10/29/10

जजमेंट

प्रत्येका कडे पहिल्या डावात १०-१० पानं. हुकुम ठरलेलाच असतो. बदाम.
वडील: "हुकुमाची ३ पानं आहेत, पण त्यातलं एक जरा हलकं. आणि चौकटचा राजा. आपल्याकडे सगळ्या रंगाची पानं असल्यामुळे तसा राजाचा हात व्हायला हरकत नाही. तरीपण, इकडचे तिकडचे सोडून २ च हात सांगावे. नेहमी पदर पाहून पाय पसरावे. नजर आकाशावर, आणि पोच फक्त खिडकीपर्यंत, त्यापेक्षा नकोच ते! अडी-अडचणीला, सणा-सुदीला पैसे लागतील म्हणून जपून जपून शिल्लक टाकायची आपली सवय! ती ह्या नवीन पिढीला काय कळणार?"
नवरा: "ह्या! तुम्ही आग्रह केला म्हणून हे असले फालतू खेळ खेळावे लागतायत." असं आधीच म्हणून टाकलं, की कितीही हात होवोत, न होवोत, उगीच विचार करायचं काम नाय. आता सगळ्या घोड्यांवर थोडी थोडी इस्टेट लावून टाकली, की एखादं तरी घोडं जिंकेल, तश्या ह्या ४ भारी पानांपैकी ३ तरी हात होतील, झालं सांगून टाकावं. मग इतरांचे डिसिजन होईपर्यंत हळूच iphone :)"
आई: "आई म्हटलं की सगळ्या गोष्टींवर प्रेमच करावं लागतं. मुलाबाळांवर प्रेम, आता सुनांवर प्रेम, एवढंच नव्हे, तर भाजी पाल्यावर प्रेम, साड्यांवर प्रेम आणि पत्त्यांवरही प्रेमच. मगाशी नेमका माझा एक्क्याचा हात कापलान सुनबाईने. आपणही त्या एवढ्याशा हार-जीतीवर किती हीरिरीने अडून बसलेलो होतो! शेवटी सगळे हात मोजायला लागल्यावर मी फेकून दिलं ते कापलेलं पान, आणि झालेच माझे बोलल्याप्रमाणे २ हात. तर काय? परवा ५-३-२ खेळत होतो, तिने २ हात काय ओढले माझे- तेव्हाही इतकं लागलं मनाला... ह्यावेळी नाही हं. करूनच दाखवीन ३ हात, तर मज्जा येईल.
इतकी वर्ष हातात एकच धड पान असलं, तरी त्याच्या भरोशावर अगदी १० माणसांचा नाही, पण ४-५ जणांचा संसार चालवतांना कशी जिवाची तडफड झाली, हे आजकालच्या मुलींना नाही कळायचं. त्यांना स्वत:चे हात करून हातभार लावता येतो म्हणून टिमकी मिरवतात... पण आधी रोजच्या भाजीत मीठाचा अंदाज येत नाही अजून, आणि चालल्या जजमेंट खेळायला! आता मात्र मी ठरवलंय. मन म्हणेल तसं जगायचं. आधीही सासूच्या राज्यात आम्हीच मन मारलं, आणि आताही सुनेच्या राज्यात आम्हीच का म्हणून मारायचं? हं. माझे दणकून लिहि रे ४ हात.!"
माऊ: "सध्या माझे मज्जेचे दिवस चाललेत अगदी. दादा-वहिनीने अमेरिकेतून amazing कपडे आणलेत, आणि कॉलेजला सुट्टी असल्यामुळे नुसते पार्ट्यांना, आईसक्रीम खायला जातांना ते अगदी perfect होतायत. परवा शीना म्हणाली, "ए तुझ्या दादा-वहिनीला सांग ना माझ्यासाठीपण next time स्वेटशर्ट आणायला! मी पैसे देईन इथे." मनात म्हटलं, हो, सगळ्यांसाठी आणायला बसलेत माझे दादा-वहिनी रिकामे. प्लस, सगळ्यांनाच आणले, तर माझं स्पेशल काय राहिल त्यात?" हो हो. हातच सांगायचेत ना.......... १० पानं........ बाबांचे २-दादाचे ३ आणि आईला तर absolutely हिशोब येत नाही. म्हणजे आपण रिस्क घेऊन ५ सांगितले तरी होतीलच आपले. वहिनी गोSSड्च आहे. मागच्या डावात म्हणाली, "मार दिया जाए...?" पण सोडला माझा एक critical हात.
तसाही ५ is my lucky number. 12th चा रोल नंबर, आता माझ्या नवीन स्कूटीचा नंबर, आणि अक्षयचा बर्थ डे......इश्य......
मी: सगळ्यांनी नाही नाही म्हणता वेळ घेतलाच हात बोलायला, आणि आता सगळ्यांचे झालेत बोलून, तर माझ्या मागे घाई. सगळ्यांनी भरभरून हात सांगितलेत. एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून ह्यांच्याकडे? आणि नाही झाले, तर स्वत:च नाही, दुसऱ्यांनाही बुडवतील स्वत:बरोबर. बहुतेक तरी बुडणारी मीच एकटी असणार. त्यांच्या सारखा विचार करणं जमतच नाही अजूनही- संसाराला इतकी वर्ष झाली तरी. विचार करण्याची "कुळकर्णी" पद्धत आणि "देशपांडे" पद्धत..... असे क्लास घ्यायला हवे होते दोन्ही पक्षी लग्ना-आधी.
पानं १०च, तरी माऊ ५ हात बोललीये येडी. मागच्या डावात मी सगळे राग-रंग ओळखून शून्य हात सांगितले, तर ते ही होऊ नयेत माझे सुरळीत? हा डावच आपला नाही म्हणा. पत्ते वाटणाऱ्याला स्वातंत्र्य नसतंच, मनासारखे हात बोलण्याचं. तसेही, सगळ्यांचे विचार असे आदळतायत कानांवर चोहीकडून, की मला खरोखर, मनापासून किती हात करायचेत? तेच उमगेनासं झालंय. ओ गॉड, आता मी जितका वेळ लावेन, तितके कॉमेंट्स येतील. "किती हळूहळू काम असतं न हिचं! आंघोळीलाच तासभर लावते रोज." घ्या, आता नवरोबाही त्यात सामील. अहो, देवीजी, तंद्रीतून बाहेर या ना आता....."
हं. शून्य. पुन्हा शून्य? हो. पुन्हा शून्य. आता खेळ संपेपर्यंत शून्यच फक्त. फारसा विचार करावा लागत नाही शून्य बोललो की. पानं जाळत बसायचं आरामात. खेळलोच नाही असं तर होणार नाही....
मग एकदा मज्जा करायची. चांगली पानं आली तरी शून्य. आणि कसे बुडतील सगळे गंमत बघायची. थोडा थोडा आनंद चोरायचा. The one who laughs at last....


10/27/10

ओळख


एकदा ना, एक साधूबाबा होते. ते रोज सकाळी गावातल्या रस्त्यावरून नदीकडे स्नानाला जायचे. आणि रोज एक दुष्ट माणूस आपल्या घराच्या गच्चीवरून त्यांच्यावर कचरा फेकायचा, त्यांना शिव्यांची लाखोली वहायचा. एक दिवस तरी हे साधूबाबा चिडतील, वैतागतील, आणि मग आपण त्यांची मजा पाहू अशी लालसा त्याच्या मनात होती. पण साधूबाबांची मन:शांती एकदाही ढळली नाही. ह्याने कचरा फेकला, की ते शांतपणे जाऊन पुन्हा स्नान करून येत. ह्याने शिव्याशाप दिले, तरी त्याच्याकडे बघून सदैव स्मित करीत.
आपण काहीही केले, तरी साधूबाबांवर परिणाम होत नाही, असे बघून मग एक दिवस ह्याला उपरती झाली. त्यांच्या पायावर लोळण घेऊन ह्याने विचारले- "बाबा, मी तुम्हाला एवढा त्रास दिला, तरी तुम्ही कधीही माझ्यावर संतापला नाहीत. हे एवढं चांगलं वागणं तुम्हाला कसं जमतं?" तर बाबा म्हणाले, "अरे सोप्पंय ते. तू मला शिव्या दिल्यास, त्रास दिलास, पण तो मी घेतला कुठे! त्यामुळे तो मला झालाच नाही."

