8/25/08

केनीकुर्डू आणि कोल्स्लॉ

Prelude: मित्रमैत्रिणींनो, मी जन्मात कधी ब्लॉगोस्फियरमधे खो खो खेळले नव्हते, त्यामुळे माझा जरा गोंधळ झालाय खरा, पण मी यशोधरा आणि नंदन ला खो दिलाय...
===================================================================
परवा एका सत्यनारायणाच्या पूजेला गेलो होतो- यजमान फारच भाविक. अगदी केळीचे खांब लावून सजवलेला चौरंग, विष्णूसहस्त्रनामाचे प्रिंट-आऊट्स, टोपलीभरून फुलांच्या पाकळ्या, अशी जय्यत तयारी होती. सौ. नी पैठणी, श्रींनी धोतर, जानवं घालून अगदी साग्रसंगीत दाक्षिणात्य गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पूजा केली. त्या भारलेल्या वातावरणात, एरवी फारसे भाविक नसलेले लोकही खिळून बसतात नं, तसं माझं झालं होतं. लहान मुलांना बाकी काही कळत नसेल, तरी रंगीबेरंगी आरास आवडते, तसं ते visual च इतकं सुंदर होतं, की कोणीही आकर्षित व्हावं... मनातले गोंधळ तात्पुरते संपून केवळ गुरूजींचा भारदस्त स्वर कानात भरून रहावा, इतपत माझी समाधी लागली होती.

कधीतरी शिकलेल्या संस्कृतामुळे, आणि आजी पौरोहित्य करते, त्यामुळे गुरूजी खरंच त्या त्या वेळी समर्पक मंत्र म्हणतायेत, की तोंडातल्या तोंडात जे श्लोक आठवतील ते पुटपुटताहेत, ते ही कळत होतं, आणि त्यामुळे गुरूजींबद्दल थोडा आदर निर्माण झाला होता. काही गुरूजी, पुजा सांगता सांगता, कोण आलं, कोण गेलं, कोणती मुलगी दिसायला चांगली आहे, अशा अनेक गोष्टी इकडे तिकडे बघत, टिपत असतात! त्यातले हे नव्हते- असं प्रथमदर्शनीच जाणवलं. लोकांना ५ ची वेळ दिली, त्यानंतर लोक हळूहळू येत होते, थोडं बसून, पुन्हा दुसरीकडे जात होते. लहान बाळं असलेल्या बायका त्यांना घेऊन शक्यतोवर पूजेपासून दूर बसल्या होत्या- म्हणजे रडणं-पडण्याचा व्यत्यय नको- अशा विविधतेने नटलेल्या त्या जागी, गुरूजींचं सगळं लक्ष मात्र फक्त पूजेवर केंद्रित होतं.

पूजा झाल्यावर, “आता कथावाचन..” असं त्यांनी सांगितलं. त्याबरोबर यजमानांनी एक टिपिकल प्लॅस्टीक कव्हर लावलेलं जुनंपुराणं पुस्तक बाहेर काढून, “The Satyanarayana Katha: Chapter 1” अशी सुरूवात केली. “One day the holy sage Narada was roaming in the heavens, and while roaming, he came to Vaikuntha, the dwelling of almighty Shri Satyanarayana.” मी नवऱ्याकडे हळूच एक नजर टाकली. ती टाकायला नको होती, असं नंतर वाटलं, कारण तोही, माझ्याप्रमाणेच, हसू दाबण्याच्या कठोर प्रयत्नात!!! इकडे कथा सुरूच, “There was once a Merchant by the name of Sadhu, who had a wife called Leelavati. He was unhappy, because he did not have children.” आता पूजेत व्यत्यय नको, म्हणून आपणच तिथून उठून जावं का काय, इतपर्यंत माझी परिस्थिती झाली होती.

लहानपणी, “पुराणकथा,” नावाच्या १० पानी पुस्तकात कित्ती कहाण्या वाचल्या होत्या, त्यांचा ह्या Lord Satyanarayana शी काही संबध आहे असं वाटेना! मनातल्या मनात, “हे लोक केनीकुर्डूच्या भाजीचं इंग्रजीत काय भाषांतर करतील?” असा विचार येऊन जास्तच हसायला आलं. “एकदा एका कुष्ठरोग्याच्या रूपात श्री विष्णू कलावतीच्या घरी आले असता, तिने त्याला प्रेमाने घरात घेऊन, तेल-उटण्याने न्हाऊ माखू घातलं.” अशा आशयाची एक गोष्ट आठवली, आणि नागपंचमी, पोळा, श्रावण, सोळा-सोमवार अशा किती कहाण्या आपण विसरलो, ते ही आठवलं! एवढी पूजा साग्रसंगीत केलीये, तर ह्यांनी कहाणीपण मराठीत वाचायला काय होतंय? असंही एकदा वाटून गेलं.

पण मग पुन्हा शांताबाई शेळकेंचं, “चौघीजणी.” डोळ्यापुढे आलं. त्यातल्या एका गोष्टीत, हॅनाने थॅंक्सगिव्हिंगच्या सणाला बनवलेलं उत्कृष्ट जेवण, शांताबाईंच्या उत्कृष्ट अनुवादामुळे मला चाखायला मिळालं होतं. मेग (Meg) च्या फसलेल्या मुरांब्याचे प्रयोग जवळचे वाटले होते, आणि सर्वात अधिक लक्षात राहिलं, ते एक Christian Hymn,
“लीनपणे जो जगे तयाला
पतनाचे भय कधीच नाही.
कुणी न ज्याचे, देव तयाचा
सदैव सहचर होऊन राही.”
शांताबाईंनी ती भाषाच नव्हे, तर त्या संस्कृतीचा अनुवाद केल्यामुळे जे अनुबंध माझ्यात आणि Little Women मधे निर्माण झाले, तेच अनुबंध इथल्या मुलांसाठी इंग्रजी सत्यनारायणाच्या कथेने नाही का निर्माण केले? एकदा वाटतं, आपल्या संस्कृतीचं जतन व्हायला हवं. पुराण-कथेच्या पुस्तकांना अक्षरश: म्युझियममधे जागा करून द्यावी. आणि दुसरीकडे वाटतं- म्युझियममधे सडण्यापेक्षा, त्यांचा प्रसार व्हायला हवा. मग केनीकुर्डूच्या भाजीला कोल्स्लॉ का म्हणेनात!!!

===================================================================
तळटीप: आनंद सरोळकरांनी, “खो.” दिल्यामुळे माझापण हा, “शब्दखेळ.” पटकन पूर्ण झाला, त्याबद्द्ल त्यांना मन:पूर्वक धन्यवाद!

8/18/08

मी कोणी नाही

कसं नाही काही लोकांना जमतं- बोलणं, बोलतांना दुसऱ्यांचं लक्ष वेधून घेणं, मुद्दे लढवणं, आणि हजरजबाबीपणाने विनोद करणं! परवा एका पार्टीला गेलो होतो- नेहमीचे हास्य विनोद चाललेले, ग्रीनकार्ड, व्हीसा,इथले डॉक्टर आणि दवाखाने, देशी-विदेशी पिक्चर, रेसीपी, अशा एक ना अनेक गोष्टींची खरपूस चर्चा चाललेली होती, आणि संभाषण आपसूक एका गोलात फिरल्यासारखं, एकेकाची खबरबात घेऊन पुढे सरकत होतं.

