2/24/16

मराठीपणा-इंग्रजीपणा

एवढ्यात  शिवाजी जयंती झाली तेव्हा माझा महाराष्ट्र, माझी मराठी या प्रकारच्या काही बातम्या आणि व्हॉटसप फॉरवर्ड आले, ते वाचून मला एकदम हुक्की आली कि काहीतरी मराठी- गौरावात्मक लिहावं . पण मनात आलं, की झालं लिहून, अशा सोयी आता आमच्या वाट्याला क्वचितच येतात (पहा: आईचा स्वत:च्या वेळेवर कधीच हक्क नसतो का?)
त्यामुळे "मनातलेच मांडे" खायची वेळ आली असे म्हणतानाच, एका मैत्रिणीचा फोन. "काय करताय  विकांताला?" बाकी काही असो. मराठी माणूस तसा मुळात आळशी असल्यामुळे, विशेषकरून विकांताला फारसे कुठले कार्यक्रम न ठरवता, 'भरपूर कौटुंबिक वेळ' घालवण्यात पटाइत :) त्यामुळे माझं ताबडतोब उत्तर, "काSSSही विशेष नाही. येताय का?" पोरं एका वयाची असल्याने आमचं चांगलं जमतं.  (आजकाल कुणाशी चांगलं जमण्याचे निकष, पोराच्या उंचीइतके 'खालावले' आहेत, हे उघड आहे :) :) सो बाकी फारसा विचार करायची गरज नव्हती, फक्त,मैत्रिणीच्या नवऱ्याला खायला काय घालायचं, हा एक मोठा प्रश्न होता. 

दिल्लीच्या, पण पटन्यात वाढलेल्या, आता आईवडील बंगलोरला स्थाईक झालेल्या आमच्या ह्या मित्राचं मला कौतुकच जास्त वाटत आलेलं आहे, कारण गेली अनेक वर्ष मी केलेले अनेक बरे वाईट मराठी पदार्थ तो बिचारा न कुरकुरता खात आलेला आहे, पण …….चेहरा मात्र मलाही नेहमी खरं सांगत आलेला आहे! आता मुळात त्याने मराठी बायको केली (माझी मैत्रीण) म्हणून मी फारसा त्या चेहऱ्याचा विचारही करत नाही, पण तरी, एखादी भाजी नेहमीची आणि एखादी आलं लसूण पनीर टाईप असतेच. आज मात्र अवचित ठरल्यामुळे, माझ्या समोर यक्ष-प्रश्न उभा ठाकला. मैत्रिणीला विचारले तर ती म्हणाली, "भजी कर." भज्यांपुढे त्याला काही दुसरं लागत नाही." 
"चला एक तरी मराठी पदार्थ तुला आवडतो!" मी त्याला गमतीने म्हटले, तर तो म्हणाला, "भजी मराठी नही है! भजी मतलब भुजिया, मराठी लोगों ने हमसे ही सिखा है!" झालं, मग आमची व्हॉटसप-वॉर  जुंपली! मी मराठी पदार्थांचे गुणगान चालवले, तर त्याने मराठी पदार्थ कसे करायला कठिण  पण खायला तरीही सहज न आवडणारे, असे आरोप लवले. अर्थात, सासूविषयी बोलायचा हक्क फक्त सुनांनाच नसतो, त्यामुळे, "आमचा सासूबाईंनी सकाळी ३ तास खपून, केलं काय तर उपासाचं थालीपीठ!" असले धमाल विनोद सुरु झाले. टू स्टेट्स सिनेमा प्रमाणे, तुम्हा पंजाबी लोकांना दुसऱ्या चवीचं काही आवडत नाही, नि तुम्ही आवडून घेतही नाही वगैरे मुद्दे मी मांडले.

