PR-वास........

1/28/09

ऋतूंचं कौतुक

भर थंडीत शून्याखाली तापमान गेलं, की सकाळी उठणे म्हणजे शिक्षा. त्यानंतर तयार होऊन, मोजे घातलेल्या हाताने खिशातून गाडीची किल्ली काढणे. कॉफीचा कप आधी गाडीच्या टपावर ठेवून मग दार उघडणे. फावड्याने गाडीच्या निदान पुढच्या आणि मागच्या काचेवरून बर्फ काढणे. तोवर मोजे ओलो होऊन बोटं निळी पडल्याचं चित्र डोळ्यासमोर दिसायला लागतं.
मग मागच्या दारातून बॅग आणि पुढच्या दारातून कॉफीसकट आपण आत शिरलो, की हुश्श्श्श्श्श्श करतांना तोंडातून वाफच निघते, आणि साध्या साध्या क्रिया करायला आपल्याला दुप्पट वेळ लागलाय, ह्या जाणीवेने म्हातारी कशीबशी निघाली कामाला- असं मनातल्या मनात मी स्वत:ला टोमणा मारून घेते.

पण आज बर्फामुळे शाळेला सुट्टी मिळाली. काय मज्जाय! भारतात खूप पाऊस झाला की, किंवा कधी जातीय दंगे असोत की बॉम्बस्फोट- शाळेला सुट्टी मिळाल्याचा आनंदच मुलांना जास्त. तशीच इथे कालपासूनच बर्फाची चर्चा सुरु झाली:
"मिस डी, तुम्हाला म्हायतीये का? बर्फ कधी होणारे?"
"आता मी काय Weatherman लागून गेलेय की मला माहिती असणारे?"
"पण लंचरूम मधे लोक म्हणत होते."
"अरे पण रात्री बर्फ पडून गेला तरी उपयोग नाही. कारण बर्फाच्या गाड्या येऊन सकाळपर्यंत तो स्वच्छ करून ठेवणार, की मग शाळेच्या बस ला काही प्रॉब्लेम नको."
"पण मग सकाळीच बर्फ पडू देत, म्हणजे सुट्टी मिळेल."
" हो हो- मागच्या आठवड्यात भल्या पहाटे ५ ला बर्फ सुरू झालं होतं. पण बर्फाचा खरा धोका तो पडतांना फारसा नसतो. बर्फानंतर मात्र रस्ते घसरडे होतात- आणि चिखल- म्हणून गाडी चालवणं कठीण असतं."

" अरे, मी ऐकलंय की उलटा पायजामा घातला की बर्फ पडतं."
" माझी आई म्हणे उशीखाली काटा-चमचा ठेवून झोपायचं."
" मागच्या वर्षी त्यांनी सुट्टी... ... ...."

ह्या बडबडीने वैतागून मी शेवटी ओरडले- की आता पुरे तुमचं बर्फ पुराण. पण मनातुन मी ही अक्षरश: प्रार्थनाच करत होते, की नेमका मध्यरात्री नंतर बर्फ पडू देत. सुट्टीचा एक दिवस मला पेपर तपासायला लागणारच होता. सकाळी ५ ला उठून मग आशाळभूतपणे आधी शाळेची वेबसाईट वाचली. शिवाय तेवढ्यात एका सहकाऱ्याचा snow-chain चा फोन आलाच. HOD ने २ लोकांना फोन आधी केला, की ती २ लोकं ठरवून दिलेल्या अजून ४ लोकांना फोन करणार- असं करत करत व्यवस्थीत सगळ्यांना शाळा बंदची बातमी कळते.

मात्र एकूणच ह्या गार प्रदेशांमधे हवामानाची चर्चा रोजच होत असते. ब्रिटीश लोक म्हणे रोजच दिवसाची सुरुवात "आज काय हवा पडलीये!" ह्या वाक्याने करतात :) इथे रूळल्यावर "उद्याचं तापमान बघून घालायचे कपडे इस्त्री करायची" सवय लागते. त्याला कारणीभूत इथले अतिशय अचूक weather forecasts म्हणावे, की लोकांना बोलायचे विषय लागतात ते- काही ही असो. पण ऋतूंचं कौतुक असतंच फार.

त्यातल्या त्यात स्प्रिंग (वसंत) आणि ऑटम (शरद) म्हणजे नाना रंगांचे ऋतू. बर्फ रोजचंच झाल्यावर पांढऱ्या काळ्याची वर्णनं तरी किती करणार? पण माझ्या Creative Writing वर्गासाठी मी ऑटमसाठी खास कविता लिहून घेतली.
त्यासाठी आधी अंगणातून पानगळीच्या कचऱ्यातून २०-२५ छान छान पानं गोळा करून आणली. आणि वर्गात जाऊन प्रत्येकाला एक एक पान दिलं. "आज आपण ह्या पानाचं अगदी सूक्ष्म निरीक्षण करून त्यावर कविता लिहणार आहोत. २ मिनिटं सगळ्यांनी नीट आपापली पानं बघून घ्या!"

आणि मग मधेच हल्ला करायचा-
"अरेरे! चुकलंच बरं का. इकडे द्या ती पानं. ती आत्ता द्यायचीच नव्हती मुळी तुम्हाला."
मग सगळी पानं गोळा करून पुन्हा हल्ला,
"ह्म्म- खरं म्हणजे, नाहीतरी तुम्ही आपापलं पान बघितलंच होतं. तर मग आता उगीच उलट्या दिशेने लेसन करण्यात काही अर्थ नाही. जरा इथे येऊन प्रत्येकाने आपापलं पान ह्या पिशवीतून परत घ्या."
मग मुलांमधे जोरात चर्चा- मोठ्ठा गोंधळ.
"ए नाही- हे पान माझं नाहिये- माझ्या पानावर पिवळे बुट्टे होते."
"माझ्या पानाचे काटेरी कोन होते."
"माझ्या पानाला लालसर छटा होती."
" अरे ते माझं पान आहे वाटतं- कारण त्याचा कोपरा दुमडलेला होता."

असं करून बहुतेक मुलांना आपापली पानं बरोब्बर लक्षात असतात. मग मुलांना विचारायचं, की तुमची पानं तुम्हाला लक्षात का राहिली? कारण तुम्ही त्यांचं सूक्ष्म निरीक्षण केलं होतंत. लेखक सुद्धा निरीक्षणातूनच कलाकृती निर्माण करतात, आणि त्यातल्या वर्णनामुळेच ती तुम्हाला आवडते, कळते, आणि लक्षात राहते.

ऑटमच्या पानांनी मी हा लेसन शिकवला खरा- पण बर्फाचं वर्णन- आधी मलाच करून बघायचं आहे...

2 comments: