PR-वास........

3/16/15

झाडं

प्रत्येक झाड वेगळं असलं तरी
प्रत्येक झाड सुंदर असतं
कधी कधी मी विचार करते-
माणसांचं असं का नसतं?

मी कुठेही फ़िरायला गेले तरी आधी मला जाणवतात ती झाडं! माझ्या माहेरी मागच्या दारी असलेलं मोठं लिंबाचं झाड असो, किंवा दारापुढे असलेलं जास्वंद- ह्या माझ्या लहानपणापासूनच्या सोबत्यांनी मला वेगवेगळ्या झाडांकडे बघायला शिकवलं.
आता आठवतंय- आम्ही एका पावसाळ्यात फ़िरायला चिखलदय्राला गेलो होतो. तिथला निवांतपणा, पावसाने तकतकीत झालेली हिरवळ मनाला ताजेपणा देत होती. पण तिथेही माझ्या उत्साही आईला शोधून शोधून काय सापडावं??? कढीलिंबाचं बन!!! रोज रोज स्वयंपाक केला की मनाच्या कप्प्यात कायमच भाजी-पाले दिसायला लागतात हे तेव्हा मला कळलेलं नव्हतं! पण तरीही, त्या कढीलिंबाच्या बनातला वास अजूनही एक प्रकारची झिंग आणतो आहे.

नंतर असंच पुण्यात शिकत असतांना युनिव्हर्सिटीतले ॠतु आठवतात- उन्हाळा आला की बाकी सगळीकडे पानगळ सुरु झाली, तरी आमच्या "शांतीनिकेतन" कॅन्टीनवर छत्रछाया धरणारी अजस्त्र चिंचेची आणि वडाची झाडं मात्र सदाहरित असायची... त्यांच्या पानांमधून शितल होऊन येणारी झुळुक उन्हाच्या, आणि परीक्षेच्याही तापातुन थोडा विसावा द्यायची.

गेले ते दिवस. अंगणातल्या सिताफ़ळाच्या पानांची पत्रावळ करुन बघायचे- उंचावरच्या चिंचा नाहीच मिळाल्या, तर चिंचेच्या पानांतला आंबटपणा चोखुन "कोल्ह्याला चिंच आंबट" म्हणायचे!!!

जर्मनीत माझ्या खोलीच्या खिडकीतून दिसणारे तसे "तरुण" झाड- बाकी अनेक झाडांनी थंडी संपल्यावर पसरलेल्या फ़ांद्यांवरची कोवळी पाने बघूनही, ते वेडे झाड आपल्या कोषातुन बाहेर यायला तयारच नव्हते! मग एकदाची त्याला पालवी फ़ुटली. आणि मग थोड्याच दिवसात त्यावर नाजुक राणी-हलक्या गुलाबी फ़ुलांनी गर्दी केली!!!! मग माझ्या खोलीची खिडकी उघडायची सोय उरली नाही- कारण त्या फ़ुलांकडे येणारे असंख्य भुंगे आणि इतर कीडे बरेचदा वाट चुकुन माझ्या खोलीत शिरु लागले.
हे माझे खास झाड होते- त्या अनोळखी प्रदेशात ते एकच मला ओळखीचे वाटू लागले होते. माझी खोली पहिल्या मजल्यावरची. त्यामुळे त्या झाडाच्या फ़ांद्या सरळ माझ्या नजरेसमोर येत. त्यामुळे कधीकधी खिडकीबाहेरच्या दृश्याकडे पाहता आले नाही, की त्याचा राग येई... पण ६ महिन्यांनी घरी परत जातांना इतर कुठलेच पाश नव्हते तरी त्या झाडाकडे बघून वाईट वाटले होते.

त्यानंतर भारतातल्या जुन्या झाडांची नव्याने ओळख करून घेतांना एक दोन पावसाळे कसे गेले कळलंच नाही. लग्नाच्या आधी आम्ही काही झांडांभोवती गाणी म्हटली नाहीत- पण मला आवडलं असतं! पंकजला एकदातरी पुण्याच्या वेताळटेकडीवर न्यायचं होतं. तिथली झाडं संध्याकाळी सुरेख, पण रात्र पडताच भयाण दिसायला लागतात. चंद्र उगवू लागलेला असेल तरी त्याचा प्रकाश रस्त्यावर झिरपत नाही तेव्हा त्यांची भीती वाटते. शहरातल्या दिव्यांना बाजुला सारून बैराग्यासारखी ही झाडं वेताळ-टेकडीवर जाऊन बसलेली!!!

आता मी अमेरिकेत आले. जर्मनीमुळे स्प्रिंग, ऑटम ही ॠतुंची नावं माहिती असल्यामुळे इथे त्या ॠतुंची नकळत मन वाट पाहत होतं. आल्या आल्या भयंकर थंडी आणि बर्फ़ात उभी राहिलेली निष्पर्ण झाडं पाहिली. एका झाडावर तर एक छोटी चिमणी पण दिसली. मी विचार केला- ही बिचारी चिमणी इथे आडोशाला आलिये नेहमीप्रमाणे, पण तिच्या ओळखीच्या झाडांवरची पानं कुठे हरवली?
बर्फ़ातली निष्पर्ण झाडं ना त्या चिमणीच्या ओळखीची होती, ना माझ्या. पण चैत्रात पालवी फुटायला लागल्यावर झाडांचे खरे रूप दिसायला लागले. आणि तरीही मनाला ओळख पटेना! भारतात घेरेदार वृक्ष, वेली, छोटी झुडपं असे वेगवेगळे प्रकार पाहिले होते, पण इथे अमेरिकेत त्यातले एकही दिसले नाही. फ़ार तर फ़ार आमच्या जुन्या घराजवळ "फ़र्न" किंवा "विद्या" ह्या प्रकारांशी मिळतीजुळती एक दोन झाडं होती.

