4/11/08

अशीच अमुची शाळा असती- भाग ५. तारे जमीं पर

व्यक्तीवादात समाविष्ट असणारे तत्त्व, प्रत्येक व्यक्तीच्या आंतरिक गुणांचा विचार करणे, हे प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या भारतासारख्या देशाला अजूनही मानवणारे नाही. पूर्वी एकेका घरी १०-१० पोरांची पिल्लावळ होती, तेंव्हा आई-वडील त्यांची नावं न घेता, “माझा ४ नंबरचा” असा उल्लेख करत असत. त्यात कसचा आलाय डोंबल व्यक्तीवाद! पण जसजशी “हम दो हमारे दो” प्रकारची कुटुंबं दिसू लागली, तसतसा पालकांचा आपल्या मुलांच्या गुणांना ओळखून, जोपासण्याकडे कल वाढू लागला. आता, हाच कुटुंबाचा साचा शालेय वर्गाला लावून पाहिला, तर शिक्षणपद्धतीतल्या अमूलाग्र बदलांमागील कारणे लक्षात येतील. भारतातले वर्ग किमान ४०-५० मुलांचे, तर अमेरिकेत २४-२५ म्हटले, की हद्द! २५ च्या पुढे आकडा गेला, शिक्षक कुरकुर करू लागतात. भारतात “सबघोडे बारा टके” ह्या थाटाततमाम जनता १०वी, १२वी च्या परीक्षा देते, त्याच एका घाण्यातून तावून सुलाखून निघते, तेच तेच प्रश्न आणि साचेबंद उत्तरं लिहून लिहून साच्याच्या चौकटीतच स्वत्त्व शोधण्याची धडपड करते. तर ह्याऊलट अमेरिकेत विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांची जोपासना कशी होईल, वेगवेगळ्या व्यक्तीविशेष गुणांना पूरक, पोषक अशी शिकवण्याची पद्धतच नव्हे, तर परीक्षापद्धतही कशी निर्माण करता येईल ह्याकडे कल असतो.
अर्थात, त्याचा भार सर्वात जास्त पडतो शिक्षकांवर, कारण वर्गात रोजच्या रोज प्रत्येकाचा कल सांभाळत बसणं काही सोप्पं नसतं! घरी नाही का आई सांगते, “बाबांना कांदा नको, तुला कांद्याशिवाय होत नाही, आजीला कांदा चालत नाही, आणि मला काय वाटतं हे तर मी विचारातही घेत नाही, तरी पण मग रोज काय तीन तीन भाज्या करू?
तरीही, अमेरिकेत शिक्षकांनी अशा तीन तीनच नव्हे, तर अनेक भाज्या कराव्यात अशी अपेक्षा तरी केली जाते. त्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो मतिमंद, गतिमंद, बौद्धीक किंवा शारीरिकरित्या दुर्बल मुलांसाठी कशा आणि कोणत्या व्यक्तिसापेक्ष सोयी केल्या जाव्यात. अर्थात, इंग्रजी मधे mentally/physically challenged असा शब्दप्रयोग रूढ आहे, जो दुर्बलतेपेक्षा क्षमतेला अधोरेखित करतो. कधीकधी autistic किंवा इतर मानसिक समस्या असलेल्या मुलांमधे अतिशय उच्च कोटीची बुद्धिमत्त आढळून येते, त्यामुळे त्यांचा उल्लेख “disabled” असा करण्यापेक्षा “differently able” असा केला जातो. ह्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतल्या शाळांमधून त्याबद्दल जागरूकता आणि जाणिव निर्माण करण्याचे सरकार आणि इतर सार्वजनिक संस्थांचे अथक प्रयत्न आहेत. त्याबद्दलची थोडी माहिती इथे देते आहे.
१९७५ मधे सुरू झालेले हे प्रयत्न आता IDEA किंवा Individuals with Disabilities Education Act ह्या नावाने सरकारमान्य आहेत. २००४ मधे ह्या कायद्यात काही अमूलाग्र बदल झाले, ज्यामुळे शारीरिक/मानसिक दुर्बलता असणाऱ्या मुलांना “Free and Appropriate Education” मिळावं असा दंडक घातला गेला. त्या कायद्याचे जे पडसाद शाळांतून उमटले, त्यातूनच तो कायदा मला जास्त कळत गेला, आणि त्या कायद्याचं पालन कितपत करता येतं, केलं जातं, हे ही कळतंय.
पुन्हा आठवते ती माझी पहिली शाळा-भेट. तिथे गेल्या गेल्या शिक्षिकेने हळू आवाजात खुलासा केला- “ही मुलं जी ह्या ओळीत बसतात ना, ती जरा कमी क्षमतेची आहेत. त्यांच्याकडे विशेष लक्ष पुरवायला आमच्या वर्गात एक खास शिक्षिका आहे. तुला माहिती आहे का- ह्या मुलांना कमीतकमी निर्बंध असणाऱ्या वातावरणात राहता यावे म्हणून ह्या वर्गात इतर मुलांबरोबर ठेवलं आहे.” असल्या वर्गाला “inclusion classroom” म्हणतात, हे तेंव्हा मला माहिती नव्हतं. गति/मतिमंद किंवा अशा इतर समस्या असणाऱ्या मुलांना आजूबाजूच्या जगात वावरण्याचा आत्मविश्चास मिळावा, ह्यासाठी त्यांना इतर सर्वसाधारण मुलांबरोबर राहण्याची, शिकण्याची संधी मिळायला पहिजे, त्यांना त्याच तोडीचं ज्ञान वर्गात मिळालं पाहिजे, पण तेही त्यांच्या विशेष क्षमता, आणि दुर्बलतांना गृहित धरून, अशा अतिशय आदर्शवादी दृष्टीकोणातून inclusion classroom ही संकल्पना निर्माण झाली. अर्थात, जसे, काही भावनिक आजारांमुळे मुलं अतिशय संतापी, अतिरेकी स्वभावाची होतात, आणि स्वत:ला किंवा दुसऱ्यांना शारीरिक इजा पोचवू शकतात. तेंव्हा जर कोणत्या भावनिक आजारामुळे (emotional disorder) एक मुलगा त्याच्या वर्गमित्रांसाठी धोकादायक ठरणार असेल, तर मात्र त्याला त्याच वर्गात राहू देणे शक्य नसते.
एरवी मात्र ह्यातले बरेचसे मानसिक/भावनिक आजार तसे सूक्ष्म स्वरूपातले असतात, आणि ते असणारी मुलं इतर मुलांप्रमाणेच बुद्धीसक्षम असतात. उदाहरणार्थ: ADHD (Attention Deficit Hyperactivity Disorder) ह्याची अनेक उदाहरणं आपल्या घरातच बघायला मिळतात. अशा मुलांना कोणत्याही एका गोष्टीवर ध्यान केंद्रित करणं शक्य होत नाही. सारखी चळवळ, सारखा नवीन उद्योग लागतो, आणि एका जागी डांबून बसवलं तर त्यांच्या विध्वंसक प्रवृत्ती जागृत होतात. मात्र अशा मुलांना सतत कार्यरत ठेवले, किंवा त्यांना त्यांच्या परिस्थितीची नीट कल्पना देवून ती प्रवृती टाळण्याचे काही उपाय शिकवले, तर त्यांना वर्गात इतर मुलांप्रमाणेच शिकता येते. गंमतीने आम्ही शिक्षिका अनेकदा म्हणत असतो, की “माझ्या वर्गातल्या सगळ्याच मुलांना ADHD आहे असं वाटतंय!”
असो. तर ह्या नवीन कायद्यामुळे inclusion classroom तर अस्तित्वात आली, पण पुढे काय? काही मुलांना परीक्षा सोडवायला जास्त वेळ लागतो, तर काही “तारे जमीं पर” मधल्या ईशान सारखे dyslexic असल्यामुळे त्यांना स्पेलिंग ची मदत लागते. एखाद्याला epilepsy साठी विशेष औषधं जवळ ठेवावी लागतात, किंवा जर कोणी depression ने ग्रासलेला असेल तर त्याच्याकडे विशेष लक्ष पुरवावं लागतं. वर्गात अशी ५ मुलं असतील तर एकच शिक्षिका त्या सगळ्यांसाठी वेगवेगळा वेळ देऊ शकत नाही, म्हणून कधीकधी त्या वर्गात दोन शिक्षिका असतात- एक Special Education Teacher आणि दुसरी Content Area Teacher. मी इंग्रजी शिकवते, तर मी दुसऱ्या प्रकारातली. Special Education मधे पदवी घेण्यासाठी वेगळा अभ्यासक्रम आहे, आणि त्याला अमेरिकेत सध्या बराच भाव आहे.
