कधीच्या काळी मी इंग्रजी साहित्य शिकत होते तेंव्हा James Joyce च्या पुस्तकातून परिचयाचा झालेला एक शब्द: epiphany म्हणजे साक्षात्कार.
खरं म्हणजे रोजच आपल्या आयुष्यातल्या अनेक घटना आपण बघतो, नि सोडून देतो. पण त्यात कितीक साक्षात्काराचे क्षण दडलेले असतात.
खूप महिन्यात काही लिहिलेले नाही- हाही एक साक्षात्कारच होता, म्हणून तिथूनच सुरूवात करावी म्हटले.
१. सिग्नलवर थांबलेल्या गाड्यांमधली माणसे बघायला मला फार आवडतं. प्रत्येकजण किती विवंचनेत असल्यासारखा आठ्या घाल-घालून सिग्नल बदलायची वाट बघत असतो! कधी एकाचाही चेहरा प्रसन्न, काळजीमुक्त दिसत नाही. Live in the present असं सारखं म्हणायचं फक्त, पण आपणही हिरव्या दिव्याची वाट बघता बघता दोन क्षण थांबण्यातली मजा अनुभवायला विसरूनच जातो...
२. कधीकधी आपल्याला तारूण्यात ज्या व्यक्तींबद्द्ल चीड येत असते, जसंजसं वय वाढतं तसतसे आपण त्याच व्यक्तींसारखे होत जातो. हे लोक किती त्याच त्या विषयांचं दळण दळतात! एकदा बोलत सुटले, की सुटतातच. आपल्या आठवणी, त्या कितीही emotionally loaded असतील, पण आपल्यासाठी. पुढच्याला त्या ऐकायला लावून बोअर का करतात? आणि मुख्य म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्द्ल एवढे emotionally कसे react करतात!
ही सगळी वाक्य आता आपल्यालाही लागू होतात, असा भास झाला, की भीती वाटते.
३. "नुकत्या निवड झालेल्या पोपचा जेसुईट (jesuit) इतिहास" किंवा तत्सम "आपले ज्ञान अद्द्यावत आहे" हे दाखवण्याच्या अट्टहासाच्या चर्चेपेक्षा मला "ओव्हनमधे ठेवलेले नान जळायला नकोत." "पोराने आज काय खाल्ले, व आता त्याची भुकेची वेळ टळून जायच्या आत त्याला भरवले पाहिजे" - असल्या विषयात जास्त डोके चालू लागते, आणि ते करता करता, कधीकाळी, मी फक्त चूलमूल करणार नाही, ही स्वत:चीच प्रतिज्ञा विसरायला होते, आणि मग घरी आलेले पाहुणे म्हणतात, "हे काय, तू सारखी स्वयंपाकघरात नको गं अडकू आमच्यासाठी", तेव्हा भान येतं. आणि भान आलं की हताश न होता, शिवाय वर, "येवढं काय त्यात!" असं आपणच आपसूक म्हणून जातो, तेव्हा, भीती वाटते.
४. भारतात न वापरली जाणारी, आणि इथल्या जगाची तिथे आठवलेली एकमेव वस्तू: किचन टॉवेल. फराफरा ओढा, नि पुसा. शी, शू, दूध, ओटा, भांडी, गळणारे पाणी अथवा नाक! ओला करून शिळ्या पोळ्यांवर घाला, किंवा कोरडाच ताज्या पोळयांच्या खाली घाला.
इथल्या जीवनातल्या केवळ ह्या एकाच गोष्टीत जीव अडकला आपला? असा साक्षात्कार झाला की पुन्हा भीती वाटते.
५. "वो खार खार है, शाखे गुलाब की मानिंद,
मै जख्म जख्म हूँ, फिरभी गले लगाऊँ उसे। " किंवा
"दयार-ऐ-दिल की रात मे चरागसा जला गया
मिला नही तो क्या हुआ ? वो शक्ल तो दिखा गया!" असले शेर लागू पडणारी आपला " muse-एश्वर" कोण असावा? हे लक्षात आलं, की प्रचंड epiphany होते!
६. जगात "काय म्हटलं" त्यापेक्षा, "कोणी म्हटलं" ह्याला फार महत्व असतं! आज तुझे दिवस चांगले आहेत, त्यामुळे तू माज करून घे. मला पण माहितीये तशा निर्भेळ यशाची चव. तेव्हा कितीही विनम्रतेचा आव आणला, तरी माझ्या यशामागे माझ्यातलेच काही दुर्मिळ सद्गुण आहेत, ह्यावर आपला विश्वास असतो. माझ्यासारखा जीवनविषयक दृष्टीकोन ठेवला, तर सगळेच यशस्वी होऊ शकतील, असंही वाटत असतं. तो फक्त "यशाचा सोनेरी चष्मा" होता, हे तुला कळायची वेळ कधीच येऊ नये, अशी ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना.
आणि यश आणि अपयशातला नेमका फरक कळल्याचा क्षण: साक्षात्काराचा!
७. एकाच छपराखाली राहणाऱ्या दोन-किंवा तीन, किंवा त्याहूनही अधिक व्यक्तींचं अनुभवविश्व एकमेकांपासून किती निरनिराळं असतं! शेवटी "मी माझा" नि "तू तुझी". मग "सोबती" चा अर्थ काय असतो?
"एकाच छपराखाली राहणाऱ्या दोन-किंवा तीन, किंवा त्याहूनही अधिक व्यक्तींचं अनुभवविश्व एकमेकांपासून किती निरनिराळं असतं! शेवटी "मी माझा" नि "तू तुझी". मग "सोबती" चा अर्थ काय असतो? "
ReplyDeleteशाश्वत सत्य! उत्तम लेख.
माणसं (पुरुष आणि स्त्रिया दोघेही) जितकी शिकतात, आर्थिक दृष्ट्या मोठी होत जातात तितकी ती आपल्याच कौटुंबिक आणि भावनिक गरजांकडे हलक्या नजरेने पाहू लागतात का? की माणूस हा मुळातच एकलकोंडा म्हणून जन्माला आला आणि केवळ जिवंत राहण्याच्या धडपडीपायी त्याने सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदारी स्वीकारली मात्र त्याच त्या मूळ स्वभावात गेल्यावर त्याच्या उत्तमतेला आणि क्रियाशील प्रतिभेला आणखी टोकदार आकार मिळू लागतात? आणि शेवटी माणसाला काळजी कशाची असते? "आपल्या" असणाऱ्या काही गोष्टी, प्रसंग, व्यक्ती त्याला सोडून जातील ह्याची की जे कधीच त्याचं नव्हतं ते कदचित केवळ मृगजळ ठरेल आणि आपण उर फाटेपर्यंत त्यामागे फक्त पळतच राहू ह्याची?
ReplyDeleteहे माझे प्रश्न (साक्षात्कार?) आहेत इथे कुणालाच उपदेशाचे "डोस" देण्याचा अथवा तुमच्या आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न नाही...मात्र मला माणसांना जवळून अनुभवताना पडतात हे प्रश्न....