PRवास......... व्हीएकेज १

पेटीत पेटी चंदनी पेटी, त्यात भरले माणिक मोती... असले उखाणे, किंवा मंगळागौरीची गाणी ऐकली होती, पण
पोर्तोरीको बेटाजवळ
बेटं छोटी छोटी,
नीलमच्या खाणीत कसे
उठून दिसती मोती!

हा उखाणा जर कोणी घातला, तर त्याचे उत्तर आहे, "कुलेब्रा" (Culebra) आणि "व्हीएकेज" (Vieques) ! पोर्तोरीकोचाच एक भाग समजली जाणारी ही दोन बेटं आहेत, आणि पोर्तोरीकोच मुळात टीचभर, तरी ह्या बेटांच्या तुलनेत एक राज्य वाटावं, इतकी ती छोटी आहेत. आम्ही तिथे जायचं अचानकच ठरवलं, कारण एक मित्र-मैत्रिण व त्यांची मुलगी, अशी छान सोबत मिळत होती. कुलेब्राचा "फ्लमेन्को" (Flamenco) बीच जगातल्या सर्वाधिक सुंदर सागरकिनाऱ्यांपैकी म्हणून प्रसिद्ध आहे, पण व्हीएकेजला "बायोलुमिनिसन्ट बे" (Bioluminiscent Bay) बघता येईल, शिवाय, तिथले किनारेही काही कमी सुंदर नाहीत, तर २ दिवसात आधी व्हीएकेजच बघू, असं ठरलं.

चित्रपटांमधून एखादी व्यक्ती मेल्यावर स्वर्गात जातांना दाखवतात, तेव्हा स्वर्गाचा रंग पांढराशुभ्र असतो, आणि तिथे ढग (आणि देव) वगैरे सोडता बाकी काही प्रेक्षणीय नसतं :) मी मात्र व्हीएकेजला पृथ्वीतलावर स्वर्ग अनुभवला! अर्थात, तो ही जवळ जवळ मेल्याशिवाय दिसला नाही, ही गोष्ट सोडा!

आम्ही व्हीएकेजला जाणार, असं कळल्यावर लगेच सूचनांचा भडीमार, पण त्यातले खरे-खोटे काहीच कळेना, अशा गोचीत आम्ही सापडलो:
१.  बेटांवर जायला अगदी स्वस्त ($२-३ प्रत्येकी) फेरी बोट असते, पण तिचा भरवसा नाही. रीझर्वेशन करता येत नाही. अत्यंत गर्दी, लांब रांग असते हे ऐकीवात आले, पण त्याबद्दल एकही चांगली धडाची वेबसाईट सापडली नाही.
२. चार्टर प्लेन  ने गेलो तर (साधारण $70 प्रत्येकी) ते फारच असुरक्षित, पोरं घाबरतात, उलट्या होतात, विमान पाण्यात पडायची शक्यता आहे!
३. Bio Bay चा प्रकाश मंदावलाय, पण त्याच्या नावाने टूरीस्ट लोकांना फसवतात, आणि पैसे उकळतात.
४. बायो बे मधे शार्कची अंडी असतात, आणि त्यांच्या ब्रीडींग सीझनमधे मादी-शार्क खूप आक्रमक होतात. पाण्यात हात घातला, तर चावतात, ओढून नेतात!
५. बेटावर गाडी भाड्याने घ्यायला खूप आधीपासून बुकींग लागते, त्या ऐवजी, प्रत्येक ट्रीपचे २-२ डॉलर देऊन टॅक्सी मिळतात वगैरे वगैरे.

कुठे २ डॉलर फेरी, आणि कुठे ७० चे विमान, असा विचार करून आम्ही अभ्यंगस्नान करून सकाळी ८ वाजता फाहार्डो (Fajardo) ला पोचलो, जिथे फेरीची अक्षरश: मैलभर लांब रांग आधीच लागलेली होती. त्यातून एक फेरी बोट बिघडली आहे, कधी निघेल सांगता येत नाही असे कळले. तरीही एक तासभर धीर धरला, पण अचानक फेरी निघाल्याचा भोंगा ऐकू आला! हे काय प्रकरण, म्हणून अगदी खिडकीजवळ जाऊन विचारले, तेव्हा कळले, की कुलेब्राची फेरी बिघडली, पण व्हीएकेजची आत्ताच निघाली! कपाळाला हात लावला. आम्ही चुकून कुलेब्राच्या लांब रांगेत तास घालवला होता! पुढची फेरी ३ तासाने! इथेच सकाळचे १० वाजले होते!