देसी पिक्चरवरून हास्याचे फवारे फुटत असतांना, “आमची ही- सावरीया आणि देवदासला ढसढसा रडून एक अख्खा टिश्यूचा डबा संपवते!” अशी कौतुकमिश्रित थट्टाही करून झाली. मग तुफान पेटलेल्या मुलं v/s मुली ह्या सामन्यात मुलांनी तितक्याच पटकन शरणागतीही पत्करली :) ह्या सगळ्या गदारोळात एक ना दोन व्यक्ती तरी असतातच, की त्यांची शांतता आपण गृहितच धरतो. मला एकदा व्हायचंय ती व्यक्ती-

कारण त्यांच्याकडे बघून मला नेहमीच प्रश्न पडतो, की मी जरा जास्तच बोलतेय का? माझी टोकाची मतं नोंदवायची पार्टी ही जागा नव्हे! किंवा कोणाची गंमत आपण बिनधास्त करतो, ते त्यांना टोचत तर नसेल? पण कधीकधी मीही असते की Nobody! बोलण्यातून आणि भाषेतून काय दिसणार, किंवा दाखवणार स्वत:चं व्यक्तिमत्त्व, जर स्वत:लाच कळलेलं नसेल? कधीकधी नसतातही मतं, विचार, माहिती- सांगण्यासारखी...

आणि कधीकधी किती असतं, जे सांगता येत नसतं, पण सांगितल्याशिवाय त्याचं अस्तित्त्व निर्माणही न होण्यासारखं...!

माझी एक आवडती एमिली डिकिन्सनची कविता:
I'm Nobody! Who are you?
Are you—Nobody—Too?
Then there's a pair of us?
Don't tell! they'd advertise--you know!

आणि कधीकधी भेटतात असे लोक, जे Nobody असतात इतरांसाठी, पण आपल्याला कळते त्यांच्या अबोलपणात दडलेली भाषा.....म्हणतात ना, कित्येकवेळा आपण आयुष्यभर बोलूनही ज्यांना कळायचं त्यांना ते कळणार नसेल, तर खऱ्या, “ओळखी..” साठी बोलण्याची गरजच नसावी! तेंव्हा, त्या स्तब्धतेत, एका चिरंतन आंतरिक शांततेचं प्रतिबिंब पडतं, आणि बोलणारं तमाम जग जरा, “अतीच करतंय..” असं वाटू शकतं!

How dreary--to be--Somebody!
How public--like a Frog--
To tell one's name--the livelong June--
To an admiring Bog!
-- Emily Dickinson

आणि हा स्वैर अनुवाद.........
“मी कोणी नाही- तू कोण आहेस?
तूही का कोणी नाहीस?
मग आपली जोडी- सांगू नकोस हं,
जाहिरातच होईल त्याची...

काय रटाळवाणं- असं - “कोणीतरी असणं-”
सार्वजनिक- बेडकापरी--
स्वत:चं नाव ओरडणं सतत
कौतुकाच्या डबक्यावरी!

8/14/08

माझं दिसणं, माझं असणं........

परवा एका पार्टीला जातांना संवाद:
“अरे तुला आईबाबांनी नवीन कुर्ता दिलाय तो घाल की!”
“नको, त्यापेक्षा शॉर्टस घालून गेलो तर काय बिघडतंय?”
“का पण? कुर्ता छान दिसतो!”
“छे- तू तर असं म्हणणारच. पण मला आता कितीही नटलो तरी काहीच चांगलं दिसणार नाहिये ह्या टकलामुळे...”
“हो- एक केस काय गेले, तर तुम्हा लोकांना डिप्रेशनच येतं. आणि वर म्हणायला मोकळे- की बायकोने केला छळ, म्हणून केस झाले विरळ! इथे आमच्या वाढणाऱ्या वजनाचं आणि गळणाऱ्या केसांचं कोणाला दिसत नाही मेलं! ”
ही अशी आमच्या आत्मसन्मानाच्या नावाने बोंब असतांनाच, एका बाईंनी तर कहरच केला, “तुमच्या मुलांनी त्यांच्या बाबांना केस असलेलं बघावं असं वाटत असेल, तर तुम्ही लवकरच चान्स घ्या बरं का!”
“अगं- सुट्टीच्या फोटोत चांगलीच जाड दिसत्येस! येवढ्या तरूणपणी एवढं वजन वाढलेलं चांगलं नाही. म्हणजे, गैरसमज नको, पण एक आपलं वाटलं म्हणून सांगितलं.” ----ह्यांना आमच्या हवाईच्या फोटोमधे सुंदर समुद्रकिनारा दिसायचा सोडून नेमके माझे जरा जास्त वर आलेले गालच का दिसावे?

