PR-वास........

7/21/08

सिंक फॅमिली

आधी घर, किंवा आधी करीयर, असे दोन फाटे बायकांच्या आयुष्यात लग्नानंतर अपरिहार्यपणे फुटतच जातात. आधी हे, मग ते, अशी सरळसरळ क्रमवारी लावणं बहुतेकांना जमत नाहीच. आणि त्यातलीच मी एक, म्हणून मला, “थोडं घर,” मग, “थोडं करीयर,” मग पुन्हा, “थोडं घर.” अशी बिकट आणि तुटक वाट चालावी लागणार हे आता स्पष्ट दिसायला लागलंय. अमेरिकेत नोकरीसाठी इथली डिग्री बरी, अशा स्पष्टीकरणाने दोन वर्ष गप्प बसवलेल्या घरच्यांना आता तोंडं फुटलीयेत, आणि दुसरीकडे, डिग्रीसाठी भांडवल म्हणून खर्च केलेल्या पैशाचे, “पांग,” फेडण्याचीही वेळ हीच आहे, आणि त्याहून अधिक- आत्ता जर लगेच नोकरीला लागले नाही, तर आयुष्यभर घरीच बसावं लागेल की काय, अशी भीती.

पण त्यातूनही एक पॉझिटिव विचार तगून राहिलाय, तो म्हणजे, “इथे जे ज्ञान मिळवलंय, त्याचा उपयोग करायची सुरसुरी- घराबाहेर स्वत:च एक विश्व निर्माण करण्याची आस, अमेरिकन शिक्षण घेतांना मिळालेल्या इथल्या मित्र-मैत्रिणींशी चालू झालेला संवाद टिकवण्याची धडपड, आणि त्यातच आपल्याही संस्कृतीशी प्रामाणिक राहून एका नवीन क्षेत्रावर आपल्या वेगळ्या विचारपद्धतीचा प्रकाश टाकून एक productive member of the society बनण्याचा प्रयत्न...
हे येवढे सगळे विचार घरी फोन करतांना ना आईला सांगता येताहेत, ना सासूबाईंना...त्या पिढीतले choices किती सोपे होते, असं मला वाटतं, तरीही मला घरी ठेवून जातांना आईची कुतरओढ झाली, ते तिच्याकडून ऐकलेल्या, “तुम्ही लहान होतात तेव्हा.....” टाईप गोष्टींमधून अनुभवलेली.

आणि त्यातच एक नवीन तिढा: माझा नवरा माझ्यापेक्षा ५ वर्षांनी मोठाय. म्हणजे त्याचे बरेचसे मित्र, ज्यांची लग्न आमच्या २-३ वर्ष आधी झाली, ते आता छान- घर,नोकरी,संसार,मुलं अशा चौकटीत फिट्ट बसलेले आहेत :) त्याउलट, माझ्या समवयस्क मैत्रिणींचे नवरे माझ्या, “गोट्या,” पेक्षा ३ वर्षांनी लहान, आणि अजूनही life is an experiment म्हणून जगण्याच्या मूडमधे. मी माझ्या नवऱ्याच्या प्रेमात पडले, तेच त्याची मॅचुरिटी बघून, त्यामुळे सहसा मी संसारात, आमच्या interpersonal communication वर भारी खूष असते. पण गोची अशी, की आम्ही ना माझ्या ग्रूपमधे बसतोय, ना त्याच्या...... Baby'sRUs, डायपर बॅग, फॉर्म्युला फूड ह्या शब्दांभोवती होणाऱ्या चर्चांचा पटकन वीट येतो, आणि तरीही, “लिव्ह इन द मोमेंट,” म्हणून टाईमपास करणाऱ्या, “तरूणाईचा.”

तर अशा प्रकारे, आम्ही आत्ता, “सिंक फॅमिली,” झालोय. DINK: Double income no kids. आणि त्याउलट SINK: Single income no kids.....
आत्ताच एक इंटरव्ह्यू देऊन आले, आणि आल्याआल्या नवऱ्याला म्हटलं, “ आता ही नोकरी मिळाली, किंवा नाही मिळाली, तरी lose-lose situationच होणारे. म्हणजे नोकरी मिळाली, तर मुलाचा विचार पुन्हा लांबणीवर टाकावा लागणार, आणि नाही मिळाली, तर येवढ्या ताज्याताज्या डिग्रीला शिळं करत घरी बसून चूल-मूल करावं लागणार. आता काही लोकांना, हीच परिस्थिती, win-win situation वाटू शकते. The road not taken.....makes all the difference......म्हणून.

पण कुठला रस्ता घ्यायचा, हा निर्णय घ्यायचं स्वातंत्र्यच सध्या माझ्याकडे नाहीये..... काय मज्जा आहे- आपण ठरवाठरवी करून आयुष्याला वळण वगैरे लावायचा प्रयत्न करतो, आणि ते मात्र उनाड मुलासारखं सैरावैरा पळत सुटतं असं, की कधी घरी येईल, कोणास ठाऊक?

2 comments:

  1. लवकरच तुम्हाला जॉब मिळावा ही सदिच्छा! जॉब मिळाल्यावर लिहायचे सोडू नका.

    ReplyDelete
  2. Kharach problem zalay pan Aaplyala nemak kay haway ha prashn vichar ? je uttar pahilynda yeeel jar tar na karata te karoon tak. lihites chan nokri mile paryanttan milali ki tithlya free time madhe lihi nakki sodu nakos.

    ReplyDelete