10/7/11

अन्वयार्थ

बाल्कनीतल्या उन्हात अगदी लवकर सकाळी कॉफी पीतांनाची आजी बघून मला का कोणजाणे, भरून आलं. तिची नजर दूर झाडांकडे लागलेली, पण मन मात्र आशेने स्वयंपाकघराकडे वळलेलं होतं, कि कोणी आपल्याशी बोलायला येतंय का? मी माझाही कॉफीचा मग सांभाळत दार उघडून म्हटलं, "गूड मॉर्निंग". तर हसून म्हणाली, "खूप पूर्वी आमच्या शेजारी बेबीताई रहायची, ती म्हणायची तसं, आज तुझं लवकर उजाडलेलं दिसतंय!"

तिच्या मनाने एका क्षणात त्या बेबीताई असणाऱ्या आठवणींचा पट, पुन्हा एकदा जगून मागे टाकला होता! हल्ली तिच्या दर ५ वाक्यांमागे, "खूप पूर्वी आमका......खूप पूर्वी गेलो होतो ते गाव.........खूप पूर्वी खाल्ली होती ती कचोरी.........." अशी उदाहरणं येत असतात. किशोरवय भविष्यात, तारूण्य नि प्रौढत्व वर्तमानात, तर वृद्धत्व भूतकाळात रमतं- ऐकलं होतं. पण आजीचं ते पूर्वीच्या गोष्टींत रमणं मला आजवर कधीच इतकं कासावीस करून गेलं नव्हतं. त्या रमण्यात आनंद असेलही तर अगदी थोडा होता. मनाला आता केवळ भूतकाळाचाच तर आधार उरलाय, अशी अपरिहार्य शरणागती माझ्या आजीने घ्यावी, हे अजिबातच सहन होईना.

"आपली प्रेमाची माणसं आता म्हातारी होत चालली!" हे स्वीकारायला हवं- मी मनाला समजावलं. ऐंशीच्या घरात पोचल्यावरही काळे केस, नि खणखणीत आवाजाची आजी, आता मात्र स्वत:च्याच आवर्तांमधे फिरतेय. नवीन चित्रं बघतांनाही जुन्याच चौकटींमधून त्यांचे अन्वयार्थ लावायला लागलीये. गंमतीत का होईना, मरण्याची गोष्ट काढून, "त्या क्षणाला" एकटीने सामोरं जायचं धैर्य गोळा करायला लागलीये.
एवढं आयुष्य जगून मागे टाकलं- त्याचा गोषवारा काय निघतो का ते शोधायला लागलीये.

आयुष्याच्या संध्यासमयी, हे असं आपसूक वैराग्य येऊनही रोजच्या जगण्यातला आनंद कणाकणाने साठवणारी ही माझ्या आधारवडांची पिढी, कदाचित मला सांगू पहातेय, "आता तुला मोठं व्हायला लागेल. आमच्या करता हॉस्पिटलच्या वाऱ्या, बेडपॅन देणं नि केस विंचरून आंघोळ घालणं तुला करावं लागू नये अशी खरंच कळकळीची शेवटची इच्छा आहे!
पण ही सेवा करण्यानेच का केवळ मोठेपण येतं?
बाल्कनीत कॉफी पीत बसलेल्या आजीशी जाऊन चार धीराचे, आशेचे, आनंदाचे शब्द बोलतांनाही मला ते नकळत आलंच होतं.