PRवास.........३ एल मोरो


स्पॅनिश साम्राज्यात सान क्रिस्टोबालची तटबंदी समुद्राच्या काठाने वाढवत वाढवत नेली, ती एल मोरोपर्यंत. आजही क्रिस्टोबालच्या पश्चिम दरवाज्यातून निघालो, की एक पादचारी मार्ग, आणि त्यालगत गाड्यांचा रस्ता एल मोरोपर्यंत जातो. एल मोरोचं खरं नाव Castillo San Felipe del Morro (कास्टिलो सान फिलीपे डेल मोरो) असं आहे.  १६व्या शतकापासून यूरोपातून जगभर व्यापार-वस्तीसाठी समुद्रमार्गे शोधक-बोटी निघाल्या, स्पॅनिशांचे वर्चस्व होते. त्या काळी दक्षिण अमेरिकेत व इतर बऱ्याच ठिकाणी साम्राज्य स्थापित करून जग जिंकण्याची स्पॅनिशांची इर्शा होती.

यूरोपातून येणाऱ्या लढाऊ बोटींचा पहिला थांबा म्हणून, किंवा यूरोपातून उत्तर/दक्षिण अमेरिकेकडे जाणाऱ्या बोटींचा "व्दारपाल" म्हणून, पोर्तो रीकोला फारच महत्त्व होते. स्पेनने ते ओळखून पोर्तोरीकोच्या पूर्वोत्तरेकडे चांगलीच मोर्चेबांधणी केली. एल मोरो हा किल्ला अगदी पूर्वोत्तर टोकाला आहे, आणि त्याची बांधणी, वाढवणी १४व्या शतकापासून अगदी १८व्या शतकापर्यंत होतच राहिली. किल्ल्याला ६ मजले आहेत असे म्हणतात, पण पर्यटकांसाठी २-३ च उघडे असतात.  तळघरात बंदीवास असावा.

एल मोरोचं दुरून दर्शन होताच कोणी त्याच्याकडे वेड्यासारखा धावत न सुटला, तरच नवल. कारण जवळजवळ मैल दोन मैलाच्या उतारावर, हिरवागार गवताचा गालिचा, जणू किल्ल्यातून हलकेच उलगडत आपल्याला पायघड्या घालत येतो! हे स्पॅनिशांचं देणं आहे, की आताच्या पर्यटनखात्याचं, हे माहिती नाही, पण ज्याचं असेल, त्याला सलाम! गजबजलेल्या अरूंद गल्ल्यांच्या जुन्या सानहुआनला, हे असं विस्तीर्ण "मागचं अंगण" असेल, अशी कल्पनाच आम्ही केली नव्हती!

किल्ला बघतांना दुपारचे ४-५ वाजले असावेत. इथेही क्रिस्तोबालसारखीच रचना,  मधला चौक,चढ-उतार, वरच्या मजल्यावर पहाणीचे बुरूज, आणि सगळीकडून खळाळत्या समुद्राचे अप्रतीम देखावे! सगळीकडून म्हणजे, अक्षरश: सगळीकडून- कारण शौचालयात गेले, तर इतकी नैसर्गिक स्वच्छ हवा, आणि खेळतं वारं, की आपण नक्की पाटी बरोबर बघितली होती ना? असं वाटून गेलं. वारं येतंय कुठून, बघायला गेले, तर खिडकीतून पुन्हा मस्त समुद्रकिनारा दिसला! कॅमेरा आणायचा का बाहेर जाऊन? असंही वाटलं, पण स्वत:ला आवरलं.
इथे गच्चीवर "कलाकुसर" प्रकारात मोडणारी, फरशीवर थोडीशी कॉन्क्रीटची वेलबुट्टी होती. नवरा व मित्राचे त्यातही, "तोफ नेण्यासाठी ह्या घळी केल्या असतील!" अशी चर्चा, तर मी घट्ट "कलाकुसरच" ह्या मताची. एखाद्या इमारतीत जर एका राष्ट्राने इतका काळवेळ-मनुष्यबळ-पैसा खर्च केला असेल, तर त्यांनी कलेसाठी ४ दिडक्याही बाजूला ठेवल्या नसतील? असा प्रश्न वारंवार पडत राहिला, पण एकूणच पोर्तोरीकोला कलेचा स्पर्श कमीच जाणवला.


एक गार्ड "किल्ला बंद होतोय, बाहेर पडा!" अशी सूचना देत किल्ल्यात फिरायला लागला. मग नाईलाजाने निघालो. तोवर सूर्य माथ्यावरचा समुद्रावर कलला होता, आणि मगाशी बघितलेले ते गवताचे गालिचे अचानक मुलामाणसांनी फुलून आलेले! हातात हात घातलेल्या प्रेमिकांना वारं सुखावत होतं, तर छोट्या मुलांना गवताच्या उतारावर स्वैर पळायला गावलं होतं! फ्रिजबी खेळणाऱ्यांना आपण कशी फेकली तर सरळ जाईल, असा विचार करावा लागत असावा, इतका भन्नाट वारा होता! पर्यटक तर होतेच, पण बरेच रहिवाशी आपल्या रोजची श्वान-फेरी करायला आलेले. इथे पतंग उडवायला काय मज्जा येईल, असा विचार मनात येतो न येतो, तोच आकाशाकडे नजर गेली, तर तिथे चक्क १५-२० प्लॅस्टिकच्या पतंगी उडत होत्या. त्यांच्यावर ड्रॅगन/कार्टूनची चित्रं होती, दोऱ्या पण भक्कम असाव्यात.


संक्रातीला नाजूक तावाच्या पतंगी पुरवून पुरवून पुन्हा पुन्हा जोडून वापरायचो, ते काचा घासलेले तिखट मांजे डोळ्यासमोर आले, पण इथे सगळे अगदी सौजन्याने आपापल्या पतंगीं सांभाळत होते, की कोणा दुसऱ्याच्या दोऱ्यात अडकायला नको! एखाद्या पोराची पतंग वाऱ्याने फाटली, तर त्याचे वडील पुन्हा जोडत होते. काही निवांत लोकतर उडणाऱ्या पतंगाची दोरी एखाद्या पुस्तकाखाली खोचून, चटईवर आळसावले होते! पतंग "उडवण्यापेक्षा", उडती पतंग नुसती धरणे, ह्यात काय मजा असेल कोणास ठाऊक? ह्यांना जर कोणी निर्घ्रुण काटाकाटीचा "ब्लडी गेम" शिकवला, तर इथे काय हल्लकल्लोळ होईल, अशी कल्पना करून हसू आलं. एवढंच काय, काटाकाटीची भव्य मॅचच इथे भरवता येईल, आणि जिंकणाऱ्याला किल्ल्यात ५.३० नंतरही जाण्याची परवानगी मिळेल, असं असतं तर?


मी आळसावून गवतावर लोळायच्या बेतात होते, तर नवऱ्याला किती फोटो काढू नि किती नको, असे झालेले! शिवाय, पोराच्या मागे पळता पळता त्याला आपसूकच नवनवीन ॲंगल्स मिळत होते!
किल्ल्यातून सूर्यास्त बघायला मिळत नाही, पण किल्याच्या भोवती बऱ्याच ठिकाणी अर्ध्यामुर्ध्या भिंती, किंवा दगडाच्या पायऱ्या आहेत, तिथे लोक जागा धरून वाट बघत बसतात, तसे आम्हीही बसलो. उन्हाळ्यात सूर्यास्त बराच उशीरा असतो, पण तरी, निसर्गाच्या प्रेमाने भारलेला हा प्रत्येक क्षण किती भरकन हातातून निसटतोय, असं सतत वाटतं, आणि संध्याकाळचा कातर प्रहर कधी संपूच नये असंही.

सूर्यास्ताचं तर वर्णन शब्दात करण्याइतकी माझी कुवतच नाही! एकदा इथे येऊन गेलेल्याला अनेक वर्ष डोळ्यासमोर दिसत राहील, असा तो सूर्यास्त! एकीकडे किल्ल्याची काळी-गडद होत जाणारी आकृती, आणि दुसरीकडे दर्यात, आकाशात, तप्त लाल-केशरी सोने ओतणारा दिनकर! जांभळ्या-गुलाबी ढगांतून मधेच चमकणारं एखादं विमान.

किल्ल्याच्या उतरणीलगत खोल कड्याखाली एक उपसागर (बे) आहे, त्याचे नाव "Ensenada de Boca Vieja" (एन्सेनाडा डे बोका विएजा), तो वळतवळत अगदी अर्धगोलाकारात पोर्तोरीकोचं वैभव दर्शवतो. बे च्या पाठीमागे निळ्याजांभळ्या डोंगरांची रांग आहे, आणि बे च्या अगदी मधोमध एक लांबच लांब नारळांची रांग उगवून आली असावी, असं भासवणारा निरूंद जमीनीचा पट्टा. हा पट्टा "Isla Del Cabras" (इस्ला डेल काब्रास) ह्या उपबेटाचा आहे, असं नंतर कळलं. सूर्यास्त होत आला, तेव्हा तर हे चित्र अद्भुतच वाटायला लागलं! खरंच आपल्या पृथ्वीवर, त्यातही, अमेरिकेच्या एवढ्या जवळ, इतकी सुंदर जागा आहे, ह्याचा मला आजवर पत्ताही नव्हता, असं कसं झालं?

नायगरा असो वा योसेमिटी, काहीच बघून इतके भारावलो नव्हतो, कारण तिथे नैसर्गिक सौंदर्यापेक्षा, ते सौंदर्य व्यवस्थीत फुटपट्टीने मोजून-मापून त्याची सोयिस्कर "रचना" करणाऱ्या माणसाचा हातच जास्त जाणवला होता. एल मोरोवर मात्र निसर्ग एखाद्या खेळकर पोरासारखा वाऱ्यावर नाचत-उडत असावा, नि त्याच्या खिशातुन नकळत गोल सागरकिनारा, नारळी, डोंगर, लाटा, अशी रत्न इथे-तिथे सांडली असावीत, असं वाटलं!
इथेही स्वच्छता आहे, इमारतींची रचना/ स्थापत्य, सगळंच अगदी वाखाणण्यासारखं आहे, पण ते जातीच्या सुंदराला मोजकेच, शोभेसे दागिने घातल्याप्रमाणे! किल्ल्याच्या विरूद्ध बाजूच्या इमारतींवर हलकेच, रंगीत प्रकाशझोत सोडतात. रात्रीही, सरळ किल्ल्यावर प्रकाश न सोडता, भिंतींच्या आतून दिवे लावतात, त्यामुळे भिंती स्वत:च प्रकाशित झाल्यासारख्या दिसतात.

ती संध्याकाळ आम्ही पुन्हा पुन्हा अनुभवली, हे सांगायला नकोच. कधी पार्कींगसाठी धक्के खात, तर कधी ट्रॅफिकमधे अडकूनही, पुन्हा पुन्हा एल मोरोवर जातोच. दरवेळी किल्ल्याच्या आत जायची आता काहीच गरज नाही, कारण किल्ल्याच्या बाहेरच दरवेळी नवनवीन सूर्यास्ताची पर्वणी मिळते.
...क्रमश:




2 comments:

अपर्णा said...

छान आहे ही सिरीज. तो वरचा सुर्यास्ताचा फोटो खूप छान आहे :)

विशाखा said...

Thanks Aparna! फोटो काढण्याचे फारसे कौशल्य माझ्याकडे नसूनही, आपोआपच छान फोटो येतात, इतकं छान आहे सगळं :)