PR-वास........१

"आम्ही 6 महि्न्यांसाठी पोर्तो-रीकोला जातोय" म्हटल्यावर सर्वात आधी घरचे लोक फोनमधून ओरडले, "क्काय???" तशी पूर्वकल्पना दिली होती, बदलीचा हुकूम, जणू सरकारी खाक्याने, लोणच्यासारखा हापिसात मुरत मुरत, अख्खा शिशिर नि हिवाळा गेल्यावर ऐन वसंतात जारी झाला, तरीही, घरचे लोक ओरडलेच, "क्काय???"
ते तरी बिचारे काय करणार? जगाच्या नकाशावर तर पोर्तो-रीको शोधून सापडत नव्हतं. साधार ३७ मैल रुंदी, आणि १०५ मैल लांबी एवढासा हा प्रांत. आणि बोटाने दाखवायला गेलं, तर बोटाखालीच लपेल इतक्या थेंबायेवढ्या एका टिचक्या बेटावर आम्ही न्यू जर्सीतली, त्यांच्या मते, "स्वर्गसुखं" सोडून कश्शाला जातोय, हे त्यांना कधीच उमजणार नव्हतं. आम्हाला तरी कुठे उमजलंय अजून? आम्ही स्वत:लाच बरीच कारणं दिली, तीच मग त्यांना:
"मुख्य अमेरिकेतल्या" (आता आमच्यासाठी सगळीच वाटणी, "mainland US/island" अशी होत होती) बऱ्याच अंशी मिळमिळीत जगण्याला थोडे कंटाळलो, नवऱ्याला तिथला अनुभव त्याच्या नोकरीत अनमोल ठरेल, कंपनीच पाठवते आहे, सगळी व्यवस्था करणारे, मुलाला मज्जा, मी कोणत्या नोकरीशी बांधिल नाही..." अशी वेगवेगळी कारणं दिली, पण खरं कारण एकच होतं, "का नाही?"...

एक सर्वस्वी वेगळा प्रदेश, भाषा, संस्कृती अनुभवायला मिळतेय, तर, का नाही? आणि, घरच्यांना जितकं पोर्तो-रीको हे नाव अपरिचित होतं, तितकं आमच्या आसपासच्या गोतावळ्याला नक्कीच नव्हतं. सुंदर सागरकिनाऱ्यांमुळे टूरीस्टांची दर हिवाळ्यात जिथे झुंबड उडते, वर्षभर जिथे साधारण सारखंच (मस्त) हवामान असतं, जिथे पेरूचं आईस्क्रीम मिळतं, तिथे जाणार? अशी कौतुकाची चौकशी व्हायला लागली, तसे आम्ही विमानात बसायच्या आधीच थोडे थोडे उडायला लागलो होतो!

तरी तयारीत महिना गेला! बॅगा, सामान किती, कसे न्यायचे? कार व राहत्या घराचे काय करायचे? नोटिसा, मैत्रांचे प्रेमळ निरोप + आमची त्यांना  आगत्याची आमंत्रणे, भरपूर खाऊपदाडीबरोबरच, तिथल्या खाऊपदाडीची चिंता म्हणून ग्रोसरीच्या असंख्य वाऱ्या, हे सगळे करून, अखेर, येऊन पडलो. सुदैवाने, पाण्यात पडलो नाही. विमान एक अंशाने धावपट्टी गाठायला चुकलं, तर पाण्यात उतरवावं लागतं असं म्हणतात , आणि एरवीपण, खिडकीजवळ बसलेल्यांना नक्कीच तसा भास होतो!

पोर्तो रीको म्हणजे म्हणे, "श्रीमंत बेट"! हे श्रीमंत बेट क्रिस्टोफर कोलंबसला प्रथम सापडलं (तोच तो. एकाच माणसाने एकाच जन्मात काय काय शोधायचं? इथे रोज एक हेअरक्लिप सापडत नाही माझीच मला!) इथे पाण्यात सोने वाहतांना दिसत असे, म्हणून हे "श्रीमंत बेट" अनेक देशाच्या वसाहतदारांना न आवडलं तरच नवल. मुख्यत्वे स्पॅनिशांनी इथे वस्ती व साम्राज्य वसवलं, ते इंग्रजांना प्रयत्न करूनही उलथवता आलं नाही. मुळचे "ताईनो" (Taino)लोक, स्पॅनिश व युरोपीयन गोरे लोक, आणि त्याचबरोबर त्यांनी आणलेले आफ्रिकन गुलाम- अशी वर्ण-वंशांची सरमिसळ झाली, व आजचे पोर्तोरीको तयार झाले.

१८९८ मध्ये पोर्तोरीको अमेरिकेच्या पदरात पडले, व सोन्याच्या खाणी संपल्या, तरी अफाट निसर्गसौंदर्याची खाण अजूनही येणाऱ्यांचे डोळे दीपवतेच! अमेरिकन राज्यघटनेत पोर्तोरीकोला commonwealth चा दर्जा आहे, व अमेरिकेच्या अखत्यारीत काहीसे स्वतंत्र सरकार आहे. तुलनाच करायची झाली, तर अंदमान-निकोबारचं उदाहरण डोळ्यासमोर येतं.

सान हुआन (San Juan)ही राजधानी उत्तर-पूर्व किनाऱ्यावर आहे, तिथेच बहुतांशी वस्ती, शहरीकरण, पर्यटन आहे. कोलंबसने मुळात "सानहुआन-बाउतिस्ता" हे बेटाचे नाव ठेवले होते, आणि पोर्तोरीको राजधानीचे! पण हळूहळू ती नावं चक्क उलटी चिकटली, आणि आशयदृष्ट्या ते ही बरोबरच झालं म्हणायचं!

जुनं सानहुआन शहर दगडी बांधकामाचं, अरूंद गल्ल्या, दगडी रस्ते, एकमेकींना चिकटलेल्या रंगीत इमारती आणि लाकडी कोरीवकामाचे सज्जे, असं गोंडस रूपडं घेऊन उभं आहे, तर नवीन सानहुआनच्या उपशहरांमधे कोंदादो, सान्तुरसे असे भाग अगदी नवी-मुंबई/नव्या पुण्याप्रमाणे दिसतात.

क्रमश:

No comments: