PR-वास........

12/9/09

ध्येय, प्रेम आशा यांची...

युद्धात माणसांचं काय हरवतं? असं विचारण्यापेक्षा, युद्धात मरण बघितल्यावर माणसांना जगून बघायचं काय उरतं? ह्याचा शोध घ्यायला गेलो, तर कदाचित हेमिंग्वेच्या (Hemingway) The Sun Also Rises चं उत्तर सापडेल.

Bullfighting च्या रिंगणातही एक वेगळंच युद्ध माजलेलं असतं. मॅटॅडोर (Matador) आणि पिकॅडोर (Picador) यांचा माजलेल्या सांडाभोवती झिम्मा. निसर्गातल्या सगळ्याच घटकांप्रमाणे सांडाची प्रवृती सरळधोट, निर्भिड आणि पवित्र असते. माणूसपणातून जन्माला आलेल्या क्षुद्रतेचा त्यात लवलेशही नसतो. शिंगांना रक्ताची चटक लागलेले हे सांड, अंगावरच्या असंख्य जखमांनी रक्तबंबाळ होऊनही आपला माज न सोडता, मृत्यूला धडका देतात, ती केवळ त्यांची क्षमताच नव्हे, तर एकप्रकारे त्यांच्या जन्माची पूर्तता असते. त्यांचा जन्मच मुळी मरणाशी झुंज द्यायला झालेला असतो!

तर जातिवंत मॅटॅडोर मात्र, सांडापुढे, त्याच्याच येवढा "माज" घेऊन उभे ठाकतात. त्यांच्याकडे तलवारी, सुरे असतात, आणि सांडाला चिथवण्यासाठी लाल कापडी पंखा. ही लढाई एकतर्फी असते, कारण सांड एकटा, आणि हे टोळकं. पण विजयाची खात्री असतांनाही, अंगावर धावून येणाऱ्या सांडापुढे स्वत:ला स्वच्छ प्रकट करण्यात मॅटॅडोरची खरी "माणुसकी" दिसते. आपला मर्मभेद करू शकेल, अशी आशा त्याला दाखवून, हुलकावण्या देत देत त्याला मारतांनाही त्याचा मान राखणं ज्या मॅटॅडोरला जमतं, त्याला खरा "मर्द" समजतात.

पाठीचा ताठ कणा घेऊन, आपलं पौरूष दाखवत ते लाखो लोकांसमोर मृत्यूचं हे महानाट्य उभं करतात, तेव्हा त्यांना लाखो लोकांची टाळी मिळते.

हेमिंग्वेचा जेक बार्न्स (Jake Barnes) हा bullfighting चा रसिक श्रोता आणि चाहता आहे. त्याने युद्धात स्वत:च्या प्राणांहूनही मूल्यवान असं काहीतरी - त्याचं पौरूष- गमावलंय. आता युद्धानंतर ब्रेट (Brett) च्या प्रेमात पडल्यावर तिला जे हवं ते तो देऊ शकत नाही. त्याच्यावर आतोनात प्रेम असूनही, मनासारख्या पुरूषाच्या शोधात अनेकांबरोबर संग करणारी ब्रेट सुद्धा स्वत:ला माफ करू शकत नाही. त्या दोघांच्या मित्रांचं टोळक्यातला प्रत्येक जण Brett कडे आकर्षित होतो, पण त्यांना जेकची सर येत नाही.

जेकचं दु:खच असं अपरिहार्य- त्याचं ओझं जातिवंत सहजतेने वागवत, आणि ब्रेटला तशातही आधार देत तो उभा आहे- Bullfighting च्या रिंगणात. युद्धात अनेकांनी गमावलेली माणुसकी आणि सौजन्य अजूनही त्याच्यात शिल्ल्क आहेत.

पण युद्धा आधीचा तो भोळा विश्वास? ती ध्येयासक्ती, ते राष्ट्रप्रेम - जगातल्या कुठल्याही दोघांनी एकमेकांवर करायचं असतं, तसं निस्वार्थ प्रेम- जेकचं हे हरवलेलं धन त्याला कुठून परत मिळणार?
ध्येय, प्रेम आशा यांची/ होतसे का कधी पूर्ती
वेड्यापरी पूजितो या/ आम्ही भंगणाऱ्या मूर्ती!
काढ सखे गळ्यातील/ चांदण्याचे तुझे हात
क्षितिजाच्या पलिकडे उभे/दिवसाचे दूत.
-कुसुमाग्रज

हेमिंग्वेच्या पुस्तकातली सगळीच पात्र - कधी जीवावर उदार होऊन रिंगणात उभे राहणारे मॅटॅडोर असतात, तर कधी जीवनाच्या निरर्थकतेने रक्तबंबाळ झालेले, तरी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची आत्मवृत्ती असणारे सांड.

गर्ट्र्ड श्टाईन (Gertrud Stein), ह्या हेमिंग्वेच्या मैत्रिणीने त्यांना दिलेले नाव--------- The Lost Generation.


11/6/09

दुसरी बाजू


सरळ समोर सिग्नल. डावीकडे लालकेशरी पानांची किनार, उजवीकडे थोड्या उतारावर, रस्त्याच्या काठाशी दडून बसलेली एक स्कूल-बस.
सरळ पुढे गेले, तर i-78 लागणारे, पण माझी ही छोटीशी रोजची वाट मी पकडणार आणि डावीकडे वळणार. म्हणजे जर पुढून येणा़या गाड्यांची अखंड रांग थोडी रेंगाळली, किंवा डावीकडचा "सुरक्षित सिग्नल" लागला तर. एरवी कधी घाईत घुसखोरी करायसाठी नुस्तं (पाऊल) चाक जरी पुढे टाकलं, तरी लगेच पुढून येणारयांचा हुकुमशाही हॉंक खावा लागेल.

त्याच रस्त्यावरून पुढे गेल्यावर एक पाच-रस्ता-चौक. (त्याला चौक का म्हणायचं मग?). त्यातली वाहती रहदारी स्वयंनियंत्रणाने सुरळीत चाललेली असली, तरी तिथेही आपला हक्क दाखवायचा, किंवा आपली कर्तव्य करायची, हे न टळणारं. पण त्या पाच रस्त्यांपैकी आपला नागमोडी एकदा पकडला, की मग मात्र आपल्याला थांबवायची कोणाची बिशाद नाही.

फक्त् एकच कठीण जातं............त्याच रस्त्याने परत येत, आपलेच दृष्टीकोण वेडावून, उलटून आपल्याला खातात, तेव्हा. ह्यावेळी आपण उजवीकडचे असतो. आपलं घर त्या रस्त्याच्या अलिकडे नसून, पलिकडच्या साध्या वस्तीत असतं.

आपण स्वत:लाच अनोळखी असल्यासारखे भिरभिर शोधतो, ती डावीकडची लालकेशरी पानांची किनार, ती रस्त्याच्या काठाशी दडून बसलेली स्कूलबस. ते आता उलटीकडे असतात. कधीकधी खूप जिवलग मैत्रांनी दुसरी बाजू घ्यावी तसे.

दुसरी बाजू. ह्म्म्म. रस्त्यांची तीच दुखरी जागा असते. त्यांना शक्यतोवर दुसरी बाजू असावी लागते. नाहीतर "one way" म्हणून हिणवले जातात.
दुसरया बाजूने सगळं नवीनच दृष्य दिसतं, आणि सैरभैर होतं मन. नको वाटते ती चिकित्सा- मायक्रोस्कोपच्या डोळ्यातून जीवाणू कडे बघणार्या त्या रस्त्याची दुसरी बाजूही आपणच होतो, तेव्हा सगळेच रस्ते संपल्यासारखे होतात.



10/15/09

दिवाळी

ही कविता मी खूप लहानपणी केली होती, पण आज वळून बघतांना दिवाळीचा सहज सोपा आनंद त्यातून पुन्हा उजळून आला....तुम्हा सर्वांना ही दिवाळीच्या अनेक शुभेच्छा!!! सुख-समृद्धी आणि आरोग्याचा प्रकाश घरा-घरातुन पसरत राहो!

दिवाळी आली, दिवाळी आली
दीप उजळले घरा घरा
त्या दीपांच्या तेजाने
न्हाऊन उठला सारी धरा!

दिवाळी आली, दिवाळी आली
आली नरकचतुर्दशी
देवाजीच्या देवळात
भक्तजनांची गर्दी खाशी!

दिवाळी आली, दिवाळी आली
आले लक्ष्मीपूजन
हळदीकुंकु करायला
मुली बसल्या नटून

दिवाळी आली, दिवाळी आली
आला तसाच पाडवा
ह्या दिवशी लहानांनी
मोठ्यांचा आशिर्वाद घ्यावा!

दिवाळी आली, दिवाळी आली
भाऊबीजही आली
बहिणीने भावाकडून
भेट काही उकळली!

दिवाळी आली, दिवाळी गेली,
फटाक्यांचे बार थांबले
तेव्हापासून आम्हा मुलांना
शाळेचे वेध लागले!

10/2/09

सवयीची...

शेजारी एक जोडपं.
निर्मनुष्य रस्त्यात बेडकाच्या पिलांनी डोळे वटारून जो येईल त्याच्या कडे टक लावून बघत बसावं, तसं.
त्यांना नोकरी-धंदा-काम नाही.
बाई चाळीशीची, बुवा पन्नाशीचा.
वय लपवण्यासाठी मुद्दाम भडक रंगाचे कपडे घालायची त्यांची चढाओढ.
हौस ही दांडगी.
Yankee Game ची जर्सी, Memorial Day ची हाफ-चड्डी, असे अनेक त्या त्या दिवसाचे ठेवणीतले कपडे घालणार.
दारावर कायम दिव्यांच्या माळा- हॉलोवीनला केशरी भोपळे, क्रिसमसला लाल-हिरवे चेंडू, आणि ४ जुलै ला अमेरिकेच्या ध्वजातले निळे-पांढरे-लाल तारे.
ते ही न लुकलुकता स्तब्ध प्रकाश फेकत थांबलेले.
बाकी त्यांच्या दारासमोर कधी पोस्टाची सुद्धा गाडी थांबत नाही.
शेजारी कधी बोलणं काढून रेंगाळत नाहीत, की संध्याकाळी फिरतांना गप्पा रंगत नाहीत.
त्यांच्या घरून कधी पाहुण्यांचा गलका, मुलांचे रडे, आपापसातली भांडणं- कधीही ऐकू येत नाहीत.
हं, त्यांना एक मुलगा आहे. गतीमंद असावा. गोड गुलाबी गालांचा, थोडा गुबगुबीत, गोल डोळ्यांचा. तो फारसा बाहेर दिसत नसला, तरी त्याच्या निमित्ताने त्याच्या आईवडिलांनीच स्वत:भोवती कोष विणलाय, आणि त्यात अडकलाय मात्र तो- असं वाटायला लावणारा.....

पण परवा माझ्या लक्षात आलं- मी गाडी पार्क केली, की आत्याबाई दार उघडून कचरा टाकायला बाहेर निघतात.
जुजबी, हवापाण्याचं सुद्धा खूप कौतुक करत बोलतात.
बुवा तर आत्याबाई कधी दम खायला थांबते, आणि माझी बोलायची पाळी येते, ह्यासाठी टपलेले.
"तुम्ही heating किती ठेवता? ६९ ठेवत जा बरं- त्याने बिल कमी येतं!"
असे सल्ले देतांना त्यांचे डोळे चमकतात.
इकडे भाजीच्या ४ पिशव्या, डबा, ऑफिसबॅग धरून माझ्या हाताला कळ लागलेली असते, पण त्यांच्या धबधब्यापुढे माझं काही चालत नाही.

मात्र गेले ४ दिवस त्यांचं घर बंद दिसलं. दिव्यांच्या माळा नुस्त्या धूळ खात लटकल्या. कचरा टाकायला कोणी बाहेर येईनासं झालं. तेंव्हा ऑक्टोबरच्या पानगळीत मला जरा जास्तच उदासवाणं वाटायला लागलं.

पण आज दुपारी झोपले होते, तोच बेल वाजली. जिवावर आलं तरी माहिती होतं- हे नक्की खालचे शेजारी असणार. दार उघडल्या उघडल्या बुवांनी पुराण चालू केलं. कुणाच्याशा funeral ला गेले, ते सहकुटुंब जरा सहल करून आले होते ते. पण मी जेमतेमच ऐकलं... आणि मनातून मला अखेर सवयीची, त्रासयुक्त जांभई आली.

9/16/09

पैठणी- शांता शेळके

फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे, कुंच्या, तोपडी, शेले, शाली,
त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी.

ही कविता मी प्रथम वाचली, तेव्हा "फडताळ", "नारळी पदर" असले शब्द कळतही नव्हते. आईबाबांची कागद-पत्रे ज्या कपाटात होती, तिथे त्यांची काही पुस्तकं अगोचरपणे वाचायला गेले, तर शांताबाई शेळक्यांचं "गोंदण" हाती आलं. एक कविता वाचली, कळेना. पान पुढे. दुसरी. त्यात "आवर्त" असले शब्द म्हणता म्हणता बोबडी वळते म्हणून पुस्तक ठेवून द्यावं, तोच "पैठणी" वर नजर गेली. ह्म्म्म ही कळू शकेल बुवा! बघू तरी...

माझी आजी लग्नामधे ही पैठणी नेसली होती
पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती
पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्म वास
ओळखीची...अनोळखीची...जाणीव गूढ आहे त्यास.

(काय बरं ह्या वाक्यात अर्थ प्रतीत होतो? तेव्हा कळण्याचं वय नव्हतं, पण अजूनही ते गूढ मनात रेंगाळलंय.)

धूप-कापूर-उदबत्त्यांतून जळत गेले किती श्रावण
पैठणीने या जपले एक तन...एक मन...
खस-हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली
(ह्या वाक्याशी मी दरवेळी थांबते. खस-हिन्याचा एकत्रित दरवळ! नुसतं खस-हिना म्हटलं तरी अंगावरून झुळूक गेल्यासारखी वाटली.)
शेवंतीची, चमेलीची आरास पदराआडून हसली.

वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला.
(माझ्या आजीची साडी इतकी मऊ कशी लागते? ह्याचं उत्तर मिळाल्यासारखं वाटलं.)
पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले
अहेवपणी मरण आले, आजीचे माझ्या सोने झाले.
(त्यावेळी आजीच्या मरणाच्या कल्पनेनेही रडू आलं होतं!)

कधी तरी ही पैठणी मी धरते उरी कवळून
मऊ रेशमी स्पर्शामधे आजी भेटते मला जवळून
मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यांनो, आजीला माझे कुशल सांगा.