मग तेवढ्यातच बाजीराव मस्तानीचा विषय निघाल्यावर तो म्हणाला," तुम्ही मराठी लोक एकतर आपले मंगळागौरीचे खेळ वगैरे कुणाला सांगत नाही, दाखवत नाही, आणि आजकाल तर, खेळतही नहि. मराठीपणा मध्ये समरस होण्याचा फारसा मौका तुम्ही अ-मराठी लोकांना देत नहि. तुमची मराठी संस्कृती संस्कृती म्हणतात ती इतकी "बंदिस्त" गोटातली आहे, कि सहज समरस होण्यासारखं त्यात काहीच नाही, आणि जे आहे, ते हि इतरांकडून उधार घेतलेलं!"
आज मराठी घरोघरी बघाल तर, इडली सांबार (दाक्षिणात्य), नाहीतर पराठे (उत्तरेचे) सगळ्यांना आवडतात. मग मी खरंच विचार करू लागले, कि जसा उत्तरेला पनीरचा आणि दक्षिणेला इडलीचा अभिमान आहे, तसा मराठीला कशाचा असू शकतो? की खरंच आपले पदार्थ "टू मच इनपुट नॉट मच आऊटपुट" प्रकारात मोडतात?

तेव्हा एकदम सुचलं, कि मराठी संस्कृतीचं थोडंफार इंग्रजी भाषेसारखं आहे, असा पुरोगामी विचार केला तर सर्वसामावेशाकतेची लाज न वाटता, अभिमान वाटू शकेल. इंग्रजी भाषा कशी फोफावली, कारण तिने इतर भाषांमधून शब्द नि:शंकपणे आत्मसात केले. हिंदू धर्म का टिकला? कारण त्याने येणाऱ्या विविध गटांच्या, परिस्थिती, पर्यावरण-आधारित कर्म-कांडाला सरळसरळ आपले म्हटले. त्यामुळे हिंदू धर्मात दिवाळीला कोणी कुठे जुगार खेळतात तर कोणी झेंडूच्या माळा लावतात. कोणी रांगोळ्या काढतात तर कोणी पुरणपोळी करतात.

मग मराठीपणानेही कशाला कुठल्या संकुचित व्याख्येप्रमाणे स्वत:ला बदलायचा प्रयत्न करावा? मराठीने का नये अभिमानाने म्हणू कि आम्ही इडली करतो, कारण आम्ही तिला आपली मानलीये. आम्ही सगळ्या भाज्या करू, नि आवडीने खाऊ कारण आमच्याकडे नव्याचा तिरस्कार नाही, स्वीकार आहे, आणि तोच आमचा सर्वात मोठा गुण आहे. भारताच्या कुठल्या दूरच्या कोपऱ्यात नसून, महाराष्ट्र हा चक्क पोटचा गोळा आहे, त्याचा परिणाम म्हणून गुजराथी असो वा कर्नाटकी, बंगाली असो वा पंजाबी,
 सगळ्या प्रदेशांशी आमची नाळ जोडलेली आहे, हे आमचं सौभाग्यच नाही का?

ह्याचा अर्थ असा नव्हे, की मराठी पदार्थ, मराठमोळी नऊवारी आणि नथ, मराठी बडबडगीतं आणि गाणी, ह्यांचा आम्हाला अभिमान नाही, किंवा त्याचं जतन आम्ही करू नये. पण आपलं ते कार्ट …. असली संकुचित वृत्ती मराठी मनानेच काय, कुणीही ठेवू नये.

अजून एक सांगू, "दुधी, परवल, पडवळ, डींगऱ्या, चपटे वाल, कडवे वाल, दक्षिणेचा नारळ घालून असो वा उत्तरेचा बटाटा, आम्हाला प्रत्येक भाजी करायच्या सतरा पद्धती येतात, आणि आम्ही त्या करतोही. प्रत्येक नावडत्या भाजीलाही आवडते करून खाणे, हे कोणी मराठी माणसाकडून शिकावे! उपलब्ध असलेल्या साध्या सामाग्रीतून रुचकर जेवण असो, वा सजावट, मराठींकडून शिकावी.

