PR-वास........

3/31/13

गाणाऱ्या कविता

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, ह्या झोपडीत माझ्या॥
भूमीवरी निजावे, तारयांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे ह्या झोपडीत माझ्या॥

ही संत तुकडोजी महाराजांची ओवी. ओवी म्हणावी की कविता? पण आमच्या शाळेच्या पाठ्यपुस्तकात होती, म्हणून कविता म्हणते. त्याच वर्षीच्या हिंदीच्या पुस्तकात हे-

हर ग्राम हर नगर के हर राह हर डगर पर
कूचे गली मुहल्ले, बाजार हाट घर घर
हर ओर ही हजारों दीपक जले हुए हैं
जैसे कि रौशनी के अनगिन सुमन खिले हैं
जैसे कि हस उठी है, तारों की आज रानी
या चांद ने हजारों बनने की आज ठानी!

आज इतक्या वर्षांनतरही मला ह्या कविता आठवतायत, त्या खरं म्हणजे ह्या गाण्यामुळे, "ऐ दिल मुझे बता दे, तू किसपे आ गया है? वो कौन है जो आकर ख्वाबों पे छा गया है!"
परवा फिरायला जातांना सहज मी गुणगुणायला लागले, तर गाणं मला आठवेच ना. आठवली ती कविता! मौखिक ग्रंथपरंपरा आणि पाठांतरातला दुवा तेव्हा जाणवला. पाठांतर करायला आवडायचं, आणि त्यातून कविता व्हायच्या ही पटापट पाठ, म्हणून मजा यायची. कवितांना चाली लावून त्या वर्गात म्हणून दाखवायची हौसही खूप :) आता ऐ दिल मुझे बता दे वर सगळ्याच कविता कशा बसायच्या? मग दुसरं गाणं-

आओ बच्चो तुम्हे दिखाऍं झांकी हिन्दुस्तान की
इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की॥

थोडं ठाकून ठोकून त्यावर कुसुमाग्रजांना बसवलं की झालं-

आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे
फेसफुलांचे सफेत शिंपित वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती गात किनाऱ्याकडे.
मऊमऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणा़ऱ्या वाऱ्याच्या संगती
उंच पांढरी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते...

आणि हिन्दीत तर त्या चालीवर वाट्टेल ते म्हणता येऊ शकतं असा भाबडा विश्वासच बसला होता-

लहरोंसे डरकर नौका पार नही होती
कोशिश करने वालोंकी हार नही होती
नन्ही चिंटी जब दाना लेकर चलती है
चढती दिवारोंपर सौ बार फिसलती है
मनका विश्वास रगों में साहस भरता है
गिरकर चढना चढकर गिरना न अखरता है
मेहनत उसकी खाली हर बार नही होती
कोशिश करने वालों की हार नही होती!

परवा फिरायला जातांना सतरा काळज्या आणि पंधरा गोष्टी डोक्यात भुंगा घालत होत्या, तेव्हा ह्या कविता मला वाचवायला आल्या!

आजीने सकाळी पूजा करतांना म्हटलेलं अथर्वशीर्ष असावं तशा ह्या कविता आहेत.
शेजारी भजन-टाळ-गजराचा नाद खोल अंतर्मनात साठवलेला असावा, तशा ह्या कविता आहेत.
रोज दुपारी चणेफुटाणेवाला आपले खास हेल काढून आरोळी ठोकत यायचा, तशा ह्या कविता आहेत.

त्या गुणगुणतांना मला पुन्हा माझ्या स्वत्त्वाची ओळख पटलीशी वाटली. त्यांचा नाद आश्वासक वाटला. गोळाबेरीज करून शेवटी माझ्या वाट्याला फक्त हे शब्द उरले, तरी ते मला खूप पुरतील, ह्याची साक्ष म्हणून त्या कविता.






3/22/13

काही साक्षात्कार

Epiphany!
कधीच्या काळी मी इंग्रजी साहित्य शिकत होते तेंव्हा James Joyce च्या पुस्तकातून परिचयाचा झालेला एक शब्द: epiphany म्हणजे साक्षात्कार. 
खरं म्हणजे रोजच आपल्या आयुष्यातल्या अनेक घटना आपण बघतो, नि सोडून देतो. पण त्यात कितीक साक्षात्काराचे क्षण दडलेले असतात. 
खूप महिन्यात काही लिहिलेले नाही- हाही एक साक्षात्कारच होता, म्हणून तिथूनच सुरूवात करावी म्हटले. 