एकतर भारतात मानसिक/भावनिक आजारांबद्दल अजुनही अज्ञान, शरमेची भावना असल्यामुळे, आणि वैद्यकीय मदतीच्या आभावामुळे अशा केसेसचं लवकर निदान होणं, आणि त्या बाहेर येणं कठीण. त्यातून प्रचंड लोकसंख्या असलेल्या वर्गात अशा मुलांसाठी वेगळी सोय
करणंही अशक्यप्राय- त्यामुळे आपल्याकडे भावनिक/मानसिक दुर्बलांसाठी काही भविष्य नसल्याच्या बरोबर. ह्याउलट अमेरिकेतल्या पालकांना जरा जास्तच काळज्या- मुलगा २ मिनिट स्वस्थ बसत नाही म्हटलं, की हे लगेच त्याला डॉक्टरकडे नेऊन तपासण्या करून घेणार, शाळेत त्याच्याकडे लक्ष देताहेत की नाही, ह्याचा शहानिशा करून घेणार. तर अशा काही मुलांच्या कथा इथे थोडक्यात देते आहे.
१. मी शाळेत शिकवत होते, तेंव्हा माझी सहशिक्षिका एकदा म्हणाली, अगं मला त्या टॉमच्या स्पेशल एड. मीटिंगला जायचंय. मला काय प्रकार आहे ते कळेना. तेव्हा तिने खुलासा केला- अगं टॉम ला अमुक अमुक प्रॉब्लेम आहे, त्यामुळे इतर मुलांइतकं काम तो वर्गात करू शकत नाही, आणि परीक्षाही त्याला कठीण जातात. तर त्याच्यासाठी एक समिती नेमली आहे. त्या समितीत त्याचे पालक, वर्गशिक्षिका, आणि स्पेशल-शिक्षिका, असे लोक मिळून हे ठरवतात, की त्याच्यासाठी पुढील वर्षात कोणते प्रगतीचे मापदंड ठरवायचे. त्याने तेवढी प्रगती केली, तर त्याला पास करून पुढील वर्गात पाठवणार. शिवाय, त्याच्यासाठी वर्गात कोणत्या सोयी हव्या आहेत, ते मला त्या मीटिंग मधे कळेल. त्याला भावनिक आजार असला तर सर्वांसमोर प्रश्न विचारायचे नाही, किंवा वर्गात समोर बसवायचं, असे नियम मला त्या मीटिंगमधे सांगतात, आणि ते मी पाळले नाही, तर राज्य सरकार माझ्या विरूद्ध कार्यवाही करू शकतं...” शाळेतल्या प्रत्येक special मुलासाठी अशी समिती नेमतात, आणि तो/ती ज्या ज्या वर्गात असेल, त्या त्या शिक्षकांची जबाबदारी असते, की त्याला लागणारे सहाय्य त्याला उपलब्ध करून द्यायचे.
बापरे... म्हणजे ही शिक्षकांच्या गळ्यावर टांगती तलवारच की.... आणि त्या एका मुलासाठी वेगळ्या परीक्षा तयार करायच्या, त्याला अधिक वेळ देता यावा म्हणून शाळेनंतर थांबायचं- हे असं आणि येवढं किती शिक्षिका खरंच करतात, किंवा करू शकतात, असले प्रश्न विचारायचे नसतात.
२. एक दिवस अशाच एका inclusion वर्गात मी निरिक्षण करत होते. त्या वर्गात जवळजवळ ७- ८ स्पेशल मुलं होती. त्यांचे बाक एका रांगेत, वर्गाच्या कडेला. त्यांची स्पेशल शिक्षिका कोपऱ्यात उभी, आणि मधून मधून त्यांच्याकडे जाऊन विचारत होती, की हे कळलंय का, असं करायचं, तू करून बघ, वही काढली का- अशा साधारण सूचना करत होती. group discussion का कसला तरी प्रॉजेक्ट सुरू झाला, तसे वर्गातल्या मुलांचे गट पाडले- त्यात स्पेशल/नॉर्मल असा भेद नव्हता, फक्त स्पेशल शिक्षिका त्यांच्याकडे लक्ष देत होती. मुलांमधे मात्र “ते वेगळे आहेत” त्याची जाणीव आपोआपच निर्माण झालेली. शिक्षिकांनी हळू आवाजात केलेल्या चर्चा- मधेच त्या मुलांना दिलेले वेगळे handouts, त्या मुलांनी दिलेली उत्तरं ह्यावरून वर्गात २ गट आपसूकच पडलेले. सरकारने न्याय्य आणि आदर्शवादी कायदे करूनही ह्या मुलांवर “मतिमंद” चा बसलेला शिक्का घालवणं किती कठीण आहे, त्याचा प्रत्यय आला. शिक्षिकांनी किती प्रयत्न केले, तरी इतर मुलांनी ह्या मुलांना सामावून घेणं सर्वात महत्त्वाचं. त्याबद्दल जनजागृतीतून आणि समाजातून आधी अमूलाग्र बदल होणं आवश्यक आहे.
३. माझ्या १२वीच्या वर्गात शिरल्या शिरल्या माझ्या सहशिक्षिकेने सांगितलं - हा ग्रेग आहे- त्याला asperger's syndrome आहे. बाकी व्यवस्थित आहे, पण एकदा बोलायला लागला की त्याचं तोंड आवरणं कठीण. आणि त्यामुळे वर्गातल्या मुलांना तो आवडत नाही अजिबात. ही माझी अशा मुलाला शिकवायची पहिलीच वेळ. मी एक कविता वाचली, आणि discussion ला सुरूवात केली. ग्रेग चा हात पहिला वर गेला. मी त्याच्याकडे खूण करून बोल असा इशारा केला. आणि त्याच्या शब्दसंग्रहाने, वक्तृत्वाने, आकलनशक्तिच्या प्रदर्शनाने अवाक् झाले. ह्या मुलाला स्पेशल शेरा दिला तर बरोबरच आहे, असं वाटून गेलं. त्याची सांगण्याची पद्धत जरा उलटीकडून घास घेणे अशी असली, तरी त्यामागचे विचार सोळा आणे होते.....
४. ईशान- तारे जमीं पर. तो अमेरिकेत असता तर त्याच्यावर झाला तसा अन्याय झाला असता का? कदाचित नाही, पण त्याला समजून घेणारे मित्र मिळाले असते का? नक्की सांगता येत नाही. त्याला पुढच्या आयुष्यात कॉलेज-नोकरी-संसारात साथ मिळेल का? सांगता येणार नाही. उदाहरण- आमच्या ओळखीतल्या एक बाई. त्यांचा मुलगा- दिसायला अतिशय देखणाच म्हणता येईल असा, लाघवी स्वभावाचा. त्याला कुठली मानसिक दुर्बलता आहे- ते विचारणंही अनुचित दिसलं असतं, इतका सुदृढ आणि स्वच्छ. अमेरिकेतल्या कायद्याप्रमाणे त्याला फुकट शालेय शिक्षण मिळालं १२वी पर्यंत, मात्र आता एका किराणा दुकानात अर्धावेळ काम करतो. घरची कामं- अगदी भांडी धुण्यापासून ते मोरी घासण्यापर्यंत. “धाकटा भाऊ कॉलेजला गेला, पण मी जाऊ शकत नाही, मला लोकांना भेटायला आवडतं, पण मला जास्त मित्र नाहियेत, मला दुकानात काम करण्याचे महिना ९० डॉलर मिळतात, पण मला अजून मिळवायला आवडेल” असं सांगतो. पण हेच जर तो एखाद्या “मतिमंदांच्या” शाळेत गेला असता, तर त्याची येवढी प्रगती झाली असती का? हे ही सांगता येत नाही.
त्याच्याकडे बघून खरंच इतकं वाईट वाटलं- की सरकारने कितीही सोयी सवलती दिल्या, तरी ह्या मुलांना एक सर्वसाधारण आयुष्य जगण्याची संधी सरकार देऊ शकत नाही. अमेरिकेसारख्या श्रीमंत देशातही जर असं, तर भारतात विचारायलाच नको. मधे वाचनात एक लेख आला, त्यानुसार भारतातही ह्या स्पेशल मुलांसाठी सर्वसाधारण शाळेत जागा असावी, असा नियम आहे. अर्थात, नियम धाब्यावर बसवण्यात आपण अग्रगण्य! तरीही, ह्या प्रश्नावर फक्त सिनेमाच्या निमित्ताने नाही, तर एकूणच चर्चा व्हायला हवी आहे, हे मात्र निर्विवाद.

