा. कधी आपला खलनायक, तर कधी सूत्रधार. 

तो डोरियनच्या डोक्यात किडा सोडतो- सौंदर्याच्या नश्वरतेची जाणीव करून देतो. "काहे भुललासी वरलिया अंगा?" मुळात सामान्य रूपाच्या व्यक्तींनी हे म्हणणं सोपं आहे, पण डोरियनला पुढचं दुर्भाग्य दिसू लागताच तो आत्म्याचं धन गहाण टाकून चिरतारुण्याचा वर मिळवतो. डोरियन Goethe च्या Faust प्रमाणे भरभरून जीवन जगण्याच्या प्रयत्नात नव्हता, तर केवळ स्वतःच्या जीवनावर प्रेम करणारा होता. त्यामुळे त्याची अधोगती तर अधिकच झपाट्याने होत जाते... 

दुसरीकडे, चित्रातल्या डोरियनचा चेहरा मात्र त्याच्या दुष्कृत्यांच्या खुणांनी भेसूर होत जातो... शेवटी कोण जिंकतं? कलाकार, त्याची कलाकृती, कि कलाकृतीमागची प्रेरणा बनलेला अप्रतिम चेहरा? त्या अप्रतिम चेहऱ्याचा धनी?

ऑस्कर वाईल्डची ही एकमेव लघु-कादंबरी. ताकदीने, सहजतेने वैचारिक उहापोह करणाऱ्या त्याच्या ओघवत्या भाषेने आपण थक्क होतो. अनेक वाक्य अशी, कि खोटी खोटी ठरवायला जावं, तितकी अधिकच खरी वाटणारी! 
"You will always be fond of me. I represent to you all the sins you never had the courage to commit.” 
“There is only one thing in the world worse than being talked about, and that is not being talked about.” 
“Nowadays most people die of a sort of creeping common sense, and discover when it is too late that the only things one never regrets are one's mistakes.” 

“The only artists I have ever known who are personally delightful are bad artists. Good artists exist simply in what they make, and consequently are perfectly uninteresting in what they are. A great poet, a really great poet, is the most unpoetical of all creatures. But inferior poets are absolutely fascinating. The worse their rhymes are, the more picturesque they look. The mere fact of having published a book of second-rate sonnets makes a man quite irresistible. He lives the poetry that he cannot write. The others write the poetry that they dare not realize.” 

वास्तवात 'काळाचा' प्रभाव कुणालाही चुकवता येत नाही. पण ज्या व्यक्ती ध्येयनिष्ठता, कर्तव्यबुद्धी, प्रेम देण्याची वृत्ती, किंवा स्वभावातले मार्दव- ह्या सनातन मूल्यांचा ध्यास घेऊन जगतात, त्यांच्या चेहऱ्यावर वृध्दपणीसुद्धा तेज दिसतं, ह्याचा अनुभव मी घेतला आहे. आदर्शवादाचं प्रवचन नाही, पण शेवटी, स्वतःचा चेहरा स्वतःलाच आरश्यात रोज बघायचा आहे, हो ना?




3/11/19

विजले निखारे

जीवघेण्या फक्क वेळी आज खायला उठले,
शुभ्र बर्फाच्या उन्हाने लखलखणारे सुरे,
भरल्या डोळ्यात पाणी गोठले- हे काव्य नव्हे!
हेच सांगाया मांडले आज शब्दांचे पसारे!

थंडीच्या उदास देहातून येई रोज प्रश्न
निष्प्रभ रश्मीत तरी कुठे तू आहेस का रे?

झाडांची आखडलेली बोटे स्पर्शातुर वेडी
त्यांना लागले जिव्हारी, बोचणारे सर्द वारे

मात्र बर्फही खट्याळ, त्याने भरले नेमके
झाडा, घरा, खाच खळग्यांचे भकास निवारे

निकराने धुगधुगी, झगडली अहोरात्र
तरी उरले शेवटी फक्त विजले निखारे  

रात्र दिवसास गिळे, असे रोजचे आवर्त
सभोवारचे मळभ, कधीही न फिटणारे  

मृत्यूदूत शुभ्रवर्णी, त्यांचे येणे अलवार
जसे हलके प्रेमाने, हिम सर्वत्र पाझरे

आता थकून टाकला, उसासा जन्मभराचा
मिटूनिया ताणलेल्या पापण्यांची दोन दारे

---

आता देशी का चाहूल गर्भरेशमी उन्हाची ?
झाडा आळत्याची बोटे- नवे कायसे तरारे?

फांद्या नृत्यमुद्रांनी मज लगडून आल्या
फिरून कुठून आणू मी गेल्या वसंता रे?











2/21/19

शब्द दिला!

"तिने बाळाला जन्म दिला!" असं म्हणतात. दिला? जन्म ही कुणी कोणाला देण्यासारखी गोष्ट तर नक्कीच नाही. तो कशाचा 'दाखला' होता, कि तिने दिला? कि तिला तो द्यावा लागला?
जेव्हा जन्म दिला, तेव्हा ज्यांना दिला, त्यांना तो घेण्या किंवा न घेण्याचा अधिकार असतो का?
जाऊदे. ह्या शब्दच्छलात पडण्यापेक्षा- डॉक्टरांनी 'डिलिव्हरी केली' असं म्हणावं, तर डॉक्टर काय पोस्टमन झाली, कि तिने केवळ जिथलं पार्सल तिथे पोचवण्याचं काम केलं?
आपल्या अवघ्या अनुभवविश्वाची मर्यादा, अशी शब्दांनी ठरवली जाते. जन्म देण्याचा अनुभव कसा असतो? त्याचं वर्णन करणारे शब्द एका लेखिकेला सापडू शकतील का?

Margaret Atwood ही कदाचित सध्याची सर्वात मान्यवर इंग्रजी लेखिका आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये, इतकी पारितोषिकं आणि सन्मान तिच्या नावावर आहेत. मार्गरेटचं घट्ट वास्तवाला धरूनच उत्तुंग भराऱ्या मरणारं साहित्य खरंच स्त्री जीवनाच्या खूप खूप जवळ जातं. The Handmaid's Tale लिहिताना म्हणे, तिने स्वतःवर बंधन घालून घेतलं होतं, कि जगात आजवर न घडलेल्या गोष्टी आपल्या कथेत मुद्दाम दुःख-विषाद निर्माण करण्यासाठी घालायच्या नाहीत. तरीही, ह्या डिस्टोपिअन कथेतली भीषणता सर्वांपर्यंत पोचली. तिच्या कथा, कविता मी जास्त वाचल्या - २५ एक कादंबऱ्या, ७-८ कथा संग्रह, कविता संग्रह, शिवाय, समीक्षा, ब्लॉगच नव्हे, तर 'ग्राफिक नॉव्हेल' सारख्या अतिशय नवीन प्रांतातही पाऊल ठेवलेलं. इतकं विपुल लेखन करणारी स्त्री लेखिका, आणि तरीही जे जे लिहिलं ते उत्तम, म्हणून मी अधिकाधिक भारावत गेले!