आता दुसरा उपाय नाही, म्हणून प्लेनची माहिती फोनवर शोधली, आणि ऐअरपोर्टवर पोचलो. तिथेही तास-दीडतास थांबावे लागले, पण निदान एसी मधे, पोरांच्या झोपा उरकल्या, आणि रणरणत्या उन्हापासून बचावलो. शिवाय, स्वदेशी बाण्याने बरोबर आणलेले ब्रेड-पीनटबटर-जॅम तिथेच खुर्चीवर उघडून, सॅन्डवीच बनवून, त्याचे भुस्कट पाडून जेवणेही उरकली. तिकीटं काढतांना त्यांनी आम्हाला वजनं विचारली (बॅगांची नव्हे, आमची), तेव्हा पुन्हा मनोमन रोज धावायला जाण्याचा निश्चय केला, पण प्लेन पाण्यात पडायच्या धास्तीने २-५ पौंड कमी करूनही मेलं सांगता येईना! :) प्लेनमधे बसतांना मग त्या वजनांप्रमाणे आम्हाला बसवलं, मात्र सुदैवाने, तिथे पुन्हा "त्या" आकड्यांचं उच्चारण झालं नाही :)


प्लेन आलं, तेव्हा प्लेन आहे, की कार/मिनीव्हॅन? असा प्रश्न पडला, कारण हे चार्टर प्लेन, पायलट धरून 9 जण बसतील, इतकं छोटं होतं! पायलट-सीट कारमधे ड्रायव्हरची असते, तशीच होती, अगदी आपल्या पुढेच. सगळे कंट्रोल्स दिसत होते, मधे काचही नाही! निघालो, तर मागून धक्का द्यावा लागतोय का काय, इतकं ते विमान दोन चिमुकल्या चाकांवर जेमतेम तोल सावरत खुटुखुटू चाललेलं. पायलटने चुकून आपल्या बाजूची खिडकी कशी उघडी ठेवलिये? म्हणून बंद करू का, असं मी विचारलं, तर तो म्हणाला, राहू देत! आयुष्यात प्रथमच विमानात उघड्या खिडकीपाशी बसल्याने जो काही माझ्या पोटात गोळा आला, तो विमान उतरे पर्यंत गेला नाही! टेक-ऑफ केला, तेव्हा जमीनीवरून जेमतेम १०० फुटांवर पोचलोयसं वाटलं.

मग मात्र डोळे विस्फारले, ते भीतीने नव्हे, तर आनंदाश्चर्याने! विमानाच्या उघड्या खिडकीमुळे वाऱ्याचा झोत चेहऱ्यावर आला, तर असं वाटलं, की बाजूच्या भींती गळून पडल्याहेत, नि आपणच आपले स्वैर आकाशात उडतोय!
 खाली निळ्याशार समुद्राचे पाणी भर दुपारच्या उन्हात असे चमचमत होते, की जणू नीलमची खाण उलटी केली असावी! फिरत्या रंगाची चिंतामणी साडी, त्यावर सुळकन उड्या घेणाऱ्या मासोळ्यांची खडी, असंही वाटून गेलं. कुठे गडद, तर कुठे फिकट, कुठे पिस्ताकडे झुकणारा टर्क्वाईझ, तर कुठे स्वच्छ आकाशी, अशा असंख्य निळया छटांनी पाण्यात पाठशिवणीचा खेळ मांडला होता.


बेटावरची शुभ्र वाळू आणि हिरवळ दिसली, तसे तर डोळ्यांचे पारणेच फिटले. असे देखावे विन्डोज वॉलपेपर किंवा कॅलेंडरवर बघितले, की आपण मनातल्या मनात म्हणतो, "नक्कीच फोटोशॉप मधून रंग भरलाय", किंवा, "हे असलं दृश्य कधी खरं असूच शकत नाही, त्यांनी इकडून तिकडून जोडून बनवलंय!" पण आता माझी खात्री पटली, की खरेच पृथ्वीवर असे अलौकिक देखावे आहेत, आणि ते ही आपल्यासारख्यांच्या अवाक्यात आहेत, म्हणजे आपण किती भाग्यवान!
देवाने इहलोकीच्या माझ्या पापांना क्षमा केली असावी, म्हणूनच असे अद्भुत काहीतरी ह्या इहलोकावरच आहे, हे मला बघायला मिळालं असावं. म्हणून मेल्यावर जर का सुदैवाने स्वर्गात जाण्याचा योग आलाच, तर मी देवाला प्रार्थना करेन, की देवा, त्या खऱ्या स्वर्गाचं स्वरूपही असंच असू देत....

क्रमश:

No comments: