2/8/12

ढीग

ती एकटीच नव्हती. तिच्याबरोबर, तिच्याचसारख्या खूपजणी होत्या. तरीपण, ती नेहमीची मुंबई, पुण्याकडची दिसली नाही, म्हणून तिलाच विचारलं, "बाई, तू कुठची?"
तर ती म्हणाली, "लखनऊची! फीनिक्स मॉल माहितिये? तिकडची!"
मग इथे कुठे नि कशी आलीस?
"साडी नि ड्रेससाठी आयुष्य वेचते बाई मी." ती म्हणाली.

तरीही मला तिची ओळख काही पटेना. बाकीच्यांचे रंग-ढंग एव्हाना परिचयाचे झाले होते. त्यांना सोबत घेऊन कोण कोण आलं असेल, त्याचाही अंदाज येण्यासारखा होता. आणि नाहीच आला, तर प्रत्येकीचं नाव-गाव पत्ता सांगतच होता की एक एक कहाणी...
गिरगावच्या मावशी बरोबर आली तिच्यात मुंबईचा नखरा दिसतच होता, "आशापुरा सिल्क्स" चं रंगीत विश्व तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहतंय. तरीही, आमच्या कुटुंबात अगदी "बडं" प्रस्थ असलेली आत्या चेन्नईहून आली, तेव्हा "नल्ली" वालीसमोर तिचा तोरा काही चालेना. छोटासा भरतकामाचा ब्लाऊजच तर होता आत, पण नल्लीच्या नावाने जादू केली की नाही सगळ्यांवर!

प्लॅस्टिकच्या ऐवजी कागद वापरून ईको-फ्रेंडलीपणा करणाऱ्या सिमी-ताईने फॅब-इंडियाच्या पिशवीतून शुद्ध स्वदेशी, "एक्सपोर्ट क्वालिटी कॉटन" चा, मळखाऊ (तिच्या मते डिसेंट) रंगाचा शर्ट तिच्या लाडक्या भावाला दिला, तेव्हा शर्टापेक्षाही आवडलेली "ती" हीच तर होती........

आणि एकी बरोबर माझा लाडका लेक अहोरात्र खेळत बसला होता... कोणे एके काळी पैठणी लेऊन आलेली, आज खेळणी घेऊन, लाळेत बरबटून बसलेली बघितली आणि मला तिच्याबद्द्ल विशेष सहानुभूती वाटायला लागली. ही कशी, भारदस्त व्यक्तिमत्वाची, ऐसपैस, जरा ’आडवी’च म्हणता येईलशी. पण भक्कम, अगदी प्रेमळ अशी, की छोट्याची मस्ती चालवून घ्यायला तिच्यासारखी दुसरी कोणी नव्हती.

बाकी इवल्या इवल्या बारक्या पण खूप होत्या, पण त्यांची नावं लक्षात कोण ठेवेल? हिरे-मोत्यांचे आहेर घेऊन आल्या, पण आता सेफ्टीपिनांपासून तिळगूळाच्या वड्यांपर्यंत काय वाट्टेल ती लूट त्यांनी घेऊन जायची, म्हणजे त्यांचा अपमानच नव्हता का?

तरीही त्यांची स्थिती बरी म्हणावी, अशी कथा त्या "झिरमिरीत" शेकडोंची होती. पाच पैसे देऊन कोणीही वेठीला धरलेल्या, कचऱ्याच्या भावाने विकल्या गेलेल्या, साध्या ओरखड्याने फाटणारं त्यांचं जिवंत कलेवर सुद्धा, पुन्हा पुन्हा गाठी मारून घेत त्या जगत होत्या. बघवेना, म्हणून डोळे दुसरीकडेच वळवले मी, तर पुन्हा ही लखनऊ वाली समोर आली. म्हणाली,

"अगं बापाकडून भावाकडे, नि नवऱ्याकडून मुलाकडे तुम्ही सोपवल्या जाता, तसाच काहीसा माझा प्रवास झाला. एकदा ते लखनऊचं घर सोडल्यावर, निर्वासितासारखी, जिथे जे काम पडेल तिथे हवी तशी राबवून घेतली, नि उपयोग संपल्यावर पुढच्या हाती सरकवून मोकळे झाले एकेकजण. आता तू तरी काय करणारेस माझं ? किती दिवस निगुतीने सांभाळशील?

आता मात्र माझ्या डोळ्यांसमोर हॉलोकास्ट मधला शवांचा ढीग दिसायला लागला. वसुंधरेच्या अंगावर जिथे तिथे बेवारशी पडलेल्या, आगगाडीतून जातांना रुळाजवळ पडलेल्या, झाडाच्या काडांना अडकलेल्या, वाऱ्यात दिशाहीनपाणे फडफडणाऱ्या, प्रत्येक घरातल्या खुंटीवर अस्ताव्यस्त लटकलेल्या, कचराकुंडीतून ओसंडून वाहणाऱ्या, त्या लाखो पिशव्यांचा ढीग!

त्यात्यल्या कितीजणींना रितसर "अग्नी" मिळेल, नि कितींना पुनर्जीवन, कुणास ठाऊक?