१. सिग्नलवर थांबलेल्या गाड्यांमधली माणसे बघायला मला फार आवडतं. प्रत्येकजण किती विवंचनेत असल्यासारखा आठ्या घाल-घालून सिग्नल बदलायची वाट बघत असतो! कधी एकाचाही चेहरा प्रसन्न, काळजीमुक्त दिसत नाही. Live in the present असं सारखं म्हणायचं फक्त, पण आपणही हिरव्या दिव्याची वाट बघता बघता दोन क्षण थांबण्यातली मजा अनुभवायला विसरूनच जातो...

२. कधीकधी आपल्याला तारूण्यात ज्या व्यक्तींबद्द्ल चीड येत असते, जसंजसं वय वाढतं तसतसे आपण त्याच व्यक्तींसारखे होत जातो. हे लोक किती त्याच त्या विषयांचं दळण दळतात! एकदा बोलत सुटले, की सुटतातच. आपल्या आठवणी, त्या कितीही emotionally loaded असतील, पण आपल्यासाठी. पुढच्याला त्या ऐकायला लावून बोअर का करतात? आणि मुख्य म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्द्ल एवढे emotionally कसे react करतात!
ही सगळी वाक्य आता आपल्यालाही लागू होतात, असा भास झाला, की भीती वाटते. 

३. "नुकत्या निवड झालेल्या पोपचा जेसुईट (jesuit) इतिहास" किंवा तत्सम "आपले ज्ञान अद्द्यावत आहे" हे दाखवण्याच्या अट्टहासाच्या चर्चेपेक्षा मला "ओव्हनमधे ठेवलेले नान जळायला नकोत." "पोराने आज काय खाल्ले, व आता त्याची भुकेची वेळ टळून जायच्या आत त्याला भरवले पाहिजे"  - असल्या विषयात जास्त डोके चालू लागते, आणि ते करता करता, कधीकाळी, मी फक्त चूलमूल करणार नाही, ही स्वत:चीच प्रतिज्ञा विसरायला होते, आणि मग घरी आलेले पाहुणे म्हणतात, "हे काय, तू सारखी स्वयंपाकघरात नको गं अडकू आमच्यासाठी", तेव्हा भान येतं. आणि भान आलं की हताश न होता, शिवाय वर, "येवढं काय त्यात!" असं आपणच आपसूक म्हणून जातो, तेव्हा, भीती वाटते. 

४. भारतात न वापरली जाणारी, आणि इथल्या जगाची तिथे आठवलेली एकमेव वस्तू: किचन टॉवेल. फराफरा ओढा, नि पुसा. शी, शू, दूध, ओटा, भांडी, गळणारे पाणी अथवा नाक! ओला करून शिळ्या पोळ्यांवर घाला, किंवा कोरडाच ताज्या पोळयांच्या खाली घाला. 
इथल्या जीवनातल्या केवळ ह्या एकाच गोष्टीत जीव अडकला आपला? असा साक्षात्कार झाला की पुन्हा भीती वाटते. 

५. "वो खार खार है, शाखे गुलाब की मानिंद,
मै जख्म जख्म हूँ, फिरभी गले लगाऊँ उसे। "             किंवा

"दयार-ऐ-दिल की रात मे चरागसा जला गया
मिला नही तो क्या हुआ ? वो शक्ल तो दिखा गया!"  असले शेर लागू पडणारी  आपला " muse-एश्वर" कोण असावा? हे लक्षात आलं, की प्रचंड epiphany होते!

६. जगात "काय म्हटलं" त्यापेक्षा, "कोणी म्हटलं" ह्याला फार महत्व असतं! आज तुझे दिवस चांगले आहेत, त्यामुळे तू माज करून घे. मला पण माहितीये तशा निर्भेळ यशाची चव. तेव्हा कितीही विनम्रतेचा आव आणला, तरी माझ्या यशामागे माझ्यातलेच काही दुर्मिळ सद्गुण आहेत, ह्यावर आपला विश्वास असतो. माझ्यासारखा जीवनविषयक दृष्टीकोन ठेवला, तर सगळेच यशस्वी होऊ शकतील, असंही वाटत असतं. तो फक्त "यशाचा सोनेरी चष्मा" होता, हे तुला कळायची वेळ कधीच येऊ नये, अशी ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना. 
आणि यश आणि अपयशातला नेमका फरक कळल्याचा क्षण: साक्षात्काराचा! 

७. एकाच छपराखाली राहणाऱ्या दोन-किंवा तीन, किंवा त्याहूनही अधिक व्यक्तींचं अनुभवविश्व एकमेकांपासून किती निरनिराळं असतं! शेवटी "मी माझा" नि "तू तुझी". मग "सोबती" चा अर्थ काय असतो?