संध्याकाळी फ़िरायला जातांना इकडे तिकडे बघता बघता मनात असे विचार यायचे- की हा देश कित्येक भारतीयांनी "आपला" म्हटला आहे. आपलासा केला आहे. आणि ह्या देशानेही त्यांना सामावून घेतले आहे. पण भारतात जशी मेंदी, मधुमालती, चाफा, नारळ, दुर्वा, बाभळी, चिक काढणारी घाणेरी, हे प्रकार आपल्या अंतर्मनात रूजलेले असतात, तसे इथले कधी रूजतील का? उद्या माझ्या अमेरिकन पोरांना मी ह्या झाडांची ओळख कशी सांगू??? की त्यांच्या पुस्तकातून मला स्वतःला आधी ती करून घ्यावी लागेल???

ऑटम येईपर्यंत ही झाडं नजरेला तरी सवईची वाटू लागली होती. (आपल्या घरी पेपर टाकणाय्रा पोराचं नाव आपल्याला कुठे माहिती असतं? पण आपण त्याला चेहय्राने ओळखतो ना, तसंच काहिसं). मग आमच्या नवीन मित्रांच्या कंपूने न्यू हॅम्पशायरला जायचे ठरवले- खास "ऑटम कलर्स" पाहण्याकरता! गाडीत अंताक्षरी खेळत होतो. भारतात हजारो वेगवेगळ्या सहलींना अंताक्षरी खेळले असले, तरी त्याला किती युगं लोटली होती कोणजाणे! "सुहाना सफर और ये मौसम हसीं" असं गात होतो, तेवढ्यात बाहेर लक्ष गेलं आणि गाणं म्हणायचं विसरूनच गेलो!!!

नेमका पाऊस पडल्यामुळे पर्वतावर विसावलेलं धुकं, आणि त्यातून अधिकच मोहक दिसणारी अक्षरशः शेकडो रंगांची उधळण करणारी झाडं! एरवी भारतात जितकं सृष्टीसौंदर्य आहे, तेवढं मी अजून तरी कुठेही पाहिलेलं नाही. पण हे रंग खरंच वेड लावणारे होते! कुठे बघावे, कुठे नाही? एकीकडे लालसर, गुलाबी, दुसरीकडे केशरी, पिवळी, आणि मधेमधे त्या रंगांच्या असंख्य छटांनी पर्वतरांगा नटल्या होत्या. maple, birch, hickory, red oak अशी सगळी झाडं रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लावली होतीच, पण खालची दरी आणि वरचा डोंगरही ते दागिने घालुन मिरवत होता.
जाताजाता उन्हाळ्याने दिलेली अप्रतीम भेट. थंडीची चाहूल लागावी, पण ती थोडी तरी सुखद व्हावी, म्हणून हा झगमगाट!

भारतातली झाडं कशी अस्ताव्यस्त पसरलेली असतात. इथली मात्र एकूणच व्यवस्थितपणाला शोभेशी! उंचच उंच, पण सरळसोट वाढणारी, एकमेकांच्या अध्यात ना मध्यात. खरं सांगायचं म्हणजे इथल्या माणसांसारखीच. सावली देतील, पण आपल्या मुळांनी वेढून टाकणार नाहीत. त्यांची पानं/फळं जेव्हा शिशिरात खाली पडतात, तेव्हा लगेच कोणीतरी ती झाडून टाकणार! आपली मुलं मोठी झाली, की त्याना बाहेरच्या जगात नि:शंकपणे धाडून देणारे इथले आईबाप- तशीच ती झाडं...

आता पुन्हा हिवाळा आलाय. उन्हाळ्यात गुलाबी निळे लाल सगळे रंग घालणारे हे "लोक" एकदम काळ्या, ग्रे, राखी रंगात थोडेसे उदास दिसताहेत. आता क्रिमसचे वेध लागले, पण दिवस लहान होत होत ४.३० लाच मावळायला लागलंय. त्यामुळे आता झाडांनाही आपला पसारा आवरता घ्यायला लागलाय.
नुसत्या राखाडी रंगाच्या काड्या काय त्या उरल्यात.
भारतातही उन्हाळ्यात झाडांची काडं होतातच, पण त्यातही उन्हाची ऊब जाणवते, तिचा इथे लवलेशही उरला नाहिये. नदीकाठावरून आमच्या कॉलेजची बस जाते, ते दृश्य सुंदर म्हणावं की भाकास? बाजूला पाणी असूनही पानांना पारखी झालेली झाडं पाहिल्या बर्फ़ानंतर मात्र पुन्हा डौलदार दिसू लागतील- Christmas Tree बरोबर रस्त्यावरच्या इतर झाडांनाही प्रकाशाची फुलं लाभतील... आणि मग वसंतोत्सवाची वाट बघत बघत हिवाळा कसा गेला कळणारही नाही...

माणसं झाडांसारखी असती,
तर रान झालं असतं,
प्रत्येक माझ्या आठवणीचं
एक पान झालं असतं!

No comments:

Post a Comment