1/9/21

अनिवासी भारतीयांची कोविड डायरी.......

भारताबाहेर राहणाऱ्या भारतीयांची कोविड आणि लॉकडाऊन मुळे फारच बिकट परिस्थिती झाली. एरवी कर्मप्रिय असलेली अमेरिका २४ तास पळत असते. उरला सुरला वेळ 'देसी' मैत्रांबरोबर पार्ट्या झोडण्यात, झालंच तर थोडे सांस्कृतिक कार्यक्रम, आणि टीव्ही त सहज जातो. वीकेंड कमी पडतात, काही वेळा तर दोन ठिकाणी तोंड दाखवून (हो, तेव्हा आम्ही तोंड दाखवू शकत होतो ;) तिसरीकडे बार्बेक्यू करायला जात होतो. पोरांच्या छंदवर्गांमागे धावत होतो..... थंडीत ६ महिने घरी बसायचे म्हणून उबदार हवेत एखादी सुट्टी टाकली, नाहीतर चक्क राहायला जाण्याइतके घरोब्याचे संबंध होते (अजूनही आहेत, अशी आशा आहे) अशा मित्र मैत्रिणींकडे २-४ दिवस जाऊन येत होतो. मुख्य म्हणजे पोरांची बालपणं एकत्र गेलेली, त्यामुळे त्यांना पाहुण्यांचे येणे जाणे म्हणजे पर्वणीच होती. 

कोविड मुळे सर्वात मोठा परिणाम झालाय तो या पोरांवर. त्यांचे आयुष्य थांबल्यासारखे  झालेय, आणि दुधाची तहान झूमवर भागू शकत नाहीये. दोन असली तर वेगळे प्रश्न, आणि एकच असलं तर वेगळे, पण प्रश्न बिकट झाले. एकूणच अनिवासी लोकांची मुळं नवीन मातीत तितकीशी घट्ट रुजलेली नसतात. पैशासाठी, किंवा जीवनशैलीच्या आकर्षणाने परदेशी राहू पाहणारे अनिवासी लोक एकमेकांना धरून असतात, पण कोविडने चांगलाच दणका देऊन भानावर आणले- कि शेवटी Blood is thicker than water! ज्यांचे अगदी जवळचे कुटुंब इथे स्थायिक आहे, ते कितीही दूर  असले, तरी निदान एखादेवेळी भेटण्याची सोय होती, इतकंच नव्हे, तर निदान झूमवर सतत संपर्क करून मानसिक समाधान करून घेता येत होते. शिवाय घरूनच काम करण्याची सोय असल्यामुळे काही कुटुंबं तर बराच काळ एकमेकांकडे जाऊन राहून आली. 

आमच्या एकुलत्या एक मुलाला हे भाग्य मिळणं शक्य नाही, ह्याची मला इतकी टोचणी लागली, कि त्यापायी मीच निराशेच्या गर्तेत जात होते. कधी अती  प्रेम, तर कधी स्वतःसाठी अजिबात वेळ न देता आल्यामुळे चिडचिड होत होती. अर्थात, मुलासाठी जे जे शक्य होतं ते केलं - त्याच्या बरोबर रोज खेळणे, बाहेर जाणे, पुस्तके वाचणे, चित्रकला गाणे नि काय काय, पण आता मार्चचा डिसेंबर झाला आहे, आणि धीर सुटत चालला आहे. हे इतकं अकल्पनीय एकटेपण आहे की म्हंटलं त्याबद्दल लिहायला तरी हवंच. 

मार्च: घरी असण्याच्या आनंदात गेला. स्प्रिंग ब्रेक मध्ये बिचाऱ्या शिक्षकांनी कशीबशी पुढच्या दोन महिन्यांपुरती आखणी केली. पोहण्याचा क्लास बंद झाला. pottery क्लास बंद झाला. 

