PR-वास........

4/24/18

शैक्षणिक तंत्रज्ञान ३

शैक्षणिक तंत्रज्ञानाचे असे अनेक फायदे लक्षात घेऊन मी उत्साहाने वर्गात सांगितलं, "आता तुमचं पुस्तक तुमच्या खिशात! ई-पुस्तकाचं ॲप मोबाईलवर उपलब्ध आहे, ते उतरवून घ्या फक्त."
तर एक मुलगी म्हणाली, "पण मला हाताने मुद्दे अधोरेखित करायला आवडतं."
"अगं ई-पुस्तकात अधोरेखनाची पण सोय आहे!"
"पण एक एक पान लोड व्हायला इतका वेळ लागतोय की गेल्या पानावर काय अधोरेखित केलं होतं, ते ही पटकन दिसत नाही!"
तिचं म्हणणं बरोबर होतं. तंत्रज्ञानाचे अनेक फायदे असले, तरी पुस्तकाचा सरळ थेट साधेपणा त्यात कसा येणार?

मला आधी वाटलं होतं, की मीच एकटी जुन्याला जळमटांना चिकटून बसलेय, पण पुढच्या पिढीला हे तंत्रज्ञान आवडत असणार, सोपं वाटत असणार. पण नंतर लक्षात आलं, की, हे विद्यार्थी, शाळेपासून तंत्रज्ञान कोळून प्याले, पण शिक्षणाच्या बाबतीत मात्र कोरडे पाषाणच राहिले होते! शिवाय, अति-परिचयाने तंत्रज्ञानाचा कंटाळा आलेलेसुद्धा खूपसे होते. एखाद्या विशिष्ट विषयासाठी, विशिष्ट कौशल्य शिकवायसाठी तंत्रज्ञान वापरणं वेगळं, आणि विद्यालयीन जीवनाचा समग्र अनुभवच शैक्षणिक तंत्रज्ञानाने व्यापून टाकणं वेगळं.

ई-पुस्तकांव्यतिरिक्त, आमच्या विद्यालयाने प्रत्येक विषयाची वाचनसामग्री ग्रंथालयाच्या वेबसाईटवर टाकलीये. तर गृहपाठाची 'सूचना' विद्यालयाच्या LMSवर, वाचन ग्रंथालयाच्या पानावर, पण गृहपाठ/चाचणी ई-पुस्तकावर, ही तिहेरी कसरत करतांना मुलांनी 'अभ्यास' नेमका कधी करायचा, हे मला कळत नाही. 

विद्यालयाच्या LMS शी ई-पुस्तकाचा ताळमेळ घालण्यासाठी आधी मुलांनी ई-पुस्तक विकत घेऊन त्याचा कोड वापरणे आवश्यक होते. एकदा कोड घेतला, की ३-४ विषयांसाठी तो वापरता येत असतो, पण कोडशी जोडलेला ईमेल पत्ता आणि पासवर्ड माहिती हवा. काही मुलांना कोड घेतल्याचे आठवत होते, पण ईमेल पत्ता आठवत नव्हता. मग त्यांना ग्राहक-सेवेचा फोन नंबर देणे, त्यांचा ईमेल पत्ता मिळाला, की पुन्हा एकदा "विद्यालयाच्या LMS शी ई-पुस्तकाचा ताळमेळ घालण्याचा धडा" शिकवणे आले. 
अशाप्रकारे, सुरुवातीचा एक महिना, वर्गातली पहिली १० मिनिटं माझं Troubleshooting चालायचं. लेखन वाचनापर्यंत अजून गाडी सरकलीच नव्हती...

एकदा ही शिक्षणयंत्रणा कार्यरत झाली, तरी पुढे तंत्रज्ञानाची सबब सांगणाऱ्या विद्यार्थ्यांचा ससेमिरा मागे लागला.

  • "गृहपाठ जिथे 'टाकायचा होता, तो डबा बंद झाला." म्हणजे, उशिराने गृहपाठ आणणाऱ्या प्रत्येक मुलासाठी मी (शिक्षिकेने) विशेषत्वाने सेटिंग बदलायचं. 
  • "ई-पुस्तक उघडायला फ्लॅश अपडेट करावा लागतोय, तो घरच्या संगणकावर होत नाहीये."
  • "माझा गृहपाठ गूगल डॉक्स मध्ये आहे, पण इथे फक्त वर्ड ची परवानगी आहे, तर काय करू? 
  • "निबंध USB वर आहे, पण आज आणायला विसरले, उद्या आणते."
  • "गृहपाठाची तारीख २०, पण तो २७ पर्यंत 'उघडा' आहे, म्हणजे मला वाटलं की २७ पर्यंत दिलेला चालेल.  
  • Turnitin वर माझा निबंध 'चोरलेला' दिसतोय, कारण मीच तो गेल्या वर्षी वेगळ्या प्राध्यापकांसाठी लिहिला होता, पण तो कोर्स मला तेव्हा पूर्ण करता आला नाही, म्हणून पुन्हा आता घेतोय.  

सध्या 'हायब्रीड' किंवा 'मिश्र' कोर्सेसचं अतिशय फॅड आहे. आठवड्यातले २ दिवसच वर्गात बसून प्रत्यक्ष शिकायचं, आणि उरलेले २ दिवस ऑनलाईन स्वाध्याय, वाचन करायचं, आणि चाचण्या द्यायच्या. ह्या मुलांची 'तयारी' तपासण्यासाठी मग ऑनलाइन चर्चासत्र शिक्षकाने घ्यायचं, विद्यार्थ्यांनी त्यात जमतील तेव्हा प्रतिसाद लिहायचे, आणि शिक्षकाने ते तपासायचे! २५ मुलांच्या 'छोट्या' वर्गातही, चर्चेचे १०० प्रतिसाद झाले, तर ते शिक्षकांसाठी किती गधेमजूरीचं काम होऊन बसतं! काही मुलं जर केवळ 'सहमत/असहमत' असे प्रतिसाद देत असतील, तर त्यांना चालना देण्यासाठी पण शिक्षकांना दिवसरात्र त्या वर्गाच्या वेबसाईट वर राबावं लागतं. हा वेळ कदाचित शिक्षकाने मुलांचे निबंध/इतर लेखन वाचण्यात घालवला असता, तर?

ह्यात अनेक समस्या आहेत:
१. शैक्षणिक तंत्रज्ञान बनवणाऱ्या अनेक कंपन्या आपलं घोडं पुढे दामटतात, पण कुठलंही एक ऍप किंवा सॉफ्टवेअर  'सर्वसमावेशक' नसतं, त्यामुळे शिक्षकांना आणि मुलांना, तीन ठिकाणी तीन गोष्टींसाठी फिरावं लागतं.

२. कुठलीही गोष्ट अंगिकारण्यापूर्वी प्रत्येकाला, ती गोष्ट स्वत:साठी 'चालवून' बघता येण्याचं स्वातंत्र्य ही तंत्रद्न्यानाची टूम शिक्षकांना देत नाही, असं वाटतं. आणि त्यातुन आलेले अनुभवांचं 'सरसकटीकरण' केलं जातं, जसं की, "ह्या शिक्षकांना नवीन गोष्टींशी जुळवून घ्यायला नको!"

३. शैक्षणिक तन्त्रद्न्यानाचा प्रयोग अधिकाधिक 'व्यक्तिसापेक्ष' शिक्षण देण्यासाठी करणे योग्यच आहे. फक्त, ह्या मुलांचं 'वर्गीकरण' करुन एकीकडे व्यक्तीसापेक्षतेचा डंका बडवायचा, आणि दुसरीकडे, त्याच ॲपमधील 'डेटा' गोळा करून, मुलांच्या 'स्कोअर वरून' शिक्षकांची "प्रगतीपुस्तकं" लिहायची, पण शिक्षक-विद्यार्थ्यांच्या 'व्यक्तीसापेक्ष-रसायनाला' गृहित धरायचे नाही, हा मला दांभिकपणा वाटतो. (विशेषकरून भाषा-शिक्षणासारख्या सापेक्ष विषयात.)

४. आत्ता 'आई म्हणून' लहान मुलांना तंत्रद्न्यानातुन शिकवणं हे बरोबर वाटत असलं, तरी प्राध्यापिका म्हणून तंत्रद्न्यानात वाढलेली मोठ्या मुलांची पीढी बघून भीती वाटते. हे माझे विद्यार्थी शैक्षणिक तंत्रद्न्यानाचे पहिले 'बकरे' / 'भोक्ते' आहेत. त्यांच्यावेळी हे सगळं नवीन होतं. त्यामुळे शिक्षकांनीपण तेव्हा फार डोळसपणे नवीन गोष्टी न वापरता, सगळीकडे नवीनतेचा उदोउदो होत असल्यामुळे, तोच पंथ आपोआप धरला, किंवा, बहुधा 'सोय' बघून, 'वाहत्या पाण्यात हात धुतले'.

शिक्षणाचं 'तंत्रज्ञान' समजावून न घेता, केवळ शैक्षणिक तंत्रज्ञान पाजळणाऱ्या लोकांना पुढे हेच विद्यार्थी कर्मचारी म्हणून मिळणार आहेत, तेव्हा तरी कदाचित त्यांना जाणवेल, की पुढे पाहून धावताना मागे काय हरवत चाललं होतं... 

No comments:

Post a Comment