आई मला भूक लागली :)
लहानपणी हे गाणं म्हटलं त्याला खूप दिवस झाले। माझी १०वी नंतर शाळा सुटली त्याला जवळजवळ १२ वर्ष होऊन गेली, आणि त्यानंतर शाळेत जायचा प्रसंग आला तो सरळ MA, M.Phil. झाल्यावर, थेट अमेरिकेत, शिक्षिका होण्यासाठी Ed.M. मधे दाखल झाल्यावर! Ed. M. म्हणजे आपल्याकडे बी. एड असतं तसंच, फक्त पदव्योत्तर अभ्यासक्रम (Masters) असल्यामुळे थोडं अधिक demanding म्हणायचं. निदान मला तरी ते अधिक demanding वाटलं- त्याचं कारण हे नवीन "अमेरिकन शिक्षणपद्धती" हे रसायन ही असू शकेल.
ह्या अमेरिकन शिक्षणपद्धतीला समजून घेतांना बरेच प्रश्न पडले, बरंच आश्चर्यही वाटलं, आणि तितकंच कौतुकही! पुन्हा सर्वाथाने शाळेत जातांना (इथे विद्यापीठालाही "स्कूल" म्हणतात हे तर प्रसिद्धच आहे ) इतकं काही शिकायला मिळालं, की शिक्षिका कसली होतेय मी- विद्यार्थिनीच बनले पुन्हा एकदा!!!
अगदी पहिला प्रसंग आठवतो: पहिल्या दिवशी विद्यापीठातल्या वर्गाला गेले तो! तिथे जायचं, शांतपणे टिपणं घ्यायची, प्राध्यापकांचा प्रत्येक शब्द ब्रह्मवाक्य मानायचा, ह्या पठडीतली मी. पोचले, तर वर्गात सगळेजण गोलात बसलेले, आणि त्यात प्राध्यापक कुठले, हे मला कळायचं एकमेव कारण म्हणजे मी आधी त्यांना प्रवेशाच्या संदर्भात भेटले होते! मग सर्वप्रथम "ओळख-परेड" सुरू झाली. प्रत्येकाने फक्त आपलं नावच नाही, तर आपल्याविषयी एखादी विशेष गोष्टही सांगायची, आणि प्रत्येकाने "स्मरणशक्ती" खेळाप्रमाणे आधीच्या सगळ्यांची नावं आणि विशेष लक्षणंही लक्षात ठेवून सांगायची! आता आमच्या वर्गात जरी फक्त २४ लोक होते, तरीही ह्या प्रकारात जवळजवळ अर्धा पाऊण तास गेलाच. मधे मधे भरपूर विनोद, एकमेकांची थट्टा, कोणी मधेच उठून "coke" घेऊन आलेले, कोणी चक्क पाय वर घेऊन बसलेले....
इथे आपण नक्की शिक्षण विषयाच्या वर्गात आहोत, की सायंकालीन मनोरंजन शिबिरात आहोत, असा विचार मी करत असतांनाच प्राध्यापिकेने कोर्सचा पुढील आराखडा मांडायला सुरूवात केली.
प्रत्येकाला कोर्सची समग्र माहिती असलेलं syllabus दिलं। त्यात कोणत्या दिवशी कोणता धडा, कोणती पानं वाचून यायची, त्याचं वेळापत्रक होतं. कोर्सच्या दर टप्प्यावर कोणत्या assignments कुठल्या दिवशी द्यायच्या, त्याची माहिती, शिवाय प्रत्येक assignment चं सविस्तर स्पष्टीकरण होतं. प्रत्येक assignment कोणत्या निकषांवर तपासली जाईल, तेही लिहिलेलं. आणि वर प्रा. बाई विचारतात, “कोणाला काही प्रश्न आहेत का?” ह्यावर एकाने, “हा अमूक पेपर किती पानांचा हवा?” हे विचारूनच घेतलं. मुळात Graduate (आपल्या भाषेत Masters) level नंतर परीक्षा हा प्रकार साधारणत: नसतोच. त्या ऐवजी ५ पानी निबंध, छोटे Reflective Responses, किंवा वर्षाच्या शेवटी मोठं project अशा विविध तहेने प्रगती तपासली जाते. स्मरणशक्तीवर भर नसून विश्लेषणावर असतो. वर्गातल्या चर्चेतला सहभाग ही सुद्धा grade साठी महत्त्वाची बाब असते.
