12/20/10

मनातलं गाव

प्रत्येकाच्या मनातलं एक गाव असतं.
एक छोटंसं घर, त्यातली बाल्कनी आणि खिडकीतुन दिसणारं आकाश, आणि त्यापुढच्या वळणावर पत्र्याची पोस्टाची पेटी- लहानपणी बहुतेक मनातलं गाव बस्स एवढंसंच असतं.
थोड्या वर्षांनी त्यात भर पडत जाते - कॉलेजकट्टा, चार-दोन सिनेमा थिएटर्स, उसाच्या रसाची टपरी, नाहितर ठरलेला उडपी/समोसेवाला...
मग खूप दिवस एक नशा चढते- त्याच त्या वळणांना फाटे देऊन नवीन नवीन जागा हुड्कायच्या, नवे अनुभव अनुभवायची नशा...
आपण पंख पसरले, की सगळं जगच आपल्या अवाक्यात येऊ शकेल की काय, हे आजमावून बघायची नशा...

अजून काही वर्षांची पानगळ होऊन जाते, तेव्हा आपण इटालियन, मेक्सिकन, टर्किश काय वाट्टेल ते खाऊ लागलेलो असतो. शब्दकोषात "ब्लॅक फ्रायडे", "स्प्रिंग क्लीनिंग" अशी भर पडलेली असते. आता जग बघण्यातही काही थ्रिल राहिलेलं नसतं, कारण दोन पैसे गाठीशी बांधले, तर कोणीही ते करू शकतं की!!!

तरीपण ते मनातलं छोटं गाव काही पुसट होत नाही. उलट अजून रंगीत, अजूनच स्पष्ट होत जातं. तीच बाल्कनी, खिडकीतून दिसणारं आकाश, आणि वळणावरची पोस्टाची पेटी - येवढंच काय ते खऱ्या अर्थाने आपलं होतं- बाकीचं सगळं ते फांद्यामधून पसरणं, आकाशाकडे झेपावणं, जगाला मिठी घालणं - ते फक्त धूसर स्वप्न होतं असं वाटायला लागतं. स्वप्नात कदाचित आपण वाटच चुकलो होतो... आता जाग येतेय, ही जाणीव.

आपल्या मनातल्या गावात- लोकांकडे रंगीत टीव्ही असतांना, आपला मात्र १०x१० चा श्वेत-श्याम होता. मोठ्या शहरातल्या मुली फाडफाड इंग्रजी बोलत, उंच टाचांचे सॅण्डल आणि जीन्स सर्रास घालत होत्या, तेव्हा आपण बावळटासारखे "मृत्यूंजय" वाचत, कुंकू पंजाबी ड्रेसमधे हौस करत होतो. कॅन्टीनचे समोसे खातांना २-२ रूपयांचाही हिशोब चोख ठेवत होतो. तो पीळ काही केल्या सुटत नाही.

न्यू यॉर्कातल्या बड्या ब्रॅण्डच्या दुकानांमधे "आपल्याला घालण्यासारखं काही नसतं" असं वरवर म्हणतांना, खरं तर तिथले सेल्समनही आपल्यापेक्षा जास्त सोफिस्टिकेटेड असल्याची लाज वाटत असते. मारे इटालियन खातांना, अजूनही गोऱ्यांपुढे आपले काटे-चमचे धड चालताहेत की नाही हे सारखं चाचपून बघण्यात जेवणाची मजाच निघून जाते... देसींची नवीन पिढी कशी, अर्ध्या बर्गरने अमेरिकन होऊन सहज ४-५ हजार डॉलरची खरेदी, दर उन्हाळ्यात व्हेकेशन करत असते...तसे बेफिकीर आपण कधीच होऊ शकत नाही, ह्याचं मनातून एकीकडे फार वाईटही वाटत असतं.

आताशा तर जगात कुठेही गेलं, तरी मनातल्या त्याच गावाचा नकाशा सगळ्या रस्त्यांवरून अंथरल्याचा भास... नवीन काही नकोच वाटतं आताशा!

ज्या स्मृतींनी झाडाच्या मुळांसारखी "बांधिलकी" द्यायची, त्यांनीच आपण "बांधून" घ्यायचं? मनातल्या त्या सुरक्षित कोपऱ्यातून धडपडल्यावर पुन्हा उठायची शक्ती घ्यायची, की पडायची भीती?
तुम्हीच ठरवा!

12/2/10

भिंतीच्या पलिकडे

माणसा-माणसांत भिंती का असतात? कधी दृष्य, कधी अदृष्य, पण पावलोपावली आपण सतत त्यांच्यावर आपटून ठेचकाळतच असतो, इतक्या कठीण!
किती दिवस/वर्ष लागतात माणसांना एकमेकांशी मोकळं व्हायला? कधी एक भेट पुरते, आणि कधी जन्मही पुरत नाही- अशा भिंती भेदायला... परक्यांचे सोडा- अगदी जुनी मैत्री म्हणावी तर ती पण कधीकधी फक्त सोयीची, तात्पुरती आणि वरवरची वाटायला लागते तेव्हा? तेव्हा मनातले कुठल्या अदीम उर्मी जिवंत होतात ती भिंत तोडायला?
Something there is that doesn't love a wall,
That sends the frozen-ground-swell under it,
And spills the upper boulders in the sun;
And makes gaps even two can pass abreast.

Robert Frost च्या Mending Wall चे पहिले शब्द.

काहीतरी आहे असे, ज्याला भिंती आवडत नाहीत. बर्फाच्या कडक थरातून उरी फुटून निघत ते कोवळे कोंब,वरचे दगड खिळखिळे करून टाकतात. त्या खिंडारातून दोन माणसेही जातील इतकी फट पडते नकळत...

