6/25/09

रंग जांभळा

गेले काही दिवस मी Celie ची पत्र वाचत होते. The Color Purple मधली.
तिने देवाला लिहिलेली. "त्या" च्या पर्यंत कधी न पोचलेली...
सेली चं बालपण उमलायच्या आधीच कोमेजलं. आई मरणाच्या दारात असतांना सख्ख्य़ा बापाने अत्याचार केले, तर सांगेल कुणाला? एक देवच तर होता, त्याच्यावर भरोसा, की तो माझा पाठीराखा...
पण तो नाही आला धावून, द्रौपदीच्या कृष्णासारखा... बापाच्या पापाची पोरं बापाने बाहेर विकली, तेंव्हा नाही. त्याने सेली ला एका प्रौढ माणसाला बायको म्हणून उजवली, तेव्हा ही नाही. त्या माणसाने तिला गुरापेक्षा वाईट वागवली, वापरली, तरी ही नाही.

सेलीची पाठची बहिणच एक होती, तिचा कैवार घेणारी. ती म्हणाली, "तू तरी का सोसतेस अशी मुक्याने?"
"I don't know how to fight. All I know how to do is to stay alive!" सेली चं उत्तर आज समजून घेणं अवघड आहे. सेली सारख्या ऍफ्रिकन अमेरिकन बायकांना अगदी विसाव्या शतकातही जे सोसावं लागलं- त्याने पार मोडलेला कणा घेऊन जगतांना, पर्यायांचा नुसता विचार करता येण्याइतकंही बळ नसणं!
देवावरच्या आपल्या भाबड्या विश्वासाने का होईना, सेली त्या मरणाहून वाईट जगण्यातून चिवटपणे तगली. तिच्या बहिणीला मात्र शिक्षणाने नवी वाट दाखवली. आफ्रिकेत मिशनरी म्हणून गेली ती, पण आपल्याच संस्कृतीच्या ह्या "मूळापासून" आपण किती दूर फेकले गेलो, ह्याचं भान तिला आलं, आणि तिच्या "मिशन" ला एक वेगळंच परिमाण प्राप्त झालं.

सेली च्या नव़याने मात्र तिची पत्र सेली पर्यंत कधी पोचू दिली नाहीत.
आशेच्या एका किरणाला पारखी झाली होती सेली, तेव्हा तिला भेटली Shug Avery. प्रसिद्ध गायिका, सौंदर्याची पुतळी, पण आजारी पडल्यावर समाजाने टाकलेली. सेलीच्या शुश्रुषेने ती बरी झाली, आणि सेलीचं आयुष्यच तिने उजळून टाकलं.

"माझ्या देवाने आजवर माझ्यासाठी काय केलं?" सेली ने शेवटी हताश होऊन विचारलं, तर शग म्हणाली,
" तुझ्या डोक्यातला देव, एकतर तो पुरूष आहे, आणि त्याहून गोरा! तर त्याच्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार? तो तुझी निरपेक्ष सेवा मागणार, आणि त्याने वाटलेलं दु:खही तू प्रसाद समजून कपाळी लावावंस असं धर्मग्रंथात लिहून ठेवणार."

"मला वाटतं देव ना स्त्री आहे ना पुरूष. ते एक तत्त्व आहे- आपल्या बरोबरीने जगणारं, सुखात हसणारं, वेदनेने कळवळणारं! भावना ही देवानेच निर्माण केल्या ना? मग त्या सतत दाबून टाकल्याने देव प्रसन्न होईल असं कसं वाटतं तुला? अगं आपल्या सुखातही देवाचं सुख असेल, असा विचार का नाही करत आपण?
आपण देवाला प्रसन्न करायला निघतो, पण देवाने आपल्याला प्रसन्न करण्यासाठी काय काय लीला मांडून ठेवल्यात त्या कधीच का डोळे उघडून बघत नाही आपण?


"I think it pisses God off if you walk by the color purple in a field somewhere and don't notice it.” शग म्हणाली.
सेलीला मग एकदम काहीतरी उमगल्यासारखं झालं... जांभळ्या रंगाने हळूहळू तिचं रंगहीन जीवन उत्फुल्ल होत गेलं...

6/23/09

तुझं अक्षर...

आज खूप दिवसांनी तुझं अक्षर दिसलं
मी तुला दिलेलं पुस्तक
कव्हर लावून परत करतांना
नाव घालून दिलेलं-
माझं नव्हे- पुस्तकाचं!!!
एक एक काना-मात्रा-वेलांटी
किती जपून जपून काढलेलं

भेटायला येतांना तीन-तीनदा
आरशात पाहिल्या सारखं
ते अक्षर!

"न" आणि "व" सारखेच दिसतात तुझे
हे तुझं व्यक्तित्व
थोड्या साशंक अभिमानाने
स्नेहपूर्ण विश्वासाने हात पुढे करावा
तसं ते अक्षर!

मग पुढे आपण खूप पत्र लिहिली.
माझं अक्षर तुझ्या अक्षरासारखं व्हायला लागेपर्यंत.
माझ्या मराठीतला "ल" आणि तुझ्या हिंदी-मिडियमच्या "ल" मधला फरक
डोळ्यांना दिसेनासा होईपर्यंत
माझ्या वाटोळ्या अनुस्वाराचं तू मला भान आणून देईपर्यंत.
लिहिलेला प्रत्येक शब्द मी तुझ्या अक्षरातून वाचायला लागले तोपर्यंत.

त्या दिवसांवरची धूळ आज
अचानक झटकतांना
तुझं अक्षर दिसलं!
आणि डोळ्यांतल्या पाण्याबरोबर वहायला लागलं
धूसर धूसर होईपर्यंत...