5/14/20

एक Wild वारी

काही प्रवास आपण करतो हवाबदल म्हणून. काहीवेळा सगे-सोयऱ्यांना भेटायला. पण काही प्रवास करायचे असतात स्वतःचा शोध घ्यायला. इतक्यात माझ्या ओळखीच्या काही लोकांनी नर्मदा-परिक्रमा केली, त्याचे अनुभव वाचतांना मला मात्र एका सर्वस्वी वेगळ्या प्रातांतली एक मुलगी आठवली - शेरील स्ट्रेड. एकटीच, आपल्या नावाप्रमाणे 'भरकटलेली', हरवलेली, वाट चुकलेली. 

तारुण्यात प्रवेश करण्याआधीच तिने आयुष्य खूप जवळून पाहिलं होतं, पण तिची आई जिवंत असेपर्यंत तिला उन्हातही सावली मिळाली होती. आईने सूज्ञपणे नाकर्त्या, मारकुट्या बापापासून स्वतःचा मार्ग वेगळा करून घेतला, आणि मुलांच्या आयुष्यावर त्या वाईट काळाची सावली पडू दिली नाही. पुढे त्यांना आधार देणारा, माया करणारा नवीन 'बाबा' मिळाला होता. कधी एक खोलीच्या घरात, तर कधी माळरानावर खोपटं बांधून सुद्धा ह्या कुटुंबाने आनंदाने दिवस काढले. छोटी शेरील आणि पाठची दोन भावंडं जीवनाशी दोन हात करायला शिकली, पण तगली, कारण त्यांची आई त्यांच्यासाठी जीवाचा कोट करून उभी राहिली होती. 

पण चांगले दिवस आता येणार, ही आशा पालवू लागते न लागते, तोच दैवाने फार मोठा घाव घातला- आईला कॅन्सर झालाय, हे पचनी पडायच्या आतच आईला काळाने हिरावून नेले. "बोलावू तुज आता, मी कोणत्या उपायी? आई!" असा आक्रोश करणारी शेरील दैवाशी भांडून वेडी झाली, पण गेलेली आई परत थोडीच येणार होती? आईने जोडून ठेवलेलं ते कुटुंब बघता बघता विखुरलं. सुकाणू विना हिंदकळणारी जीवननौका सांभाळू बघता शेरील व्यसनांच्या आहारी गेली, दुःख बुडवायला दैवावरचा राग स्वतःवर काढू लागली, जिवलगांपासून दूर गेली, आणि स्वतःवरचा विश्वासच गमावून बसली. 

पण एक दिवस अचानक तिला Pacific Crest Trail वरचं पुस्तक सापडलं. सापडलं, कि तिच्या डोक्यात अनेक दिवसांपासून घोळत असलेलं स्वप्न मूर्त स्वरूपात पुढे आलं कोणजाणे? "माझ्या आईच्या डोळ्यात जशी मी मला दिसत होते, तशी पुन्हा होण्यासाठी मी हा प्रवास करणार!" तिच्या डोक्याने घेतलं. काडीचा अनुभव नसताना, गाठीशी असलेले जेमतेम पुरतील इतके पैसे सगळे पणाला लावून ती एकटी, हा प्रवास करायला निघाली. 

पहिल्या दिवशी तर बॅकपॅक उचलता सुद्धा येईना, इतकी दारुण अवस्था असताना, फक्त वेड्या ध्यासापायी एक एक पाय पुढे टाकत, ही बारकीशी पोर, दक्षिणेला मोहावे च्या वाळवंटातून उत्तरेच्या 'Bridge of Gods'  पर्यंत मजल मारते, त्याची थरारक कहाणी तिने आपल्या Wild: From Lost to Found on the Pacific Crest Trail या पुस्तकांत लिहिली आहे. कथानकात येणारे चढ-उतार आणि वेगवेगळ्या हवामानातले, परिसरातले चढउतार, ह्यांचा सुरेख मेळ घालत शेरिलची लेखन-शैली आपल्यालाही त्या थरारक अनुभवातून घेऊन जाते. भावनिक सत्य सांगणं एकवेळ सोपं असेल, पण त्यातल्या सूक्ष्म छटा पकडत वाचकाला त्या सत्याचा अनुभव करवून देणं कितीक लेखकांना जमतं? शेरिलच्या तीव्र जाणिवांनी ते साध्य केलंय हे या पुस्तकाचं मोठं यश आहे!

ह्या प्रवासात डोक्यात कसले कसले विभ्रम निर्माण होतात! मनुष्यवस्तीपासून दूर, सर्व गोष्टींची आबाळ असतांना साधा गरम चहा सुद्धा स्वर्गसुखासारखा वाटू शकतो! कित्येक वर्ष न आठवलेली बडबडगीतं डोक्यात रुंजी घालायला लागतात, आणि त्यांच्या अर्धवटच येणाऱ्या शब्दांनी वेड लागतं. पाठीवर घट्टे पडतात, पण मन मात्र जास्त जास्त हळवं होऊन तिथे दोन क्षणांसाठी भेटलेल्या मुसाफ़िरांवर फिदा होऊन जातं. तर कधी असंही होतं, की रोजच्या 'जगण्याच्या' आदिम स्फूर्तीपुढे डोंगराएवढी दुःख पण छोटी वाटू लागतात. 

जेव्हा बुटात पाय मावत नसतो- तेव्हा प्रत्येक पावलागणिक यातना होतात. आत्म्याचं कवचही तसंच जुनं झालेलं असतं, म्हणून तेही तसंच असह्य होतं, पण नखं गळून पडली तरी या प्रवासात थांबायचं नसतं हेच खरं. सोबतीला खारुताईपासून अजस्त्र अस्वलापर्यंत काहीही, आणि कोणीही भेटू शकतं, पण शेवटी वाट एकटीचीच असते. निसर्गाच्या सानिध्यात, इतक्या नीरव एकांतात, दुःखावर फुंकर घालायची प्रचंड ताकद असते. कदाचित त्या खडतर वाटेवरची फुलं, जवळ भासणारी पण डोळ्यात न मावणारी बर्फाच्छादित शिखरं,किंवा पुरुषभर उंचीचं झेपावणारं गवत होऊन तिच्या आईनेच तिची पाठराखण केलेली असते! 
ऐहिक स्वरूपात हरवलेली आई आता झाडं, पानं नितळ डोहातच नव्हे, तर तिच्याच अंतर्मनात सामावलेली असते, आणि तिला सांगत असते, "स्वतःच्याच डोळ्यांत बघ- तुला मी ही दिसेन, आणि माझ्या डोळ्यातली तू ही." 

अशी ही शेरिलची कहाणी वाचून वाटलं- परिक्रमा, वारी, यात्रा करणं, ह्या धार्मिक गोष्टींमागे आत्म्याला शुद्ध करण्याचाच हेतू असावा, आणि "धर्माच्या राजकारणा" पलीकडे पाहता आलं, तर तो सहज दिसतोही, पटतोही. आज जगभर पसरलेल्या करोनामुळे दोन महिने घरबसल्या मी हीच वारी केली. त्यातून मला पण काय काय शोध लागले! पण ते सांगेन, नंतर कधीतरी.  

No comments: