2/8/16

आईचा स्वत:च्या वेळावर कधीच हक्क नसतो का?"

खालील जिब्रानचे वाक्य आहे : तुमची मुलं ही खरंतर तुमची नसतात. जीवनाच्या स्वत:वरील प्रेमाची ती प्रतीके, तुमच्या पोटी आली म्हणून तुमची म्हणायची.

खरंय, तरीही , आपण मुलांच्या जीवनात इतके समरस होउन जातो, की आपलं जगणं, त्यांच्या  जगण्यापासून वेगळं काढता येत नाही. 
माझंही कित्येक दिवस तेच चाललेलं! त्यांची  शाळा, त्यांचे डबे, त्यांचे अभ्यास, त्यांचे क्लास, त्यांचेच गोंडस राग, नि त्यांचेच गोडूले लोभ :) त्या रामरगाड्यात वाचायला वेळ काढता आला तरी सलग नाही, म्हणून हलकं फुलकं पुस्तक घेतलं, आणि सुखद धक्का बसला!

ज्या काळी  प्रकाशित  झालं , त्या काळी कदाचित शोभा डे ह्यांच्या "स्पीड पोस्टात" बायकांना स्वत:चं प्रतिबिंब दिसलं नसेल, कारण बऱ्याच मध्यमवर्गीय बायकांच्या आणि तिच्या जीवनशैलीत जमीन अस्मानाचा फरक होता, पण आता ते चित्र बदललं आहे हे नक्की. त्या काळी मुलांचे डब्बे स्वत: न भरणारी आई दुर्मिळ होती, पण आता नाहिये. त्या काळी मुलांना घरी ठेवून कामाकरिता बाहेरगावी जाणारी आई दुर्मिळ होती पण आता कुठल्याही नोकरीत "मुलं" ही सबब बायका असोत वा पुरूष, वापरू शकत नाहीत. इतकंच नव्हे, तर त्या काळापेक्षा, "तुम्हारे दो- मेरे दो- हमारे दो " अशी खट्टी -मिठी कुटुंबही सर्रास दिसू लागली अहेत.

किंवा अपर्णा वेलणकरांच्या मराठी अनुवादाची जादू असेल , पण मला शोभा डे यांची आपल्या मुलांना लिहिलेली पत्रं फारच जवळची वाटली. मुलंवर खूप प्रेम करणं म्हणजे आपलं सगळं आयुष्य त्यांच्या कारणी लावून, नंतर जन्मभर "आम्ही तुमच्या किती खस्ता खाल्ल्या!" हे त्यांना ऐकवत बसणाऱ्या आयांची पिढी कधीच पार पडली, आणि मुलांना बेबिसिटरकडे ठेवयचा जीव होत नसला, तरी कधी मधी त्यांच्या शाळेच्या दिवशी सुटी काढून बिनधास्त दोघं पिक्चर टाकून येणाऱ्या पिढीची मी आहे. शिवाय, आजकालची मुलंही, लवकर स्वावलंबी झालेली, इंटर्नेट मुळे अर्धवट, पण जास्त समज आलेली, आपल्याच विश्वात रमणारी, कदाचित जास्त निर्भीडही झालीयेत…

त्यामुळे तिचे प्रश्न, तिचा दृष्टीकोन, सगळं समजतंय, आपलं वाटतंय. "आईला राग काढायची परवानगीच नसते का? घरादाराच्या शांतीसाठी कायम तिने आपला राग, आपली चिडचिड, आपल्या दु:खाचे कढ, मनातच जीरवायचे असतात का? " हे तिचे खडे सवाल आता असमंजस किंवा अपरिपक्व वाटत नाहीत. "तुला केसांना तेल लावणारे, तुझा डबा भरणारे, तुझे मोजे शोधून देणारे हात माझे नव्हते, त्याचं  दु:ख मी कधीही मनावेगळं करू शकणार नाही" असं म्हणणारी ही आई, मला तरी सच्ची वाटली.

त्या उलट "स्मृतिचित्रे" लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक! रेव्हरंड नारायण वामन टिळकांची पत्नी म्हणून अतिशय सोशीक, धैर्यशील, पुरोगामी असणारी ही स्त्री, एक आई म्हणून कशी होती, याबद्दल पुस्तकातून फारशी माहिती मिळत नाही. टिळक बाप्तिस्मा घ्यायला गेल्यावर सुरुवातीला धसका घेऊन डिप्रेशनमधे दिवसेंदिवस खाटेवर पडून राहतांना, जीव द्यायचा प्रयत्न करतांना, त्या माउलीने आपल्या एकुलत्या एक मुलाला मात्र कधी मोठ्या बहिणीच्या तर कधी भाचीच्या सहज स्वाधीन करून टाकले होते.

मुलासाठी तिचा जीव तुटला हे नक्की, पण त्या काळी बालसंगोपनाची मदार आजकाल प्रमाणे सर्वस्वी आई-बापाच्या खांद्यावर नसे, त्यामुळे त्यांचे ते ओझे किती हलके होते हा विचार राहून राहून माझ्या मनात येत रहिला. त्या काळी पोरांना आजी-आजोबा, ढीगभर नातेवाईक असत, किंवा मोठी भावंडे सांभाळीत हे ऐकलंय.

रेव्ह. टिळकांनी कविता, भाषांतरे, धर्मांचा केवढा अभ्यास  केला, तसा आजच्या कुठल्याहि वडिलांना करता येण्याची किती कमी शक्यता आहे, तर मग कुठल्या आईने स्वत:साठी इतका वेळ देणे तर दूरच राहिले! त्यामुळे माझ्या पोराला जर मी कधी पत्रं लिहिलं, तर त्यात नक्की सांगेन, कि "

"बाळा, मी तुला रागावले, १०० खेळणी घेऊन दिली नाहीत, अभ्यासासाठी मागे लागले, माझ्या स्वभावाचा तुला त्रास झाला असेल, तुझ्या आवडीचा स्वयंपाक मी फारसा केला नसेल, वगैरे १०० तक्रारी तुझ्या माझ्याबद्दल असतील, तर त्या सगळ्या मला मान्य आहेत. फक्त….
मी तुला वेळ दिला नाही, देऊ शकले नाही, अशी तक्रार मात्र तू केलीसच, तर मी नक्की शोभा डे प्रमाणे म्हणेन, "आईचा स्वत:च्या वेळावर कधीच हक्क नसतो का?"



2 comments:

अपर्णा said...

मस्त लिहिलं आहेस. आमच्याकडे थोडं वेगळं चित्र आहे पण त्याबद्दल पुन्हा केव्हातरी. तू उल्लेख केलेलं शोभा डे चं पुस्तक मिळवायला हवं :)

विशाखा said...

वेगळं चित्र? ते कसं काय? तुझ्याकडून, तुझ्याच शब्दात ऐकायला आवडेल. मधे इंद्रा नुयी ची मुलाखत पहिली. तिने वेळेचा प्रश्न स्वत:पुरता सोडवला, पण तिचं करीयर इतकं भारी आहे, कि ते सबळ कारण झालं. बाकी ९०% बायका मुलांना वेळ देता येत नाही म्हणून स्वत:लाच दोष देतात, आणि त्या देत नसतील तर समाज देतो .