आज युनिव्हर्सिटीत गेले.. तिथे आता माझे फार दिवस उरले नाही (मे मधे ग्रॅजूएशन) अशी जाणीव झाली, पण खरंच एक दिवशी युनिव्हर्सिटीत जाणं बंद होईल तो दिवस कसा असेल त्याची कल्पना मात्र मनाला करता आली नाही.. हे माझं आहे, आणि हे माझंच राहणार आहे, ह्या भोळसट विश्चासाच्या भरोशावरच तर इथवर आले। नाहीतर मन गुंतलेल्या जागांना मागे टाकून येणं सोप्पं का असतं?
त्यावरून सुचलं- आठवणींच्या गावात जाणं कसं असतं.....
परवाच एक कार्यशाळा केली- मुलांना लेखन कसं शिकवावं ह्याबद्दल. त्यात प्रमुख वक्ते म्हणून एक नामांकित शिक्षकच आले होते. त्यांची पुस्तकं छापली गेलियेत तरी हाडाचे शिक्षकच, त्यामुळे, त्यांनी भाषणात दोन वाक्यांची सुरुवात करून आम्हालाही मुलांसारखं कामालाच लावलं. आता मी पण त्यांचा कित्ता गिरवत तुम्ही हे वाचत असाल तर तुम्हाला सांगते- तुम्ही माझ्या ह्या online वर्गात आहात तोवर हे करून पहा:
१. एकूण ३ कागद लागतील. पेन, पेन्सिल, रंग हवे तर रंग ही जवळ ठेवा.
२. आता पहिल्या कागदावर एक यादी करा- तुम्ही आजवर कुठेकुठे राहिलात, त्या ठिकाणांची यादी, मग ते कोणतंही ठिकाण असो... काही लोक कसे कॉलेजच्या कट्ट्यावर राहतात! काही लोक कायम देवळांत प्रवचनं ऐकत बसतात....तर ते एक ठिकाण म्हणून दिलं तरी चालेल... फक्त तुमच्यासाठी ते ठिकाण महत्त्वाचं असलं पाहिजे. अशी जितकी ठिकाणं १ मिनिटात सुचतात तेवढी लिहा......चला पटपट- ३० सेकंद तर इथेच संपले!!! बरं अजून १ मिनिट घ्या...... काय काय जागा दिसतायत तुमच्या यादीत? होस्टेलची ती गल्ली? की तुमचं ऑफीस? फारच घरकोंबडे असाल तर ४ जागा म्हणजे घरातल्या ४ खोल्याच दिसताहेत का? की अख्खी शहरं- जिथे जिथे बदल्या झाल्या ती?
जे असेल ते असो. काहीही चालेल. कारण ही तुमची यादी आहे.....आता पुढे.....
३. आता, त्या यादीतुन एक ठिकाण निवडा- ह्या ठिकाणाचे तपशील तुम्हाला छान आठवताहेत ना? किती रूतून बसलेत तिथे घालवलेले दिवस तुमच्या मनात! प्रत्येक भिंतीचा रंग, प्रत्येक झाड, प्रत्येक घराच्या खिडक्यांचे आकार.....दिसतंय ना सगळं अगदी काल पाहिल्यासारखं तुमच्या डोळ्यांपुढे??? चला तर मग.... तुमची आजची परीक्षा म्हणजे- ह्या जागेचा एक नकाशा काढा नवीन कागदावर. त्यासाठी चित्रकला यायची गरज नाही- फक्त तपशील महत्त्वाचे! रंग ही घ्या की- किती दिवस झाले रंगकांडी हातात धरून?? गंमत वाटत्येय? वर्गाबाहेर काढीन तेव्हा रडाल, त्यापेक्षा आत्ता लगेच कामाला लागा बघू! फक्त ५ मिनिटं देणार आहोत. तुमच्या भावविश्चातली जागा माझ्या भावविश्चापर्यंत पोचवायची असेल, तर काय काय दाखवावं लागेल त्या नकाशात ह्याचा विचार करा. हवं तर नावं लिहा खाली- “हे माझं घर”, “ही ग्यानबाची विहीर.......” चला चला....