3/3/08

सोनेरी अक्षरांची ओळ

आज युनिव्हर्सिटीत गेले.. तिथे आता माझे फार दिवस उरले नाही (मे मधे ग्रॅजूएशन) अशी जाणीव झाली, पण खरंच एक दिवशी युनिव्हर्सिटीत जाणं बंद होईल तो दिवस कसा असेल त्याची कल्पना मात्र मनाला करता आली नाही.. हे माझं आहे, आणि हे माझंच राहणार आहे, ह्या भोळसट विश्चासाच्या भरोशावरच तर इथवर आले। नाहीतर मन गुंतलेल्या जागांना मागे टाकून येणं सोप्पं का असतं?
त्यावरून सुचलं- आठवणींच्या गावात जाणं कसं असतं.....
परवाच एक कार्यशाळा केली- मुलांना लेखन कसं शिकवावं ह्याबद्दल. त्यात प्रमुख वक्ते म्हणून एक नामांकित शिक्षकच आले होते. त्यांची पुस्तकं छापली गेलियेत तरी हाडाचे शिक्षकच, त्यामुळे, त्यांनी भाषणात दोन वाक्यांची सुरुवात करून आम्हालाही मुलांसारखं कामालाच लावलं. आता मी पण त्यांचा कित्ता गिरवत तुम्ही हे वाचत असाल तर तुम्हाला सांगते- तुम्ही माझ्या ह्या online वर्गात आहात तोवर हे करून पहा:
१. एकूण ३ कागद लागतील. पेन, पेन्सिल, रंग हवे तर रंग ही जवळ ठेवा.
२. आता पहिल्या कागदावर एक यादी करा- तुम्ही आजवर कुठेकुठे राहिलात, त्या ठिकाणांची यादी, मग ते कोणतंही ठिकाण असो... काही लोक कसे कॉलेजच्या कट्ट्यावर राहतात! काही लोक कायम देवळांत प्रवचनं ऐकत बसतात....तर ते एक ठिकाण म्हणून दिलं तरी चालेल... फक्त तुमच्यासाठी ते ठिकाण महत्त्वाचं असलं पाहिजे. अशी जितकी ठिकाणं १ मिनिटात सुचतात तेवढी लिहा......चला पटपट- ३० सेकंद तर इथेच संपले!!! बरं अजून १ मिनिट घ्या...... काय काय जागा दिसतायत तुमच्या यादीत? होस्टेलची ती गल्ली? की तुमचं ऑफीस? फारच घरकोंबडे असाल तर ४ जागा म्हणजे घरातल्या ४ खोल्याच दिसताहेत का? की अख्खी शहरं- जिथे जिथे बदल्या झाल्या ती?
जे असेल ते असो. काहीही चालेल. कारण ही तुमची यादी आहे.....आता पुढे.....
३. आता, त्या यादीतुन एक ठिकाण निवडा- ह्या ठिकाणाचे तपशील तुम्हाला छान आठवताहेत ना? किती रूतून बसलेत तिथे घालवलेले दिवस तुमच्या मनात! प्रत्येक भिंतीचा रंग, प्रत्येक झाड, प्रत्येक घराच्या खिडक्यांचे आकार.....दिसतंय ना सगळं अगदी काल पाहिल्यासारखं तुमच्या डोळ्यांपुढे??? चला तर मग.... तुमची आजची परीक्षा म्हणजे- ह्या जागेचा एक नकाशा काढा नवीन कागदावर. त्यासाठी चित्रकला यायची गरज नाही- फक्त तपशील महत्त्वाचे! रंग ही घ्या की- किती दिवस झाले रंगकांडी हातात धरून?? गंमत वाटत्येय? वर्गाबाहेर काढीन तेव्हा रडाल, त्यापेक्षा आत्ता लगेच कामाला लागा बघू! फक्त ५ मिनिटं देणार आहोत. तुमच्या भावविश्चातली जागा माझ्या भावविश्चापर्यंत पोचवायची असेल, तर काय काय दाखवावं लागेल त्या नकाशात ह्याचा विचार करा. हवं तर नावं लिहा खाली- “हे माझं घर”, “ही ग्यानबाची विहीर.......” चला चला....
४. हम्म्म्म......कसा दिसतोय ना छान नकाशा? आधी अगदी निरूत्साहानेच ह्यात पडलात, तरी आता नकाशा पाहून बरं वाटलं ना? अगदी स्वत: काहीतरी “create” केल्याचं समाधान..... पण अजून संपला नाहीये हं तास. अजून एक गोष्ट राहिलीये. कितीही केलं तरी नकाशात सगळं दाखवता आलं नाही म्हणता? मग आता एक गोष्ट लिहा- त्या गोष्टीला शेंडाबुडखा नसेल तरी चालेल. शुद्धलेखनाच्या चुकाही आज तुम्हाला माफ! खरंच माफ. फक्त झोकून द्या स्वत:ला त्या जागेत असल्याच्या अनुभवात. कोणते रंग आहेत त्या जागेत, काय गंध येताहेत? वारा आहे, की पाऊस? थंडी आहे की कोवळं ऊन? सगळं अनुभवा, आणि अनुभवतांना लिहा. कोणते शब्द कागदावर उतरले, काय व्याकरण होतं त्याची चिंता आत्ता करू नका. फक्त तुमचं ते विश्व सजीव होईल तोवर लिहा. काहीही, कसंही. मुक्तछंद.
५. हातांचा वेग कमी पडतो, पण मन धावत राहतं. त्या अर्धवट बांधलेल्या इमारतीच्या कट्ट्यावर पुन्हा बसून येतं. झाडांना स्पर्श करून, रस्त्यातले खड्डे चुकवत, उंडारत राहतं त्या चौकटीत. किंवा कधीकधी बाजारात रमतं, ते बाहेर पडायला तयारच होत नाही. स्टीलची चकचकणारी भांडी एका दुकानाच्या दारातूनच दिसताहेत. दुसरीकडून ओला, दुधाळ, थंड वास येणारी कुल्फीची गाडी आणि त्यावर ठेवलेला लाल फडक्यात गुंडाळलेला माठ पाहता आहात तुम्ही. त्याचवेळी, त्या दृश्यांना मागे सारून उरणारी भावना- हातात घेतलेले हात...जाणवताहेत अजुनही... पण तेच हात आता लिहिताहेत. शब्दांच्या पलिकडले, तरी शब्दांच्या पलिकडे न जाऊ शकणारे आभास, उतरताहेत कागदावर अगदी शेवटची घंटा वाजेपर्यंत.
६. इतकं मनापासून लिहिता येतं? इतकं मनातलं लिहिता येतं? इतक्या सहज, नकाशाच्या रेघांवरून घसरत, भूतकाळात जाता येतं? ते गाव खरंच असं होतं, की माझ्या मनात ते तसं होतं? काय फरक पडतो त्याने? कागदावर उतरला तो अनुभव तर खराच होता ना! ज्या क्षणी तुमच्या मनाने तो अनुभव घेतला, त्याच क्षणी तो खरा झाला. साकार झाला. आता फक्त एक. हे लिहिलेलं कोणाला तरी वाचायला द्या. संकोच करू नका, भिऊ नका. तुमच्या प्रयत्नाची पूर्तता तेंव्हाच झाली, जेंव्हा तुमच्या लेखनातुन तुम्हाला आनंद मिळाला. आता फक्त तो आनंद दुसऱ्यांनाही मिळतो का बघा. आणि त्यांना विचारा- काय आवडलं ह्यातलं सगळयात जास्त? एखादी ओळ? एखादी उपमा? एखादा तपशील?
बघा पडताळून एकमेकांचे अर्थ, आणि मग......
७. त्यातून एकच ओळ निवडा. “सोनेरी अक्षरांची ओळ”. ह्या ओळीत भरलं असेल तुमच्या लेखनाचं सार. ती होतीच तिथे, फक्त काही साध्या सुध्या ओळींमधे लपली होती. मस्तच जमलीये ही ओळ- असं समाधान वाटायला लावणारी ओळ, जिच्यातून तुमच्या लेखनसामर्थ्याचा प्रत्यय येतो ती एकच ओळ. तिच्यात अजून किती किती अर्थ भरलेत, ते बाहेर यायला धडपडताहेत....
तास इथे संपला, मात्र लेखन संपलं नसेल. ते तर आता कुठे सुरु झालंय. त्या सोनेरी ओळीभोवती आता एक संपूर्ण कथानक जन्म घेईल. ते कागदावर उतरवायला मी तुम्हाला सांगेन म्हटलं, तरी मी सांगायची वेळच येणार नाही... माझे विद्यार्थी आता स्वत:च लिहू लागतील. ट्रेनच्या गर्दीत, बागेतल्या बाकावर, कोणी कंम्प्युटरसमोर वेळ काढतांना एकदम स्फूर्ती येऊन.... तर कोणी मनातल्या मनात. कसंही असो- स्वत:साठी लिहिणं महत्त्वाचं.

