4/23/18

शैक्षणिक तंत्रज्ञान २

माझ्या मुलाचं हे पहिलीचं वर्ष, त्यामुळे नोंदणीची शंभर कागदपत्रं भरल्यावर जरा श्वास घेतला. 'मोठ्या' शाळेच्या पहिल्या दिवसात चिटुक काय काय नवीन शिकला ते माहिती नाही, पण मी मात्र शाळेकडून येणाऱ्या अक्षरशः रोज एक इमेलने भांबावून गेले!
१. शिक्षकांचे प्रत्येकी वेगळे वेबपेज, पालक-संगठनेचा वेगळा 'दुवा'.
२. मुलगा आजारी/अनुपस्थित असेल तर शाळेला कळवण्यात यावं, त्यासाठी वेगळा ईमेल-पत्ता!
३. शिवाय, मुलाचं 'प्रगतीपुस्तक' बघण्यासाठी वेगळ्या ठिकाणी आपलं 'पालक-खातं' बनवणे.
४. फावल्या वेळात मुलांना गणिताची गोडी लागावी म्हणून वेगळं 'app', ज्यावर आपल्या पाल्याशी आपलं खातं जोडणे, म्हणजे त्याची प्रगती आपल्याला कळेल.
५. वाचनाच्या गोडीचं तसलंच, पण वेगळं app!
६. मुलांना शाळेतुन 'डबा'/ जेवण विकत घ्यायचं असेल, तरमुलांच्या हाती पैसे सोपवावे लागू नयेत म्हणून एक पालक खातं, त्याचा फक्त 'कोड नंबर' मुलांनी शाळेत वापरायचा आहे. त्यात दर महिन्याला १०-२० डॉ. भरून ठेवता येतात.
७. जेवणाचा मेन्यू शाळेच्या वेब-पत्त्यावर उपलब्ध, तो दर महिन्याला आपण 'उतरवून' घेऊ शकतो.

हे इतके 'मायाजाल' लक्षात ठेवता ठेवता माझी सुरुवातीला तारांबळ उडाली, मग सरळ वहीत 'सदस्यनाम' + परवलीचा शब्द लिहून ठेवू लागले. मुलगा मात्र दोन दिवसात जेवणाच्या नंबरपासून अभ्यासाच्या खात्यापर्यंत सगळी नावं/पासवर्ड शिकून तरबेज झाला. मी मनाशी म्हटलं, "आपण जुन्या खोडा प्रमाणे नवीन तंत्रज्ञानाबद्दल उगीचच साशंक झालो आहोत. नवीन पिढीसाठी हे काही कठीण नाही!"

पण त्याच वर्षी, आमच्या विद्यालयानेसुद्धा नवीन Learning Management System (शिक्षण-संस्थापन तंत्रज्ञानाचं) अवलंबन करायचं ठरवलं. फर्मानं सुटली, कार्यशाळा झाल्या. वर्ष सुरु झालं. तेवढ्यातच पुन्हा नवीन फर्मानं निघाली, की इंग्रजी साठी पूर्वीचं साधं पाठ्यपुस्तक बाद करून त्या ऐवजी एक वेगळी LMS पद्धत वापरायची आहे. ह्या दोन्ही पद्धतींचा एकमेकींशी ताळमेळ घालून देण्याची अजून एक नवीन कार्यशाळा झाली!

मी स्वतःला 'जुने खोड' म्हंटले तरी खरं म्हणजे माझं तंत्रज्ञानाशी अजिबातच वाकडं नाहीये, त्यामुळे मी ह्या नवीन पद्धती बऱ्यापैकी लवकर आत्मसात केल्या. खरंतर ह्या नवीन माध्यमातल्या क्षमतांचा विद्यार्थी, तसेच शिक्षकांना खूप उपयोग होऊ शकतो: 

१. पुस्तकातले प्रश्न सोडवतांना बरेचदा पाठ करून/ दुसऱ्यांची बघून लिहिलेली उत्तरं दिसतात, पण त्यातून मुलं खरी संकल्पना (concept) शिकलीयेत की नाही, ते कळत नाही. ह्या ई-पुस्तकात प्रत्येक व्यक्ती आपल्या खात्यातूनच लॉगिन करणार, त्यामुळे उत्तरं चोरायचा प्रश्न येत नाही. शिवाय, प्रत्येक विद्यार्थ्याला, त्याच संकल्पनेबद्दल, पण वेगळे प्रश्न दिसतात! इतकंच नव्हे, तर शिक्षकांनी परवानगी दिली, तर एक 'चाचणी परीक्षा' २-३ वेळा देता येते, आणि त्यातून सर्वात चांगले गुण 'धरले' जातात.
२. अमेरिकाभर वापरली जाणारी अजून एक वेबसाईट म्हणजे 'Turnitin'.  ह्यावर विद्यार्थ्यांचे शेकडो/हजारो निबंध आधीपासून साठवलेले आहेत, त्यामुळे माझ्या विद्यार्थ्याने जर दुसऱ्या कुठूनही वाक्ये/उतारे 'चिकटवली' असतील, तर ते मला, शिक्षिकेला दिसून येतं. प्रत्येक शिक्षकाने ही व्यवस्था वापरली, तर निबंधाची संख्या वाढत जाते, व दुसऱ्याच्या कल्पना चोरून वापरणं अधिकाधिक कठीण होत जातं.
३. विद्यार्थ्यांना तर चक्क 'धडा वाचून दाखवणे' ही पण सोय ह्या नवीन ई-पुस्तकात आहे, म्हणजे अगदी जिम मध्ये व्यायाम करता करता कानाला हेडफोन लावून धडा 'ऐकता' येतोय!

इतक्या सगळ्या सोयी सुविधा असूनही माझ्या अनुभवात, मुलांना हे तंत्रज्ञान आत्मसात करणं, स्वीकारणं, खूप कठीण जात होतं. जोवर एखाद-दुसऱ्या वेबसाईटशी जुळवून घ्यायचं असेल, तोवर ठीक आहे, पण गेल्या १० वर्षात मी शिक्षिका म्हणून अशा ६-७ तरी  वेगवेगळ्या 'पद्धतींशी' जुळवून घेते आहे. नवीन विद्यालयात नवीन तंत्र, नवीन अभ्यासक्रम. 
(माझ्यासारखे 'तात्पुरते प्राध्यापक' (Adjunct Professor) यांची वणवण, हा एक अजून वेगळा घोर लावणारा विषय आहे, ते सोडा च.) 

शिक्षकांची ही कथा, तर मुलांना बहुतेक शालेय-स्तरावर अनेक वेगवेगळ्या विषयांसाठी, १५-२० तरी वेबसाईट/ऍप/सॉफ्टवेअर आत्मसात करावं लागत असणार (असा एक माझा अंदाज आहे). ह्या ओढाताणीत मुलांची स्वयंप्रेरणा मात्र कमी होऊ लागली, तर ह्या तंत्रज्ञानाचे अनेक फायदे सर्वस्वी अपयशीच ठरतील, हे त्या अनुभवातून गेल्याशिवाय पालकांना व शासकांनाही कळणार नाही, हे इथे लक्षात आणून द्यायचा माझा उद्देश आहे.  

1 comment:

मिलिंद कोलटकर said...

मजा आली! वि० शेवटाकडे, पळवाटा शोधण्याची मानवी अंत:प्रवृत्ती अपेक्षितच म्हणायची. आता यावर कोणी मुलाने स्वाध्याय न देण्याची आधुनिक १०० प्रसूत करू नये म्हणजे झालं! :-) एका नव्या विषयावर लेख पाहायला मिळाला. धन्यवाद! - मिलींद.