9/16/09

पैठणी- शांता शेळके

फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे, कुंच्या, तोपडी, शेले, शाली,
त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी.

ही कविता मी प्रथम वाचली, तेव्हा "फडताळ", "नारळी पदर" असले शब्द कळतही नव्हते. आईबाबांची कागद-पत्रे ज्या कपाटात होती, तिथे त्यांची काही पुस्तकं अगोचरपणे वाचायला गेले, तर शांताबाई शेळक्यांचं "गोंदण" हाती आलं. एक कविता वाचली, कळेना. पान पुढे. दुसरी. त्यात "आवर्त" असले शब्द म्हणता म्हणता बोबडी वळते म्हणून पुस्तक ठेवून द्यावं, तोच "पैठणी" वर नजर गेली. ह्म्म्म ही कळू शकेल बुवा! बघू तरी...

माझी आजी लग्नामधे ही पैठणी नेसली होती
पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती
पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्म वास
ओळखीची...अनोळखीची...जाणीव गूढ आहे त्यास.

(काय बरं ह्या वाक्यात अर्थ प्रतीत होतो? तेव्हा कळण्याचं वय नव्हतं, पण अजूनही ते गूढ मनात रेंगाळलंय.)

धूप-कापूर-उदबत्त्यांतून जळत गेले किती श्रावण
पैठणीने या जपले एक तन...एक मन...
खस-हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली
(ह्या वाक्याशी मी दरवेळी थांबते. खस-हिन्याचा एकत्रित दरवळ! नुसतं खस-हिना म्हटलं तरी अंगावरून झुळूक गेल्यासारखी वाटली.)
शेवंतीची, चमेलीची आरास पदराआडून हसली.

वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला.
(माझ्या आजीची साडी इतकी मऊ कशी लागते? ह्याचं उत्तर मिळाल्यासारखं वाटलं.)
पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले
अहेवपणी मरण आले, आजीचे माझ्या सोने झाले.
(त्यावेळी आजीच्या मरणाच्या कल्पनेनेही रडू आलं होतं!)

कधी तरी ही पैठणी मी धरते उरी कवळून
मऊ रेशमी स्पर्शामधे आजी भेटते मला जवळून
मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यांनो, आजीला माझे कुशल सांगा.


देवाच्या कृपेने माझ्या दोन्ही आज्या अजून खुशाल आहेत, तरीपण, अमेरिकेतल्या माझ्याशी, भारतातल्या आज्यांचा, कालपटाचा धागा जुळतो, तेव्हा गहिवरून येतं. ह्या कवितेबद्द्ल लिहितांना, "कवयित्रीने सर्व संवेदना- स्पर्श, गंध, दृष्टीला खुणावणारं काव्य केलंय" असं काहीबाही लिहायला गेलेही असते कदाचित

पण एवढंच म्हणते- शांताबाई! तुमच्या कवितेने जागवलेल्या माझ्यातल्या निर्मळ मनाला, मनातल्या निरागस आठवणींना, आणि त्या आठवणींनी वाहणाऱ्या झऱ्यांना सलाम!!!

9/6/09

मी स्वत:वर प्रेम करते!

कुठून कोणजाणे, आमच्या घरच्या सगळ्यांना आत्मविश्वासाचा विंचू चावलाय. श्यामच्या आईसारखं, "माझा मुलगा पोहायला शिकला नाही, हे सांगायला मला किती लाज वाटेल होSS श्याम!" अशी प्रेमळ, पण नकारात्मक धमकी न देता आमच्या आई-बापांनी आम्हाला कायम, "पोहणं काय? सोप्पं असतं, तुला येईल पटकन् ! आमची मुलगी आहेच मुळात हुश्शार!" अशी पाठीवर थापच देऊन पाठवल्यावर मनात कधी शंकाच आली नाही- की हे आपल्याला जमेल का?