2/4/08

अशीच अमुची शाळा असती- भाग 4

मुलांचं असं, तर शिक्षकांविषयीपण थोडंसं:
माझ्या co-operating teacher चं नाव Ms. D. १० वर्ष शिकवल्याचा अनुभव, आणि एकूण अतिशय शिस्तप्रीय बाई. मुलांवर वचक येवढा, की तिने नुसतं बघितलं तरी दातखिळी बसावी. अमेरिकन शिक्षक साधारणत: फार खेळकर, मित्रत्त्वाच्या नात्याने मुलांशी वागणारे असतात, तशी D नाहिये, हे पहिल्या आठवड्यातच लक्षात आलं. ह्या आठवड्यात माझं काम फक्त निरीक्षणाचं होतं. शाळेचा पहिला दिवस. मुलं उत्साहात वर्गात आलेली. बाकावर बसताच "overhead projector" वर सूचना लिहिलेली- की आपापल्या आडनावाप्रमाणे, alphabetically एका ओळीत उभे राहून नंतर रांगेने बाकांवर बसावे. मुलांचा कल्ला, आपापसात थट्टा, गलका होत असतांना मिस डी. शांतपणे तोंडातून एकही अक्षर न काढता बघत बसलेली. एखाद्या मुलाने उशीरा आल्यामुळे काही न कळून प्रश्न विचारलाच, तर हिचं उत्तर "एकतर वर्षाच्या पहिल्या दिवशी उशीरा येऊन तू तुझा आळशीपणा सिद्ध केलायस, आणि आता इथे ओव्हरहेडवर स्पष्ट सूचना लिहिलेली असूनही मला विचारतो आहेस, की काय करायचं, त्यावरून मला वाटतं की तू निरक्षर सुद्धा असावास!” इतर मुलं हसायला लागली, आणि हा बिचारा खाली मान घालून रांगेत उभा राहिला.

सगळेजण अशा रीतीने स्थानापन्न झाल्यावर तिने वर्षभरात काय काय शिकायचे आहे, वर्गातली शिस्त, इत्यादि समजावून सांगितलं, ते ही जरा करड्या स्वरातच. मागच्या बाकावर बसलेला एक मुलगा जरा गोंधळ करू लागताच हिने त्याला ताबडतोब नामोहरम करून वर्गाबाहेर काढलं!!! मी तोंडात बोट घालून बघत होते, की तिने पहिल्याच दिवशी मुलांशी अक्षरश: युद्ध सुरू केल्याच्या थाटात लढायचा पवित्रा घेतलेला होता. पुढे इतर बऱ्याच शिक्षकांच्या बोलण्यातून असाच सूर दिसला, की आधी शिस्त, सन्मान, आणि मग जमलंच तर मैत्री.


भारतात, निदान मी शाळेत होते, तेंव्हा तरी, शिक्षकांसमोर ब्र काढण्याची आम्हाला हिम्मत नव्हती. पुढे कॉलेजमधे गेल्यावर त्याचा परिणाम असा झाला, की चर्चा, आपली मतं मांडण्याचा आत्मविश्वास, कुठेतरी कमी पडत गेला. मग भारतात थोडे दिवस शिकवतांना लक्षात आलं, की ही पद्धत अजुनही फारशी बदलली नाहिये, त्यामुळे शिक्षक म्हणून मुलांना शिस्त लावण्यासाठी मला काहीच प्रयास करायची गरज पडली नाही. उलट, motivation आणि आत्मविश्वास वाढावा म्हणून मुलांशी खेळीमेळीने वागणंच योग्य होतं.
इथे परिस्थिती त्याच्या उलट. वचक नसेल, तर वर्गातल्या चर्चा कुठच्या कुठे वाहवत नेण्यात मुलं स्वत:चं चांगलंच मनोरंजन करून घेतात. टिपणं काढण्याचा परिपाठ नाही, त्यासाठी handouts देणे, ही शिक्षकांची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे वर्गात बसून बडबड करण्याव्यतिरिक्त पोरांना दुसरी कामं नसावीत असं एकूण चित्र आहे.....
तर आमच्या मिस. डी ने पहिल्याच दिवशी आपला दरारा दाखवून पुढील वर्षाचा पायंडा पाडून दिला. मी जरा नवशिकी, आणि मुलांपेक्षा फारशी मोठी नाही, त्यामुळे आधी lenient राहिले, तर त्याचे परिणाम मला पुढे भोगावे लागले!!!

आमच्या वर्गात तीन शिक्षिका पिरियडस वाटून घेत होत्या- मिस. डी, मिसेस बोसी, आणि मिसेस श्वार्टझ. ह्या तिघींचं आपापसात अगदी हाडवैरच असावं- कारण मागच्या वर्षीही वर्ग वाटून घेतल्यामुळे त्यांना एकमेकींच्या चांगल्या, आणि वाईट सवयी अगदी पक्क्या माहिती होत्या. मिसेस बोसी अतिशय धांदरट. तिचा वर्ग संपल्यावर फळा न पुसता निघून गेली, वर्गातल्या TV चा रिमोट कंट्रोल तिथे डेस्कवर विसरून गेली, त्यामुळे तो हरवला, स्वत:च्या पुस्तकांऐवजी डी चं पुस्तक घेऊन गेली, असे अनेक किस्से डी. मला सांगून आपलं मन हलकं करायची, की माझे कान भरायची कोणजाणे. मी मात्र आपल्याला इथे फक्त ३ महिने रहायचं आहे, ह्या भावनेने स्थितप्रज्ञतेने तिचे गरळ ओकणे ऐकून घेत होते.

“त्या बयेला इतकी वर्ष शिकवूनही पोरांना शिस्त कशी लावायची हे कळलेलं नाहिये. इतक्या वर्षांच्या अनुभवानंतरही तुझ्यात काही सुधारणा नसेल, तर तू शिक्षकीपेशा सोडून दुसरंच काहितरी करायला पाहिजे, हो की नाय?” मिस डी. मला सांगत होती. “अगं परवा माझ्या वर्गात मुलांचं project presentation होतं, त्यासाठी एका मुलीने स्वत: कुकीज बनवून आणल्या होत्या, आणि त्या मी मागच्या टेबलवर ठेवल्या होत्या. ९व्या पिरियेडला बघते, तर तिथे नुसता कुकीजचा चुरा उरलेला!!! ह्या मिसेस. बोसीच्या पोरांनी कुकीज खाऊन टाकल्या, आणि ही बया मला सांगते- तरीच मला वाटलं, की ती मुलं त्या टेबलपाशी काय करताहेत !” “तिला येवढं दिसत असतांना तिने ते चालवूनच कसं घेतलं म्हणते मी???” “तिची पोरं बाकं तोडून, वाकवून ठेवतात. परवा मला Zach म्हणाला, मी दुसरं बाक घेऊ का? तेव्हा मला कळलं, की त्याचं डेस्क वाकवलेलं! अशाने नोकरीवरून काढून टाकतील तिला!”

मिस. बोसीची वेगळीच कथा. वर्गातल्या मुख्य शिक्षिकेच्या डेस्कवर तिलाही थोडी जागा हवी होती. तर तिने आमच्या मिस. डी विरूद्ध तक्रार केली- झालं. दुसऱ्या दिवशी डी. चा डेस्क पूर्णपणे रिकामा, पण त्यावर डी. ने ठेवलेले उपयोगी साहित्य- stapler, pins, markers, chalks असं सगळंही गायब. काय तर डी. मला सांगते, “तिने माझ्याविरूद्ध तक्रार केली, तर आता माझं साहित्य मी कुलुप लावून माझ्या कपाटात ठेवणार. डेस्कवर ठेवत होते, उपकार म्हणून, तर ही डोक्यावर बसलीये येऊन....”

शिक्षणक्षेत्राच्या "पवित्र" वातावरणात अशी कोती मनोवृत्ती बघून दुसरा धक्का बसला. भारतातल्या शाळेत तसंही ह्या सुखसुविधांची मारामारच आहे, पण इथे, पयशाला पासरीभर मिळणाऱ्या सवलती असूनही, शिक्षकांना पुरतच नाहित. एकदा माझ्या वर्गासाठी मला चार्टपेपर हवे होते, तर आपण काही इथे कायमस्वरूपी शिक्षक नाही ,ह्या भावनेने मी स्वत: पेपर दुकानातून विकत आणले. तर मिस. डी मला म्हणाली, “अगं, तू कशाला तुझ्या खिशाला खार लावून घेतलास? शाळेकडून मला बघ हे ढीगभर चार्टपेपर मिळतात दरवर्षी!” अशी उदारता. एकीकडे स्वत:च्या पैशाने मुलांसाठी खाऊ आणायचा, आणि दुसरीकडे सहकाऱ्यांबरोबर अगदी फडतूस गोष्टींवरून भांडणं उकरून काढायची, कपाटाला कुलपं लावायची, अशी मिस. डी. ची दोन रूपं!

तिची शिस्त पाहून आधीच मी जरा धसका घेतलेला होता, पण पुढे तर जरा भीतीच वाटायला लागली मला. इथे आधीच शिक्षकांची कर्तव्य आणि मर्यादा अगदी काटेकोरपणे पाळल्या जातात, तपासल्या जातात, आणि त्यातही डी. च्या शिस्तीमुळे मला सुरुवातीला बराच त्रास झाला. नियमानुसार दर आठवड्याच्या सुरूवातीला आम्हाला इंग्रजी विभागाच्या अध्यक्षांकडे आपले lesson plans पाठवावे लागत असत. अर्थात, काही मुरलेल्या शिक्षकांची वट असते, ते कधीच हा नियम पाळत नाहीत, हे कानावर आलेलं होतं. मी Teacher-intern ह्या नात्याने, मिस. डी. च्या अधिकाराखाली शिकवत असल्यामुळे, माझे lesson plans तपासणे, त्यात सुधारणा सुचवणे, आणि मगच मी ते वर्गात शिकवणे, असा शिरस्ता तिने मला आधीच नेमून दिला होता. आता ह्या पद्धतीत दोष असा काहीच नाही, पण मी नवशिकी आहे, विद्यार्थी आहे, हे अनुभव मला overwhelming वाटताहेत, ह्या सगळ्याचा विचार करून तिने माझ्याबद्दल थोडी flexibility दाखवायला हरकत नव्हती. पण तसं कधीच झालं नाही. उलट एकदा तर मी आजारी असतांना तिला माझे plans पाठवू शकले नाही, तर त्याचं उत्तर, “It shows a lack of care on your part” ह्या शब्दांत मिळालं.

माझ्या युनिव्हर्सिटीतून इतर लोक internship करत होते, त्यांचे co-op.s ह्या बाबतीत अगदी निष्काळजी होते. महिन्यातून एकदा दिलेले lesson plans, ते त्यांनी नजरेखालून घातले जेमतेम, की मग वर्गात काय चाललंय ह्याची त्यांना पर्वा नसायची. मिस. डी मात्र माझ्या प्रत्येक दिवसाचा आराखडा अगदी काटेकोरपणे तपासून पहायची. प्रत्येक आठवड्याच्या lesson plan मधे एक आराखडा होता- ह्या तासात माझ्या शिकवण्याचे मूळ उद्देश कोणते (objectives), तसंच, हे उद्देश पूर्णत्वास नेण्यासाठी मी कोणत्या पद्धती वापरणार? (procedures), प्रत्येक दिवशी माझं ध्येय मी गाठलं की नाही, किंवा मुलांना मी काय शिकवलं, ते कळलं की नाही, हे तपासून पाहण्यासाठी मी कोणत्या परीक्षा, किंवा चाचण्या घेणार (assessment) असे भाग प्रत्येक दिवसाच्या प्लॅनमधे समाविष्ट असतात. इतके पद्धतशीर प्लॅन करण्याची चांगली सवय मला मिस. डी मुळे लागली, पण कामाचा ताण वाढल्याचा थोडा त्रास जाणवला.

ह्या लेसन-प्लॅनमधे आणखी दोन गोष्टींचा समावेश असतो, तो भारतातल्या शिक्षणपद्धतीत आहे की नाही, ह्याची मला अजिबात कल्पना नाही. पहिला भाग म्हणजे, न्यू जर्सी राज्य- शिक्षण महामंडळाने (New Jersey Board of Education) नेमून दिलेली मूलतत्त्व आणि ध्येयं. भाषा शिकतांना "लेखन, वाचन, संभाषण, ऐकणे, आणि माध्यमांचे आकलन (Writing, reading, speaking, listening, media-literacy) अशी मूलतत्त्व प्रत्येकाला साध्य झाली पाहिजेत, असा प्रयत्न असतो. मीडिया लिटरसी हा त्यातला अतिशय आधुनिक भाग- कारण, आजकाल आपल्यावर अनेक दृक-श्राव्य माध्यमांतून जो माहितीचा भडिमार होत असतो, त्याचं आकलन होणे, हा सुद्धा शिक्षणाचाच एक भाग मानला गेला आहे. त्यात कंप्युटर्स, टी.व्ही., रेडियो, वर्तमानपत्र, जाहिराती, इंटरनेट, ह्या सगळ्या तंत्रज्ञानाचा अर्थ, आणि त्यातली भाषा समजावून घेणे, ही आजकालच्या मुलांसाठी एक जीवनावश्यक कला (skill) च बनलेली आहे. तर अश्या ह्या मूलतत्त्वांची वर्गावार आणि क्रमवार विभागणी केलिये, की ८वीतल्या मुलाच्या दृष्टीने, लेखनातील कोणते कोणते प्रकार त्याला ८वीत शिकवले गेले पाहिजेत, आणि ते त्याला साध्य झाले पाहिजेत. मी ११वी, १२वी ला शिकवत असल्याने, प्रत्येक तासाला, मी ह्यातली कोणती ध्येयं साध्य करायचा प्रयत्न केला, त्याची मला माझ्या लेसन-प्लॅनमधे नोंद करावी लागते, आणि वर्षाअखेर, न्यू जर्सी महामंडळाची सगळी ध्येय आणि मूलतत्त्व मी माझ्या शिकवण्यात समाविष्ट केली, ह्याची नोंद मला माझ्या वरिष्ठांना दाखवावी लागेल. प्रत्येक दिवसाच्या ध्येयाचा क्रमांक आपल्या प्लॅनमधे लिहिणे, ही एक किचकट गोष्ट सोडली, तर ह्या प्रक्रीयेत दोष असा काहीच नाही. पण अनुभवी शिक्षक असल्या "फालतू" कारणांत वेळ वाया घालवत नसतात, शिवाय, त्यांचे लेसन वर्षानूवर्ष तेच तेच चालले असल्यामुळे, त्यांना फक्त तारखा बदलून पुन्हा तेच पुढे सारता येतात. तसला प्रकार माझ्या बाबतीत शक्य नव्हता.

दुसरी "तापदायक" कार्यप्रणाली अशी, की मानसिक/शारीरिक/भावनिक ह्यापैकी कोणतीही दुर्बलता (disability) असलेल्या मुलांसाठी वर्गात मी कोणत्या सोयी उपलब्ध करून देईन, त्याची प्रत्येक दिवसाच्या लेसन-प्लॅनमधे नोंद करणे आवश्यक आहे. आता ह्याचा अर्थ असा नव्हे, की मला mentally/physically/emotionally challenged मुलांबद्दल कळवळा नाही. माझा प्रश्न फक्त येवढाच, की फक्त कागदावर लिहिल्याने कोणती गोष्ट सिद्ध होत नसते. वर्गात ६० ऐवजी २५ च मुलं असली, तरी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गरजा असतात. त्यांच्याकडे शिक्षकाने लक्ष द्यायचे असते, हे गृहितच आहे. प्रत्यक्ष वर्गात मात्र ४० मिनिटात कितीकिती आणि कायकाय बसवायचे, कसे बसवायचे, ह्याची शिक्षकांना जास्त चिंता असते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वानुसार शिकवायचे असेल, तर शाळेपेक्षा घरीच व्यक्तिगत शिकवणी लावणे बरे, असा सोयीस्कर विचार मी करते. भारतातल्या ६० मुलांच्या वर्गात बसूनही मी जे शिकायचं ते शिकलेच, आणि जे नाही कळलं, त्यासाठी शिकवण्यांचे पैसेही माझ्या पालकांनी भरले. प्रत्येक पद्धत शास्त्रीयदृष्ट्या अतिशय संपूर्ण आणि दोषरहित असली, तरी, रोजच्या व्यवहारात तिचे पालन करतांना अनेक त्रुटी राहून जातात, असला हा प्रकार आहे.
ह्या प्रणालीचा खोलवर विचार पुढील भागात...

1/17/08

अशीच अमुची शाळा असती- भाग ३

मुलं. शाळा म्हणजे भींती नव्हेत. शाळा म्हणजे कम्प्युटर्स किंवा इतर साधनं नव्हेत. हे जितकं खरं भारतात आहे, तितकंच खरं जगात इतर कुठेही आहे- असायला हवं. शिकवायच्या पद्धती वेगळ्या असल्या, मुलं सावळ्याऐवजी गोरी असली, तरी शाळेचा आत्मा असतात ती मुलंच. पण इथल्या मुलांचं जग, मी शाळेत होते त्या जगापेक्षा फार वेगळं आहे. गेल्या शतकात जगाचा नक्षा इतका पालटलाय, की आपण कुठे आहोत तेच कळेनासं झालंय. आम्ही लहान असतांना आमची आजी मिक्सर/टी. व्ही ला हात लावायला घाबरायची. आमचे आईवडील अजुनही कंप्युटर्सशी झगडतायत, आणि आम्ही ह्या सगळ्यांवर ताण केली, असं वाटत असतांनाच ही पुढची पिढी बघून मला म्हातारं वाटायला लागलं...

एकदा मी शिकवण्यात अगदी तल्लीन झाले होते, तर एका मुलीकडे माझं लक्ष गेलं. तिचा चेहरा माझ्याकडे, डोळे माझ्यावर रोखलेले, पण डोळ्यात एकही भाव नव्हता, किंवा मी बोलतेय ते कळतंय ह्याची काहीही पावती नव्हती. मला जरा शंका आली, म्हणून तिच्या नकळत मी फिरत फिरत तिच्या जवळ गेले, तर डेस्कखाली हातांची बोटं मोबाईलवरून Text Message लिहत असलेली!!! शाळेत मोबाईल खरंतर allowed नाहिये. त्यातून वर्गात तर घोर अपराध. पण मला तिला धाक दाखवून सोडून द्यायला लागलं, कारण निदान इथल्या शाळांत तरी आता हे सर्रास चालू झालंय, तर किती किती मुलांना असं वर्गाबाहेर काढायचं??? ह्यावरून जाणवलं मात्र हे, की आजच्या मुलांच्या शाळेतील आणि शाळेबाहेरच्या जगात इतकी भयंकर तफावत निर्माण झालिये, शिक्षणाला काही अर्थ द्यायचा असेल, तर शिक्षणाने ह्या मुलांच्या वेगाशी जमवून घ्यायला हवंय.

मग एकदा मी गंमत केली. त्यांना एका कागदावर एक Text message, एक कादंबरीतला उतारा, एक वर्तमानपत्रातली बातमी, एक कविता, ह्यातून काही ओळी काढून दिल्या, आणि त्यांना विचारलं- की ह्या ओळी कुठून आल्यात ते ओळखून दाखवा. त्यांनी अर्थात सर्वात आधी ओळखले ते SMS आणि त्यावरून वर्गात भरपूर हशा पिकला- की मिस. डी. तुम्ही पाठवता का SMS वगैरे वगैरे... पण त्यातून त्यांना हे कळालं- की वाचनासाठी आवश्यक असलेल्या कितीतरी strategies त्यांच्याकडे आधीपासूनच आहेत. कविता वाचतांना काय अपेक्षित असतं, हे अगदी ७वीत शाळा सोडलेल्या मुलाला सुद्धा माहिती असतं. फक्त ह्या strategies हुकमी त्यांना हव्या तेंव्हा वापरता यायला हव्यात. आपण वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या लेखनप्रकारांकडे वळतो, ह्याचं भान आलं पाहिजे, म्हणून हा प्रपंच.

वर्गात एक दिवस निबंध लिहायला मूड यावा म्हणून मागे संथ सितार लावली. एकदा शिकवलेली माहिती किती लक्षात राहिली, हे पहायला टेस्ट न घेता कंप्युटरवर एक खेळ तयार केला, की त्यातून त्यांना मजा येईल. एखादी कादंबरी शिकवत असतांना त्यावर आधारित चित्रपट वर्गात दाखवायचा, हे तर आता सर्रास सगळे शिक्षक करतात. कवितेऐवजी जर कोणाला एखाद्या pop गाण्याचं विश्लेषण करावसं वाटलं, तर ते ही करता येईल, अशी सूट... आणि इतकं करूनही मुलांचं विश्व वेगळं, ते वेगळंच राहतं. त्या विश्वात शिरण मला जवळजवळ कधीच शक्य झालं नाही. अमेरिकेत मला ३च वर्ष झालियेत म्हणून, की माझा स्वभाव मुळात फारसा outgoing नाही म्हणून, कोणजाणे. पण माझ्या सहकारी शिक्षिकेकडून जे जे कळलं, आणि जे काही थोडं बघायला मिळालं, त्याने माझे अगदी डोळे उघडले.

एक दिवस एक मुलगा शाळा संपल्यावर होमवर्क किंवा राहिलेले assignments पूर्ण करायला वर्गात येऊन बसला. आम्ही दोघी होतोच तिथे- तर गप्प निघाल्या. हा मुलगा तसा वाया गेलेलाच म्हणायला लागेल. बरेचदा शाळा चुकवणारा, अभ्यासात जेमतेम, पण उलट उत्तरं द्देण्यात वस्ताद, आणि वर्गातला पॉप्युलर गुंड!! तर त्या शिक्षिकेने विचारलं, ’काय रे, अभ्यासात लक्ष नाही तुझं, मग तू पुढे काय करणार? ’ ठरलेलं उत्तर, ’कोणजाणे, आत्ताच मी शाळेनंतर मॅकडोनल्ड मधे काम करायला लागलोय. पैसे नसले तर गर्लफ्रेंड मिळत नाही, खी खी खी...” ह्यावर आम्ही हसलो. “कुठे राहतोस?” “न्यू यॉर्कजवळ त्या भागात...” “तिथे गँग असतात म्हणे...” “हो............आमच्यात दोन पंथ आहेत, काळे आणि लाल. (त्याने काय शब्द म्हटले ते ही मला निटसं कळलं नव्हतं). आता परवाच माझा एक मित्र मेला.” “काय!!!!!!!” “हो, त्याने मला रात्री हाक मारली, की त्या टोळीला हाणायला जायचं, तर मी असाच पायजाम्यात बाहेर पडलो, आणि तिथे मारामारी झाली, मी लवकर घरी आलो. तर कोणीतरी पिस्तुल आणलं होतं, तो थांबला, आणि मेला.... त्याच्याजागी मी असू शकलो असतो!” “हे तुला कळतं ना, तरी मग तु का गँगमधे जातोस?” “मी गेलो नाही, ते अनुवांशिकच असतं. माझी आई मला फार ओरडते. तिला हे आवडत नाही. पण माझे वडिल त्या गॅंगमधे होते.. ते नंतर आम्हाला सोडून निघून गेले. पण त्यांच्यामुळे आता मी ही आपोआपच त्या गँगचा मेंबर झालो. गँगवाले एकमेकांना मदत करतात मिस. जॅकसन, आता मला ही नोकरी लागली, ती त्यांच्यामुळे, तर मी कसं काय नाही म्हणणार? ऐकावं लागतं, नाहीतर तुम्हीच मराल एक दिवस...” ह्यावर आम्ही गप्प. हा १६-१७ वर्षाचा, ११वीतला मुलगा आम्हाला गँगचं तत्त्वज्ञान समजावून सांगत होता, आणि त्याचं ते रात्री घरी गेल्यावरचं विश्व इतकं भयानक, त्यात जगायचे/ तगायचे धडे आम्ही त्याला देऊ शकत नव्हतो.

दुसरी कथा एका मुलीची. १२वी, वय साधारण १७, उत्तम रेकॉर्ड, चांगले मार्क मिळाल्यामुळे "Advanced English” वर्गात वर्षाच्या सुरुवातीला दाखल झालेली. तिची आई एक दिवस भेटायला आली होती, तर मी माझ्या सह-शिक्षिकेला विचारलं, की काय झालं? तर कळलं, की मुलगी प्रेग्नंट आहे. शाळा बुडवावी लागेल, पण निदान बाळ होईपर्यंत तरी तिला अभ्यास करायचा आहे, आणि नंतरही शाळा सोडायची नाहिये, त्यामुळे तिचे पेपर, टेस्ट मी तुम्हाला घरून करून पाठवले तर चालतील का? हे विचारायला आई आलेली.

१४व्या वर्षापर्यंत गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड नसेल, तर तुम्ही loser category तले, अशी ही शाळा संस्कृती. Prom, म्हणजेच शाळेतला पहिला formal डान्स, त्याला सगळ्यात सेक्सी ड्रेस घालून कोण आलं, त्यात कोणाचा पार्टनर कोण होतं, Prom-queen/ king कोण झालं, हे त्या वयातल्या मुलांचे जीवनमरणाचे प्रश्न बनतात. त्याचंही commercialization करून शाळांना पैसे मिळतात, पण मुलं कुठली किंमत मोजतायत, ते त्यांना दिसतंय का? अर्थात, एकीकडे मध्यमवर्गीय, साधारण पालक आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यायचा प्रयत्न करत असतातच. पण "Do whatever, just don't get pregnant” असा काहींचा approach, तर ६ ला घरी आलं नाही तर जेवण नाही, असेही काहीजण.

इथे मुलं पॉकेटमनी साठी छोट्यामोठ्या नोकऱ्या करतात, ते तर सगळ्या जगाला माहिती आहे, पण आजची मुलं किती भयंकर exposure ला सामोरी जातायत, किती वेड्या peer-pressure खाली जगतायत, आणि त्यातून त्यांचं बाल्यच हरवतंय असं मला वाटतं.

परवाच माझ्या World Literature च्या वर्गात मी मोठ्या उत्साहाने रामायण शिकवायला घेतलं. साधारण कथेचा सांगाडा समजावून सांगितला, तर एका मुलीचा लगोलग प्रश्न, “म्हणजे सीता रावणाची mistress झाली का? Did he rape her?” गळ्याशप्पथ सांगते, ह्याचा विचार मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कसा केला नाही, ह्याचं मलाच नवल वाटलं, पण त्याहून नवल, की सगळ्या वर्गासमोर, शिक्षिकेला हा प्रश्न विचारता येतो, अशी शिक्षणसंस्थाही असू शकते, त्याचं..... अमेरिकेचं obsession with sex and sexuality हा एक मोठाच विषय आहे, पण शाळेतही त्याचे इतके पडसाद उठतील अशी कल्पना नव्हती. नंतर एकदा अशीच माझी सह-शिक्षिका एका मुलीला douchebag चा अर्थ सांगत बसली होती. तुम्हालाही माहिती नाही म्हणता? शोधा, शोधा, इंटरनेटवर शोधा, बरंच काही सापडेल ह्याची गॅरेंटी आहे!

असं असलं, तरी मुलं ती मुलंच. अगदी सेक्सकडे बघायचा त्यांचा दृष्टीकोणही किती निरागस असतो कधीकधी! उत्सुकता असते. एकमेकांना "गे" म्हणून चिडवणंही असतं. माझ्या सह-शिक्षिकेचं जरा स्थूल पोट पाहून एक मुलगा विचारतो, “तुम्ही प्रेग्नंट आहात का?” बिच्चरी, तिचं तर लग्नंही झालेलं नाही!
आणि बाकी सुद्धा बरचसं असतं. एकदा एक मुलगी शेवटच्या पिरियेडला आली, तीच कोकलत, की मला भूक लागलीये. मी तिला म्हटलं, “जेवली नाहिस का?” तर तिची आई बहुतेक डिव्होर्सी, एकटी कमावणारी असल्यामुळे ओव्हरटाईम करत असते. तिला मुलांचा डब्बा करायला कधीच वेळ नसतो. तर हिला घरी जाऊन फ्रीजमधे असेल ते किडूकमिडूक खाऊन पोट भरावं लागतं. आणि हीच कथा साधारण अमेरिकेतल्या कुठल्याही शहरी जीवनात दिसते. काही शिक्षिका स्वत: २ तास ड्राइव्ह करून रोज शाळेत ७.३० ला पोचतात, त्यांच्याही मुलांची आहे.


माझ्या सह-शिक्षिकेने तिच्या ड्रॉवरमधे थोडा सुकामेवा, काही दाणे, चणे होते, ते लगेच काढून ह्या मुलीला दिले, आणि वर्गातही वाटायला लावले. एकीकडे कोलमडणारी समाजव्यवस्था, तर दुसरीकडे ही informality सुद्धा इथेच सापडते.

1/11/08

अशीच अमुची शाळा असती- भाग २

ह्या वर्गात तरी मला भरपूर साधनं दिसली, आणि भरपूर निर्मितीक्षमताही. आता पाठ्यपुस्तकच नाही तर ही शिक्षिका काय आणि कुठून शिकवणार हे आधी मला कुतुहल होतं. तर त्या दिवशी "library visit असा कार्यक्रम होता. तिने मुलांना एक छोटंसं लेक्चर दिलं- कि लायब्ररीत कशाला जातोय, काय करायचंय वगैरे. शिवाय handouts होतेच सगळं समजावायला!!!

खरंच, इथे त्यांना handouts दिले नाही, तर उद्या पालक येऊन कोर्टकेस करतील या भीतीने handouts वाटतात, की एकूण कागद फुकट, प्रिंटिंग फुकट, कंप्युटर्स सदा हाताशी, तर handout बनवायला काय जातंय, ह्या विचाराने, कोण जाणे, पण कागदांचा जणू महापूर लोटलेला असतो। Articles, photocopies, assignments, course syllable, graphic organizer, lists, agenda, study guides देवा देवा देवा, ते सुद्धा डबल साईड नव्हे! एक ना दोन शेकडो प्रकारचे कागद पोरांना द्यायचे, त्यांनी ते हरवायचे, आपण पुन्हा थोड्या extra copies हाताशीच ठेवायच्या, पुन्हा वाटायच्या, हे इतकं अंगवळणी पडलेलं, की ते नाही केलं तर आपल्यालाच आपण किती कोत्या मनोवृत्तीचे आहोत असं वाटायला लागतं. खरंच ह्या कागदांनी अभ्यास करणाऱ्यांना पुढे उपयोग होत असेल, पण प्रत्येक गोष्ट audio + visual, द्रुक-श्राव्य, दोन्ही माध्यमातून मिळायलाच पाहिजे, ही सवय लागल्यावर, आणि handout आहेच मदतीला, हे आश्चासन असल्यावर शिक्षिकेने वर्गात कितीही घसाफोड करून स्पष्टीकरण दिलं, तरी त्याला काय किंमत उरते? Handouts च वाटायचे असतील, तर पोरांनी correspondence course च का करू नये, असा प्रश्न मला अनेकदा पडला आहे. पुन्हा, दोन बाजू आहेतच.


