3/8/17

एक दिवस त्यांचाही का न असावा?

हॅपी वुमन्स डे! 
आज जागतिक महिला दिन! नेमका मध्यरात्री धूराच्या भोंग्याची बॅटरी संपल्याच्या पीक पीक आवाजाने झोपमोड झाली, म्हणून अंधारात फोन बघायला गेले, तर एका मित्राने हा
फोटो पाठवलेला!

बरं नंतर त्याला फ़ैलावर घेतलं, तर म्हणाला, "कावलो होतो यार, तुमच्या सगळ्या वुमन हे वुमन ते पुराणाने डोकं उठवलं, म्हणून गंमत केली."

मी पण विचार केला, खरंय बिचाऱ्याचं म्हणणं :) एकीकडे पणजीपासून मुली पर्यंत सगळ्या स्त्रियांचे गोडवे गाणारे व्हॉट्सऍप संदेश, आणि दुसरीकडे स्त्रियांच्या एकूण जीवनशैलीचा विनोदी पद्धतीने आढावा घेणारे पुढे-सरकवले संदेश. काही तुरळक स्त्री-वैज्ञानिक वगैरे विविध क्षेत्रातल्या आघाडीवरच्या स्त्रियांचे स्मरण अथवा गुणगान करणारे.

पण ह्या सगळ्यात खूपच भाव खाऊन जाणारे, हमखास स्मायली मिळवणारे, महिला दिनाची संधी साधून, पुरुषांना कोपरखळी मारणारे, चक्क पुरुषांचा या भूतलावरचा जन्मच व्यर्थ असल्यासारखे नव्याने गरळ ओकणारे संदेश.
स्त्रीवाद, किंवा स्त्रियांना सामान हक्क मिळवून देण्यासाठी झगडणे, म्हणजे पर्यायाने पुरुषांना पायदळी तुडवून बदला घेणेच, अशा प्रकारचे दोन्ही बाजूनी सरसकटीकरण (स्टिरिओटायपिंग) करून डोक्यात जाणारे!

बरं पण महिलादिनाचा कितीही ऊत आलेला असला, तरी हे वरचं चित्र म्हणजे सरळ सरळ, बॉलीवूडच्या दुर्योधन आणि दु:शासनाने द्रौपदीची भरल्या सभेत लाज काढण्या सारखं होतं. तर तमाम पुरुषमंडळींना नम्र निवेदन करावंसं वाटलं, की बाबांनो, वर्षातल्या ह्या एका महिलादिनाचा तुम्हाला इतका त्रास होत असेल, तर तुम्ही शतकानुशतकं पायदळी तुडवत अलायत ती स्त्रियांची अस्मिता त्यांना परत करा. त्यांचे मानवी हक्क त्यांना परत करा. त्यांचे सामान-वेतनाधिकार त्यांना परत करा. महिलादिन वेगळा साजरा करण्याची वेळच आपल्यावर का येते? हा प्रश्न स्वतःला विचारून पहा...

एका मैत्रिणीच्या लहान मुलाला महिलादिनाचं महत्व कळलेलं नव्हतं. तो हि आपल्या जागी बरोबरच होता! कारण लहानपणी वर्गामध्ये त्याने मुलींकडून अनेकदा धोपटून घेतलेलं :) लहानपणी मुलींची उंची जास्त असते, शिवाय मुलांच्या मानाने त्यांना समजही लौकर आलेली असते. त्यामुळे वर्गात सहसा मुलींची चलती असते!  मी लहानपणी मोकळ्या तासाला बोलणाऱ्या सगळ्या मित्रांची नावं निर्दयपणे फळ्यावर लिहून त्यांना शिक्षा घडवली आहे, त्यांचे शिव्याशाप मला अजून भोवतायत असा माझा वैयक्तिक 'कर्मसिद्धांत' आहे.

संस्कृतीच्या उदयापासून, बाह्य आक्रमणे, लढाया, विश्व्युद्ध, ह्या सगळ्या इतिहासात बळी गेलेल्या स्त्रीची कथा त्या छोट्या मुलाला माहिती असण्याचं कारण नाही. शिवाय वेश्याव्यवसाय, 'मानवी व्यापार' ह्या संकल्पनालहान मुलांना समजावून सांगणेही अशक्य! त्यामुळे स्त्रियांचं शोषण होतं, ते कसं, हे च मुळात आपण मोकळेपणाने सांगू बोलू शकलेलो नाही, तर समानतेची स्वप्नं अजूनतरी स्वप्नंच आहेत.

ह्या असमानतेला जोरदार शह जर कशाने बसला असेल, तर तो यंत्र/तांत्रिक क्रांतीने! बायकांच्या अंगभूत गुणांना चांगला वाव मिळवून देणारी आणि त्यांना आर्थिक स्वायत्तता देणाऱ्या ह्या क्रांतीने इतकं काही बदललं आहे, कि नव्या पिढीने, मध्यमवर्गात तरी, शोषण वगैरे पाहिलं किंवा अनुभवलं असण्याचं काहीच कारण नाही.

उलट, आपल्या समग्र शिक्षणपद्धतीचा भर 'एका जागी, शांत बसून, आज्ञा पाळून, ज्ञान गोळा करण्यावर आहे.' हे मी मुलगी असल्यामुळे माझ्या कायम पथ्यावर पडत आलंय. शाळेत मी अगदी आदर्श विद्यार्थिनी,  पण माझा कार्टा त्याच्या ३ वर्षाच्या इटुकल्या शालेय जीवनात ऑलरेडी डांबरट म्हणून प्रसिद्ध झालाय ते हि कुठेतरी माझ्या 'कर्मसिद्धांताला' अनुसरूनच असावं.

५व्या वर्षापासूनच, माझ्या मुलाचं शाळेशी वाकडं होऊ घातलं आहे! 'झोपेच्या तासाला' झोपता न येणे,  सतत बडबड आणि धावपळ करून बाकीच्या बाळगोपाळांना त्रस्त करणे/मनोरंजन करणे/खोड्यांचे नवीन मार्ग दाखवणे हे उद्योग करून रोज ओरडा खाऊन, 'उद्या शाळेत जाणार नाही!' अशी रोज कटकट करणेही सुरु झालेले आहे.

मुली शालेय परीक्षेतच नव्हे, तर उच्चशिक्षणात मुलांना कधीच मागे टाकून पुढे पळतायत. तर पुरुषांचा अनेक वर्षांच्या वर्चस्वाने तयार झालेला, प्रसंगी पोकळ आत्मविश्वास, पुरुषी अहंकार, ह्या नवीन परिस्थितीला तोंड द्यायला असमर्थ ठरला, कि त्याचे दुष्परिणाम कायम स्त्रियांनाच भोगावे लागतात. पुरुषांची यशस्वितासुद्धा समाजाच्या हिताकरिता तितकीच महत्वाची आहे. महिलांच्याच भविष्यातील हितासाठी, मुलांच्याच शिक्षणाची, त्यांच्या मानसिक स्वास्थ्याची, त्यांच्या भावनिक विकासाची मला काळजी पडली आहे. एक दिवस त्यांचाही का न असावा?

1/31/17

शॅम्पू ने डोक्यात गळू होईल!

शॅम्पू ने डोक्यात गळू होईल!
आकलनाच्याही आधी एक निमिष होता
मी तिथेच थांबायला हवे होते
पण तोवर डोळ्यात घुसून
संवेदना मेंदू पर्यंत पोचली होती.

षट्कोनी भोकांमधून
आळ्यांचे डोळे
केसांच्या खाली, सपाट गोऱ्या मानेवरून
माझ्याकडे बघत होते.

मी गप्पकन डोळे मिटून घेतले
तरी पटलावर कोरलेली ती भोकं
त्यातून वळवळणारे लक्ष डोळे
तोंडात अचानक दाटून आलेले दर्प
हातापायांना सुटलेला कंप

एक असहाय चीड उठून मग जुळवली बोटं
एक एक चौकोनावर आघात करत,
"शोधा" त लिहिलं: "शॅम्पूचं गळू खरं आहे काय?"
कमळ- कंदाच्या षट्कोनी पोवळ्यातून
गुलाबी पाकळ्या फुटतांना पहिल्या
त्याच डोळ्यांनी.

"खरं आहे काय?" काय खरं आहे?
'माझ्या' शोधाच्या 'चौकटीतून' कापून
त्याला शंबर ठिकाणी चिकटवलं
सीमेवर परत पाठवलं
आणि सांगितलं, "आता कर आक्रोश!"
निवायला हवे आहेत मला माझे डोळे - स्वच्छ प्रकाशाने.

डोळ्यांवर अत्याचार केला होता
ती मैत्रीण आता मला फुलं पाठवते
रोज सकाळी - गुड मॉर्निंग!
कळवळा आहे तिला माझा
आणि मी पण रोज डोळे मिटून 
कमळ-कंदातुन उमलणाऱ्या पाकळ्या आठवते. टीप: खोटी प्रतिमा इथे देऊ इच्छित नाही, त्यामुळे कुतूहल असल्यास Shampoo Hoax शोधावे. कमळाच्या बिया बाहेर पडत असतांनाचा फोटो मानेवर चिकटवून भयानक रोग भासवला गेला आहे.

सध्या अमेरिकन निवडणुकी संदर्भात जालावर फिरणाऱ्या बातम्या (बहुतांशी खोट्या) असूनही जनमत बदलून गेल्या. निवडून आल्यावर राष्ट्राध्यक्षानी केलेली विधाने, दोन्ही बाजूंची वृत्तपत्रे, यांनी नि:पक्षपाती पत्रकारितेचा परिहास केला आहे! त्या पार्श्वभूमी वर माझा एक व्यक्तिगत अनुभव म्हणून वरील कविता लिहिली आहे.


1/9/17

प्रवासी कशाचा तुला भार आहे?

कधी वाटते मी जगापार आहे
मनाचे मना, मुक्त हे द्वार आहे
परी अडखळे जीव माझेपणाशी
विचारांचाच जरा आजार आहे!

कधी वाटते कि स्थितप्रज्ञ झाले
दुःखे-सुखे वा, कशाचे न काही
तरी भळभळे रक्त हळवेपणाने
जरी वल्गनेचा समाचार आहे

कधी वाटते ती जिगीषाच खोटी
न झिजले न घडले पुरेशी खरी
सुखासीनता न मागताही मिळाली
यशाचा कुठे मात्र बाजार आहे?

कधी वाटते जीव लावू नये तो
जीव कुठे का राही सदा? 
परी प्रेमगाठी कशा सोडवाव्या?
प्रेमात अवघाच संसार आहे!

कधी वाटते का न कळले मला हे
दिवास्वप्न आहे जग डोळ्यातले
दिलेले तुला, पण तुझे काय होते?
प्रवासी कशाचा तुला भार आहे?