PR-वास........

10/27/10

ओळख


एकदा ना, एक साधूबाबा होते. ते रोज सकाळी गावातल्या रस्त्यावरून नदीकडे स्नानाला जायचे. आणि रोज एक दुष्ट माणूस आपल्या घराच्या गच्चीवरून त्यांच्यावर कचरा फेकायचा, त्यांना शिव्यांची लाखोली वहायचा. एक दिवस तरी हे साधूबाबा चिडतील, वैतागतील, आणि मग आपण त्यांची मजा पाहू अशी लालसा त्याच्या मनात होती. पण साधूबाबांची मन:शांती एकदाही ढळली नाही. ह्याने कचरा फेकला, की ते शांतपणे जाऊन पुन्हा स्नान करून येत. ह्याने शिव्याशाप दिले, तरी त्याच्याकडे बघून सदैव स्मित करीत.
आपण काहीही केले, तरी साधूबाबांवर परिणाम होत नाही, असे बघून मग एक दिवस ह्याला उपरती झाली. त्यांच्या पायावर लोळण घेऊन ह्याने विचारले- "बाबा, मी तुम्हाला एवढा त्रास दिला, तरी तुम्ही कधीही माझ्यावर संतापला नाहीत. हे एवढं चांगलं वागणं तुम्हाला कसं जमतं?" तर बाबा म्हणाले, "अरे सोप्पंय ते. तू मला शिव्या दिल्यास, त्रास दिलास, पण तो मी घेतला कुठे! त्यामुळे तो मला झालाच नाही."

ही गोष्ट मला परवा आठवली, आणि आरशात स्वत:चाच चेहरा बघून दचकायला झालं. लहानपणचा निरागस चांगुलपणा, परीकथांवर विश्वास, मनाचे श्लोक पाठ करणेच नव्हे, तर त्यातले "संस्कार" मनापासून पाळणारं ते माझं भारतीयत्व होतं, की फक्त कोवळं वय? बालपणातला तो देवत्त्वाचा अंश होता, की एका सुरक्षित, स्वप्नाळू बालपणाची झापडं?

आता संसारात, सासूरवासात ऐकून घ्यायला लागणारे निरर्थक टोमणे, न पटणाऱ्या अपेक्षा, रोजचे अनाहूत सल्ले ह्यांना तोंड देतांना का आठवत नव्हती मला त्या साधूबाबाची गोष्ट?
"तुम्हा आजकालच्या मुलींना संसाराची आवडच नाही!"
" नवऱ्याला अरेतुरे करता, तिथेच सगळं बिघडतं"
" सकाळी लवकर उठून कशी झटझट कामं झाली पाहिजेत."
" हे झिपरे केस, डोक्याला ना टिकली, ना गळ्यात मंगळसूत्र! ह्या आमच्या मुली-सुना म्हणायची लाज वाटते."
" देवाजवळ रोज दिवा तरी लावत जा- बाकी काही नसेल."
" एवढ्या सुखात रहाता, तरी तुम्हाला काय प्रॉब्लेम असतात? ३-४ च महिन्यांसाठी काय तो सासुरवास. अमेरिकन सून ही चालली असती की मग आम्हाला."
" दोघांपैकी एकाने (म्हणजे बायकोने) ऐकून घ्यायलाच पाहिजे. नाहीतर तुम्ही रात्र अशीच भांडणात घालवणार!"

मी साधूबाबा असते तर माझ्याही अंगावरून ओघळून गेल्या असत्या ह्या गोष्टी. पण मग मीच एक का म्हणून भगवे घालून चांगुलपणाच्या वाटेवर कुचुकुचु काटे टोचून घेत चालायचं?" रांगोळ्या घालण्यापासून पुरणपोळी असो, की स्तोत्र असोत, सगळ्या सो कॉल्ड संस्कारांचं बाळकडू माझ्या सुदैवाने मला मिळालं, आणि ते मनापासून आवडत ही होतं.
फरक फक्त येवढा, की माझ्या संस्कारांचा उगम शिक्षणात होता, विश्वासात आणि समर्पणात नव्हे. मोठ्यांनी "हे कर" सांगितलं, की ते करायचं, इतक्या सरधोपट आणि विचारहीन पद्धतीने मी ह्या गोष्टी आत्मसात केल्या नव्हत्या.

चांगलं वागणं नेहमीच जास्त कठीण असतं. लहानपणी तसेही फारसे कलह आपल्या आयुष्यात नसतात, म्हणून ते सोप्पं वाटत असतं. पण आता तेच सालस विचारही "कर्तव्याचा" काटेरी मुकुट घालून पुढे येतात, तेव्हा मनावर ओरखडे उठणारच!

पण मग भारतीयत्त्व, साधूबाबा, चांगुलपणा, हे सगळे आदर्शवाद मी गुंडाळून माळ्यावर टाकले, आणि आधुनिकतेच्या धर्मातला पहिला धडा उघडला- प्रॅक्टिकली विचार करायला लागले. पण खरं म्हणजे आपण साधूबाबांसारखं व्हायचं, ते आपल्या मन:शांती साठी, हे सोप्पं लॉजिक लावलं, आणि प्रश्न सुटला. बोलणं सोप्पंय, वागणं अवघड, पण आता ते तसं का वागायचं, हे तरी कळलंय. आरशातल्या चेहऱ्याची, त्यातल्या बदलांसकट ओळख पटलीये.




2 comments:

  1. खूप खूप आवडली तुमची ही पोस्ट!
    अगदी माझ्याच मनातलं तुम्ही बोलताय असं वाटलं. :)

    शेवटचं "बोलणं सोप्पंय, वागणं अवघड" जेव्हा जमेल तेव्हा मी अगदी "हत्तीवरून साखर वाटणार आहे." :D

    ReplyDelete
  2. धन्यवाद श्रद्धा! अगदी खरंय तुझं म्हणणं. कळतं पण वळत नाही, म्हणून तर मनस्ताप होतो.

    ReplyDelete