मुद्दाम उकरून भेदरलेल्या सशाला बाहेर काढण्याचे रूपक सार्थपणे वापरत फ्रॉस्ट स्पष्ट सुचवतोय- एकमेकांच्या अंतरंगात शिरून, दुखावलेल्या कोपऱ्यावर फुंकर मारणारी मैत्री वेगळी, आणि उलट दुसऱ्याच्या मनातले काढून घेत त्यावर दुसरीकडे तिखटमीठ लावून चर्चा करणारी "मैत्री" वेगळी.
पण भिंतीतूनही सहज दोन मनांमधे निर्माण झालेली वाट - तिचं कौतुक करण्याची परिस्थिती नसते. शेजारधर्म म्हणून का होईना, खिंडार बुजवण्याची जबाबदारी दोन्ही घरधन्यांवर येऊन पडते.

Good fences make good neighbors!

हे सौजन्यपूर्ण अंतर राखायचं बाळकडू शेजाऱ्याला त्याच्या वडिलांकडून मिळालेलं, आणि त्याने विचारांती मान्य केलेलं. अल्याडचे दगड ह्याने बसवायचे, पल्याडचे त्याने, अशी नेमकी वाटणीही आपसूकच झाली. मग स्वत:ची पाठ थोपटत दोघे कामाला लागले. मागच्या बागांचा एवढा प्रश्न नाही, कारण त्याचे pines काही माझ्या apples मधे मिसळून गोंधळ होणार नाहिये. आणि एकमेकांच्या परसात शिरून नासधूस करायला आम्हा दोघांकडे गाईगुरंही नाहियेत.
झालंच तर मग. ओळख, मैत्री, घरोबापण- अशा सर्वमान्य नियमांतूनच वाढत नसतो का? काल मी नेलेली वाटीभर साखर उद्या परत करणारच, किंवा तुमच्या घरची भांडी आमच्या घरी संक्रमण करायला लागली, तर तुम्ही सहज बोलताबोलता त्याची आठवण करून देणे!

पण ह्या सोप्या कुंपणाचीही वाढत वाढत भिंत कधी होते तेच कळत नाही. आणि मग मनात एक टिटवी किलबिलतेच.

Before I built a wall I'd ask to know
What I was walling in or walling out,
And to whom I was like to give offense.
Something there is that doesn't love a wall...

आपण घराभोवती भिंत घालता घालता, स्वत:लाच कोंडून घातलंय का आत?

पार्टी, हाय-हॅलो, पिक्चर, राजकारण, बाष्कळ विनोद, पुस्तकांच्या चर्चा. बास. इतकीच असते का मैत्री?
इतकीच सौजन्यपूर्ण, अंतर राखून, जबाबदाऱ्या समंजसपणे वाटून, आपले दोन शब्द बोलून झाले, की त्यांच्या दोन शब्दाची वाट बघणारी मैत्री? विषयांच्याही मर्यादा घालून घ्यायच्या असतात कुठल्या कुठल्या "मित्रांच्या" कंपूत बोलतांना?

ते ही एक कुंपण भेदून खरंच आपल्या रोजच्या सुखदु:खांबद्द्ल आपण कधी बोलू शकणार आहोत? काठावर पोहून कधी संपणारे, आणि कधी येईल त्या मैत्रीत एवढी शक्ती, की आपण खरोखरीच एकमेकांच्या अंतरंगात खोल डोकावून पाहू शकू, आणि नुसते बोलून नव्हे, तर कृतीने ते दाखवू शकू?
कधी बोलू शकणार आहोत आपण हक्काने फक्त हे चार शब्द- काय गं? कशी आहेस?



10/29/10

जजमेंट

प्रत्येका कडे पहिल्या डावात १०-१० पानं. हुकुम ठरलेलाच असतो. बदाम.
वडील: "हुकुमाची ३ पानं आहेत, पण त्यातलं एक जरा हलकं. आणि चौकटचा राजा. आपल्याकडे सगळ्या रंगाची पानं असल्यामुळे तसा राजाचा हात व्हायला हरकत नाही. तरीपण, इकडचे तिकडचे सोडून २ च हात सांगावे. नेहमी पदर पाहून पाय पसरावे. नजर आकाशावर, आणि पोच फक्त खिडकीपर्यंत, त्यापेक्षा नकोच ते! अडी-अडचणीला, सणा-सुदीला पैसे लागतील म्हणून जपून जपून शिल्लक टाकायची आपली सवय! ती ह्या नवीन पिढीला काय कळणार?"
नवरा: "ह्या! तुम्ही आग्रह केला म्हणून हे असले फालतू खेळ खेळावे लागतायत." असं आधीच म्हणून टाकलं, की कितीही हात होवोत, न होवोत, उगीच विचार करायचं काम नाय. आता सगळ्या घोड्यांवर थोडी थोडी इस्टेट लावून टाकली, की एखादं तरी घोडं जिंकेल, तश्या ह्या ४ भारी पानांपैकी ३ तरी हात होतील, झालं सांगून टाकावं. मग इतरांचे डिसिजन होईपर्यंत हळूच iphone :)"
आई: "आई म्हटलं की सगळ्या गोष्टींवर प्रेमच करावं लागतं. मुलाबाळांवर प्रेम, आता सुनांवर प्रेम, एवढंच नव्हे, तर भाजी पाल्यावर प्रेम, साड्यांवर प्रेम आणि पत्त्यांवरही प्रेमच. मगाशी नेमका माझा एक्क्याचा हात कापलान सुनबाईने. आपणही त्या एवढ्याशा हार-जीतीवर किती हीरिरीने अडून बसलेलो होतो! शेवटी सगळे हात मोजायला लागल्यावर मी फेकून दिलं ते कापलेलं पान, आणि झालेच माझे बोलल्याप्रमाणे २ हात. तर काय? परवा ५-३-२ खेळत होतो, तिने २ हात काय ओढले माझे- तेव्हाही इतकं लागलं मनाला... ह्यावेळी नाही हं. करूनच दाखवीन ३ हात, तर मज्जा येईल.
इतकी वर्ष हातात एकच धड पान असलं, तरी त्याच्या भरोशावर अगदी १० माणसांचा नाही, पण ४-५ जणांचा संसार चालवतांना कशी जिवाची तडफड झाली, हे आजकालच्या मुलींना नाही कळायचं. त्यांना स्वत:चे हात करून हातभार लावता येतो म्हणून टिमकी मिरवतात... पण आधी रोजच्या भाजीत मीठाचा अंदाज येत नाही अजून, आणि चालल्या जजमेंट खेळायला! आता मात्र मी ठरवलंय. मन म्हणेल तसं जगायचं. आधीही सासूच्या राज्यात आम्हीच मन मारलं, आणि आताही सुनेच्या राज्यात आम्हीच का म्हणून मारायचं? हं. माझे दणकून लिहि रे ४ हात.!"
माऊ: "सध्या माझे मज्जेचे दिवस चाललेत अगदी. दादा-वहिनीने अमेरिकेतून amazing कपडे आणलेत, आणि कॉलेजला सुट्टी असल्यामुळे नुसते पार्ट्यांना, आईसक्रीम खायला जातांना ते अगदी perfect होतायत. परवा शीना म्हणाली, "ए तुझ्या दादा-वहिनीला सांग ना माझ्यासाठीपण next time स्वेटशर्ट आणायला! मी पैसे देईन इथे." मनात म्हटलं, हो, सगळ्यांसाठी आणायला बसलेत माझे दादा-वहिनी रिकामे. प्लस, सगळ्यांनाच आणले, तर माझं स्पेशल काय राहिल त्यात?" हो हो. हातच सांगायचेत ना.......... १० पानं........ बाबांचे २-दादाचे ३ आणि आईला तर absolutely हिशोब येत नाही. म्हणजे आपण रिस्क घेऊन ५ सांगितले तरी होतीलच आपले. वहिनी गोSSड्च आहे. मागच्या डावात म्हणाली, "मार दिया जाए...?" पण सोडला माझा एक critical हात.
तसाही ५ is my lucky number. 12th चा रोल नंबर, आता माझ्या नवीन स्कूटीचा नंबर, आणि अक्षयचा बर्थ डे......इश्य......
मी: सगळ्यांनी नाही नाही म्हणता वेळ घेतलाच हात बोलायला, आणि आता सगळ्यांचे झालेत बोलून, तर माझ्या मागे घाई. सगळ्यांनी भरभरून हात सांगितलेत. एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून ह्यांच्याकडे? आणि नाही झाले, तर स्वत:च नाही, दुसऱ्यांनाही बुडवतील स्वत:बरोबर. बहुतेक तरी बुडणारी मीच एकटी असणार. त्यांच्या सारखा विचार करणं जमतच नाही अजूनही- संसाराला इतकी वर्ष झाली तरी. विचार करण्याची "कुळकर्णी" पद्धत आणि "देशपांडे" पद्धत..... असे क्लास घ्यायला हवे होते दोन्ही पक्षी लग्ना-आधी.
पानं १०च, तरी माऊ ५ हात बोललीये येडी. मागच्या डावात मी सगळे राग-रंग ओळखून शून्य हात सांगितले, तर ते ही होऊ नयेत माझे सुरळीत? हा डावच आपला नाही म्हणा. पत्ते वाटणाऱ्याला स्वातंत्र्य नसतंच, मनासारखे हात बोलण्याचं. तसेही, सगळ्यांचे विचार असे आदळतायत कानांवर चोहीकडून, की मला खरोखर, मनापासून किती हात करायचेत? तेच उमगेनासं झालंय. ओ गॉड, आता मी जितका वेळ लावेन, तितके कॉमेंट्स येतील. "किती हळूहळू काम असतं न हिचं! आंघोळीलाच तासभर लावते रोज." घ्या, आता नवरोबाही त्यात सामील. अहो, देवीजी, तंद्रीतून बाहेर या ना आता....."
हं. शून्य. पुन्हा शून्य? हो. पुन्हा शून्य. आता खेळ संपेपर्यंत शून्यच फक्त. फारसा विचार करावा लागत नाही शून्य बोललो की. पानं जाळत बसायचं आरामात. खेळलोच नाही असं तर होणार नाही....
मग एकदा मज्जा करायची. चांगली पानं आली तरी शून्य. आणि कसे बुडतील सगळे गंमत बघायची. थोडा थोडा आनंद चोरायचा. The one who laughs at last....


10/27/10

ओळख


एकदा ना, एक साधूबाबा होते. ते रोज सकाळी गावातल्या रस्त्यावरून नदीकडे स्नानाला जायचे. आणि रोज एक दुष्ट माणूस आपल्या घराच्या गच्चीवरून त्यांच्यावर कचरा फेकायचा, त्यांना शिव्यांची लाखोली वहायचा. एक दिवस तरी हे साधूबाबा चिडतील, वैतागतील, आणि मग आपण त्यांची मजा पाहू अशी लालसा त्याच्या मनात होती. पण साधूबाबांची मन:शांती एकदाही ढळली नाही. ह्याने कचरा फेकला, की ते शांतपणे जाऊन पुन्हा स्नान करून येत. ह्याने शिव्याशाप दिले, तरी त्याच्याकडे बघून सदैव स्मित करीत.
आपण काहीही केले, तरी साधूबाबांवर परिणाम होत नाही, असे बघून मग एक दिवस ह्याला उपरती झाली. त्यांच्या पायावर लोळण घेऊन ह्याने विचारले- "बाबा, मी तुम्हाला एवढा त्रास दिला, तरी तुम्ही कधीही माझ्यावर संतापला नाहीत. हे एवढं चांगलं वागणं तुम्हाला कसं जमतं?" तर बाबा म्हणाले, "अरे सोप्पंय ते. तू मला शिव्या दिल्यास, त्रास दिलास, पण तो मी घेतला कुठे! त्यामुळे तो मला झालाच नाही."

ही गोष्ट मला परवा आठवली, आणि आरशात स्वत:चाच चेहरा बघून दचकायला झालं. लहानपणचा निरागस चांगुलपणा, परीकथांवर विश्वास, मनाचे श्लोक पाठ करणेच नव्हे, तर त्यातले "संस्कार" मनापासून पाळणारं ते माझं भारतीयत्व होतं, की फक्त कोवळं वय? बालपणातला तो देवत्त्वाचा अंश होता, की एका सुरक्षित, स्वप्नाळू बालपणाची झापडं?

आता संसारात, सासूरवासात ऐकून घ्यायला लागणारे निरर्थक टोमणे, न पटणाऱ्या अपेक्षा, रोजचे अनाहूत सल्ले ह्यांना तोंड देतांना का आठवत नव्हती मला त्या साधूबाबाची गोष्ट?
"तुम्हा आजकालच्या मुलींना संसाराची आवडच नाही!"
" नवऱ्याला अरेतुरे करता, तिथेच सगळं बिघडतं"
" सकाळी लवकर उठून कशी झटझट कामं झाली पाहिजेत."
" हे झिपरे केस, डोक्याला ना टिकली, ना गळ्यात मंगळसूत्र! ह्या आमच्या मुली-सुना म्हणायची लाज वाटते."
" देवाजवळ रोज दिवा तरी लावत जा- बाकी काही नसेल."
" एवढ्या सुखात रहाता, तरी तुम्हाला काय प्रॉब्लेम असतात? ३-४ च महिन्यांसाठी काय तो सासुरवास. अमेरिकन सून ही चालली असती की मग आम्हाला."
" दोघांपैकी एकाने (म्हणजे बायकोने) ऐकून घ्यायलाच पाहिजे. नाहीतर तुम्ही रात्र अशीच भांडणात घालवणार!"

मी साधूबाबा असते तर माझ्याही अंगावरून ओघळून गेल्या असत्या ह्या गोष्टी. पण मग मीच एक का म्हणून भगवे घालून चांगुलपणाच्या वाटेवर कुचुकुचु काटे टोचून घेत चालायचं?" रांगोळ्या घालण्यापासून पुरणपोळी असो, की स्तोत्र असोत, सगळ्या सो कॉल्ड संस्कारांचं बाळकडू माझ्या सुदैवाने मला मिळालं, आणि ते मनापासून आवडत ही होतं.
फरक फक्त येवढा, की माझ्या संस्कारांचा उगम शिक्षणात होता, विश्वासात आणि समर्पणात नव्हे. मोठ्यांनी "हे कर" सांगितलं, की ते करायचं, इतक्या सरधोपट आणि विचारहीन पद्धतीने मी ह्या गोष्टी आत्मसात केल्या नव्हत्या.

चांगलं वागणं नेहमीच जास्त कठीण असतं. लहानपणी तसेही फारसे कलह आपल्या आयुष्यात नसतात, म्हणून ते सोप्पं वाटत असतं. पण आता तेच सालस विचारही "कर्तव्याचा" काटेरी मुकुट घालून पुढे येतात, तेव्हा मनावर ओरखडे उठणारच!

पण मग भारतीयत्त्व, साधूबाबा, चांगुलपणा, हे सगळे आदर्शवाद मी गुंडाळून माळ्यावर टाकले, आणि आधुनिकतेच्या धर्मातला पहिला धडा उघडला- प्रॅक्टिकली विचार करायला लागले. पण खरं म्हणजे आपण साधूबाबांसारखं व्हायचं, ते आपल्या मन:शांती साठी, हे सोप्पं लॉजिक लावलं, आणि प्रश्न सुटला. बोलणं सोप्पंय, वागणं अवघड, पण आता ते तसं का वागायचं, हे तरी कळलंय. आरशातल्या चेहऱ्याची, त्यातल्या बदलांसकट ओळख पटलीये.




8/22/10

विराग

दारासमोर माझ्या फुलणार बाग होता
का व्यर्थ पावसाचा मग पाठलाग होता?

राशी किती सुखाच्या मी ओंजळीत पेलू?
जगण्यावरील माझा इतकाच राग होता!

कळली जगा न माझी व्याख्याच वेदनेची
काव्यात्म अनुभवाचा तो एक भाग होता!

भिजवून ओठ माझे दिधली तहान ऐसी
जीवना सखया तुझा तो अनूराग होता.

हिरवी बघून पाने फुलल्या कळ्या नव्याने
एका क्षणाचपुरता माझा विराग होता!




8/19/10

मोल

दोन कवी, दोन्ही ही अलौकिक प्रतिभा घेऊन आलेले. आणि तरीही दोघांनाही सारखेच प्रश्न पडावे!

"एकदा भेटून जा रे, दिव्यतेच्या पांडुरंगा,
हुरहुरे प्राणांत माझ्या वेदनेची चंद्रभागा
तूच ये घेऊन दिंडी, होऊदे माझीच वारी,
ताणली ताणापुढे मी जीवनाची एकतारी."


ह्या काही ओळींची मला सारखी प्रचीति येते. रोज करोडो लेख, रोज नवे पुस्तक, रोज नवा ब्लॉग, रोज नवे लेख, रोज नवी नावे, आणि सगळेच अप्रतीम, अलौकिक लिहिणारे! त्यांना दुरून बघायचं, आणि एकदा तरी त्या दिव्यतेचा स्पर्श आपल्याला व्हावा म्हणून झटायचं!