खरंच, आपल्या असण्यामधे दिसण्याचं किती महत्त्व असतं नाही? मी लहान असतांना आजीबरोबर खूप प्रवचनं, आध्यात्मिक व्याख्यानांना जायची. त्यामुळे जग हे मिथ्या आणि आत्मा सत्य वगैरे डोक्यात बसलं होतं. त्यामुळे दिसायला चारचौघात बरी असूनही त्याचा गर्व करू नये, हा प्रयत्न तरी केला. एक माझे झिपरे आणि पातळ केस सोडले, तर बाकी स्वत:च स्वत:च्या रूपाच्या प्रेमात पडू नये, असं काहीही मला दिसत नव्हतं. (काय करणार? प्राप्ते तु शोडषे वर्षे.......) आणि तरीही, रूपाशी जोडलेल्या व्यक्तित्त्वाच्या पुढे जाऊन आपलं काहीतरी असावं, अशी प्रखर इच्छा होती. येवढंच नव्हे, तर केवळ रूप बघून कोणी आपल्या प्रेमात पडू नये, असंच वाटायचं. आणि दिसण्यामधे आपलं लक्ष कमी करण्यात यश आलं असं वाटत असतांनाच काय एकेक साक्षात्कार होत जातात-

  • की आजकाल आपल्याला फोटो काढून घ्यायला आवडत नाही. आणि काढलेच, तर त्यातली स्वत:ची इमेज चट्कन विसरून जायला फारसे कष्ट लागत नाहीत.
  • आजकाल आपण जुने लग्नाचे फोटो बघून, “काय ना मी तेव्हा smashing होतो!” असं एकमेकांना दाखवत बसतो.
  • आजकाल नवीन कपडे घेणं नकोच वाटतं, कारण मॉलच्या फिटिंग रूम मधे तो शर्ट घालून बघितल्यावर, “हाच का तो शर्ट जो पुतळ्याला घातलाय?” असा प्रश्न पडतो.
  • घालायला गेलो, की कपाटात एकही धड कपडा दिसत नाही.
  • ट्यूबलाईटपेक्षा मंद पिवळा प्रकाश जास्त आवडायला लागतो, त्यात चेहऱ्यावरचे काळपट डाग ऊठून दिसत नाहीत.
  • भारतात गेल्यावर सगळ्यात आधी लोकांकडून, “अभिप्राय.” ऐकून घ्यावे लागणार, त्याची चीड आणि मानसिक तयारी करावी लागते.
  • तिथल्या लोकांची overweight ची व्याख्याच कशी चुकलिये, तिथल्या लोकांनी आपल्याला १० वर्षांपूर्वी पाहिलंय आणि आता त्यांच्या डोक्यात तीच image फिट्ट बसलीये, त्यामुळे असं होतं, हे समजुन घेण्याचा प्रयत्न.
  • येवढंच नव्हे तर, त्या लोकांना दुसरं काही बोलणं सुचत नसेल, किंवा चक्क आपल्याविषयी jealousy पोटी असं बोलत असतील, असे सोयीस्कर समज करून घेणे.

खरंच मी दिसण्याच्या बाबतीत इतकी sensitive होते, हे आजवर माझं मलाच जाणवलं नव्हतं. का बरं आपल्या self-image ची, आणि लोकांनी बनवलेल्या image ची कधी सांगड घालता येत नाही? शेवटी मी म्हणजे मीच आहे ना, आणि मला मीच आवडत नसेन तर जगण्यालाच काही अर्थ उरत नाही, इथपर्यंत तो self-image चा निराशाजनकप्रवास जाऊन पोचतो.
मग स्वत:चाच नव्हे, तर सगळ्या जगाचा राग राग येऊन माणूस अगदी विरक्तीपर्यंत जाऊन पोचतो. म्हणजे आलीच का पुन्हा आजीची, “जग मिथ्या आत्मा सत्य..” वाली फिलॉसॉफी! उगीच नाही प्लेटोच्या पुतळ्याचे केस मला विरळ वाटले...... :) :)