ही गोष्ट मला परवा आठवली, आणि आरशात स्वत:चाच चेहरा बघून दचकायला झालं. लहानपणचा निरागस चांगुलपणा, परीकथांवर विश्वास, मनाचे श्लोक पाठ करणेच नव्हे, तर त्यातले "संस्कार" मनापासून पाळणारं ते माझं भारतीयत्व होतं, की फक्त कोवळं वय? बालपणातला तो देवत्त्वाचा अंश होता, की एका सुरक्षित, स्वप्नाळू बालपणाची झापडं?

आता संसारात, सासूरवासात ऐकून घ्यायला लागणारे निरर्थक टोमणे, न पटणाऱ्या अपेक्षा, रोजचे अनाहूत सल्ले ह्यांना तोंड देतांना का आठवत नव्हती मला त्या साधूबाबाची गोष्ट?
"तुम्हा आजकालच्या मुलींना संसाराची आवडच नाही!"
" नवऱ्याला अरेतुरे करता, तिथेच सगळं बिघडतं"
" सकाळी लवकर उठून कशी झटझट कामं झाली पाहिजेत."
" हे झिपरे केस, डोक्याला ना टिकली, ना गळ्यात मंगळसूत्र! ह्या आमच्या मुली-सुना म्हणायची लाज वाटते."
" देवाजवळ रोज दिवा तरी लावत जा- बाकी काही नसेल."
" एवढ्या सुखात रहाता, तरी तुम्हाला काय प्रॉब्लेम असतात? ३-४ च महिन्यांसाठी काय तो सासुरवास. अमेरिकन सून ही चालली असती की मग आम्हाला."
" दोघांपैकी एकाने (म्हणजे बायकोने) ऐकून घ्यायलाच पाहिजे. नाहीतर तुम्ही रात्र अशीच भांडणात घालवणार!"

मी साधूबाबा असते तर माझ्याही अंगावरून ओघळून गेल्या असत्या ह्या गोष्टी. पण मग मीच एक का म्हणून भगवे घालून चांगुलपणाच्या वाटेवर कुचुकुचु काटे टोचून घेत चालायचं?" रांगोळ्या घालण्यापासून पुरणपोळी असो, की स्तोत्र असोत, सगळ्या सो कॉल्ड संस्कारांचं बाळकडू माझ्या सुदैवाने मला मिळालं, आणि ते मनापासून आवडत ही होतं.
फरक फक्त येवढा, की माझ्या संस्कारांचा उगम शिक्षणात होता, विश्वासात आणि समर्पणात नव्हे. मोठ्यांनी "हे कर" सांगितलं, की ते करायचं, इतक्या सरधोपट आणि विचारहीन पद्धतीने मी ह्या गोष्टी आत्मसात केल्या नव्हत्या.

चांगलं वागणं नेहमीच जास्त कठीण असतं. लहानपणी तसेही फारसे कलह आपल्या आयुष्यात नसतात, म्हणून ते सोप्पं वाटत असतं. पण आता तेच सालस विचारही "कर्तव्याचा" काटेरी मुकुट घालून पुढे येतात, तेव्हा मनावर ओरखडे उठणारच!

पण मग भारतीयत्त्व, साधूबाबा, चांगुलपणा, हे सगळे आदर्शवाद मी गुंडाळून माळ्यावर टाकले, आणि आधुनिकतेच्या धर्मातला पहिला धडा उघडला- प्रॅक्टिकली विचार करायला लागले. पण खरं म्हणजे आपण साधूबाबांसारखं व्हायचं, ते आपल्या मन:शांती साठी, हे सोप्पं लॉजिक लावलं, आणि प्रश्न सुटला. बोलणं सोप्पंय, वागणं अवघड, पण आता ते तसं का वागायचं, हे तरी कळलंय. आरशातल्या चेहऱ्याची, त्यातल्या बदलांसकट ओळख पटलीये.