एप्रिल-मे : ऑनलाईन शाळेच्या पद्धती शिकण्यात गेला. त्यात ही मजा होती, नावीन्य होतं. बाहेरही फुलं फुलायची थांबली नव्हती, त्यामुळे पार्क मध्ये फक्त घरच्यांबरोबर  फिरणे, सायकल चालवणे हे झाले. पण एरवी बाहेर एकत्र खेळणारी कोणीच मुलं दिसेनाशी झाली. प्रत्येक वेटाळात थोड्या फार फरकाने मुलं बाहेर पडत असतील,  नसतील, पण आमच्या दुर्दैवाने आमचा शेजार फारच 'कट्टर कोविडवादी' निघाला. रोज भेटणारे मित्र पोराला २-४ महिने अक्षरश: दिसेनासे झाले. 

ऑनलाईन शाळा होती, तसेच मग पोरांनी आयपॅड वर एकमेकांच्या 'virtual' विश्वात जाऊन खेळायला सुरुवात केली. ज्या स्क्रीनपासून मुलांना लहानपणापासून दूर ठेवायला धडपडलो, तेच स्क्रीन त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यावश्यक होऊन बसले. ऑनलाईन छंदवर्गात जाणे मुलाला अजिबात आवडत नव्हते, पण आठवड्यातून एकदा ते करायला लावले.

जून-जुलै: लोक किंचित सैलावले होते, पण आमच्या गल्लीत अजूनही भीतीयुक्त वातावरण च होतं....पोरं सायकल चालवण्यापुरती मास्क लावून बाहेर पडत होती, पण बोलणे नाही की खेळणे नाही. त्यांचे त्यांचे काय वेगळे 'गट' होते माहिती नाही, पण शेजार मात्र संपल्या सारखा झाला. मी भारतातल्या लोकांना कायम सांगत असे, की आमच्या गल्लीत पोरं खेळतात, एकमेकांकडे जायला यायला वेळकाळ बघावा लागत नाही, ते पार बंद झालं. तो काळ फार फार कठीण होता... रोज घरी प्रचंड वादविवाद, आक्रस्ताळेपणा (मुख्यतः स्क्रीनवरून) होऊ लागले. मुलगा आता संपूर्णपणे स्क्रीनच्या आहारी गेला होता, पण इलाज चालत नव्हता. निराशेमुळे स्क्रीन, की स्क्रीनमुळे निराशा, हे गणित सुटेनासं झालं होतं. मार्चमध्ये निदान वर्गातल्या पोरांची मैत्री होऊन गेली होती, त्यामुळे त्यांना ऑनलाईन गप्पा मारणे सहज शक्य होते, पण शाळा संपल्यावर त्या मैत्र्या आपोआप संपल्या.....

ऑगस्ट-सप्टेंबर: आता उन्हाळ्याचे फार कमी दिवस राहिले, त्यामुळे पुन्हा पाण्याखाली जायच्या आधी खोल श्वास भरून घ्यावा, तसे आम्ही बीच, थोडं बाहेर आपापलेच फिरून आलो. गणपती, दिवाळीला कोणी येणार जाणार नव्हते, ते ही मला जरा सूक्ष्म बरंच वाटलं- किती काम पडत होतं गेल्या वर्षी, ते आठवून. जवळच्या मित्र मैत्रिणींना भेटायला पार्क मध्ये जात होतो, कधी तिथेच गवतावर दूरदूर बसून पिझ्झा, भेळ खाल्ली. शाळेतली पोरं सगळीच एकमेकांना नवीन (अमेरिकेत दरवर्षी वर्गात वेगवेगळी पोरं असतात, त्यांना मिसळता यावं म्हणून, पण इथे त्याचा उलट परिणाम झाला.) गेल्यावर्षीचे कुठलेच जिवलग मित्र आताच्या वर्गात नव्हते. 

ऑक्टॉबर-नोव्हेंबर: बाहेर थंडी असूनही, मास्क लावून Halloween ला चॉकलेटं लुटणे आणि दिवाळीला फटाके उडवणे झाले. हे गल्लीतल्या जरा पुढाकार घेणाऱ्यांनी (मी व माझी एक शेजारीण) घडवून आणलं कारण मुलांचं दुःख बघवत नव्हतं. आता मुला मध्ये एक बदल जाणवला- एरवी गणपती, दिवाळीत अजिबात रस न घेणाऱ्या मुलाने, रांगोळी काढणे, चकल्या खाणे, फटाके अगदी आवडीने उडवले. छोटे छोटे आनंद गोळा करायला मुलं शिकत होती.....कारण तेच पुरवायचे आहेत, हे कळून चुकलं होतं. 