Dancing Girls मधली तिची कथा, "Giving Birth" च्या सुरुवातिचा थोडासा स्वैर अनुवाद/गोषवारा वर दिलाय. मानव"जन्मा" च्या लिखित इतिहासात, अनुभवकथनात, स्त्रियांच्या अनुभवांचं स्थान दुय्यमच नव्हे, तर केवळ अंशमात्र ठरलं. पृथ्वीच्या उत्क्रांतीपासून विश्वयुद्धापर्यंत अनेक 'महत्वाच्या' घडामोडीमध्ये स्त्रीजीवनाचा विचार फार कमी वेळा पुढे मांडला गेला. १०० प्रसिद्ध लेखकांची नावं घ्या म्हंटल, तर सहज तोंडावर येतील- शेक्सपियर/मिल्टन/चॉसर  पासून कीट्स, वर्डस्वर्थ, हार्डी, येट्स, आणि इकडे अमेरिकेत व्हिटमन, हॉथॉर्न, फिट्सजेराल्ड,आर्थर मिलर, रॉबर्ट फ्रॉस्टच नव्हे, तर लोकप्रिय लेखकात जेफ्री आर्चर, आर्थर हेली वगैरे सर्वांना माहित असतात. आता १०० इंग्रजी लेखिकांची, किंवा स्त्रीविषयक लेखनाची नावं आठवून पाहू बरं?

कठीण च होतं ते! इंग्रजीपेक्षा मग मराठी लेखिकाच लवकर आठवतील. अभिजात साहित्य लिहायला वेळ, पैसा, आणि 'स्थान', ह्या तीन गोष्टींचं गणित स्त्रियांसाठी जुळून येईपर्यंत २०वं शतक उजाडलं. व्हर्जिनिया वूल्फ म्हणाली, तसं, कादंबऱ्यांनी स्त्रियांच्या विश्वाला साहित्यात स्थान मिळवून दिलं. आणि तरीही, साहित्याच्या पुरुषप्रधान निकषांवर ते उतरायला अजून कितीतरी काळ लोटावा लागला. जेन ऑस्टेन, ब्रॉन्टे भगिनी फक्त प्रेम-घर-लग्न-कुटुंब ह्याच परिघात फिरत राहिल्या, कारण त्या पलीकडचं विश्व त्यांच्या परिचयाचंच नव्हतं...

Atwood च्या "Giving Birth" ची लेखिका/निवेदिका स्वतः आई आहे. तिची २ वर्षाची पिल्लूडी मधेच झोपेतून उठल्यावर तिला खाऊ घालणे, न्हाऊ घालणे, हे करता करता ती लिहितेय, विचार करतेय.
तिच्या मुलीला कोणीतरी दिलेली बार्बी बाहुली, त्या बाहुलीचे सगळे कपडे गायब, आणि कशी कोणजाणे, बाहुलीच्या पोटातून मधे अखंड चीर गेलीये! आणि आज बघते, तो चिमुकलीने तोंडात घालून घालून बाहुलीचे पाय पण तोडलेयत! मग लगेच मुलीचं डायपर उघडून तपासणी करावी लागते, कि पाय खाल्ले असतील, तर शी तुन बाहेर पडले का?
आता ती बीभत्स बाहुली बघवत नाही, म्हणून कचऱ्यातच टाकावी लागते!  

हे सोपस्कार पार पडून, शेवटी आपण गोष्टीतल्या नायिकेकडे वळतो- जेनेट. जेनेट सुशिक्षित, बहुधा नोकरदार, सजग स्त्री असल्यामुळे तिने प्रसूतीविषयी पुस्तकं वाचलीयेत, श्वासावर लक्ष केंद्रित करायचे, दहा आकडे म्हणायचे - असे पर्याय ती प्रसूती-कार्यशाळेतून शिकून आलीये. ह्या क्लासमध्ये सांगतात, "थोडा त्रास होणारच, पण तो आपण कसा घेतो, त्यावर आहे!" पण तिथली एक अनुभवी बाई म्हणते- "इंजेकशन घेऊन टाका- नरकयातनांपेक्षा काहीही बरं! त्रास- प्रसूती वेदनांना 'त्रास' म्हणणं म्हणजे!" पण पाहिलटकरीणी तिच्याकडे आक्रसून बघतायत - किती नकारात्मक विचार करावा उगीच!

जेव्हा वेळ येते, तेव्हा मात्र जेनेटला वाटतं- क्लासमध्ये शिकलेल्या वाचलेल्या ऐकलेल्या कितीही गोष्टी असोत, 'ह्या' अनुभवासाठी त्या पूर्णपणे निरुपयोगी आहेत!
कळांच्या वेदनेतून जाताना ती सगळ्या जगापासून तुटल्यासारखी होते. तिच्या अवतीभवती घडणाऱ्या गोष्टी संथ होतात, आणि शेवटी श्वासोच्छवास, दहा आकडे, शब्द, सगळ्यांच्या पलीकडे ती पोचते. बाळ बाहेर येतं, तेव्हा नवरा म्हणतो, "बघ,वाटलं तितकं कठीण नव्हतं, ना?"

तिचा चष्मा नवऱ्याने आणलेला नसतो, त्यामुळे "काय झालंय" ते तिला दिसू शकत नाही! स्वतःच्याच इतक्या व्यक्तिगत अनुभवाकडेही शेवटी तिला कुणा परक्याच्याच नजरेतून, त्यांनी वर्णन केलेल्या भाषेतूनच बघावं लागणार असतं. थोड्यावेळाने जाग आल्यावर मात्र, खिडकीतून बाहेर बघताना, आजवर ज्या इमारती खंबीर आणि स्थिर दिसत होत्या, त्या अचानक विरघळून जाऊ लागल्या. एक अशक्य अशी कोवळी क्षणिकता जेनेटला दिसली, तेव्हा तिला वाटलं - ती स्वतःच आता एक वेगळी व्यक्ती झाली आहे!















1/18/19

रिक्षावाला

"ए बेबी, तुझा चक्का उलटा फिरते नं!" मागून जोरात आवाज आला.

एक सेकंद दचकून मी खाली वाकून चाकाकडे पाहिलंच, पण तेवढ्यात गंगारामच्या रिक्षाच्या टपावर बसलेल्या पोरांनी खाली उतरून त्याला जोरात धक्का मारला, आणि मला मागे टाकून हुल्लड करत रिक्षा पुढे निघून गेला! मी पण जोरजोरात सायकल हाणत ओरडले, "ए गंगाराम, काहीSSS काय सांगतो? मी आता पडले असते म्हणजे!" पण गंगाराम हसत हसत "कशी घाबरली!" करत पुढे निघून गेला.

मी तोल सावरला. जुलैच्या पावसात निसरड्या रस्त्यावर नुकतीच लांबच्या मोठ्या शाळेत मी आपली आपली सायकल घेऊन जायला लागले होते. जाऊदे, तो गंगाराम आहेच आगाऊ! असं मनातल्या मनात म्हटलं, आणि पेडल मारलं. माझी सायकल पुढेच जात होती, पण बाजूनी रिक्षा जास्त वेगाने गेल्यामुळे मला खरंच पुन्हा एकदा वाटलं, "आपली चाकं उलटी फिरतायत का?" :) :) चाकं नाही, पण मन उलटं फिरून प्राथमिक शाळेत गेलं.

पहिली ते चवथीची शाळा, मोठ्या रस्त्यावर तीन चौक टाकून होती, म्हणून आम्ही ७-८ वर्षाचे ५-६ फटाके आणि टिकल्या (मुलंमुली) गंगारामच्या सायकलरिक्षातुन शाळेत जायचो. गंगारामच्या मस्कऱ्या स्वभावाने आमची फारच करमणूक व्हायची, पण दप्तर लटकावताना मधेच जर त्याने एका मुलीची वेणी ओढली, दुसरीचा रुमाल पळवला, तर आम्हा मुलींची अस्मिता दुखावली जायची आणि आम्ही जोरात ओरडायचो. आता मी मोठी झाले, असं मला वाटलं होतं, पण मागून येऊन गंगारामने खोडी करायची ती केलीच! मला हसू आलं.

माझ्या तिप्पट चौपट वयाच्या गंगारामला आम्ही ७-८ वर्षापासूनच "ए गंगाराम" च म्हणायचो, कारण माणूस हा असा विनोदी. "अहो गंगाराम काका" वगैरे म्हणायचं, हे पण कधी सुचलं नाही, आणि कोणी शिकवलंही नाही. सगळा बेभरवशाचा कारभार, आणि रोज वेगवेगळ्या वेळी अवतारायचा नेम! :)

सकाळी सकाळी ७:०० वाजता तयार होऊन अंगणात दप्तर घेऊन उभं राहायचं, तरी सव्वासात पर्यंत ह्याचा पत्ता नाही. कि मग समोरच्या अंगणातून चित्रकाकूचा मुलगा ओरडायचा "आज गंगाराम येत नाही वाटतं!" मग धावत धावत टॉयलेटचं दार वाजवायचं, "बाबा, गंगाराम येत नाही, लौकर करा, शाळेत सोडायचं आहे." आणि नेमकी तेवढ्यात बाहेर घंटी वाजणार. कळकट शर्ट, तारवटलेले डोळे, दाढीचे खुंट वाढलेले, नाकातून सूं सूं पाणी येतंय, अशा अवतारात गंगाराम उभा. "बेबी, पायलीवाली खांडेकरनी लेट केला नं!" असं म्हणायचा, पण आजी हळूच नंतर सांगायची, "रात्री दारू पिऊन पडला असेल. तू जास्त बोलत जाऊ नको, शाळेत जायचं- यायचं.  ह्या लोकांशी कशाला जास्त वाढवा?"

पण ते काही असो, घरच्यांचा, आणि आम्हा पोरांचापण त्याच्यावर विश्वास होता, कारण बाकी तो मनाने मुलांत मूलच होता. रिक्षात बसून आम्ही धांगडधिंगा करायला लागलो, कि "ते बेबी रिक्षातून पडली नं, डॉक्टरकडे जाऊन टाकेबी पडले..." वगैरे नुसत्या कहाण्या सांगायचा, पण आम्हाला शिस्त लावणं त्याला जमणं शक्यच नव्हतं, कारण चौकात रिक्षा थांबला, कि खाली उतरून मागे "टपावर" बसायला आम्ही "टपलेले" असायचो.

मला वाटतं गंगाराम टपावरच्या दोन सीट धरूनच मुलांची भरती करत असावा, कारण त्याला झेपतील, आणि मावतील त्यापेक्षा जास्तच पोरं रिक्षात असायची. (रोज कोणीतरी आजारी, कोणी उशीरा उठलेला, कोणी गावाला गेला - म्हणजे शाळेला बुट्टी, म्हणून उरलेली रिक्षात मावूनच जातील असाहि त्याचा अंदाज असावा :-) :-) शिवाय दुसऱ्या कोणा रिक्षावाल्याची बुट्टी असेल, तर तिथलं पण एखादं चिरकूट "दयाळूपणे" आणून बसवायचा (एक्स्ट्रा कमाई नं!)

इतकी पोरं सीटवर कोंबून बसायला तयार नसायची, उलट टपावर बसायलाच भांडाभांडी व्हायची! म्हणजे आम्ही मुलं पण ह्या कटात भागीदार होतो. टपावर 'बसणं' कसलं, ते रिक्षाच्या मागे लोम्बकाळणंच होतं, पण त्यात काय थ्रिल होतं, ते अनुभवल्याशिवाय कळूच शकत नाही...सायकलरिक्षाच्या दोन चाकांना जोडणाऱ्या पट्टीवर पाय, आणि सीटच्या काठाला हाताने धरलेलं, अशी सवारी करणारी एक दोन तरी पोरं प्रत्येक रिक्षात असायचीच. जरा उंची पुरली, की सीटच्या काठावर मागून चढून उलटं बसता पण यायचं, आणि उतारावर जास्त वारं खायला मिळायचं! शिवाय, दोन रिक्षातल्या शर्यतीत पुढे जायला टपावरची पोरं मधेच उतरून रिक्षाला धक्का पण मारू शकायची. काय पण labor of love होतं आमचं!!!

