11/30/08

असंच काहीसं...

थॅंक्सगिव्हिंग वीकेंड होता, म्हणून डेलावेअरच्या एका मित्राकडे अड्डा टाकायला गेलो होतो. मित्र तसा माझ्या नवऱ्याच्या, पण नवऱ्याने अलिकडे "माणूसघाणे" हे आडनाव धारण केल्यामुळे, असंख्य मेला-मेली, फोनांमधे त्याने जाणूनबुजून अलिप्तपणा केला. मग शेवटी काहीच ठरेना, तेंव्हा नेमक्या शिव्यांनी नटलेली एकच सुबक इमेल अशी केली, की सगळे झोपेतून उठून "हो येतोय", "आम्ही तर आधीच तयार होतो!" वगैरे कुजबुज करते झाले!
तिथे गेल्यावर मात्र जरा प्रश्नच पडला, की आता काय बोलावं. लेकुरवाळ्यांना त्यांच्या बाळांपासून फुरसत नव्ह्ती, आणि त्यांचे चेहरे सुमारे २ वर्ष एकही दिवसाची शांत झोप न मिळाल्यामुळे "झॉम्बींसारखे" झालेले पाहून आपण त्यांच्याकडून अपेक्षा तरी काय करणार?
तरीही, एकत्र सण साजरा करून परत निघालो तेंव्हा नवरा एकच वाक्य बोलला, "तुला ह्या कंपनीत एकाच्याही चेहऱयावर मित्र भेटल्याचा खरा आनंद दिसला?"
नशीब तिथून आम्ही लवकरच पळ काढला- कारण घरी माझी मैत्रिण तिच्या नवऱ्याला घेऊन येणार होती नं! मला इतका उत्साह आला होता- काय करू नि काय नाही असं होऊन गेलं. कॉलेज मधे अगदी जिवलग होतो, पण नंतर मधे संपर्क तुटल्यासारखा झाला, तो सरळ इथे येऊन जुळला. ती आली, आपुलकीने राहिली, आम्ही पिक्चर, गप्पा, पत्ते, खाणे, पीणे अशा सगळ्या करण्याच्या गोष्टी केल्या, पण मला का कोणजाणे, माझी जुनी मैत्रिण कुठे हरवलीये, असा विचार डाचत होता.
ती गेल्यावर नवरा पुन्हा त्याच्या नेमक्या शब्दात म्हणाला, "ही खरंच तुझी इतकी चांगली मैत्रिण होती?"
"हो, का रे?"
"अगं मला तरी तिच्यात तसं काही दिसलं नाही. तिने ना तुझी चौकशी केली, ना तुझ्या कुठल्या गोष्टीचं कौतुक. तिला तू आधीचीच "कळली" होतीस, त्यामुळे तुझ्यात आता तिला interestच नाहिये असं वाटलं मला! किती खोटं वाटलं तिचं सगळंच वागणं..."

मला त्याचं बोलण कळलं पण वळलं नाही असंच काहिसं झालं. नाती इतकी बदलतात, की ज्या मित्रांनी आपलीच ओळख एकेकाळी आपल्याला सांगितली होती, त्याच मित्रांचे चेहरेच आता ओळखू येऊ नयेत? कोण बदललं असेल? ती, का मी? आम्ही दोघीही, की माझा नवरा?
की आम्हा दोघींमधली ती ओळखच पुसलीये, आणि ती पुन्हा लिहावी लागणारे नव्याने?

11/7/08

The Bell Jar

Dying
Is an art, like everything else.
I do it exceptionally well.

- Sylvia Plathहे जळजळीत शब्द जगाच्या मळक्या पाटीवर कोरून ती निघून गेली. आत्महत्या करून.

पण आजही तिचं आत्मकथन वाचतांना प्रश्न पडतो, की काही बदललंय का? काहीच कसं बदललं नाही?
छोट्या गावातून आलेली ती, न्यू यॉर्कमधे स्वत:ची ओळख शोधत असतांना तिला भलतेच काही शोध लागले. स्वत:बद्दल, स्वत:च्या अस्तित्वाबद्द्ल. कुठल्याच मैत्रिणीत, कि कुठल्याच काकी-मामी, एवढंच काय स्वत:च्या आईमधेही तिला स्वत:चं प्रतिबिंब दिसेना, तेंव्हा वाटायला लागलं, "माझं काही चुकत तर नाहिये ना?" Doreen चा तडफदारपणा आवडतो, पण तिच्यासारख्या रूपगर्वितांना मुलं झुलवत ठेवतात, आणि काम साधलं, की फेकून देतात, ह्याची तिला ना जाणीव, ना तमा. Betsy चा आज्ञाधारकपणा म्हणावा, की मूर्खपणा, ते कळेना. आणि Boss असलेली Jay Cee? तिच्या यशाचा द्वेष करावा, की कुरूपतेची कीव?

काहीच कसं सगळं मनासारखं साधत नाही? बायकांनी यशस्वी असलं, की त्यांना काय भावना नसतात, की काय त्यांचं स्त्रीत्व नाहिसं होतं? बायकांनी स्वाभिमान बाळगला, येवढंच नव्हे, तर स्वाभिमान दाखवला, तर कोणती मोठी मर्यादा ओलांडली? आणि खुद्द आईने तिला सांगावं? "तुला काय करायचं कॉलेजशिक्षण? त्यापेक्षा टायपिंग शिकून स्वत:ची भाकरी मिळवायला शीक!" (म्हणजे मुलींना ना शिकण्याची मुभा, ना स्वावलंबित्वाचा अभिमान बाळगायची मुभा!)

राग राग आला, पण त्याहूनही, वाईट वाटलं. किती भाबडेपणाने सगळे नियम पाळले लहानपणी!
ठेवला विश्वास, की जे चांगलं असतं, ते केलं, की कौतुक होईल,
आणि नाहीच, तर निदान प्रेम मिळेल, निदान कोणीतरी पाठीवर हात ठेवून म्हणेल,
"खूप दमतेस. थकलीस का?" पण तसं काही झालं नाही.

A Birthday Present मधे सांगते,
I am sure it is unique, I am sure it is what I want.
When I am quiet at my cooking, I feel it looking, I feel it thinking.
Measuring the flour, cutting of the surplus,
Adhering to rules, to rules, to rules.
स्कॉलरशिप म्हणा, की परिक्षेतलं यश म्हणा- सगळ्या सामाजिक निकषांवर खरं उतरल्यावर तरी मला स्वप्न पाहण्याचा अधिकार मिळेल का? ह्या तडफडीने यशाचा ध्यास घेतला. गणित आवडत नाही का? न आवडू दे- तरीही कायम A Grade! स्वयंपाक करतांनाही मन लावून, की एके दिवशी त्या स्वप्नातल्या राजकुमाराला आवडायला हवा ना?
ती- तिचं भावविश्व उत्तुंग होतं. जे शब्द माझ्या मर्यादेपलिकडे होते, त्या शब्दांना, त्यामागच्या भावनांसकट वापरायचं धैर्य तिच्याकडे होतं.
पण मग का कोणजाणे- थकायला झालं! स्वत:ला किती प्रयत्नाने समाजाच्या चौकटीत बसवूनही, मनाने ती चौकट कधीच स्वीकारली नाही, की खया अर्थाने तिला सन्मानाने वागवणारा, तसंच तिच्या सन्मानाला पात्र असणारा जीवनसाथी ही मिळाला नाही. वरवर बघता सगळं मिळूनही, एखाद्या शापाने सगळं कडूकडू होऊन शेवटी हाती काहीही लागू नये?
आधीच घुसमटलेल्या जीवाला एखाद्या प्रयोगशाळेतल्या Bell Jar मधे भरून ठेवल्यागत झालं. एखाद्या जन्माआधीच मृत्यू पावलेल्या गर्भाला भरून ठेवतात तस! तेच रूपक वापरून तिने तिची तिची आत्मकथा लिहिली.
The Bell Jar.