म्हणजे, जुगाड- इन्वेन्शनचे आद्य प्रणेते आम्हीच की!"

इतिहासाच्या एका टप्प्यावर, मराठी माणसावर फार संकटं आली. अठरा विश्वे दारिद्र्य आणि दुष्काळात तेरावा महिना असतांना आम्ही जे धडे घेतले, त्यांनी मराठीमाती झालीच असेल, तर जास्त कणखर झालीये.

आज इंग्रजीने जग काबीज केलंय, ते केवळ इंग्रजी राजवटीमुळेच नव्हे, तर इंग्रजीच्या अंगभूत लवचिकतेमुळेही. नाझी जर्मनीत तावून सुलाखून निघालेले ज्युईश लोक अमेरिकेत येऊन अतिशय यशस्वी झाले, ते त्यांनी अंगी बाणवलेल्या चिवटपणामुळे. तेव्हा पंजाबच्या अफाट हिरव्या शेतीचा आणि दक्षिणेच्या द्रविडी संपत्तीचा माज करणाऱ्यांनो, सावध असा. असे न होवो, कि तुम्हालाच तुमच्या मधून मराठी लोकांना वेगळे काढणे अशक्य होवून बसेल!

2/8/16

आईचा स्वत:च्या वेळावर कधीच हक्क नसतो का?"

खालील जिब्रानचे वाक्य आहे : तुमची मुलं ही खरंतर तुमची नसतात. जीवनाच्या स्वत:वरील प्रेमाची ती प्रतीके, तुमच्या पोटी आली म्हणून तुमची म्हणायची.

खरंय, तरीही , आपण मुलांच्या जीवनात इतके समरस होउन जातो, की आपलं जगणं, त्यांच्या  जगण्यापासून वेगळं काढता येत नाही. 
माझंही कित्येक दिवस तेच चाललेलं! त्यांची  शाळा, त्यांचे डबे, त्यांचे अभ्यास, त्यांचे क्लास, त्यांचेच गोंडस राग, नि त्यांचेच गोडूले लोभ :) त्या रामरगाड्यात वाचायला वेळ काढता आला तरी सलग नाही, म्हणून हलकं फुलकं पुस्तक घेतलं, आणि सुखद धक्का बसला!

ज्या काळी  प्रकाशित  झालं , त्या काळी कदाचित शोभा डे ह्यांच्या "स्पीड पोस्टात" बायकांना स्वत:चं प्रतिबिंब दिसलं नसेल, कारण बऱ्याच मध्यमवर्गीय बायकांच्या आणि तिच्या जीवनशैलीत जमीन अस्मानाचा फरक होता, पण आता ते चित्र बदललं आहे हे नक्की. त्या काळी मुलांचे डब्बे स्वत: न भरणारी आई दुर्मिळ होती, पण आता नाहिये. त्या काळी मुलांना घरी ठेवून कामाकरिता बाहेरगावी जाणारी आई दुर्मिळ होती पण आता कुठल्याही नोकरीत "मुलं" ही सबब बायका असोत वा पुरूष, वापरू शकत नाहीत. इतकंच नव्हे, तर त्या काळापेक्षा, "तुम्हारे दो- मेरे दो- हमारे दो " अशी खट्टी -मिठी कुटुंबही सर्रास दिसू लागली अहेत.