Hybrid School चा प्रयोग: अर्धी अर्धी पोरं शाळेत दोन दोन दिवस जाऊ लागली, पण शिकवण्याचे तास कमीच राहिले. शाळेत जाऊनही शिक्षिका आणि मुलं -लॅपटॉप वरच अभ्यास करू लागली, कारण उरलेली अर्धी पोरं घरून त्यांच्या क्लास मध्ये हजार होती.... तेवढ्या साठी बसमधून येणे-जाणे,खेळ/व्यायामवर्गात जागेवरच (दुरुन) कवायती करणे काही आवडणे शक्य नव्हते. त्यामुळे मुलाने महिन्याभरातच "मी पूर्णवेळ घरूनच शाळा करीन," असं सांगून टाकलं. 

डिसेम्बर: सांता यावर्षी विशेष प्रेमात होता, मुलांना किती सोसावं लागतंय, म्हणून जास्तच केक, कुकीज आणि खेळणी घेऊन आला. ह्याच दरम्यान मुलाचं गोड खाणं ही वाढलं. साखरेने आनंदाची भावना होते - एरवी लाडू गोड पदार्थांकडे ढुंकूनही ना बघणाऱ्या मुलाचा हात डब्याकडे जाऊ लागला. काही चांगले बदल होते, घरातल्या कामांकडे लक्ष देणे, मदत करणे. ६ महिन्यांपासून वळण लावत होते, ते हळू हळू लागताना दिसत होते. आक्रस्ताळेपणा आटोक्यात आला. 

कधी कधी वाटतं - कोव्हिडच्या आधीपासूनच जी मुलं माणसात रमणारी होती, ज्यांना प्रसंगी कमीपणाची भावना, किंवा बुजरेपणा होता, त्यांना कोविडने फार त्रास सहन करावा लागला. भारतात बाहेरचं वातावरण, आणि सामाजिक बांधिलकीमुळे जे कवच मुलांना सहज मिळतंय, ते अनिवासी मुलांना मिळत नाहीये, आणि त्या अभावाने होणारे खोलवर परिणाम पुसण्यासाठी अनेक वर्ष जावी लागतील. 

=====००००००=======

१. सगळं सोडून भारतात परतावं, असं या दरम्यान अनेकांना वाटलं असेल. कोविडमधून बाहेर आल्यावरही तसंच वाटत राहील का? अर्ध्याहून अधिक आयुष्य इथे गेलेल्या माझ्यासारख्या लोकांना मात्र हाच एकटेपणा काही अंशी आयुष्यभर सोसावा लागणार आहे, हे टळटळीत सत्य कसं पचवायचं हे अजूनही कळत नाहीये. "ह्या अनुभवातून जीवना! तुला जे शिकवायचे ते लवकर शिकव, पण बाहेर काढ!" म्हणायची पाळी आली. 

२. दुसरीकडे, ह्या देशाने आपल्याला काय काय दिलंय, त्याचीही जाणीव आहे. लाखो नोकऱ्या गेल्या, हंगामी मजुरांवर ओढवलेलं संकट, छोट्या घरात राहणाऱ्यांची अवस्था पाहून, 'त्यापेक्षा आपण भाग्यवान आहोत' ही जाणीवही झाली. निदान पदार्थ  साठवणे, घरी सगळी आयुधं सज्ज असणे, बाहेर फिरताना गर्दी नसणे, ह्या मोठ्या जमेच्या बाजू होत्या. 

३. मुलासकट आता आम्ही दोघेही रोज 'कृतज्ञतेची प्रार्थना' म्हणायला लागलो आहोत. आजचा दिवस चांगला घालवण्याचा प्रयत्न करीत आहोत. एकमेकांना जपत आहोत. हे ही नसे थोडके.