ह्यांना कुठून धाडस येतं अक्षरश: "झंझावाता" सारखं लिहत सुटायचं? कुठुन शब्द येतात? कुठून कल्पना? कशी जमते इतक्या पारदर्शीतेने भावना मांडतांनाही त्यांचं सौंदर्य टिपण्याची कसरत?

मग कधीकधी वाटतं आपलं लिहणं तर काय? खूप सोप्पं आहे- शब्दांचे बुडबुडेच काय ते. दोन क्षण आनंद देऊन गेले तरी पुरेत. लाखो लोक आपापल्या मती/गतीनुसार लिहितच असतात की. "राजहंसाचे चालणे/जगी झालेया शहाणे/म्हणोनी काय कवणे/चालोची नये काय?" - बघा, हे सुद्धा पु. लंनी आणि त्या ही आधी कोणी तुकारामांनी लिहूनच ठेवलंय की महाराजा, आणि ते ही ओवीबद्ध.

हेच ते कधीकधी अशक्य श्वास कोंडल्यासारखं होणं, जेव्हा मीसुरेश भट वाचते, कुसुमाग्रज वाचते.

"असेच काही दुरूनि पाहणे, वा वा म्हणणे,
पिटात जागा अपुली राखुन
अलौकिकाच्या दिव्यात दुसरे, अपुले व्हावे
प्रेक्षागारी व्यतीत जीवन.

तेच सुरक्षित तेच समंजस ते सालसपण
बिकट वाट वहिवाट नसावी
अतर्क्य नियती! अशी मुलाखत आकाशाशी
पंखावाचुन भाळी असावी!"

कुसुमाग्रजांच्या "अतर्क्य" कवितेतल्या ह्या ओळीपण किती सुरेश भटांच्या कवितेशी जुळतात! खरे तर हे दोन्ही कवी अलौकिकाच्या प्रकाशात आकंठ न्हायले, आणि प्रेक्षागारी बसलो आपण. आणि तरीही त्यांच्याच शब्दातून आपल्याच भावनांना इतके सुंदर रूप मिळावे, हाच तर खरा विरोधाभास आहे.

बोलणे सारेच आता फोल जाहले
त्यांचेच आज माझे हे बोल जाहले.

ती लाट अर्णवाची, क्षितिजास हात टेके-
डबक्यात पोहुनीही मी "खोल" जाहले!

काहीतरी लिहावे, सुचते तसे परंतू
शब्दांपुढे कशाचे, ना मोल जाहले.

7/23/10

ऋण

वेदनेच्या वाळवंटी एक अश्रू दान दे
एवढ्या स्वप्नास माझ्या पूर्णतेचा मान दे

मी-पणाची भरजरी लेऊनी आले पैठणी
फाटक्या पदरात तू समर्पणाचे वाण दे

वृक्ष वठला देठ सुकले, सूर्य ये माथ्यावरी
नको आता अंत पाहू पावसाचे पान दे!

किती मी दु:खे स्वत:ची पाळली, कुरवाळली
आर्ततेची साद दुसरी ऐकण्याचा कान दे!

जीवना, सखया तुझे फेडीन ऋण मी रोजचे
सुंदराची मोहिनी दे, अंतरीचे गान दे!



4/30/10

नादान हैं जो...

परवा कामावरून परत घरी येतांना रेडियो सुरू केला, तर अचानक तलतचा आवाज- मला एकदम माहेरचं माणूस भेटावं तसं झालं. लहान असतांना आमच्या घरी पं. जीतेंद्र अभिषेकी, पं वसंतराव देशपांडे, हे देव होते. फक्त शांतपणे देवघरात बसून नैवेद्य खाणारे देव नव्हे, तर सुरांची शिडी करून, त्यांच्या बरोबर आपल्यालाही स्वर्गात बरोबर घेऊन जाणारे देव...
तलत आणि लता मात्र घरचेच होते. दुपारी चहा पितांना किंवा रात्री आईस्क्रीम खातांना गप्पा रंगवणारे family friends! आमच्या बाबांची सवय होती, एक गाणं आवडलं, की ते टेप घासेतोवर वाजवायचं, आणि वाजवतांना स्वत:ही आळवायचं... तेव्हा पाठ झालेला तलत......तो काल परत......अचानक!

हैं सबसे मधुर वो गीत जिन्हे
हम दर्द के सुर मे गाते हैं...........हम दर्द के सुर मे गाते हैं ।

माझा अतर्क्यावर विश्वास आहे. हे गाणं होतं, की माझी मनस्थिती समजून घेणारी अज्ञात शक्ती? कॉलेजात असतांना Percy Bysshe Shelley ची "To a Skylark" शिकतांना, त्यावर आधारित हे गाणं ऐकून एकदम ती कविता पण उमजल्यासारखी झाली होती.

Skylarkच्या स्वर्गीय आवाजाची अमूर्तता शेली ला दु:खांच्या पलिकडच्या जगातून आल्याचा भास होत होता. "तू कवी आहेस, आपल्याच भावविश्वाच्या किरणांत लपलेला, जगाला आशा-निराशेच्या द्वंद्वाची जाणीव करून देणारा?" "की तू बागेतला काजवा आहेस, फुलापानांआड दडून स्वैर गुणगुणणारा?"


लाख उपमा देऊनही न सुटलेलं कोडं असं, की तुझ्या गाण्यामागची स्फूर्ती कुठली आहे? दु:खाचा लवलेशही नसलेला शुद्ध परिपूर्ण स्वर- पृथ्वीवरच्या अर्ध्या-अधूऱ्या जगण्यातून तो स्वर आम्ही आणावा कुठून?

We look before and after,
And pine for what is not:
Our sincerest laughter with some pain is fraught;
Our sweetest songs are those that tell of saddest thought.

काँटों मे खिले हैं फूल हमारे
रंगभरे अरमानोंके......रंगभरे अरमानोंके ।
नादान हैं जो, इन कांटोसे
दामन को बचाए जातें हैं ॥

दु:खातून मुक्ती नव्हे, तर दु:खापासून पळवाट काढणाऱ्या skylark च्या स्वर्गीय, अमर्त्य गाण्यापेक्षा, दु:ख पचवून पुढे जाणा़या माणसाचा चा शेलीने पुरस्कार केला. दु:ख सोसल्याशिवाय सुखाची व्याख्या करता येत नसते, हे शेलीच्या कवितेचं सार आहे.

पण शैलेंद्र सिंग ह्यांचे बोल तिथेच न थांबता, उत्तुंग आशावादाकडे आपल्याला घेऊन जातात.
जब गम का अंधेरा घिर आए,
समझो के सवेरा दूर नही..........दूर नही ।
हर रात का है पैगाम यही
तारे भी यही दोहराते हैं.......... तारे भी यही दोहराते हैं॥

दुसऱ्यांच्या दु:खात समरस होऊ शकण्यात माणसाच्या अश्रूंची खरी पवित्रता दिसते.

पहलू में पराये दर्द बसाके,
हँसना हँसाना सीख ज़रा..... तू हॅंसना हॅंसाना सीख ज़रा
तूफान से कहदो घिर आए,
हम प्यार के दीप जलाते हैं....... हम प्यार के दीप जलाते हैं ॥

जब हदसे गुज़र जाती है खुशी
आँसू भी छलकते आते हैं........ आँसू भी छलकते आते हैं॥

4/23/10

Life is a two way street.

आज हा ही अनुभव घेतला. काय असतं "नोकरी जाणं"? जेव्हा हातातून काहीतरी निसटत असतं, तेव्हा आपल्याला काय काय मिळालंय, ह्याची जाणीव होणं?

लाखो लोक येतात आपापली स्वप्न घेऊन, अमेरिकेत. The American Dream.

१० खोल्यांचा महाल, त्यात संगमरवरी स्विमिंगपूल, दारात ४ गाड्या, घरात ४ मुलं..... सगळं मिळालंच पाहिजे, आणि ते ही भरभरून मिळालं पाहिजे हा अट्टहास म्हणजे खरं अमेरिकन स्वप्न नव्हे. आज जगात अमेरिकेची image काही ही असो, पण स्वत:च्या निष्ठेने आणि कष्टांनी, स्वतंत्रपणे जे हवं ते मिळवता येण्यासाठी जी सामाजिक घडण लागते, ती सगळ्यांना उपलब्ध असणं, हे खरं अमेरिकन स्वप्न आहे.

ह्याचा अर्थ असा नव्हे, की ह्या समाजात असमता नाही. पण जेव्हा अमेरिकेत पहिल्या वसाहती निर्माण झाल्या, तेव्हा जुन्या पश्चिमी राजवटीला पर्याय शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कुणाच्या धर्म, जात, सामाजिक स्तरावरून त्यांच्या कर्तृत्वाची झेप ठरू नये, ह्या विचारातून capitalism आणि individualism चा उदय झाला.

गेली ५ वर्ष मी थोड्या अंशी ते अमेरिकन स्वप्न जगते आहे. आणि आज त्याचं झालेलं दु: स्वप्न ही अनुभवायला मिळालं. इतर कुठल्या देशातल्या विद्यार्थ्यांनी, सहकाऱ्यांनी, मला इतकं सहज समजून घेतलं असतं? इतर कुठल्या देशात माझा रंग नाही, तर केवळ माझे विचार आणि गुणवत्ता हे निकष ठरले असते?

अर्थात, अमेरिकेतही वेगवेगळ्या राज्यांमधे खूप तफावत आहे, व्यक्तिसापेक्षही खूप तफावत आहे. पण माझ्यापुरतं, माझ्या छोट्या कुटुंबापुरतं तरी ते स्वप्न आजवर खरं होतं.

माझी नोकरी गेली. चूक कोणाची? कोण बरोबर? हे विचार आधी मनात आले ही होते. वेगवेगळ्या लोकांना (स्वत:सकट) दोष देऊन झाले ही होते. Rather, सगळंच एकट्या माणसाच्या खांद्यावर टाकून वर मानभावी पणे, "हे अमेरिका आहे- इथे कोणीही नशीब काढू शकतं, आणि तुम्ही नशीब काढलं नाही तर तुमच्यातच काहीतरी कमी आहे!" हे सांगणाऱ्या अमेरिकन स्वप्नाच्या विचारसरणीलाही निकालात काढून झालं.

पण आज जेव्हा ती वेळ आली, तेंव्हा मिटिंगरूम मधे गंभीर चेहऱ्याने मला "वाईट बातमी" सांगणारे लोकच मला स्वत:पेक्षाही जास्त ओशाळलेले वाटले. तेंव्हा मला पुन्हा आरशात लख्ख माझा चेहरा दिसला. कधी माझा वृथा अभिमान दिसला, कधी वैयक्तिक कारणांमुळे हरवलेल्या दिशा दिसल्या, कधी निव्वळ कामाने थकून गेलेला जीवही दिसला.

आणि मला कळलं- Life is a two way street. मनातून जी साद निघते, त्याचे अगदी तस्सेच पडसाद नियतीत/जगात/आसमंतात उठत असतात. आता थांबून पुन्हा मनन करायला हवे...