अमेरिकन किंवा एकूणच पाश्चात्य शिक्षणपद्धतीची पहिली ओळख अशी झाली, की इथे विद्यार्थ्यांना सगळी इत्थंभूत माहिती पुरवणं हे प्राध्यापक, प्रशासक, शिक्षणसंस्था ह्यांची पहिली जबाबदारी असते। मला आठवलं, SSC बोर्डात आपण पेपर लिहून एकदा का मख्ख चेहयाच्या supervisor/ Invigilator कडे तो दिला, की पुन्हा आयुष्यभर त्याची नि आपली गाठभेट अशक्यच! तो निदान परिक्षकांकडे तरी पोचावा, अशी प्रार्थना करण्यावाचून आपल्या हाती काही उरत नाही. परिक्षकांनी तो कसा तपासला हे विचारण्याचा हक्क भारतीय विद्यार्थ्यांना नाही, तो ह्या देशात तर मूलभूतच मानला आहे.
ह्या अशा विचारात मी असतांना बाईंनी पुढच्या चर्चेचा विषय सांगितला, "प्रत्येकाने आपल्याला शिक्षक किंवा शिक्षिका का व्हायचे आहे, आपल्याला शिक्षणक्षेत्राविषयी काय वाटतं ते सांगायचं"। प्रत्येकजण सांगायला लागला तसा, मला घाम फुटायला लागला- मी का शिक्षिका होते आहे? ह्याचं उत्तर मला स्वत:लाही त्या क्षणी फारसं स्पष्ट दिसत नव्हतं. लहानपणापासून शिकवायला आवडतं, आणि आपला आवडता विषय दुसयांनाही आवडावा, अशी साधी अपेक्षा. भारतात आपल्याला खरं म्हणजे "पर्याय" हा शब्द खया अर्थाने कळलेलाच नसतो. नोकरी मिळणे, पैसा कमावणे, हे एकमेव ध्येय ठेवून दरवर्षी लाखो डॉक्टर आणि करोडो इंजीनियर बाहेर पडतात. उरलेले लोक दुसरं जे जमेल ते करतात, अशी निदान काल-कालपर्यंत तरी परिस्थिती होती. त्या शिडीवरची सर्वात खालची पायरी म्हणजे शिक्षक होणे! पण लवकरच लक्षात आलं, की इथेही शिक्षकी पेशाला फारशी किंमत नाही. असं असूनही, काहिसा आदर्शवाद, काही स्वप्न घेऊन माझे सगळे वर्गमित्र-मैत्रिणी आपल्या भाषेवरच्या प्रेमामुळे इथे आलेले. लेखन, वाचन, कवितांशी दृढ नातं असणारे, केवळ नाइलाजाने ह्या वाटेला न वळलेले, समविचारी खरे मित्र मैत्रिणी मला पहिल्याच दिवशी सापडले, हे मात्र त्या चर्चेतून जाणवलं. काहींनी शाळेत अर्धावेळ शिकवलेलं, पण बरेचसे माझ्यासारखे- नवीन कोया पाटीसारखे...
पण ही माझी पाटी नुसती कोरीच नव्हे, तर अगदी नवीनसुद्धा होती, ते कळलं प्रथम मी इथली शाळा पाहिली तेंव्हा! ह्या कोर्ससाठी आम्हाला एका शाळेतल्या वर्गाचं ७ दिवस "निरीक्षण" करायचं होतं। तिथल्या शिक्षणतंत्राला स्वत:च्या संकल्पनांशी पडताळून पहायचं होतं. तर असा आमचा निरीक्षणाचा पहिला दिवस: एका उच्चभ्रू शाळेत आम्हाला पाठवलेलं. मी अखेरची शाळा पाहिली, ती भारतात दहावी झाले त्यावेळी, १२ वर्षांपूर्वी. त्यानंतर हा इथला वर्ग म्हणजे माझ्या स्वप्नातल्या शाळेपेक्षाही सुंदर! मुले ही देवाघरची फुले, म्हणून देवानेच त्यांच्यासाठी बनवलेला का काय, असा विचार पाय टाकताक्षणीच मनाला स्पर्शून गेला!
बाकांऐवजी सुबक क्रीम- निळ्या रंगाच्या अशा मोजून फक्त २४ खुर्च्या ! आणि वर्ग मात्र चांगला प्रशस्त। पुढे फळा, त्यावर Overhead लावायची सोय म्हणून खाली ओढायचा पडदा तयार. एका कोपयात टीव्ही कायमचा बसवलेला, तर वर्गाच्या मागच्या बाजूस मुलांसाठी ३-४ कंप्युटर्स मांडून ठेवलेलले. बाईंच्या टेबलावर त्यांचा स्वत:चा कंम्प्युटर आणि शेकडो रंगीबेरंगी फायली वगैरे, शिवाय त्यांना अख्खी दोन कपाटं पुढच्या कोपयात दिलेली. खोलीच्या कडेला room-heaters असतात, त्यामागच्या खिडक्यांजवळ मुलांसाठी साहित्य ठेवलेलं- पेन, कागद, हस्तकलेच्या खास कात्र्या, ५० एक स्केचपेन तर एका टोपलीतच ठेवलेले. कोणाला लागले तर खुशाल घ्या, वापरा, मात्र वर्गातून बाहेर पडतांना परत करून जा, असे. आजूबाजूच्या भिंतींवर चारही रंगीबेरंगी पोस्टर्स- काही लेखनकलेबद्दल, तर काही प्रसिद्ध लेखकांची वाक्य, काही शालेय जीवनात मुलांना प्रोत्साहनपर किंवा काही चक्क मजेदार- खोडसाळ Bart Simpson (Simpsons ह्या प्रसिद्ध कार्टून मालिकेतला) ला शिक्षा मिळालिये त्याच्या कारनाम्यांची यादी करून "I will not...” पुढे लिहायची... हे सगळं बघून आधीच हर्षवायू झालेली मी, आणि त्यात नजर दूरच्या कोपयाकडे गेली, तर तिथे चक्क एक छोटी Bookcase ठेवून तो कोपरा बंद केलेला. आणि आत छोटी गादी, एक छोटी खुर्ची ठेवून एकClassroom Libraryच तयार केलेली! वर्गातलं काम संपलं, की आरामात ह्या कोपयात जाऊन हवं ते पुस्तक काढून वाचायची मुलांना परवानगी होती, ईतकंच नव्हे, तर नोंद करून घरी न्यायची सुद्धा! मुलांना काय, मला सुद्धा हा वर्ग कधी सोडून जाऊच नये असं वाटायला लावणारा...
पण हा वर्ग तयार करण्यात शालेय संस्थापकांचा फारसा सहभाग नसतो। प्रत्येक शिक्षकाला वर्गातली पुस्तकं आणि TV, computer ह्या मोठ्या गोष्टी सोडल्या तर फारसं काही शाळेकडून मिळत नसतं. अनेक वर्ष थोडंथोडं जमवून, जुनी पुस्तकं विकत घेऊन, काही स्वत:च्या घरून आणून शिक्षक आपला संसार मांडतात. मुळात भारतात एकच वर्ग, आणि वेगवेगळे शिक्षक तिथे येऊन शिकवणार, ह्या उलट इथे प्रत्येक शिक्षकाला स्वत:चा वर्ग मिळतो, आणि मुलं त्यांच्या वय/ कुवत/ आवडीनुसार ते ते कोर्सेस घेणार आणि त्या त्या वर्गात जाणार. एकूण "कॉलेज" सारखी ही व्यवस्था असते. म्हणजे एखाद्या मुलाला गणित आवडत असेल, आणि त्यात गती असेल, तर तो ७वीत असूनही ८वीचं गणित घेऊ शकेल, तसंच जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश ह्यापैकी कुठलीही भाषा निवडू शकतो. त्या विषयांचे एकूण "credits” गोळा केले, की त्याला शाळेतून "graduation” मिळणार. शालांत परिक्षांचा प्रकार प्रत्येक राज्यानुसार वेगळा असला, तरी आजकाल "HSPA” ही परिक्षा पास होणं graduation साठी लागू लागलं आहे.
तर अशा ह्या वर्गात मी साधारण सकाळी ७.३० ला पोचलेले- आणि आता घंटा होऊन सामुदायिक प्रार्थना/ प्रतिज्ञा असलं काहीतरी म्हणायला कुठल्या ठिकाणी जायचं असा विचार मी करत बसले, तेवढ्यात रंगीबेरंगी फुलांचे ताटवे तशी मुलं वर्गात घोळक्या घोळक्याने शिरू लागली. गणवेष नसल्यामुळे काहीही घालायचं स्वातंत्र्य तर मुलांना असतंच. शिक्षिका आधीच तिथे होती, त्यामुळे ऊठून शिस्तित "Good morning ma'm” म्हणायचा प्रश्नच नव्हता... आणि एकदम आवाज कुठून आला कोण जाणे (Central Announcement system) म्हणून दचकून बघितलं तर सगळी मुलं ऊठून उभी राहिलेली. वर्गातल्या अमेरिकेच्या झेंड्याकडे तोंड करून, डावा हात छातीवर ठेवून एकदम "I pledge allegiance to the flag of the United States, and to the republic, for which it stands. One nation, under God, with liberty and justice for all.” असं म्हणून पटापट बसली सुद्धा! झाली प्रतिज्ञा. माझ्या मनात मात्र सारखी घोळत राहिलेली वाक्य:
“भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत। माझ्या देशावर माझे प्रेम आहे...” किंवा इंग्रजी माध्यमातून शिकलेली "India is my country, all Indians are my brothers and sisters...” प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर छापलेली. इथे तर काय, पाठ्यपुस्तकच नाही! हा दुसरा धक्का. प्रत्येक राज्याच्या नियमानुसार फक्त "ध्येय" किंवा objectives त्या त्या वर्गासाठी ठरवून दिलेली. ती गाठायला तुम्ही शेक्सपियर वापरा, किंवा सलमान रशदी- ते त्या शिक्षिकेने ठरवायचं!
आणि हे individualization, customization फक्त राज्यांपुरतंच मर्यादित नव्हे, तर प्रत्येक गावाच्या प्रत्येक शाळेला करता येण्यासारखं आहे. म्हणजे असं, की टिळकनगरची शाळा ही फक्त टिळकनगर रहिवाशांच्या करभारातून, टिळकनगरच्या मुलांसाठी चालवली जाते. त्यामुळे त्या अभ्यासक्रमात शंकरनगरच्या रहिवाशांनी ढवळाढवळ करायचं कारणच काय? तसंच, शाळा चालवतांना त्यात Federal Money किंवा सरकारी मदतही जवळजवळ नाहीच्याच बरोबर मिळते...त्यामुळे शिक्षणविषयक धोरणंही गावादरगणिक बदलत जातात. आणि आमच्या न्यू जर्सीत गाव केवढं- तर खरंच दर ५ मैलावर बदलणारं. आता त्यात गोची अशी, की समजा New Brunswick ही गरिबांची वस्ती, आणि South Brunswick ही उच्च मध्यमवर्गीयांची, तर त्यांच्या शाळांतही त्यांच्या सांपत्तिक स्थितीचं प्रतिबिंब पडणार. श्रीमंतांच्या शाळेत कंप्युटर-लॅब, जिमनेशियम, लायब्ररीचा थाट, तर गरिबांच्या शाळेत साधे फळे आणि खडू व्यतिरिक्त काहीच नाही. आणि तरीही, ह्या सर्व "public schools” च म्हणायच्या बरं का... सरकारी शाळा. खाजगी शाळा मी पाहिली नाहिये, पण कल्पना आली साधारण, की अमेरिकेच्या ह्या भांडवलशाहीत पैसा आणि सत्ता टिकवण्याचा सोपा मार्ग- Let the rich get richer and the poor, poorer....असो, पण भांडवलशाहीची दोन रूपं जशी सगळ्या क्षेत्रात दिसतात, तशी शिक्षणक्षेत्रातही...
सकाळ च्या पैलतीर वर प्रकाशित।
प्राजक्ता Madam,
ReplyDeleteलेख फ़ारच छान आहे. शिक्षक म्हणून अभिमानाने शिकवीणारी माणसे फ़ार कमी भेटतात, भारतात तर पोटार्थींचे प्रमाण फार वाढू लागले आहे. पण अजून आदर्श गुरु मंडळी पण भरपूर आहे.
टिळक नगर आणि शंकर नगरचा उल्लेख वाचल्यावर नक्की नागपूरहून गेला असाल, असे वाटते. माझेही मन एकदम तीस वर्षे पाठी गेले, आणि LIT मधील विद्यार्थी जिवन झरकन समोर आले.
मानव आणि प्राणि मात्रातील एक प्रमुख फरक म्हणजे अनुभव संकलन आणि हस्तांतरण! We say it as a knowledge! एका पीढीतून दुस-या पीढीकडे हा वारसा अधिक प्रगल्भतेने जाताना दिसतो. शिक्षक आणि पालक जेव्हा म्हणतात, हल्लीची मुलं बाई फारच स्मार्ट! त्यावेळी आपण जे पुस्तका्तही शिकलो नाही ते आजची मुले अनुभवताना दिसत आहेत, त्याचाच हा परिणाम! त्यामुळेच शिक्षकांना आता फारच Update रहावे लागत आहे.
मी माझा नोकरी व्यवसाय संभाळून दोन शाळांशीही थोडा संबंध आहे, पण तुमच्या इतकी शोधक नजर मला परिसरातील एकाही शिक्षकाची वाटली नाही.हुषार मुलांनी व्यावसायिक शिक्षणाकडे जायचं, त्याचाही परिणाम आहे तो! प्रत्येक अनुभव हा आपण विद्यार्थी बनून शिकायचा आहे. चांगली आणि वाईट प्रत्येक गोष्ट निश्चित काहीतरी शिकवून जाते, हीच शिकवण शिक्षकाला महान बनवत असते.तुमच्या अनुभवांबद्दल भरपूर लिहित रहा, ह्याच शुभेच्छांसह!!!!!!
मोहन,
ReplyDeleteधन्यवाद! तुमची इतकी सविस्तर प्रतिक्रीया बघून मला माझं नागपूरी अघळपघळ वर्णन अगदीच काही वाया गेलं नाही, असं वाटतं...
शाळेशी तुमचा संपर्क असतो असं म्हणालात म्हणून, मी सध्या एक पुस्तक वाचते आहे- “The Teaching Gap” त्यात जपान, जर्मनी आणि अमेरिकेतल्या शाळांमधे गणित कसं शिकवलं जातं त्याची चर्चा आहे- खरोखरी संस्कृती ही शिक्षणाचा पाया असते, हे त्यातून स्पष्ट होतं. आपल्या देशात दुर्दैवाने "ज्ञान" ब्राह्मण जातीने कडीकुलपात बंद करून ठेवलं, असा एकच पैलू प्रकर्षाने मांडला जातो. पण आपल्या संस्कृतीत ज्ञान हे "पवित्र" मानलं गेलं आहे, वंद्य मानलं गेलं आहे, हा त्याचा दुसरा पैलू लोक विसरतात. भारतीय संस्कृतीत शिक्षक/ गुरूला परमपूज्य स्थान देतात, त्यातून आपल्या सगळ्या शिक्षणसंस्थेचा पाया तयार झाला आहे, त्याच्या चांगल्या-वाईट परिणामांसकट. ह्याउलट अमेरिकेत, शिक्षक हा ज्ञानाचा उगम नाही, ही कल्पना रूढ आहे. वर्गातील चर्चांमधून ज्ञान निर्माण होतं, आणि त्यात विद्यार्थ्यांचा समसमान सहभाग असतो, हे मूलतत्त्व इथे अलिकडे सर्वमान्य झालंय.
त्या दृष्टीने विचार करता माझं शाळेचं वर्णन कधीच संपणार नाही, कारण शाळेतून खरं तर अमेरिकन संस्कृतीच दिसते आहे. मात्र तुमच्या प्रतिक्रीयेमुळे पुन्हा पुढचा भाग लिहायला हुरूप आला :)