किंवा अपर्णा वेलणकरांच्या मराठी अनुवादाची जादू असेल , पण मला शोभा डे यांची आपल्या मुलांना लिहिलेली पत्रं फारच जवळची वाटली. मुलंवर खूप प्रेम करणं म्हणजे आपलं सगळं आयुष्य त्यांच्या कारणी लावून, नंतर जन्मभर "आम्ही तुमच्या किती खस्ता खाल्ल्या!" हे त्यांना ऐकवत बसणाऱ्या आयांची पिढी कधीच पार पडली, आणि मुलांना बेबिसिटरकडे ठेवयचा जीव होत नसला, तरी कधी मधी त्यांच्या शाळेच्या दिवशी सुटी काढून बिनधास्त दोघं पिक्चर टाकून येणाऱ्या पिढीची मी आहे. शिवाय, आजकालची मुलंही, लवकर स्वावलंबी झालेली, इंटर्नेट मुळे अर्धवट, पण जास्त समज आलेली, आपल्याच विश्वात रमणारी, कदाचित जास्त निर्भीडही झालीयेत…

त्यामुळे तिचे प्रश्न, तिचा दृष्टीकोन, सगळं समजतंय, आपलं वाटतंय. "आईला राग काढायची परवानगीच नसते का? घरादाराच्या शांतीसाठी कायम तिने आपला राग, आपली चिडचिड, आपल्या दु:खाचे कढ, मनातच जीरवायचे असतात का? " हे तिचे खडे सवाल आता असमंजस किंवा अपरिपक्व वाटत नाहीत. "तुला केसांना तेल लावणारे, तुझा डबा भरणारे, तुझे मोजे शोधून देणारे हात माझे नव्हते, त्याचं  दु:ख मी कधीही मनावेगळं करू शकणार नाही" असं म्हणणारी ही आई, मला तरी सच्ची वाटली.

त्या उलट "स्मृतिचित्रे" लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक! रेव्हरंड नारायण वामन टिळकांची पत्नी म्हणून अतिशय सोशीक, धैर्यशील, पुरोगामी असणारी ही स्त्री, एक आई म्हणून कशी होती, याबद्दल पुस्तकातून फारशी माहिती मिळत नाही. टिळक बाप्तिस्मा घ्यायला गेल्यावर सुरुवातीला धसका घेऊन डिप्रेशनमधे दिवसेंदिवस खाटेवर पडून राहतांना, जीव द्यायचा प्रयत्न करतांना, त्या माउलीने आपल्या एकुलत्या एक मुलाला मात्र कधी मोठ्या बहिणीच्या तर कधी भाचीच्या सहज स्वाधीन करून टाकले होते.

मुलासाठी तिचा जीव तुटला हे नक्की, पण त्या काळी बालसंगोपनाची मदार आजकाल प्रमाणे सर्वस्वी आई-बापाच्या खांद्यावर नसे, त्यामुळे त्यांचे ते ओझे किती हलके होते हा विचार राहून राहून माझ्या मनात येत रहिला. त्या काळी पोरांना आजी-आजोबा, ढीगभर नातेवाईक असत, किंवा मोठी भावंडे सांभाळीत हे ऐकलंय.

रेव्ह. टिळकांनी कविता, भाषांतरे, धर्मांचा केवढा अभ्यास  केला, तसा आजच्या कुठल्याहि वडिलांना करता येण्याची किती कमी शक्यता आहे, तर मग कुठल्या आईने स्वत:साठी इतका वेळ देणे तर दूरच राहिले! त्यामुळे माझ्या पोराला जर मी कधी पत्रं लिहिलं, तर त्यात नक्की सांगेन, कि "

"बाळा, मी तुला रागावले, १०० खेळणी घेऊन दिली नाहीत, अभ्यासासाठी मागे लागले, माझ्या स्वभावाचा तुला त्रास झाला असेल, तुझ्या आवडीचा स्वयंपाक मी फारसा केला नसेल, वगैरे १०० तक्रारी तुझ्या माझ्याबद्दल असतील, तर त्या सगळ्या मला मान्य आहेत. फक्त….
मी तुला वेळ दिला नाही, देऊ शकले नाही, अशी तक्रार मात्र तू केलीसच, तर मी नक्की शोभा डे प्रमाणे म्हणेन, "आईचा स्वत:च्या वेळावर कधीच हक्क नसतो का?"