४. हम्म्म्म......कसा दिसतोय ना छान नकाशा? आधी अगदी निरूत्साहानेच ह्यात पडलात, तरी आता नकाशा पाहून बरं वाटलं ना? अगदी स्वत: काहीतरी “create” केल्याचं समाधान..... पण अजून संपला नाहीये हं तास. अजून एक गोष्ट राहिलीये. कितीही केलं तरी नकाशात सगळं दाखवता आलं नाही म्हणता? मग आता एक गोष्ट लिहा- त्या गोष्टीला शेंडाबुडखा नसेल तरी चालेल. शुद्धलेखनाच्या चुकाही आज तुम्हाला माफ! खरंच माफ. फक्त झोकून द्या स्वत:ला त्या जागेत असल्याच्या अनुभवात. कोणते रंग आहेत त्या जागेत, काय गंध येताहेत? वारा आहे, की पाऊस? थंडी आहे की कोवळं ऊन? सगळं अनुभवा, आणि अनुभवतांना लिहा. कोणते शब्द कागदावर उतरले, काय व्याकरण होतं त्याची चिंता आत्ता करू नका. फक्त तुमचं ते विश्व सजीव होईल तोवर लिहा. काहीही, कसंही. मुक्तछंद.
५. हातांचा वेग कमी पडतो, पण मन धावत राहतं. त्या अर्धवट बांधलेल्या इमारतीच्या कट्ट्यावर पुन्हा बसून येतं. झाडांना स्पर्श करून, रस्त्यातले खड्डे चुकवत, उंडारत राहतं त्या चौकटीत. किंवा कधीकधी बाजारात रमतं, ते बाहेर पडायला तयारच होत नाही. स्टीलची चकचकणारी भांडी एका दुकानाच्या दारातूनच दिसताहेत. दुसरीकडून ओला, दुधाळ, थंड वास येणारी कुल्फीची गाडी आणि त्यावर ठेवलेला लाल फडक्यात गुंडाळलेला माठ पाहता आहात तुम्ही. त्याचवेळी, त्या दृश्यांना मागे सारून उरणारी भावना- हातात घेतलेले हात...जाणवताहेत अजुनही... पण तेच हात आता लिहिताहेत. शब्दांच्या पलिकडले, तरी शब्दांच्या पलिकडे न जाऊ शकणारे आभास, उतरताहेत कागदावर अगदी शेवटची घंटा वाजेपर्यंत.
६. इतकं मनापासून लिहिता येतं? इतकं मनातलं लिहिता येतं? इतक्या सहज, नकाशाच्या रेघांवरून घसरत, भूतकाळात जाता येतं? ते गाव खरंच असं होतं, की माझ्या मनात ते तसं होतं? काय फरक पडतो त्याने? कागदावर उतरला तो अनुभव तर खराच होता ना! ज्या क्षणी तुमच्या मनाने तो अनुभव घेतला, त्याच क्षणी तो खरा झाला. साकार झाला. आता फक्त एक. हे लिहिलेलं कोणाला तरी वाचायला द्या. संकोच करू नका, भिऊ नका. तुमच्या प्रयत्नाची पूर्तता तेंव्हाच झाली, जेंव्हा तुमच्या लेखनातुन तुम्हाला आनंद मिळाला. आता फक्त तो आनंद दुसऱ्यांनाही मिळतो का बघा. आणि त्यांना विचारा- काय आवडलं ह्यातलं सगळयात जास्त? एखादी ओळ? एखादी उपमा? एखादा तपशील?
बघा पडताळून एकमेकांचे अर्थ, आणि मग......
७. त्यातून एकच ओळ निवडा. “सोनेरी अक्षरांची ओळ”. ह्या ओळीत भरलं असेल तुमच्या लेखनाचं सार. ती होतीच तिथे, फक्त काही साध्या सुध्या ओळींमधे लपली होती. मस्तच जमलीये ही ओळ- असं समाधान वाटायला लावणारी ओळ, जिच्यातून तुमच्या लेखनसामर्थ्याचा प्रत्यय येतो ती एकच ओळ. तिच्यात अजून किती किती अर्थ भरलेत, ते बाहेर यायला धडपडताहेत....
तास इथे संपला, मात्र लेखन संपलं नसेल. ते तर आता कुठे सुरु झालंय. त्या सोनेरी ओळीभोवती आता एक संपूर्ण कथानक जन्म घेईल. ते कागदावर उतरवायला मी तुम्हाला सांगेन म्हटलं, तरी मी सांगायची वेळच येणार नाही... माझे विद्यार्थी आता स्वत:च लिहू लागतील. ट्रेनच्या गर्दीत, बागेतल्या बाकावर, कोणी कंम्प्युटरसमोर वेळ काढतांना एकदम स्फूर्ती येऊन.... तर कोणी मनातल्या मनात. कसंही असो- स्वत:साठी लिहिणं महत्त्वाचं.