देवाच्या कृपेने माझ्या दोन्ही आज्या अजून खुशाल आहेत, तरीपण, अमेरिकेतल्या माझ्याशी, भारतातल्या आज्यांचा, कालपटाचा धागा जुळतो, तेव्हा गहिवरून येतं. ह्या कवितेबद्द्ल लिहितांना, "कवयित्रीने सर्व संवेदना- स्पर्श, गंध, दृष्टीला खुणावणारं काव्य केलंय" असं काहीबाही लिहायला गेलेही असते कदाचित

पण एवढंच म्हणते- शांताबाई! तुमच्या कवितेने जागवलेल्या माझ्यातल्या निर्मळ मनाला, मनातल्या निरागस आठवणींना, आणि त्या आठवणींनी वाहणाऱ्या झऱ्यांना सलाम!!!

9/6/09

मी स्वत:वर प्रेम करते!

कुठून कोणजाणे, आमच्या घरच्या सगळ्यांना आत्मविश्वासाचा विंचू चावलाय. श्यामच्या आईसारखं, "माझा मुलगा पोहायला शिकला नाही, हे सांगायला मला किती लाज वाटेल होSS श्याम!" अशी प्रेमळ, पण नकारात्मक धमकी न देता आमच्या आई-बापांनी आम्हाला कायम, "पोहणं काय? सोप्पं असतं, तुला येईल पटकन् ! आमची मुलगी आहेच मुळात हुश्शार!" अशी पाठीवर थापच देऊन पाठवल्यावर मनात कधी शंकाच आली नाही- की हे आपल्याला जमेल का?


आज मोठेपणी मला पदोपदी त्यांची आठवण येते- आमचे निर्णय, आमचे विचार, आमच्या कल्पनांचं नेहमी स्वागतच करणारे माझे आईवडील सगळ्यांनाच का नाही लाभत ?
"तुला कला-शाखेत जायचं का? जा. तू जिथे जाशील तिथे मन लावून काम करशील आणि त्यात तुला यश मिळेल. पण बेटा, हा निर्णयही तू नीट विचार करून घे." हे विश्वासाने सांगणारे ते भेटले म्हणून आज माझ्या आयुष्यात मला जे करायचं होतं ते मी करू शकले.
तुम्ही पण विचार करा- तुम्ही स्वत:ला आवडता का? मला मी आवडते. ह्याला मी overconfidence समजत नाही, तर आईवडीलांनी दिलेली आत्मविश्वासाची देणगी समजते.


तुमचे केस सरळ तर नाहीतच, पण झिपरे म्हणावेत इतके नाठाळ असतांना, गालांवर थोडं अतिरिक्त मास दिसायला लागलं असतांना, लेटेस्ट फॅशनचा गंध नसतांना, किंवा मेक-अप केलेला नसतांनाही- तुम्हाला स्वत:चं रूप सुंदर नव्हे, पण आनंददायक (pleasant) वाटतं का?
उद्या तुमच्या समोर मॅट डेमन येवो, की हॅली बेरी येवो, त्यांनी तुम्हाला, तुम्ही जसे आहात तसं स्वीकारणं तुम्हाला अपेक्षित आहे का? का नसावं? प्रत्येकालाच पुढच्या माणसाकडून काहीतरी शिकण्यासारखं असतंच नं? " रोमन हॉलीडे" सिनेमात खुद्द राजकन्येलाही एका फाटक्या पत्रकाराची मैत्री, प्रेम हवसं वाटतं, ते काय त्याचे कपडे बघून?


मी स्वत:वर प्रेम करते, पण आंधळं प्रेम करत नाही. स्वत:च्या चुका कबूल करायला लाजत ही नाही. पण स्वत:वर प्रेम केल्यामुळे मला इतरांवर प्रेम करायला जमतं. कुणाचं यश बघून असूया वाटणे, पगारांची तुलना करून त्यात कमीपणा वाटणे, हे मला फार विचित्र वाटतं. अरे, झोपडपट्टीत तुम्ही उपाशीपोटी असतांना पुढच्या माणसाकडे वडापाव असेल, त्याची असूया वाटणं सहाजिक आहे, पण तुमचे केस पांढरे, आणि इतरांचे काळे म्हणून असूया वाटावी???


मी खूपदा विचार करते, की नेमकं आपलं स्वत्त्व कशात असतं? कशात असावं? कुणाचं दिसण्यात, कुणाचं पैशात, तर कुणाचं एका आवडत्या ब्रॅन्डच्या सिगरेटीतही स्वत्त्व असतं. मला वाटतं, स्वत्त्व हे असं कुठल्यातरी मूर्त-अमूर्त गोष्टीला चिकटवूच नये. त्याची गरजच नसते. तुम्ही तुम्ही आहात- हेच तुमचं स्वत्त्व असतं.


स्वत:वर प्रेम असेल, तर ते तुमच्या कामात, तुमच्या कपड्यात, आयुष्याच्या प्रत्येक पैलूत सकारात्मक रीतीने प्रकट होतं. मी स्वत:वर प्रेम करते, म्हणून मी स्वत:ला चांगल्या गोष्टी मिळाव्यात म्हणून धडपडते. माझं काम चांगलं व्हावं म्हणून धडपडते. त्यातला आनंद मिळवल्यावर मला त्या आत्मविश्वासाच्या विंचूबद्दल फार कृतज्ञता वाटते. आणि मला हा आत्मविश्वास आहे, म्हणूनही मी स्वत:वर प्रेम करते!
तुम्हाला काय वाटतं? स्वत:वर प्रेम करावं का?

7/15/09

माझी भारतात न्यायची सूटकेस

माझी भारतात न्यायची सूटकेस
भरतेय हळूहळू
अपेक्षांनी, लाडिक हट्ट, उंचावलेल्या भुवया, निरागस कुतुहल
क्वचित, ओथंबलेल्या अश्रूंनी.


जुने झालेले कपडे तिथे "देऊन टाकायला" नेतांना
स्वत:च ओशाळी
“शोभेच्या वस्तू गुंडाळायला बरे पडतात
जुने कपडे!” समर्थनासाठी.

सुटकेसचे एक एक पदर रचतांना
कुठून अचानक कुणाची आठवण
घमघमली. पिवळ्याधमक गर्द झेंडूची भेट
आता काय न्यावी त्यांना परतभेट? - पर्फ्यूमची बाटली???

एक एक वस्तू शक्यतोवर
सुट्या सुट्या खोचल्या तरीपण
आपल्या पोत, जाडी, आकारासकट
आदळणार एकमेकींवर- एअरपोर्टवरच्या मिठीगत
ते प्रेम होतं- की परिस्थितीनुसार-
फक्त व्यवहार?

पिकासोच्या चित्रासारखे
चित्रामागून उलगडताहेत
एक एक कोपरे.
कितीही झाकलं तरी बोडकेच राहणारे.

पिकासोने स्त्री पाहिली
आरशातून प्रत्येक अंगाने
स्वत:लाच न्यहाळणारी.

तशी माझी सूटकेस
थोड्या आनंदाने, थोड्या अनिच्छेने
प्रवासाला निघतेय.

7/7/09

आईस्क्रीमची गाडी...पाच रूपये

माझ्या आजोबांची, अण्णांची, एक गोष्ट आमचे बाबा नेहमी सांगतात. अण्णांनी मोठेपणा घेऊन अनेकांचे संसार स्वत:च्या खिशातून चालवले, त्यात त्यांना प्रचंड कर्ज झालं. त्या काळी हजारोंच्या घरात ते कर्ज अगदी गळ्यापर्यंत आलं होतं. मुलांच्या शाळेची फी भरणंही जड जायला लागलं होतं. फक्त गावात नाव चांगलं असल्यामुळे घेणेकऱ्यांनी अजून रांग लावली नव्हती, एवढंच. माझ्या वडिलांना, आणि सगळ्या भावंडांना खूप लहानपणीच परिस्थितीची जाण आली. कर्जाच्या ओझ्याने त्यांचं बालपणही कोमेजून जायला लागलं होतं.

आमचे बाबा त्या भावंडात सगळ्यात धाकटे. आई लवकर गेल्यामुळे अगदीच पोरके होते, पण अण्णांकडे कधीही काही हट्ट त्यांनी केला नसेल.
एक दिवस मात्र नागपूरच्या कडक उन्हाळ्यात, घरासमोरून आईस्क्रीमची गाडी गेली. अगदी अनावर मोह झाला, पण आधीच घरच्या गरीबीत अण्णांकडे पैसे कसे मागायचे? अशा विचाराने त्यांचा चेहरा अगदी केविलवाणा झाला. डोळ्यात पाणी आलं. आईस्क्रीम तर मनापासून हवंच होतं... तेवढ्यात अण्णांचं तिकडे लक्ष गेलं. ते प्रेमळ होते, त्यामुळे त्यांना लगेच अंदाज आला.
“काय रे? काय झालं?”
“काही नाही अण्णा!”
पण खोदून खोदून विचारल्यावर कसंबसं उत्तर आलं,
“ती आईस्क्रीमची गाडी...पाच रूपये हवे होते... पण आपलं कर्ज...!”
अण्णा हसले, “ये बेटा, इथे बस. अरे आत्ताच्या त्या ५ रूपयांनी माझं कर्ज काही उद्या फिटणार नाहीये. पण ५ रूपयांसाठी तुझ्या मनात त्या आईस्क्रीमची खंत राहून जाईल. इतका समंजसपणा दाखवलास बाळा, जा पळ! त्या गाडीवाल्याला पट्कन बोलावून आण. आज आपण सगळेच भरपूर आईस्क्रीम खाऊ.”

अण्णांचं वागणं किती बरोबर, किती चूक? प्रत्येकाचे ह्यावर वेगळे विचार असतील. पण त्या पाच रूपयात त्या काळी कूकरचे ३ डब्बे भरून आईस्क्रीम मिळालं. पण त्या पाच रूपयांचं मोल एवढं होतं, की पुन्हा कधी म्हणून त्यांच्या मनात आईस्क्रीमबद्द्ल हाव सुटली नाही, की त्यात त्यांचा जीव अडकला नाही.

मला वाटतं आनंद असाच सदासर्वदा आपल्या डोक्यावर छत्र धरणाऱ्या आकाशासारखा असतो. त्याला आपले हात कधीही टेकणार नाहीत, आणि त्याची उंची कधी कमी होणार नाही, हे आश्वासन, म्हणजे आनंद.

मी बरेचदा बघते, अडचणीच्या परिस्थितीत माणसं किती छोटे-छोटे आनंदही पुरवून, पुरवून चाखतात! पैसे नाहीत म्हणून आपल्याला हे करता येत नाही, ते विकत घेता येत नाही, हे घालता येत नाही...त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वालाच त्या नसण्याची एक कायमची अढी बसते, ती पुढे कितीही बरकत आली, तरी सुटता सुटत नाही!

मनातून कित्ती हौस असूनही वहिनी स्वत:साठी एक टिकली खर्च करतील तर शपथ! “मला कशाला हवीये ती साडी? आता कुठे जायचंय मला मिरवायला?” आणि फारच आग्रह झाला, तर, “बरं मी वाढदिवसाला घेईन हो. वाढदिवस आणि पाडवा एकातच होऊन जाईल!” हे वर. आणि त्या एका साडीचा आनंद मग खूप खूप दिवस मिरवतात त्या.

आपल्याला अमूक एक गोष्ट हवी आहे, हे मनात आणायला सुद्धा घाबरत घाबरत जगणारी ती माणसं- आजच्या Debit-Credit च्या जमान्यात दुर्मिळच म्हणायची. पण "तो" ही त्यातलाच एक. “तुला वाढदिवसाला iphone घेऊन देते! असं मी खुशीत म्हणताच, “नको नको. मला बघायचंय मी iphone शिवाय किती दिवस राहू शकतो ते....!”

हे असं स्वत:च्याच मनाला पीळ घालून घेणं मला तरी नाही पटत. कुठेतरी सारखी ती आजोबांची गोष्ट आठवत राहते. खरा आनंद कोणत्या वस्तूंत थोडाच असतो? मला हवं तेव्हा मला आईस्क्रीम "मागता" येईल, ह्या आश्वासनानेच मन तृप्त झालेलं असतं.

6/25/09

रंग जांभळा

गेले काही दिवस मी Celie ची पत्र वाचत होते. The Color Purple मधली.
तिने देवाला लिहिलेली. "त्या" च्या पर्यंत कधी न पोचलेली...
सेली चं बालपण उमलायच्या आधीच कोमेजलं. आई मरणाच्या दारात असतांना सख्ख्य़ा बापाने अत्याचार केले, तर सांगेल कुणाला? एक देवच तर होता, त्याच्यावर भरोसा, की तो माझा पाठीराखा...
पण तो नाही आला धावून, द्रौपदीच्या कृष्णासारखा... बापाच्या पापाची पोरं बापाने बाहेर विकली, तेंव्हा नाही. त्याने सेली ला एका प्रौढ माणसाला बायको म्हणून उजवली, तेव्हा ही नाही. त्या माणसाने तिला गुरापेक्षा वाईट वागवली, वापरली, तरी ही नाही.

सेलीची पाठची बहिणच एक होती, तिचा कैवार घेणारी. ती म्हणाली, "तू तरी का सोसतेस अशी मुक्याने?"
"I don't know how to fight. All I know how to do is to stay alive!" सेली चं उत्तर आज समजून घेणं अवघड आहे. सेली सारख्या ऍफ्रिकन अमेरिकन बायकांना अगदी विसाव्या शतकातही जे सोसावं लागलं- त्याने पार मोडलेला कणा घेऊन जगतांना, पर्यायांचा नुसता विचार करता येण्याइतकंही बळ नसणं!
देवावरच्या आपल्या भाबड्या विश्वासाने का होईना, सेली त्या मरणाहून वाईट जगण्यातून चिवटपणे तगली. तिच्या बहिणीला मात्र शिक्षणाने नवी वाट दाखवली. आफ्रिकेत मिशनरी म्हणून गेली ती, पण आपल्याच संस्कृतीच्या ह्या "मूळापासून" आपण किती दूर फेकले गेलो, ह्याचं भान तिला आलं, आणि तिच्या "मिशन" ला एक वेगळंच परिमाण प्राप्त झालं.

सेली च्या नव़याने मात्र तिची पत्र सेली पर्यंत कधी पोचू दिली नाहीत.
आशेच्या एका किरणाला पारखी झाली होती सेली, तेव्हा तिला भेटली Shug Avery. प्रसिद्ध गायिका, सौंदर्याची पुतळी, पण आजारी पडल्यावर समाजाने टाकलेली. सेलीच्या शुश्रुषेने ती बरी झाली, आणि सेलीचं आयुष्यच तिने उजळून टाकलं.

"माझ्या देवाने आजवर माझ्यासाठी काय केलं?" सेली ने शेवटी हताश होऊन विचारलं, तर शग म्हणाली,
" तुझ्या डोक्यातला देव, एकतर तो पुरूष आहे, आणि त्याहून गोरा! तर त्याच्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार? तो तुझी निरपेक्ष सेवा मागणार, आणि त्याने वाटलेलं दु:खही तू प्रसाद समजून कपाळी लावावंस असं धर्मग्रंथात लिहून ठेवणार."

"मला वाटतं देव ना स्त्री आहे ना पुरूष. ते एक तत्त्व आहे- आपल्या बरोबरीने जगणारं, सुखात हसणारं, वेदनेने कळवळणारं! भावना ही देवानेच निर्माण केल्या ना? मग त्या सतत दाबून टाकल्याने देव प्रसन्न होईल असं कसं वाटतं तुला? अगं आपल्या सुखातही देवाचं सुख असेल, असा विचार का नाही करत आपण?
आपण देवाला प्रसन्न करायला निघतो, पण देवाने आपल्याला प्रसन्न करण्यासाठी काय काय लीला मांडून ठेवल्यात त्या कधीच का डोळे उघडून बघत नाही आपण?


"I think it pisses God off if you walk by the color purple in a field somewhere and don't notice it.” शग म्हणाली.
सेलीला मग एकदम काहीतरी उमगल्यासारखं झालं... जांभळ्या रंगाने हळूहळू तिचं रंगहीन जीवन उत्फुल्ल होत गेलं...

6/23/09

तुझं अक्षर...

आज खूप दिवसांनी तुझं अक्षर दिसलं
मी तुला दिलेलं पुस्तक
कव्हर लावून परत करतांना
नाव घालून दिलेलं-
माझं नव्हे- पुस्तकाचं!!!
एक एक काना-मात्रा-वेलांटी
किती जपून जपून काढलेलं

भेटायला येतांना तीन-तीनदा
आरशात पाहिल्या सारखं
ते अक्षर!

"न" आणि "व" सारखेच दिसतात तुझे
हे तुझं व्यक्तित्व
थोड्या साशंक अभिमानाने
स्नेहपूर्ण विश्वासाने हात पुढे करावा
तसं ते अक्षर!

मग पुढे आपण खूप पत्र लिहिली.
माझं अक्षर तुझ्या अक्षरासारखं व्हायला लागेपर्यंत.
माझ्या मराठीतला "ल" आणि तुझ्या हिंदी-मिडियमच्या "ल" मधला फरक
डोळ्यांना दिसेनासा होईपर्यंत
माझ्या वाटोळ्या अनुस्वाराचं तू मला भान आणून देईपर्यंत.
लिहिलेला प्रत्येक शब्द मी तुझ्या अक्षरातून वाचायला लागले तोपर्यंत.

त्या दिवसांवरची धूळ आज
अचानक झटकतांना
तुझं अक्षर दिसलं!
आणि डोळ्यांतल्या पाण्याबरोबर वहायला लागलं
धूसर धूसर होईपर्यंत...

4/30/09

कळवळा

तसा माझा स्वभावच आहे, शिक्षकांच्या प्रेमात पडण्याचा. आमचे एक सर होते कॉलेजात. त्या काळी समाजमान्य जे जे नव्हतं, ते सगळं त्यांच्यात दिसायचं! येणार झोकात जीन्स आणि मोटरबाईकवरून. भिवईत सुंकलं, तोंडात सिगरेट आणि हातात खडू :) एम. ए. ईंग्रजीच्या वर्गात, "मराठी वाचा, मराठीशी संबंध तोडू नका," असं म्हणून शार्दुलविक्रीडितातली कविता फळ्यावर लपेटदार अक्षरात लिहणारे.
त्यांच्या त्या अलिप्त व्यक्तिमत्त्वाभोवती नेहमीच एक वलय, आणि खूपशा वदंता.
"ते त्यांच्या गर्लफ्रेंडबरोबर लिव्ह इन रिलेशनशीप मधे राहतात म्हणे!"

हे कळल्यावर फारच हृदयभंग झाला होता. पण आमचं प्रेमही "तसलं" नव्हे, भक्तियुक्त होतं! तेंव्हा ते आमचे देवच होते- जुनाट आदर्शांना धुडकावून स्वत:च नवीन आदर्श बनवणारे. मग मधे खूप वर्ष गेली. दुसऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवून स्वत:ची वाट दिसत नसते, हे कळायला लागलं. त्यांचे विचार अजूनही आठवतात. त्यांचा कुठला शर्ट आवडता होता, ते मात्र विसरून गेले.... :-)

आता मी स्वत: शिक्षिका झाले, पण अचानक पुन्हा मला विद्यार्थिनी बनवणारा दुसरा एक "देव" भेटलाय!!!
कधी कधी अशी माणसं भेटतात नं आयुष्यात, की त्यांच्याकडे बघून वाटतं- "मी ज्या रस्त्यावर आत्ता अडखळते आहे, तो रस्ता ह्याने पायाखालून घातलाय. जे ओझं मला आत्ता जड-जड होतंय, ते "त्या" ने वाहून तो पुन्हा मदतीला मागे वळून आलाय.

असा माझा सूपरव्हायजर! इतकी बडबड करतो, तरी कानात प्रत्येक वाक्य साठवून ठेवावसं वाटतं. एकाच वेळी कसं बोलता येतं- सुसंबद्ध, विचारपूर्वक, तरी गंमतीशीर आणि उत्स्फूर्त! एकाच वेळी कसं होता येतं- बौद्धिक तेजाने धारदार आणि संवेदनशीलतेने मृदू? कदाचित भाषा शिकवणाऱ्यांचा खास बाज असेल तो. पण जे माझ्या आवडत्या सरांमधे मला कधीच दिसलं नव्हतं, ते मला आमच्या "Mr. Williams" मधे दिसलं आणि डोळेच दीपले....

परवा साधा शाळेतला दिवस. मुलांनी दंगा केला, मी चिडले, मी शिक्षा त्यांना केली की स्वत:ला, अशी हताश झाले. आणि तो मला शांतपणे येऊन २ तास समजावत बसला....
एकीकडे Lesson Plans वेळेवर येऊ देत, अशी सगळ्या स्टाफला ईमेल करणारा, आणि दुसरीकडे मी, माझ्यासारख्या इतर नवीन टीचर्स, आमचे रोजचे छोटे छोटे challenges समजून घेणारा.
लेसन वाईट झाला, हा मुद्दा कधी ही न काढता, केवळ लेसन चांगला कसा होईल, ते सांगणारा.

मग मधे खूप वर्ष जातील. मी त्याच्याकडून गोष्टी शिकून पुढे निघून जाईन, किंवा चक्क दुसऱ्याच पायवाटेवर चालू लागेन. त्याचा विचारांचा प्रभाव उद्या फिकट होत जाईल कदाचित. पण विसरणार नाही तो त्याची सावलीसारखी माया, आणि त्याचा डोळे दीपवणारा कळवळा.
कोणीतरी म्हट्लं होतं नं, की "People come in your life for a reason, season or a lifetime!"

4/1/09

निरभ्र जगणं

काचेवरती साचलं पाणी
थेंबाथेंबाने निथळत गेलं
मागे वळता क्षणाक्षणाने
हळवं मन वितळत गेलं

रंग उधळुनी डोळ्यांवरती
होळीने आंधळं केलं
घुसमटुनही गर्दीमधे
माझं मीपण मिसळत गेलं

इथे श्वासही स्वातंत्र्याचा
कसा मोकळा, पोकळ वाटे
बर्फाच्या पांढऱ्या दुपारी
रक्त उन्हाचं उसळत गेलं!

सहज मिटले डोळे बघून
आकाशाचा निरर्थ धूसर
पेटवूनही प्रकाश-स्वप्ने
निरभ्र जगणं नकळत गेलं!

3/25/09

सावली

"अथर्वशीर्ष येतं?" - हो.
"रांगोळी काढता येते?" - बऱ्यापैकी छान.
"सवाई गंधर्व ला जाणारेस का?" - अर्थात! शास्त्रिय शिकतेय गेली ६ वर्ष- कानसेन झाले तरी मिळवली.
"अरूणा ढेरे"? - त्यांची नवीन कविता दिवाळी अंकात वाचली. खूप सडेतोड तरी सुंदर वाटली.
"ज्ञानेश्वरीवर प्रवचन आहे." - हो का? मला खूप आवडतात त्यांच्या विराण्या.
====================
- "पासओव्हर (passover) कधी आहे?" - चेहरा कोरा.
- "कालचं आमचं डिनर म्हणजे three-can-cooking होतं." - ह्म्म- मला का सुचत नाहीत असले भन्नाट शब्दप्रयोग? three-can-cooking!!!!!!!
- "मी ४ वर्षाची असतांना द्राक्षाचा रस म्हणून चुकून वाईन प्यायले होते म्हणे" - तू मला काही चांगल्या वाईनची नावं सांगशील का? मला try करून बघायच्यायत...
- "Kind of like P-Diddy... :) " - हा कोण गायक बुवा?

कधी जाणवलं नव्हतं भारतात असतांना, की एक "सांस्कृतिक सत्ता" असते. तुम्ही तिचे सभासद असाल, तर तुमच्याकडे देण्यासारखं खूप असतं. "गृहस्थ" चा लिंगबदल केला, की "गृहिणी" होतं, हे तुम्हाला माहिती असतं. दृष्टद्युम्न द्रौपदीचा भाऊ होता, हे ही. "साबण लावली" म्हणणाऱ्यांपेक्षा तुम्ही खुशाल स्वत:ला श्रेष्ठ समजू शकता.
पण वेगळ्या देशात ज्या क्षणी पाऊल ठेवलं, त्या क्षणी तुम्ही अक्षरश: होत्याचे नव्हते होता. तुमचं सांस्कृतिक भांडवल, घसरणाऱ्या रूपयासारखं क्षणार्धात कचरा-कचरा होऊन जातं. किंवा अगदीच कचरा नसेल कदाचित, पण शोभेच्या काचेच्या बाहुलीसारखं, कधीमधी काढून पुसायचं, पुन्हा कपाटावर ठेवून द्यायचं, असं होऊन जातं.

कालपर्यंत मी अखंड, सुसंबद्ध होते, आणि आज?
आज मी सदा मूक, पण ऊन कुठल्याही दिशेला गेलं तरी पायाला घट्ट धरून राहणारी, ती सावली झाले आहे.
ह्या देशाला देण्यासारखं असेल माझ्याकडे बरचसं, पण इथून खूपसं घेतल्याशिवाय मला जे द्यायचं ते देता ही येणार नाहिये, ही अस्वस्थ करणारी भावना आज मला छळत राहिली.

काल कोणी मला म्हटलं असतं, की तुमच्या उच्चभ्रू संस्कृतीने आमची गळेचेपी झाली, तर मी खूप समजूतदारपणे त्यांच्याकडे बघून म्हटलं असतं, "पण आम्ही ती मुद्दामहून करत नव्हतो!"
आज "खालच्या पायरीवर" असण्याचा अनुभव घेतेय. त्यात कमीपणा वाटण्यापेक्षा निराशा वाटतेय.

जर कोणी मला विचारलं, की अमेरिकन संस्कृतीबद्दल मला काय वाटतं, तर मी म्हणेन, "मला एक दिवस खरी सावली म्हणून इथे जगायचंय. माझ्या अमेरिकन मैत्रिणीच्या घरात तिच्या पाठोपाठ शिरायचंय. ग्रोसरी स्टोअर मधे आम्ही दोघी जातो, पण ती किती वेगळ्या वस्तू उचलते! मग ती घरी जाऊन त्यांचं काय करत्येय ते बघायचंय. माझ्यासारखा तिच्याकडेही असेल पसारा? कोणतं गाणं लावते ती, संध्याकाळी थकून घरी आल्यावर! शनिवारी ती जाते का भक्तीभावाने सिनॅगॉगमधे Hebrew School ला? तिच्या मुलांच्या वाढदिवशी Sprinkler Party म्हणजे नक्की काय करतात???"

मनातल्या मनात यादी करतांना मी शेवटी थकून जाते. सगळ्या गोष्टी शिकता येतात, पण संस्कृती? अदृश्य भिंतीसारखी ती खुणावते, पण दार सापडत नाही. कधी मला वाटतं ती धबधब्यासारखी आहे, पण माझे फक्त तळवेच टेकलेत कसेबसे पाण्यात. बाकीची मी- अधांतरी! कदाचित सावलीचं प्राक्तनही ह्यापेक्षा बरं असेल!

3/12/09

ते मी असावं

खूप दिवसांपासून ह्या कवितेतलं एक वाक्य डोक्यात घोळत होतं-
Let the more loving one be me!
W. H. Auden च्या एका सुंदर कवितेचा भावानुवाद करायचा प्रयत्न केलाय.

ताऱ्यांकडे बघतांना मी उमजून आहे
माझ्या अस्तित्त्वाशी, त्यांना कर्तव्य नाही
जिवाच्या भीतीशी झुंजणाऱ्या मला
त्यांच्या निर्लेपपणाची पर्वा ही नाही.

ताऱ्यांनी प्रेमाने माझ्यासाठी पेटून उठावं
असल्या अफाट प्रेमाचं ओझं नको व्हावं
अशक्य परतफेडीच्या बरोबरीपेक्षा
अधिक प्रेम करणारं- ते मी असावं

नाहीच पण मला जमलं-
असं तुटून प्रेम करणं
कौतुक असेल किती, पण एका ताऱ्याच्या
आठवणीत झुरणं.
प्रत्येक ताऱ्याचा होवो अस्त
आभाळाची काळोखी अंगवळणी पडेल
हळूहळू का होईना त्यातली
गर्द उदात्तताही मिळेल.

- W. H. Auden

2/22/09

ग्राफिटी

पुस्तकावर कव्हर
म्हणजे
कागदावर
पेपर!!!

2/5/09

ग्रेडिंग पार्टी

मी कधी विचारही केला नव्हता- नवीन देशात नवीन मित्रमैत्रिणी मिळतील, त्यापुढे नवीन सहकारी मिळतील, नवीन नाती तयार होतील... शाळेत काम करतांना आयुष्यात प्रथमच मला जाणवलं- हे माझं विश्व आहे. त्या विश्वाचं अप्रूप वाटावं, इतकं वेगळं, तर कधी चक्क adventure वाटावं, इतकं अनोळखी.
कसं वर्णन करावं त्या विश्वाचं- ज्याला लौकिकार्थाने "शाळा" म्हणतात..........?
आमच्या डिपार्टमेंटमधे ऐकू आलेली ही काही असंबद्ध (random) वाक्य:

संवाद नं १.
रिबेका: "अगं आज सकाळी उठून माझ्या पोरांनी फार गोंडस कल्ला केला- Groundhog Day चा तो हॉग बाहेर आलाय, आणि त्याने आपली सावली पाहिल्यामुळे आता ६ आठवडे अजून बर्फ पडणारे..."
मी कोऱ्या चेहऱ्याने: "सॉरी रिबेका, तू काय बोलतेयस मला ढिम्म काही कळत नाहिये."
रिबेका: "ओSSS अगं आता तुला हळूहळू कळेल, अमेरिकेत काय गमतीशीरच पद्धती असतात.... हा Groundhog Day दर फेब्रुवारीत येतो, आणि पेन्सिलव्हेनियात तो साजरा करतात. "
(तिने मला सांगितलेली माहिती इथे वाचता येईल)
मी: "एकूण अमेरिकेत घुशीसारखे इतके वेगवेगळे प्राणी आहेत, की मला त्यातला धड फरकही कळत नाहिये!"
रिबेका: "खरं सांगू का, मला ही कळत नाही..............
आम्ही दोघी: खीखीखीखी..........