3/21/10

मातीमाय

स्वच्छ पांढऱ्या फ्लॉवरची
खुडलेली देठं
भेगेत मिटून ठेवलेलं
गव्हाचं गुपीत
मातीतुनही मेथीचे हिरवे
कोवळे कोंभ

हे जीवन सुंदर आहे.

तडतडणाऱ्या मोहरीच्या तालावर
थुईथुई नाचती मिरची बघतांना
पिवळ्या हळदीवर हिरवे मटार
कुंचले झाले जगतांना

दुपारचा चहा, खारी बिस्कीटं
चिवडयातला कुरकुरीत कढीलिंब
ओल्या नारळाचा चरबरीत गोडवा
भातावर तुपाची सोनसळी धार

श्रीखंडातल्या केशरागत
क्वचित मुरलेल्या स्वप्नांची
तीट लागली जन्माला
टम्म फुगल्या पोळ्यांची

तिने दिलेला जन्म चाखतो
रोज दिवाळी घरोघरी
हवे आणखी काय मनाला?
उद्या मिळावा आजपरी...




2/23/10

Sistine Chapel आणि देवाचं बोट

काही दिवसांपूर्वी Frank O'Hara नावाच्या कवीच्या कविता वाचनात आल्या. विसाव्या शतकात दोन महायुद्धांनंतर अतिशय क्लिष्ट होत गेलेल्या जीवनाकडे बघणाऱ्या लेखकांची एक लाट तेंव्हा उदयाला आली, ज्यांना आपण आज "modernists" म्हणून ओळखतो.

"My love is like a red red rose" म्हणणारी Robert Burns ची सोळाव्या शतकातली कविता बाळबोध म्हणा्वी इतकी साधी सरळ होती. समकालीन शेक्सपियरच्या लेखनातली खोली त्या काळच्या इतर कुठल्याही लेखकात आभावानेच आढळते कारण एकूणच तेव्हा आपल्या देव-धर्म, नीतिमत्ता, भावनांच्या संकल्पना मर्यादित स्वरूपाच्या होत्या. माणसाच्या जन्मजात चांगुलपणावरचा भाबडा विश्वास उडवणाऱ्या महायुद्धांनी माणसांमधल्या सगळ्या नीचतम भावनांना वाट करून दिली. अपरिमीत हिंसा, स्वार्थ, लोचटपणा, दुर्बलताच नव्हे तर त्याहुनही भयावह अशी पशुता माणसात असू शकते, ह्याची जाणीव माणसांना स्वत:कडेच नव्याने बघायला शिकवून गेली.

ह्या जीवनाचा, स्वत्त्वाचा आणि नीतिधर्माचा जर सरळ अर्थ लावता येत नाही, तर कवितांचा तरी कसा सरळ अर्थ लावता येईल? काही लेखकांना ही गुंतागुंत जीवघेणी वाटली, तर काहिंनी मात्र त्या क्लिष्टतेचाच पुरस्कार करत कला-लेखन-विज्ञानालाही एक नवीनच परिमाण प्राप्त करून दिलं.

त्या लाटेतलाच फ्रॅंक ओहारा जेव्हा सापडला, तेव्हा त्याच्या कवितांमधली क्लिष्ट विषयांची सोपी मांडणी खूप आवडून गेली.

Wouldn't it be funny
if The Finger had designed us
to shit just once a week?

all week long we'd get fatter
and fatter and then on Sunday morning
when everyone's in church


ploop!

शेक्सपियरच्या "Let me not to the marriage of true minds" पुढे अगदी थिल्लर वाटणा़ऱ्या ह्या ओळींमधे काय बरं अर्थ दडला असेल? आधी फक्त कविता वाचतांना कुठल्या गोष्टी तुमच्या डोळ्यात भरल्या? The Finger मधे कॅपिटल अक्षरं? कि शेवटचं कडवं आणि ploop! मधली मोकळी जागा? साधारणत: इंग्रजीत God ह्या शब्दाला कॅपिटल अक्षरं वापरण्याचा प्रघात आहे. मग ओहाराने देवाला "The Finger" का म्हणावं? कदाचित हे पेंटिंग तुम्हाला थोडं परिचयाचं वाटेल.
Michaelangelo च्या "Adam and God" ह्या पेंटिंगमधला हा एक तुकडा आहे. Sistine Chapel च्या छतावरती संपूर्ण पेंटिंग आहे. अर्थात, देवाच्या स्वरूपाची कल्पना केवळ एक बोट अशी आहे असाही ह्याचा अर्थ होत नाही. पण मग पुन्हा विचार करून बघुया की finger शी काय काय निगडीत असू शकेल? पुढील वाक्यात लोकांच्या लठ्ठपणावरून "finger fries" असाही एक अर्थ निघू शकतो.

पण मग लोकांनी ६ दिवस खा खा खाऊन सातव्या दिवशी चर्चमधे जाऊन का विधी उरकावे? तर मग आपण चर्चच्या अर्थाचा विचार करुया. चर्चमधे सहसा पापं केल्यावर लोक त्यांची कबुली देऊन पुन्हा शुद्ध होतात अशी संकल्पना आहे. त्याची तुलना देहधर्माशी करून फ्रँक ओहाराने धर्मावर टीका केलिये, कि धर्मांध लोकांवर? माझ्या मते ही टीका लोकांच्या "सोईस्कर धार्मिकतेवर" असावी. दर रविवारी पापांची कबुली दिली, म्हणजे आपण पुन्हा पापं करायला मोकळे, अशा उथळ विचारसरणीवर ही टीका आहे.

येवढंच नव्हे, तर कदाचित अति भोगवादी फ़ास्ट-फूड नेशन वर सुद्धा हे एक भाष्य असू शकेल. खा खा खाऊन मग detox diet करणाऱ्या संस्कृतीची इथे खिल्ली उडवलीये असं मला वाटतं. शिवाय एरवी चांगल्या कवितांमधे असणारी imagery (दृष्यात्मकता) ही इथे आहेच हे सांगायला नको. मी ही कविता बरेचदा शिकवलिये, आणि बाकी काही लक्षात राहो, न राहो, "ploop" हा शब्दच एक तिला अविस्मरणीयतेचा दर्जा द्यायला पुरेसा आहे :)

त्याच कवीची ही अजून एक कविता- निव्वळ शब्दांचे अर्थ, नाद आणि दृष्यात्मकतेवर उभी असलेली. तुम्हाला तीत काय अर्थ जाणवतोय? नक्की कळवा.................

Oh! kangaroos, sequins, chocolate sodas!
You really are beautiful! Pearls,
harmonicas, jujubes, aspirins! all
the stuff they've always talked about

still makes a poem a surprise!
These things are with us every day
even on beachheads and biers. They
do have meaning. They're strong as rocks.

2/5/10

शिक्षकी आणि डीटॉक्स

आजकाल शाळेत शुक्रवारीच वीकेंड झाल्यासारखी मुलं वागतात. वैताग आला अगदी. चीड आली मनातून, एका श्रीमंत देशात लाखो सोईसुविधा असूनही शिक्षणाचं महत्त्व न कळलेल्या मुलांची. ह्या माझ्या अमेरिकन विद्यार्थ्यांना, "मी तुमच्या साठी किती "रक्त आटवलं" किंवा "घसाफोड" केली, असले वाक्प्रचारही कळू शकत नाहीत. त्यामुळे मी आणि माझा संताप! जातोय कुठे?

मी तेव्हा खरंच विचार करायला लागले. कशाला मी हौसेने शिक्षिका झाले? मी शाळेत असतांना ज्या एकमार्गी अभ्यासाला लागले, ती अगदी कालपर्यंत शिकत होते. विद्यार्थिनी म्हणून जे यश मिळत गेलं, तेच शिक्षिका म्हणूनही मिळेल असं माझंच गृहितक माझ्याच अंगाशी आलं कि काय? असा ही एक वाटून गेलं.

खरं म्हणजे शिकवतांना, "मुलांचं भलं व्हावं, त्यांना ४ गोष्टी कळाव्या" हा असला खोटा नि:स्वार्थ हेतू घेऊन काही मी ह्यात पडले नव्हते. उलटं, मला शिकवायला आवडतं, त्यात माझी हुशारी दिसते, असला सरळसरळ स्वार्थ कुठेतरी डोक्यात होता. तेव्हा तो जाणवला नव्हता, येवढंच. पण माझं साहित्यावर प्रेम आहे हे ही तेवढंच खरं. शिकवतांना आवडत्या विषयावर चर्चा करायला मिळेल, हा पण एक उद्देश त्यात होता.
त्यात शिक्षिका म्हणून माझी पात्रता किती, हातोटी कशी असेल, ह्या गोष्टी तेंव्हा दुय्यमच नव्हे, तर अगदी क्षुल्लकच वाटल्या होत्या.

मी शाळेत असतांना माझा एक साधा विश्वास होता, कि हे ज्ञान आयुष्यात महत्त्वाचं आहे. हे पुढे कुठेतरी आपल्याला लागणार आहे, म्हणूनच आपण हे शिकतोय, आणि आपल्याला हे शिकायला हवंय. तसला विश्वास घेऊन माझे विद्यार्थी काही माझ्या वर्गात आले नाहीत. तुम्हाला लाख साहित्याची चाड असेल, पण आम्ही हे "boring" पुस्तक का म्हणून वाचावं? असले प्रश्न घेऊन ती मुलं आली. मी ही दुधखुळी नाहिये, आणि वर्गातल्या सगळ्या मुलांपैकी ४-५ च जर हे विचारत असती, तर ठीक होतं, असं मला वाटायचं. पण आज सगळीच मुलं ते विचारताहेत.

बरं, शिक्षक-प्रशिक्षणात ज्या युक्त्या, क्लुप्त्या शिकले होते, त्या सगळ्या वापरूनही मुलांमधे काहीच बदल होत नाहिये, हे मी आज पाहिलं, आणि हात टेकले. त्या एका वर्गाच्या आणि माझ्या तारा कधीच जुळणार नाहीत असं आता मला स्पष्ट दिसतंय, पण त्यामुळे आता काळजी वाटते. कशी ही मुलं परीक्षा पास होणार? पुस्तकांबद्दल काडीचा इन्टरेस्ट किंवा साधं कुतुहलही नसतांना, केवळ मार्कांच्या मागे लागलेली ही मुलं! ह्यांचं मन मी कसं बदलू शकणार?

शिक्षक नेहमी आशावादी असतात असं म्हणतात. पण तो आशावाद शिकू इच्छिणाऱ्यांना लागू होतो! घोड्याला पाण्याजवळ नेलं खरं, पण त्याला तहान लागावी असं शिकवायचं! जे हे करू शकतात, ते खरे महान शिक्षक!

सगळ्या विचारांची पुन्हा पुन्हा उजळणी करूनही उत्तर का चुकत राहतं? माझा सुपरव्हायझर म्हणाला, " ह्या अनुभवातून आपण विनय शिकायचा असतो, येवढंच. तुझी चिडचिड होणं स्वाभाविक आहे, पण जाऊदे. डीटॉक्स (detox) करायचं. "

खूप विचार करून मग मला उमजलं.

सगळे उत्तम पदार्थ असूनही कधीकधी शंकरपाळे का फसतात? चकली का हसते? हे तसंच आहे. चकलीवर राग काढून काय साधणारे? हे येवढं पथ्य पाळायचं जरी जमलं, तर शिक्षकी जमो वा न जमो, काहीतरी मिळवलं असं समजेन.