8/11/08

उलटी अमेरिका

आज कित्येक वर्षांनी पुन्हा
आई-बाबांचा हात धरून
उत्साहाने गेले फिरायला.
फक्त,
आज मी गोष्टी सांगतेय,
ते ऐकतात, कौतुहलाने!
मी रस्ते दाखवते,
ते येताहेत मागून
ह्या नव्या जगातली प्रत्येक गोष्ट
लहान मुलांच्या डोळ्यांनी
मनात साठवत....
“अय्या! इथे दारं उलटी, दिव्यांची बटनं उलटी,
गाड्या तर उलट्या धावतातच!”
“छे, इथल्या भाज्यांना चवच नाही मुळी!”
“बाSSSSSपरे! येवढ्या मोठ्या पार्किंग लॉट मधे, गाड्या फक्त तीन?”

------मीच बोलले नव्हते का ही वाक्य,
अमेरिकेतल्या माझ्या पहिल्या वहिल्या दिवशी?

पिढ्यांचं चक्रही, ह्या उलट्या अमेरिकेने उलटंच फिरवलंय की!
“तुम्हाला पोरं झाली की कळेल...” हे त्यांचं टिपिकल वाक्य.
“तुम्हाला इथे राहून थोडे दिवस झाले, की कळेल....” हे माझं.

मॉलमधे कपड्यांवरची लेबलं बघून
त्यांचे भांबावलेले चेहरे बघतांना
दाटून आला गळा-
वाटलं, त्यांनीही करावा माझ्याकडे हट्ट-
स्वेटर, घड्याळ, मोत्याची माळ
पर्स घेऊन देण्याचा.....
पण ३ डॉलरच्या कॉफीतच होतात शेवटी त्यांचे लाड
तेव्हा कळते त्यांची धडपड-
आपल्या बालपणीच्या लाखो मागण्या पूर्ण करायची!

कधीकधी होतातही वाद,
“तुम्हीच अमेरिकन झालात, तर तुमची पोरं कसली मराठी बोलणार?”
-----“पण त्यांनी मराठी बोलावं, हा अट्टहास का तुमचा?”
“आपण नायगराला पराठे घेऊन जाऊ...”
------ “ह्म्म....तुमच्या चवी काही बदलायच्या नाहीत!”
“इथे तुम्हाला माणसांचंच वावडं आहे!”
-------”हो, तिकडे शेजाऱ्यांना चांभार चौकशा असतात, त्यापेक्षा हेच बरं!”

पण आतून कधीतरी आपणही घातलेलेच असतात ना हे वाद स्वत:शी?
बर्गरला आपलं म्हणता येईपर्यंत गेलीच ना ५ वर्ष?
त्यांनीही अशीच समजून घेतली असेल ना- माझी स्वयंपाकाची नावड,
माझी नोकरीची जिद्द, मी उडवून लावलेले उपास-तापास......
साडी नेसून  दाखवण्याच्या कार्यक्रमाबद्द्ल पोटातून चीड!

आणि आज मी सांगतेय त्यांना,
की हे जे इथे असं आहे, ते तसंच स्वीकारावं लागतं.
इथल्या माणसांमधे, मिळून मिसळून रहावं लागतं- नव्हे, रहायला आवडतंही.

पण मग त्यांना विमानात बसवून आलो,
की हेच इथलं रोजचं जग अनोळखी वाटायला लागतं...
वैराण वाळवंटात येऊन पडल्याचा भास!
कसे विसरलो आपण जन्मापासून भारतात घेतलेले श्वास?
जाऊया का परत?

नकोच.
त्यांना मिळू दे आता इथे आपल्याकडे-
पुन्हा एकदा- एक निर्भर निश्चिंत बालपण.
म्हणतात ना, “लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते...”