पुढे पाचवी ते सातवी मात्र "भाऊ" भेटले. खरं म्हणजे भाऊ वयाने गंगारामपेक्षा पुष्कळच तरुण, पण त्यांचा आपसूक आदरच वाटायचा, कारण नियमितपणा आणि शिस्तीचं हे दुसरं टोक! रिक्षा चालवण्यातपण किती शिस्त आणि निष्ठा असावी! रिक्षा अतिशय टापटीप ठेवायचे. त्यांनी रिक्षाला गिअर्स बसवून घेतले होते, आणि दप्तरं लटकवायलाही शिस्तीत दोन्ही बाजूला हुक्स, बाजूने ऊन-पाऊस लागू नये म्हणून वेगळे पडदे! स्वतः ही अगदी कडक कपडे घालायचे! उन्हाळ्यात काळ्याशार रंगाचे भाऊ, जवळजवळ तेजस्वीच दिसायचे इतका त्यांचा रंग तुकतुकीत होता! बेसबॉल कॅप घातलीकी तर आम्ही त्यांना सांगायचो, "भाऊ, आज काय स्मार्ट दिसून राहिले!"

सायकल रिक्षात वास्तविक गादीची सीट एकच असते, त्याच्या विरुद्ध बाजूला लाकडी फळकुटच असतं. तर गंगारामच्या रिक्षात उंच सीट पकडायला आम्ही शाळा सुटल्यावर सुसाट धाव घ्यायचो, नाहीतर भांडाभांडी ठरलेली. भाऊंनी मात्र एक दिवसाआडचा नियमच करून टाकला, म्हणजे काल गादीवर बसलेल्यांनी आज खाली बसायचं! गंगारामच्या रिक्षात गादी-फळकुटात फारसा फरकही नव्हता म्हणा, कारण गादी ठिकठिकाणी फाटली होती, आणि भोकातून नारळाच्या का जूटच्या झावळ्या पार्श्वभागाला टोचायच्या :) त्या पुढे भाऊंचा रिक्षा म्हणजे आमच्यासाठी limousine पेक्षा कमी नव्हता!

रिक्षात गाण्याच्या भेंड्यापासून शाळेतलं गॉसिप आणि होमवर्कपर्यंत सगळं घडायचं, कारण रस्ते अगदी लोण्यासारखे गुळगुळीत होते. नागपूरसारखे भव्य, सरळ, रिकामे रस्ते दुसऱ्या कुठेच पहिले नव्हते. ते रस्ते, आणि सायकल-रिक्षा. दोन्ही आता कालातीत झाले.

गंगारामला "उद्या वेळेवर ये" सांगून थकलो होतो, ते भाऊंना "भाऊ उद्या येऊ नका नं, म्हणजे आई शाळेत सायकलने जाऊ देईल..." असं सांगायला लागलो... आधी रहदारीच्या रस्त्यावर डावी-डावीकडून हळू सायकल चालवत होतो, ते नंतर १०वी त शर्यती लावायला लागलो. तेव्हा कधी गंगाराम, कधी भाऊ, छोट्या मुलांना घेऊन जातांना दिसत. कधी मी त्यांना हसून हात हलवला असेल, कधी दुर्लक्षही केलं असेल, कारण तेव्हा मी मोठी झाले होते नं! टागोरांच्या काबुलीवाल्याप्रमाणे आमच्या आयुष्यात रिक्षावाला, दूधवाला, ही मंडळी होती. १०वी च्या परीक्षेचा निकाल लागल्यावर भाऊ घरी येऊन मला १०० रुपये देऊन गेले! त्यांचं मात्र मला संपूर्ण नावही कधी माहिती झालं नाही.

माझी मात्र गरज सरली, की बालपण? त्यांच्याशी बोलण्यासारखं अचानक माझ्याकडे काहीच उरलं नाही...!