
सान हुआनकडे जातांनाचा रस्ता समुद्राच्या काठा काठाने जातो, तिथूनच त्या शहराचं खरं सौंदर्य कशात आहे, हे जाणवतं. जवळजवळ मैल-दोन मैल पर्यंत उजवीकडून निळ्या समुद्राची, शुभ्र लाटांची, आणि नारळी-खजूराच्या झाडांची साथ इथले निसर्गाचे वरदान दाखवते, तर रस्त्याच्या डावीकडे सान हुआनच्या मुख्य शासकीय इमारती, इथल्या लोकप्रीय नेत्यांचे पुतळे, असे सांस्कृतिक घटक, इथल्या इतिहासाची, वर्तमानकाळाशी सांगड घालून देतात.
जुन्या सान हुआन शहराची तटबंदी "सान क्रिस्तोबाल" आणि "एल मोरो" ह्या दोन भक्कम किल्ल्यांनी केलिये. इथे येणारा जवळजवळ प्रत्येकच प्रवासी ह्या दोन किल्ल्यांच्या प्रेमातच पडतो, असे आम्हाला कळले होते, म्हणून आधी तिथेच गेलो. तसेही, जुन्या सान हुआनच्या कुठल्याही भागातून ह्या दोन किल्ल्यांचे दर्शनी भाग सदैव डोळ्यासमोरच असतात, कारण त्या किल्ल्यांच्या उतारावरच शहराची रचना उभ्या-आडव्या अरूंद गल्ल्यांमधून केलिये.
भारतात बरेच मुगल व निजामशाही किल्ले बघितले होते, आणि ते फारच आवडलेही होते. महाराष्ट्रातही किल्ल्यांची कमी नाही! मुरूड-जंजिऱ्याची आठवण आलीच. गोवळकोंडा, दौलताबाद, इंदौरजवळचा बांधवगड, राजस्थान-गुजरात कडचे जयपूर-उदयपूरचे किल्ले अशी बरीच भटकंती सुदैवाने करता आलेली होती.
त्या मानाने हे दोन स्पॅनिश किल्ले अगदीच "कामचलाऊ" म्हणण्यालायक होते. म्हणायला भक्कम आहेत, आणि १८ फूट जाडीच्या भिंती आहेत, पण दिसायला अगदीच सुमार! दाखवायला ना कुठे साधी नक्षी, ना लाकडाचे कोरीव दरवाजे! भला थोरला ॲटलांटिक समुद्र, हाच काय तो त्यांचा एकमेव दागिना! सान क्रिस्तोबाल किल्ल्यावर सकाळी १० वाजताही चांगलंच ऊन जाणवत होतं, पण समुद्राकडून येणाऱ्या भन्नाट वाऱ्याने मस्त वाटलं! आमचे चिरंजीव तर "कित्ती मस्त वारंय, कित्ती गार वारंय" चा जपच करत होते.
किल्ल्यात जागोजागी "पाहणीचे" किंवा तोफेचे बुरूज होते, तिथून ॲटलांटिक महासागर सारखा खुणावत होता, आणि सूं सूं वाऱ्याच्या, लाटांच्या गाजेच्या हाकाही घालत होता. वारं घुसून केसांचं कबुतराचं खोपटं झालं, आणि डोक्यात अक्षरश: वाऱ्याची नशा चढली, की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपोआपच एक धुंदसं हसू फुटतं! किल्ल्याची उंची बरीच असल्यामुळे, खालची अखंड ४-५ मैलांची किनारपट्टी, काळ्याभोर खडकांवर येऊन फुटणाऱ्या शुभ्र लाटा, त्या काठाने उंच इमारती दिसत होत्या. तो देखावा बघून ऊन, घाम, केसांत घुसलेल्या वेड्या वाऱ्याचे, कशा-कशाचे भान उरले नाही.
"दूर बंदरात उभे, एक गल्बत रूपेरी"- दिसले, पण कुसुमाग्रजांच्या स्वाभिमानी, निरीच्छ गल्बताची त्या "क्रूज शिप" शी तुलना करणंही चूकच होईल. सान हुआन हे करीबियन बेटांमधून फिरणाऱ्या बोटींचं मोठं बंदर आहे, त्यामुळे दर शनि०रवीला कुठली ना कुठली क्रूजशिप, लखलख दिव्यांच्या माळा घालून नटून सजून, प्रवासींना आकृष्ट करणाऱ्या सिन्योरीटासारखी बंदरात उभीच असते.
असे वेगवेगळ्या कोनांतून समुद्र-देखावे बघत बघत आम्ही क्रिस्तोबाल चढत होतो. लाकडाची फरशी, व उंच खिडक्यांची खोली अधिकाऱ्यांची "बेडरूम" असावी, असं आम्हीच ठरवलं. मधल्या चौकात आल्यावर रांगेने सैनिकांचे गाळे आहेत, त्यात म्यूझियम बनवलेले होते.

खरंतर ह्या किल्ल्यांवर संध्याकाळी जायला फारच आवडलं असतं, पण आतून बघायला ते फक्त ६ पर्यंत उघडे असतात. म्हणून जेवल्यावर लगेच क्रिस्तोबालचा भाऊ "एल मोरो" कडे कूच केलं. पण त्याबद्दल पुढील भागात...
No comments:
Post a Comment