4/30/13

लेखनप्रपंच

वाटे का लेखन। झाले आता बंद
डोके झाले मंद। कशापायी?

दिसामाजी काही । लिहीणे वाचणे
समर्थांचे सांगणे । नित्य असे

तेवढी चिकाटी । आणावी कुठून?
वृक्ष हा वठून । चाललासे

जालावर फार । लेखन सुमार
त्यात लेख चार । आपलेही

शब्दांचे बुड्बुडे। जगती क्षणभर
मनामधे घर। करीत ना

प्रकाशित होता । पुन:पुन्हा पाही
प्रतिसाद काही । आले का ते

स्वार्थाचा डोलारा । शब्दांचा फुलोरा
माझा मी दुजोरा । देत राही

लेखनप्रपंच । नाही बरे सोपा
सुगरणीचा खोपा । आकारतो

अस्तित्वास हवे। नित्य होणे नवे
तेव्हा शब्द-थवे। उडतील

ज्ञानेश माऊली । धरावी साऊली
प्रार्थना पाऊली । तुमच्या ह्या...