तर अशी सगळी जय्यत तयारी करून आमची जत्रा शाळेच्या लायब्ररीत पोचली। तिथे computer-instructor ने पोरांना समजावलं, की internet वर रीसर्च कसा आणि का करायचा, कोणते "डेटाबेसेस" वापरायचे, त्यातले कोणते लेख हे अभ्यासासाठी योग्य असतात (peer reviewed articles) इत्यादि... ही मुलं नुकती ७वीत आलेली, आणि त्यांना माहितीचं इतकं भंडार उपलब्ध आहे, जे आम्हाला पदवीच काय, पदव्योत्तर शिक्षणातही मिळालं नव्हतं. खरंच, पुढील शैक्षणिक प्रगतीचा पाया इथे बांधला जातोय, हे जाणवलं. पोरंही आजकाल कम्प्युटर्स सर्रास हाताळू लागली आहेत, त्यामुळे त्यांनी पटापट पासवर्ड वगैरे घालून साईटस उघडल्या, आणि कामाला लागली...

लायब्ररीत हा रीसर्च करून त्यांना त्याविषयी एक प्रेसेंटेशन तयार करायचं होतं। विषय त्यांनी त्यांच्या आवडीचा निवडायचा होता. एका शाळेत तर प्रत्येक विद्यार्थ्यामागे एक कंप्युटर अशी सोय होती. तिथल्या मुलांनी म्हणे Science Project मधे झाडांचे वर्गीकरण, किडे किंवा प्राण्यांचे जीवनचक्र, ह्या विषयांवर i-movies बनवल्या होत्या!!! अगदी पार्श्वसंगीत, संपादन, सगळं साधून....

सोयी-सुविधा आहेतच, पण त्यांचा योग्य विनियोगही केला जातोय, हे अमेरिकन शिक्षणपद्धतीचं खास वैशिष्ट्य पाहून खरंच कोणाच्या मनात आदर निर्माण होणार नाही? पण निर्मितीक्षम शिक्षणपद्धतीसाठी नेहमीच साधनांची, सोयींची आवश्यकता असते असं ही नाही!!! निरीक्षणाच्या दुसऱ्या खेपेला मी वर्गात पोचले, त्या आठवड्यात पोरं पिकनिकला जाऊन आली होती। आणि त्या दिवशी वर्गात पिकनिकची गाणी सादर करणं चाललं होतं. एखाद्या प्रसिद्ध गाण्याच्या चालीवर, पिकनिकचा अनुभव सांगणारी गाणी पोरांनी स्वत: रचली होती... त्यातून त्यांना कवितेच्या मूलभूत तत्त्वांची माहिती सहजच घडत होती- यमक, वृत्तात बसणारे शब्द, ह्यांचा विचार स्वत: करून शिवाय पिकनिकचा आशय त्यात येणं, हे सगळंच आपसूक साधत होतं. ही गाणी एकट्याने नं बसवता ग्रूपने बसवायची होती, म्हणजे मुलांच्या वैयक्तिक क्षमतेचा विचारही त्यात होता.

Edu-tainment, म्हणजेच, education with entertainment, ही संकल्पना प्रत्यक्षात आणायला दरवेळी पैसे लागतातच असं नाही। आम्ही लहान असतांना कवितांना हिंदी चित्रपटगीतांच्या चाली लावून पाठ करायचो. पण त्याच चालीत स्वत: कविता करावी, हे आम्हाला कधी सुचलंही नाही, किंवा कोणी सुचवलं ही नाही...... पाठांतरावर भर देण्यात निर्मितीक्षमता मेली, हे कोणाच्या लक्षात कसं आलं नाही? मुलांना आपल्या देशात साहित्य, कवितांची गोडी लागतच नाही, त्याचं कारण हेच तर नसेल? इथे मुलांसाठी अभ्यासेतर वाचनाच्या साहित्याचा दर्जा, आणि संख्या, हा तर एक स्वतंत्र विषय आहे. हॅरी पॉटरचं फक्त नाव आपल्याला माहिती आहे, पण हॅरी हा काही बालसाहित्यातला पहिला आणि शेवटचा हीरो नव्हे. दरवर्षी बालसाहित्यासाठी लेखकांना Newberry Awards जाहिर केले जातात. त्या पुस्तकांचा नाद मलाही चटकन लागला, इतका दर्जा उत्तम होता.

हेच नव्हे, असे कितीतरी अनुभव दर निरीक्षणात येत होते। साधी गोष्ट- मुलांना एका कथेतल्या पात्राचे व्यक्तिचित्रण करायचे आहे, तर त्यासाठी काय युक्ती, की एका chart वर डोळे, हृदय, ओठ आणि पायांचे चित्र असणारे कप्पे करायचे. डोळ्यांच्या कप्प्यात, त्या पात्राने काय बघितले, ओठ म्हणजे त्याने कोणते उद्गार काढले, हृदय म्हणजे त्याच्या भावना, असे विश्लेषण पोरांनी केले. खरंच किती साध्या गोष्टींतून मुलांसाठी आनंद निर्माण करता येतो, आणि जिथे शिकण्यात आनंद आहे, तिथेच शैक्षणिक प्रगती आहे, हो ना? अभ्यासासारख्या रटाळ गोष्टीला सुरस बनवून मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी फक्त विचारांची दिशा बदलण्याची आवश्यकता आहे.

पु।लंच्या एका कथेत असं काहितरी होतं, की आमच्यावेळी गणिताची पुस्तकं म्हणजे रूक्ष आकडे आणि आकृत्या, पण आजकाल कशी गोंडस चित्रं असतात! मन्याने सर्कशीत ३ विदूषक पाहिले, तिथे लगेच विदूषकांचं चित्र, अशी गंमत असते... म्हणजे we are on the right track, हे ही नसे थोडके!

हे मला नवीन होतं, ज्या पद्धतीने मी शिकले, तीच पद्धत बरोबर, असा प्रतिगामी विचार करून इथे शिक्षिका म्हणून माझा निभाव लागणार नाही, हे त्या निरीक्षणांतून लक्षात आलं. मग माझ्या वर्गात मी मुलांना persuasive essay writing शिकवायला जाहिरातींचा आधार घेतला.

वर्गातल्या प्रत्येक गटाने एखाद्या नवीन वस्तूची जाहिरात तयार करायची, असा प्रोजेक्ट बनवला। त्यात hybrid car, health food restaurant, ipod असे नाविन्यपूर्ण choices ठेवले. सहसा लोक जे घेऊ पाहणार नाहीत, त्या गोष्टींची जाहिरात करतांना persuasive strategies वापरण्यावर जास्त भर द्यावा लागेल, असा विचार त्यामागे होता. जाहिरात सादर करतांना प्रेक्षकांनी प्रश्न विचारायचे होते- उदा. “मी म्हातारी आहे, तर तुमचा ipod मला वापरता येईल का?” त्या प्रश्नांना उत्तरं देतांना तुमच्या rhetorical strategies चा कस लागणार होता...... मुलांना हा प्रोजेक्ट आवडला, त्यातच त्याचं यश आहे, अशी मी स्वत:ची पाठ थोपटून घेतली.


पण सगळ्याच प्रकारच्या ज्ञानाला काही गोडगोड, मनोरंजक, सुंदर वर्ख लावून मुलांपुढे ठेवता येत नाही, हे ही तेवढंच खरं. जेंव्हा मूलभूत संकल्पना शिकवायच्या असतात, तेंव्हा खरी कसोटी असते. कुठलंही साहित्य, कथा, कविता वाचत असतांना त्यातून स्वत:चे अर्थ स्वत:च शोधता आले पाहिजेत, ही सवय मुलांना लावणं मला फारसं जमलं नाही, आणि कित्येक अनुभवी शिक्षकांनाही ते अजून साध्य झालेलं नाही. त्या बाबतीत अमेरिकन शिक्षणपद्धती मला जरा वरवरची, उथळ वाटली. The road to hell was made with all good intentions- असं काहिसं..... कसं, ते बघूया पुढच्या भागात!
Published on esakal.