आज मोठेपणी मला पदोपदी त्यांची आठवण येते- आमचे निर्णय, आमचे विचार, आमच्या कल्पनांचं नेहमी स्वागतच करणारे माझे आईवडील सगळ्यांनाच का नाही लाभत ?
"तुला कला-शाखेत जायचं का? जा. तू जिथे जाशील तिथे मन लावून काम करशील आणि त्यात तुला यश मिळेल. पण बेटा, हा निर्णयही तू नीट विचार करून घे." हे विश्वासाने सांगणारे ते भेटले म्हणून आज माझ्या आयुष्यात मला जे करायचं होतं ते मी करू शकले.
तुम्ही पण विचार करा- तुम्ही स्वत:ला आवडता का? मला मी आवडते. ह्याला मी overconfidence समजत नाही, तर आईवडीलांनी दिलेली आत्मविश्वासाची देणगी समजते.


तुमचे केस सरळ तर नाहीतच, पण झिपरे म्हणावेत इतके नाठाळ असतांना, गालांवर थोडं अतिरिक्त मास दिसायला लागलं असतांना, लेटेस्ट फॅशनचा गंध नसतांना, किंवा मेक-अप केलेला नसतांनाही- तुम्हाला स्वत:चं रूप सुंदर नव्हे, पण आनंददायक (pleasant) वाटतं का?
उद्या तुमच्या समोर मॅट डेमन येवो, की हॅली बेरी येवो, त्यांनी तुम्हाला, तुम्ही जसे आहात तसं स्वीकारणं तुम्हाला अपेक्षित आहे का? का नसावं? प्रत्येकालाच पुढच्या माणसाकडून काहीतरी शिकण्यासारखं असतंच नं? " रोमन हॉलीडे" सिनेमात खुद्द राजकन्येलाही एका फाटक्या पत्रकाराची मैत्री, प्रेम हवसं वाटतं, ते काय त्याचे कपडे बघून?


मी स्वत:वर प्रेम करते, पण आंधळं प्रेम करत नाही. स्वत:च्या चुका कबूल करायला लाजत ही नाही. पण स्वत:वर प्रेम केल्यामुळे मला इतरांवर प्रेम करायला जमतं. कुणाचं यश बघून असूया वाटणे, पगारांची तुलना करून त्यात कमीपणा वाटणे, हे मला फार विचित्र वाटतं. अरे, झोपडपट्टीत तुम्ही उपाशीपोटी असतांना पुढच्या माणसाकडे वडापाव असेल, त्याची असूया वाटणं सहाजिक आहे, पण तुमचे केस पांढरे, आणि इतरांचे काळे म्हणून असूया वाटावी???


मी खूपदा विचार करते, की नेमकं आपलं स्वत्त्व कशात असतं? कशात असावं? कुणाचं दिसण्यात, कुणाचं पैशात, तर कुणाचं एका आवडत्या ब्रॅन्डच्या सिगरेटीतही स्वत्त्व असतं. मला वाटतं, स्वत्त्व हे असं कुठल्यातरी मूर्त-अमूर्त गोष्टीला चिकटवूच नये. त्याची गरजच नसते. तुम्ही तुम्ही आहात- हेच तुमचं स्वत्त्व असतं.


स्वत:वर प्रेम असेल, तर ते तुमच्या कामात, तुमच्या कपड्यात, आयुष्याच्या प्रत्येक पैलूत सकारात्मक रीतीने प्रकट होतं. मी स्वत:वर प्रेम करते, म्हणून मी स्वत:ला चांगल्या गोष्टी मिळाव्यात म्हणून धडपडते. माझं काम चांगलं व्हावं म्हणून धडपडते. त्यातला आनंद मिळवल्यावर मला त्या आत्मविश्वासाच्या विंचूबद्दल फार कृतज्ञता वाटते. आणि मला हा आत्मविश्वास आहे, म्हणूनही मी स्वत:वर प्रेम करते!
तुम्हाला काय वाटतं? स्वत:वर प्रेम करावं का?