संवाद नं. २
एमी: तू तर रोज स्वयंपाक करतेस ना? ग्रेट आहेस. मी गेले ८ दिवस फ्रोझन लंच खातेय.
मी: आज काय आणलंस मग?
एमी: अगं मला ट्रेडर जो मधे फ्रोझन इंडियन जेवण मिळालं. अर्थात तू घरी करतेस त्याची आणि ह्याची बरोबरी नाही, पण चांगलं लागतंय. आणि ह्यात तर काही preservatives ही नव्हते.
मी: अय्या, हो का? छान दिसतंय की खरंच. मी पण आणून बघायला हवं :)


संवाद नं ३
मेरी-एलन (एक अनुभवी शिक्षिका): कसं चाललंय गं?
मी: ह्म्म्म, surviving :)
मेरी-एलन: अगं पहिलं वर्ष कठीणच असतं. पुढच्या वर्षी बघ.
मी: माझे इतके पेपर तपासायचे राहिलेत, आणि प्लॅनिंगच्या नावाने तर बोंबच आहे.
मेरी-एलन: You know what, don't be too hard on yourself. The work will never vanish. Enjoy your weekend!
मी: हो, ते ही खरंच. तुझ्याशी बोलून इतकं बरं वाटतंय. सांगायला कोणीतरी लागतं नं.

संवाद नं ४ लंचरूम
कॅरेन: तुम्हा कोणाकोणाचे पेपर तपासून झाले?
सिंडी: मी तर कालच गठ्ठा सगळा हातावेगळा केला. २ फ्री पिरियेड होते. आणि विकेंडला घरी काम घेऊन जायचं नाही असं ठरवलंय.
कॅरेन: छे! मला तुझा इतका राग येतोय- जेव्हा पहावं तेव्हा तुझं काम संपलेलं, आणि माझी फक्त सुरूवात!
मी: कॅरेन, तू इतकं वाईट वाटून घेऊ नको. मी आहे तुला सोबतीला. माझा एक गठठा राहिलाय.
एमी: खरं म्हणजे, मी आज उशीरापर्यंत थांबायचं म्हणत होते, तर तुम्हा कोणाला कॉफी वगैरे हवी असेल, तर मी घेऊन येते.
कॅरेन: अच्छा! तर मग आपण तिघी "ग्रेडिंग पार्टी" करूया का?
मी: येप्! ही मी आलेच............................

1/29/09

कंप्यूटरने आयुष्य...

"कोहम" प्रेरणेने.......
केवळ गाडी चालवतांना झालेला कंप्यूटरचा विरह सहन न होऊन, घरी आल्या आल्या चहातल्या बिस्किटाबरोबर कंप्यूटर चघळत, तिच्यासाठी हिऱ्याच्या कुड्या आणल्याच्या आवेशात
तो: ए लवकर इकडे ये- मी तुला एक गंमत दाखवतो!
ती: मागच्या वेळी तुझी गमतीची व्याख्या म्हणजे बिकिनीतली सूपरमॉडेल होती. त्यामुळे सध्या मी पोळ्यांवर चित्त एकाग्र करतेय, तेच बरं.
तो: अगं नाही, ही खरंच एकदम सूपर गंमत आहे- आणि बघ मी तुला करून देतो... हे गूगलचं "रीडर" म्हणजे काय कमाल आहे- तुला रोज वाचायच्या असलेल्या, जगभरातल्या, अख्ख्या मायाजालावरच्या सगळ्याच्या सगळ्या वेबसाईट इथे ह्या गूगलच्या एकाच पानावर मिळतील...हा शोध मला आधीच लागला असता तर!
ती: (बुद्धाने ज्या निर्विकारपणे राग-द्वेष-मोह-दु:खाचा स्वीकार केला, त्या निर्विकारपणे): ह्म्म्म्म्म्म्म.
तो (तिच्या निर्विकारपणाने अधिकच चिरडीला येऊन): अगं हे मायाजाल म्हणजे अलिबाबाची गुहा आहे- ह्यात काय काय रत्न दडलियेत... (मग पुन्हा, हुकमी एक्का चालवल्याच्या आवेशात) आता मला सांग- मागच्या महिन्यात आपला किराण्याचा खर्च काय झाला?
ती (ते माझं काम नव्हे - असं मनात घोळवत): ह्म्म्म
तो: हा माझा ऑनलाईन हिशोब सांगतोय की आपण चक्क ४०० डॉलर किराण्यात घालवले. No offense, पण आपल्या घरी काय पंचपक्वान्नांचं साग्रसंगीत जेवण रोज असतं असंही नाही!
ती (आता कधी तो सीमारेषा ओलांडतो, आणि कधी आपण क्षेपणास्त्र चालवतो, ह्या ईर्शेने): अच्छा- म्हणजे तुला आज वरणभाता ऐवजी पुरणपोळी चालणारे का?
तो (जे लोणच्याने जमत नाही, ते लोण्याने होतंय का अशा विचारात): अगं असं नाही. पण हेच बघ. तो अक्षयकुमारचा नवीन पिक्चर निघाला- त्याची तिकिटं ऑनलाईन अर्ध्या किमतीत मिळतायत. जायचं का मग?
ती (त्याचाच डाव त्याच्यावरच उलटवत): त्यापेक्षा YouTube वर येईलच ना फुकटात- तेच बघूया!
तो: तेच तर म्हणतोय मी- की आपल्याला ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे, त्यांची माहिती मिळायला नको का? तू तुझ्या सगळ्या साळकाया-माळकायांना Twitter वर बोलाव- म्हणजे पिक्चरपासून रोटी-मेकरच्या नवीन मॉडेलबद्दल तुला लगेच बातम्या कळतील......
ती( ८वीत असतांना फ्रीज, टीव्ही, मिक्सरपासून फोन, गाडी, कंप्यूटर, वॉशिंगमशीन- ह्या गरजा की सोयी? अशा अर्थाचा निबंध लिहिला होता, त्याचा पुनर्विचार करत): अरे उत्क्रांतीवादात माणसाची शेपूट गळाली, ती गरज होती की सोय, की चक्क एक hobby? !!
तो(नेमकं तिचं म्हणणं काय आहे, हे कधीच कळत नसल्यामुळे वैतागून): पण वॉशिंगमशीनमधून धुण्याचं सायकल संपलं, की तुला ट्विटरवर अपडेट येईल बघ!
ती (आडून आडून वार करण्याचा कंटाळा येऊन, सरळ हल्याच्या पवित्र्यात): अरे पण ते कपडे आपोआप जाऊन पडत नसतात ना तिथे! बा पामरा- नुसतं कंप्यूटरवर बसून आयुष्य चालत नसतं. काल पुढच्या दाराची कडी बिनसलिये. त्याचं काय करणारेस कंप्यूटरवर?
तो (पटकन उत्तर सुचल्याचा जल्लोष करत): आपल्या Maintenance वाल्याची वेबसाईट असेलच ना- तिथे ऑनलाईन कम्प्लेंट नोंदवतो आत्ताच्या आत्ता- बोल- काय म्हणणं आहे तुझं ह्यावर?
ती (निकराने): पण स्वत: उठून तु कधी साधा बल्बही बदलू नकोस- त्यासाठी, किंवा चहा, पोळ्या, कपड्यांच्या घड्या घालायला ऑनलाईन काही सॉफ्टवेअर मिळतंय का बघ.
तो (निर्वाणाची दीक्षा नुकतीच मिळाल्याप्रमाणे, थोड्या सात्त्विक, थोड्या विस्मयचकित स्वरात): ह्म्म्म. मी झालोय खरा कंप्यूटर-ऍडिक्ट.
आणि मग.....................................................
तो लगेच संगणकपेटी बंद करून, तत्परतेने उठून, टीव्हीपुढे समाधी लावून बसतो.....................

1/28/09

ऋतूंचं कौतुक

भर थंडीत शून्याखाली तापमान गेलं, की सकाळी उठणे म्हणजे शिक्षा. त्यानंतर तयार होऊन, मोजे घातलेल्या हाताने खिशातून गाडीची किल्ली काढणे. कॉफीचा कप आधी गाडीच्या टपावर ठेवून मग दार उघडणे. फावड्याने गाडीच्या निदान पुढच्या आणि मागच्या काचेवरून बर्फ काढणे. तोवर मोजे ओलो होऊन बोटं निळी पडल्याचं चित्र डोळ्यासमोर दिसायला लागतं.
मग मागच्या दारातून बॅग आणि पुढच्या दारातून कॉफीसकट आपण आत शिरलो, की हुश्श्श्श्श्श्श करतांना तोंडातून वाफच निघते, आणि साध्या साध्या क्रिया करायला आपल्याला दुप्पट वेळ लागलाय, ह्या जाणीवेने म्हातारी कशीबशी निघाली कामाला- असं मनातल्या मनात मी स्वत:ला टोमणा मारून घेते.

पण आज बर्फामुळे शाळेला सुट्टी मिळाली. काय मज्जाय! भारतात खूप पाऊस झाला की, किंवा कधी जातीय दंगे असोत की बॉम्बस्फोट- शाळेला सुट्टी मिळाल्याचा आनंदच मुलांना जास्त. तशीच इथे कालपासूनच बर्फाची चर्चा सुरु झाली:
"मिस डी, तुम्हाला म्हायतीये का? बर्फ कधी होणारे?"
"आता मी काय Weatherman लागून गेलेय की मला माहिती असणारे?"
"पण लंचरूम मधे लोक म्हणत होते."
"अरे पण रात्री बर्फ पडून गेला तरी उपयोग नाही. कारण बर्फाच्या गाड्या येऊन सकाळपर्यंत तो स्वच्छ करून ठेवणार, की मग शाळेच्या बस ला काही प्रॉब्लेम नको."
"पण मग सकाळीच बर्फ पडू देत, म्हणजे सुट्टी मिळेल."
" हो हो- मागच्या आठवड्यात भल्या पहाटे ५ ला बर्फ सुरू झालं होतं. पण बर्फाचा खरा धोका तो पडतांना फारसा नसतो. बर्फानंतर मात्र रस्ते घसरडे होतात- आणि चिखल- म्हणून गाडी चालवणं कठीण असतं."

" अरे, मी ऐकलंय की उलटा पायजामा घातला की बर्फ पडतं."
" माझी आई म्हणे उशीखाली काटा-चमचा ठेवून झोपायचं."
" मागच्या वर्षी त्यांनी सुट्टी... ... ...."

ह्या बडबडीने वैतागून मी शेवटी ओरडले- की आता पुरे तुमचं बर्फ पुराण. पण मनातुन मी ही अक्षरश: प्रार्थनाच करत होते, की नेमका मध्यरात्री नंतर बर्फ पडू देत. सुट्टीचा एक दिवस मला पेपर तपासायला लागणारच होता. सकाळी ५ ला उठून मग आशाळभूतपणे आधी शाळेची वेबसाईट वाचली. शिवाय तेवढ्यात एका सहकाऱ्याचा snow-chain चा फोन आलाच. HOD ने २ लोकांना फोन आधी केला, की ती २ लोकं ठरवून दिलेल्या अजून ४ लोकांना फोन करणार- असं करत करत व्यवस्थीत सगळ्यांना शाळा बंदची बातमी कळते.

मात्र एकूणच ह्या गार प्रदेशांमधे हवामानाची चर्चा रोजच होत असते. ब्रिटीश लोक म्हणे रोजच दिवसाची सुरुवात "आज काय हवा पडलीये!" ह्या वाक्याने करतात :) इथे रूळल्यावर "उद्याचं तापमान बघून घालायचे कपडे इस्त्री करायची" सवय लागते. त्याला कारणीभूत इथले अतिशय अचूक weather forecasts म्हणावे, की लोकांना बोलायचे विषय लागतात ते- काही ही असो. पण ऋतूंचं कौतुक असतंच फार.

त्यातल्या त्यात स्प्रिंग (वसंत) आणि ऑटम (शरद) म्हणजे नाना रंगांचे ऋतू. बर्फ रोजचंच झाल्यावर पांढऱ्या काळ्याची वर्णनं तरी किती करणार? पण माझ्या Creative Writing वर्गासाठी मी ऑटमसाठी खास कविता लिहून घेतली.
त्यासाठी आधी अंगणातून पानगळीच्या कचऱ्यातून २०-२५ छान छान पानं गोळा करून आणली. आणि वर्गात जाऊन प्रत्येकाला एक एक पान दिलं. "आज आपण ह्या पानाचं अगदी सूक्ष्म निरीक्षण करून त्यावर कविता लिहणार आहोत. २ मिनिटं सगळ्यांनी नीट आपापली पानं बघून घ्या!"

आणि मग मधेच हल्ला करायचा-
"अरेरे! चुकलंच बरं का. इकडे द्या ती पानं. ती आत्ता द्यायचीच नव्हती मुळी तुम्हाला."
मग सगळी पानं गोळा करून पुन्हा हल्ला,
"ह्म्म- खरं म्हणजे, नाहीतरी तुम्ही आपापलं पान बघितलंच होतं. तर मग आता उगीच उलट्या दिशेने लेसन करण्यात काही अर्थ नाही. जरा इथे येऊन प्रत्येकाने आपापलं पान ह्या पिशवीतून परत घ्या."
मग मुलांमधे जोरात चर्चा- मोठ्ठा गोंधळ.
"ए नाही- हे पान माझं नाहिये- माझ्या पानावर पिवळे बुट्टे होते."
"माझ्या पानाचे काटेरी कोन होते."
"माझ्या पानाला लालसर छटा होती."
" अरे ते माझं पान आहे वाटतं- कारण त्याचा कोपरा दुमडलेला होता."

असं करून बहुतेक मुलांना आपापली पानं बरोब्बर लक्षात असतात. मग मुलांना विचारायचं, की तुमची पानं तुम्हाला लक्षात का राहिली? कारण तुम्ही त्यांचं सूक्ष्म निरीक्षण केलं होतंत. लेखक सुद्धा निरीक्षणातूनच कलाकृती निर्माण करतात, आणि त्यातल्या वर्णनामुळेच ती तुम्हाला आवडते, कळते, आणि लक्षात राहते.

ऑटमच्या पानांनी मी हा लेसन शिकवला खरा- पण बर्फाचं वर्णन- आधी मलाच करून बघायचं आहे...