8/11/08

उलटी अमेरिका

आज कित्येक वर्षांनी पुन्हा
आई-बाबांचा हात धरून
उत्साहाने गेले फिरायला.
फक्त,
आज मी गोष्टी सांगतेय,
ते ऐकतात, कौतुहलाने!
मी रस्ते दाखवते,
ते येताहेत मागून
ह्या नव्या जगातली प्रत्येक गोष्ट
लहान मुलांच्या डोळ्यांनी
मनात साठवत....
“अय्या! इथे दारं उलटी, दिव्यांची बटनं उलटी,
गाड्या तर उलट्या धावतातच!”
“छे, इथल्या भाज्यांना चवच नाही मुळी!”
“बाSSSSSपरे! येवढ्या मोठ्या पार्किंग लॉट मधे, गाड्या फक्त तीन?”

------मीच बोलले नव्हते का ही वाक्य,
अमेरिकेतल्या माझ्या पहिल्या वहिल्या दिवशी?

पिढ्यांचं चक्रही, ह्या उलट्या अमेरिकेने उलटंच फिरवलंय की!
“तुम्हाला पोरं झाली की कळेल...” हे त्यांचं टिपिकल वाक्य.
“तुम्हाला इथे राहून थोडे दिवस झाले, की कळेल....” हे माझं.

मॉलमधे कपड्यांवरची लेबलं बघून
त्यांचे भांबावलेले चेहरे बघतांना
दाटून आला गळा-
वाटलं, त्यांनीही करावा माझ्याकडे हट्ट-
स्वेटर, घड्याळ, मोत्याची माळ
पर्स घेऊन देण्याचा.....
पण ३ डॉलरच्या कॉफीतच होतात शेवटी त्यांचे लाड
तेव्हा कळते त्यांची धडपड-
आपल्या बालपणीच्या लाखो मागण्या पूर्ण करायची!

कधीकधी होतातही वाद,
“तुम्हीच अमेरिकन झालात, तर तुमची पोरं कसली मराठी बोलणार?”
-----“पण त्यांनी मराठी बोलावं, हा अट्टहास का तुमचा?”
“आपण नायगराला पराठे घेऊन जाऊ...”
------ “ह्म्म....तुमच्या चवी काही बदलायच्या नाहीत!”
“इथे तुम्हाला माणसांचंच वावडं आहे!”
-------”हो, तिकडे शेजाऱ्यांना चांभार चौकशा असतात, त्यापेक्षा हेच बरं!”

पण आतून कधीतरी आपणही घातलेलेच असतात ना हे वाद स्वत:शी?
बर्गरला आपलं म्हणता येईपर्यंत गेलीच ना ५ वर्ष?
त्यांनीही अशीच समजून घेतली असेल ना- माझी स्वयंपाकाची नावड,
माझी नोकरीची जिद्द, मी उडवून लावलेले उपास-तापास......
साडी नेसून  दाखवण्याच्या कार्यक्रमाबद्द्ल पोटातून चीड!

आणि आज मी सांगतेय त्यांना,
की हे जे इथे असं आहे, ते तसंच स्वीकारावं लागतं.
इथल्या माणसांमधे, मिळून मिसळून रहावं लागतं- नव्हे, रहायला आवडतंही.

पण मग त्यांना विमानात बसवून आलो,
की हेच इथलं रोजचं जग अनोळखी वाटायला लागतं...
वैराण वाळवंटात येऊन पडल्याचा भास!
कसे विसरलो आपण जन्मापासून भारतात घेतलेले श्वास?
जाऊया का परत?

नकोच.
त्यांना मिळू दे आता इथे आपल्याकडे-
पुन्हा एकदा- एक निर्भर निश्चिंत बालपण.
म्हणतात ना, “लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते...”